करूणापर पदे - भाग ६

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे


१२९१
( चाल-कोण मी मज० )
काय करुं मज कंठत नाहीं ॥ भोगविलास न मानत कांहीं ॥ध्रु०॥
घर उदासीन रान उदासीन ॥ मन उदासीन होत चि आहे ॥१॥
बहुत तमासे सृष्टींत भासे ॥ देखत त्नासे अंतर माझें ॥२॥
दास म्हणे रे कर्ता पाहें ॥ शोधित आहे मन तयाला ॥३॥

१२९२
( चाल-नाममध्यें उ० )
नको दूरि धरुं राघवा कुडावें या । तुज कारणें उदास मीं सखया ।
तुजविण न गमे रे जीवा जिवाचिया । अवस्था लागली रे माहेरा माझिया ॥ध्रु०॥
काय करावें रे वैमव आम्हांसी । वृत्ति गुंतली राघवा तुजपाशीं ।
तुझिया वियोगें रे न कंठे मानसीं । रामा अंतर पडिलें बहु दूरी ।
राघवा तूंचि रे आमुचा कैवारी । सावा धांवा तुजविण कोण करी ॥२॥
रे या संसारें गांजिलें करूं काये । मज सांडुनी विवेक दुरि जाये ।
येथुनी सोडविता मज कोण आहे । रामा एक वेळ कृपाद्दष्टीं पाहे ॥३॥
इच्छाबंधनीं पडिलों सोडवावें । माझे अंतरीं राघवें प्रगटावें ।
मानस वैमवीं हे गुंतोंचि नेदावें । ब्रीद आपुलें स्वामीनें सांभाळावें ॥४॥
भाव कैंचा रे आम्हां अभाविकां । कीर्ति ऐकोनी शरण तुज एका ।
पतितपावन हें नाम टाकिलें कां । रामा धांव रे सांमालीं आम्हां रंकां ॥५॥
वाढ वेळ लाविला तूं कां रे धांवेनासी । करुणासिंधु कां रे आटलासी ।
काय करिसी माझिय अद्दष्टासी । कृपाळुवा तुज कणव न ये कैसी ॥६॥
जितुकें होतें तें स्वामीचें करणें । शब्द अनाथासी  कासया ठेवणें ।
रामदासीं कृपाळु राम तेणें । तोडिलें बंधन खुंटिलें येणें जाणें ॥७॥

१२९३
( राग-खमाज; ताल -धुमाळी )
आजीं भेटें गे रघुवीरे मी तुझें धाकुटें बालक । भवधूशरें भरलें माझें पुसीं वो श्रीमुख ॥ध्रु०॥
माझे जीवींचा जिव्हाळा सखा जिवलग सांगाती । आजीं भेटे रघुवीर माझ्या बाह्या स्फुरती ॥१॥
आजीं कंजती साळ्या माझे लवती लोचन । आजीं भेटेळ रघुवीर सुख दुःख सांगेन ॥२॥
रामीरामदासीं नित्य होताती शकुन । बाह्यांतरीं निज भेटि हितगुज सांगेन ॥३॥

१२९४
( चाल-नामामध्यें उत्त० )
सांडीं सांडीं गोपाळा नाना मतें रे । तुझ्या पायीं बुडालों चित्तें वित्तें रे ॥ध्रु०॥
गेली गेली प्रतिष्ठा या देहाची रे । केली केली सांडी त्या विभवाची रे ।
मोकलिली लाज या लौकिकाची रे । द्दढ चट तुझिये संगतीची रे ॥१॥
लपसी किती देखिलें तुज देवा रे । कळल्या आम्हां सकळ तुझ्या मावा रे ।
भुलविलें त्वां देवोनि वैमावा रे ॥ मायाजाळीं गोंविलें सर्व जीवां रे ॥२॥
चुकलों होतों परी सांपडलों जवळी रे । जवळीच लपतो वनमाळी रे ।
पाहों जातां न दिसे येहीं डोळीं रे । देहबुद्भि घालितो पायांतळीं रे ॥३॥
सगुण रूपें चाळक चाळवितो रे । जैसा भाव तैसाचि तेथें होतो रे ।
एका सिद्भीची लालुची दावितो रे । एका पद सगुण रुपें देतो रे ॥४॥
एका विद्या देउनि चाळविलें रे । एका ज्ञानेंसी प्रपंचीं गोंविलें रे ।
एका अभिमानें संगतीं लविलें रे । एका धोका देउनि बुडविलें रे ॥५॥
इतुकें करणें तूंचि करितोसी रे । गीतेमध्यें सांगितलें अर्जुनासी रे ।
इंद्रियचाळक मीच एक या मनासि रे । मीपन सांडितां मीच स्वयें होसी रे ॥६॥
तूंचि सर्व तरी कां मज म्हणासी जीव रे । ठकिले लोक ते फावलें लाघव रे ।
आतां न चले मी उडवीन गौरव रे । रामदासीं मी केलें वाव रे ॥७॥

१२९५
( राग-कल्यान; ताल-धुमाळी )
कमळदलनयना चाल हरी ॥ध्रु०॥
सकल पालका अंतरचालका । कठिणता न करीं ॥१॥
दीनदयाळा भक्तवत्सला । दूरी दुरी न घरी ॥२॥
रामदास म्हणे आतां तुजविन । उदासा वाटे तरी ॥३॥

१२९६
( राग-सारंग; ताल-धुमाळी; चाल-कधीं बा रिकामा० )
माझें मागणें तें किती । रामावल्लभा रघुपति ॥ध्रु०॥
लक्ष्मी मागुं रे ते तों माय । तिचा महिमा सांगूं काय ॥१॥
नलगे विकुंठ कैलास । नाहीं त्निभुवनाची आस ॥२॥
रामदास म्हणे द्यावें । जन्ममरणासी  न यावें ॥३॥

१२९७
( रग-कल्याण; ताल-धुमाळी )
रे राघवा देईं तुझें भजन रे ॥ध्रु०॥
अनुतापें त्याग वरी भक्तियोग । मानिति हें सज्जन ॥१॥
कीर्तन करावें नामें उद्भरावें । अंतरीं लागो ध्यान ॥२॥
दास म्हणे मन आत्मनिवेदन । सगुण समाधान ॥३॥

१२९८
( राग-सारंग; ताल-धुमाळी )
कल्याण करीं देवराया । जनहित विवरीं ॥ध्रु०॥
तळमळ तळमळ होत चि आहे । हे जन हातीं घरीं ॥१॥
अपराधी जन चुकत गेले । तुझा तूंचि सांवरीं ॥२॥
कठीण त्यावरि कठीण जालें । आतां न दिसे उरी ॥३॥
कोठें जावें काय करावें । आरंभली बोहरी ॥४॥
दास म्हणे आम्हीं केलें पावलों । दयेसि नाहीं सरी ॥५॥

१२९९
( चाल-रामा कृपा बहुत० )
अभिमानापासुनि सोडवावें । तुज न येतां शरण कुणा जावें रे रामा ॥ध्रु०॥
रे मी येत होतों तुझा तुजपाशीं । पंथ क्रमिला बहुत सायासीं ।
चित्त उतावेळ तुझिये भेटीसी । ऐसें जाणवलें अभिमानमैंदासी रे रामा ॥१॥
एवढे संकटीं आतां पावेला कोण । मज रे सोडविता नाहीं तुजविण ।
तुज बाहतां बहूत जाला शीण । धांव धांव आतां न पाहें निर्वाण ॥२॥
मज रे सिंहाच्या पिल्याची बाळलीळ । देखूनि जंबुकें मद केला आगळा ।
ऐसें जाणावलें श्रीरामदयाळा । रामदास केला अहंतेवेगळा ॥३॥

१३००
( राग-कमोद; ताल-धुमाळी; चाल-लावुनियां० )
नावरे निरंतर मन हें अनावर । आवरीं सत्वर देवराया रे ॥ध्रु०॥
माझींच पारखीं मज । म्हणोनि शरण तुज । शरणांगताची लाज राख रे रामा ॥१॥
तुझिया रंगणीं मन । धरितें अमिमान । तयासि निर्वान करिं देव रे ॥२॥
रामीरामदासीं भाव । धारितां प्रगटे देव । मनाचा स्बभाव पालटावा रे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 16, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP