विविधविषयपर पदे - षड्रिपु

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


१२११
( चाल-कामदा वृत्ताची )
फावली मज फावली मज । फावली मज हेंचि सांगतो तुज ॥ध्रु०॥
काळ ताडिले भोगाड फाडिले । बांधोनि पाडिले हे सद्गुरुकृपा ॥१॥
भवसिंधु आटले बंधन सुटले । जंजाळ तुटले हे गुरुकृपा ॥२॥
मन माजले तत्काळ गांजिले । देखोनि लाजले हे० ॥३॥
प्रपंच लटका तोडून तटका । काळासि फटका । हे० ॥४॥
रामी रंगला । जीवभाव भंगला । अभिमान खंगला । हे० ॥५॥
आनंद घटाव । ब्रह्म कटाव । थोर धिटाव । हे० ॥६॥
जळे दृश्य धडका । वैराग्य कडका । भ्रांति फडका । हे० ॥७॥
वृत्ति फुटावी । मुक्ति लुटावी । मायेसि दटावी । हे० ॥८॥
पाषांड उडाले । थोतांड बुडाले । ब्रह्मांड दडाले । हे० ॥९॥
रामदास रे । सदा उदास रे । मीपणा घास रे । करी सद्गुरुकृपा ॥१०॥

१२१२
( राग-काफी; ताल-दादरा )
समसमाधी रे तुटे उपाधी रे । जीत मेले मरोनि ज्याले ।
तेथे केविं समाधी रे ॥ध्रु०॥
सद्गुरुकृच्या बोले देहावसान जाले । आले गेले मेले नाही ।
भ्रांती फिटली आशंका तुटली । पालटले नाही कांही ॥१॥
गुरुपणाची कथा शिष्यपणाच्या माथां । आली जाले फार ओझे ।
शिष्य उबगला टाकुनी पळाला । नाचतो आनंदभोजे ॥२॥
खुळखुळी होइना उतटोन जाइना । माइना ये ब्रह्मांडी ।
परिणाम खुंटले नभ उतटले । खुंटली वाचा उदंडी ॥३॥
लिंपण सांडण सांडुनि टाकी । संगती साहो नेणे ।
सकळ खाय तरी न धाय । ऐसे कोणा सांगणे ॥४॥
बोलऊं गेले ते ही मेले । समाधि होऊनि ठेले ।
त्यांचि माय वाट पाहे । मागुती नाही आले ॥५॥
समाधी लादले ते ही समाधीस सुखावले ।
पायाळ जाले धन रे । आकाश जाउनि भस्म उधळुनि ।
साधिले सिद्ध साधन ॥६॥
रामीरामदास पळाला ब्रह्मारण्यी पडिला । आप आपणा जेवी ।
जीतो की मेला कळेना कवणाला । समाधी काशासी द्यावी ॥७॥

१२१३
( राग-भैरवी; ताल-धुमाळी )
कधिं बा रिकामा होसी रे । कवि संतां शरण जासी ॥ध्रु०॥
कधि नाम वाचे घेसी । कधी सद्गुरु वंदिसी ॥१॥
येतां जातां नाकळे कांही रे । बुडतोसी प्रपंचडोही रे ॥२॥
ऐसे करितां जन्म गेला । माझे माझे म्हणतां मेला रे ॥३॥
गुरुसि भजावे भावे रे । रामदासी रामचि व्हावे ॥४॥

१२१४
( राग-भैरव; ताल-धुमाळी )
कुबुद्धि त्यागावी सुबुद्धि लागावी ।
उत्तम गुण करुनि उंच पदवी पावावी ॥ध्रु०॥
नीतीने जावे न्याये वर्तावे ।
असत्य सांडुनी सत्ये पाठी लागावे ॥१॥
धर्म जोडावा अधर्म सोडावा ।
बळेंचि करुनि पाषांडाचा मार्ग मोडावा ॥२॥
ज्ञान शोधावे मानस बोधावे ।
रामदास म्हणे सज्जनसंगे विवरावे ॥३॥

१२१५
( राग-काफी; ताल-धुमाळी )
संग बरा जाणोनि धरा । हित करा करा विवरा ।
संगतीने पार उतरा ॥ध्रु०॥
संगतीने प्राणी नासती । संगतीने उत्तम गती ।
संगतीने जीती मरती ॥१॥
पापसंगे पापचि होते । पुण्यसंगे पुण्य लाभते ।
सर्व कांही कळत जाते ॥२॥
दास म्हणे सावधपणे । धन्य होणे सार्थक जिणे ।
येणे जाणे हे दैन्यवाणे ॥३॥

१२१६.
( चाल-धर्म जागो० )
वाड वेळ निजलासी । जाग जाग रे बापा ।
दुरी पंथ ठाकणे गा । मार्ग पावसी सोपा ॥ध्रु०॥
सज्जन संगतीची मनी धरी आवडी ।
विवेकजीवने गा ज्ञानदृष्टी उघडी ॥१॥
जागशील तरी बापा दिनउदय जाहला ।
निजतां निज गेले अंतसमय आला ॥२॥
घोरती थोर थोर अहंभाव मानसी ।
दिवसाची रात्री केली ते पडती फांसी ॥३॥
उठी काय निजलासी संतसंगती जावे ।
एकले जाववेना संसार मैदावे ॥४॥
संतसंग लाधलिया दास जागृती आला ।
अवस्थातीत होतां निजपद पावला ॥५॥

१२१७
( चाल-अर्जुना तूं जाण० )
वेगी ठाक ठोक रे, करी बोहणी रोख रे ।
उधाराचे काम नाही सांगतो मी ठीक रे ॥ध्रु०॥
साजे नाना रंग रे, होईल विरंग रे ।
काया वाचा मनो बुद्धी, सेवी साधुसंग रे ॥१॥
साराचे जे सार रे, सांगतो मी फार रे ।
रामीरामदास प्रभु, स्मरा वारंवार रे ॥२॥

१२१८
( राग-देस, ताल-दादरा )
तनमन वेधले रे वेधले । अंतर बोधले बोधले ॥ध्रु०॥
संतसंग दुल्लभ दुल्लभ । होत असे अलभ्याचा लाभ ॥१॥
जगी जगजीवनु कळला । कळला जवळी आकळला ॥२॥
अंतर देवचि जाहाले । दास म्हणे आत्म निवेदले ॥३॥

१२१९
( राग-भैरव; ताल-धुमाळी )
रंगा रे रंगी रंगा रे ॥ध्रु०॥
आपुले हित करणे जेही । आवडी धरावी संतसंगा रे ॥१॥
श्रवण मनन ध्यास धरावा । कथा पावन पापभंगा रे ॥२॥
दास म्हणे कथानिरुपण । संगचि करी निःसंगा रे ॥३॥

१२२०
( चाल-डफगाण्याची० )
मैलागिरीचे संगती । खैर धामाड चंदन होती ।
परि ते वेळुवाचे जाति । नव्हे चंदन ॥१॥
सहजगुणा त्या चंदना । बुरस गुण त्या हिंगणा ।
तैसे सज्जना आणि दुर्जनां । सहज गुण ॥२॥
सज्जन पदोपदी निववी । दुर्जन पदोपदी दुःख दावी ।
म्हणुनि आदरे करावी । सज्जनसेवा ॥३॥
नको दुर्जनाचा वारा । दुःख होतसे उबारा ।
मज न्यावे जी शेजारा । सज्जनाच्या ॥४॥
दास म्हणे भले गाईले । साधुसंतांसी मानीले ।
जैसे क्षीर निवडले । राजहंसी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP