विविधविषयपर पदे - षड्रिपु
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.
११८९.
( राग-मारु, ताल-धुमाळी )
हित गेले रे बापा हित गेले रे ।
जाणत जाणत तुवां ऐसे काय केले रे ॥ध्रु०॥
वरि वरि राम अंतरि काम । मानिले विषयसुख ।
प्रीति खोटी परि हे मोठी । होईल अति दुःख रे ॥१॥
द्रव्यहानी शक्तिहानी । महत्त्वहानि जाली ।
लावण्य जाऊनि हीन कळा । दीन दशा आली रे ॥२॥
आतां तरि सावधान । सोय धरुनी राहे ।
रामदास सांगताहे । मानेल तरी हे पाहे रे ॥३॥
११९०.
( राग-काफी; ताल-दादरा )
राग धरा राग धरा राग धरा तस्करु ॥ध्रु०॥
धरवेना । धरवेना शांती जीवी करवेना ॥१॥
राहवेना राहवेना । नीच उत्तर साहवेना ॥२॥
दास म्हणे बोध गेला क्रोध अवचित आला ॥३॥
११९१
( राग-हुसेनी; ताल-धुमाळी )
लोभे नाडिले वासनाबंदी पाडिले ॥ध्रु०॥
कैचे ज्ञान कैचे ध्यान । कैचे समाधान ॥१॥
कैंचि भक्ति कैचा भाव । कैचा देव आठवावा ॥२॥
कैंचा राम कैंचा दास । लागली आस ममतेची ॥३॥
११९२
( राग-हुसेनी; ताल-धुमाळी )
लोभ धरा लोभ धरा लोभ धरा तस्करु ॥ध्रु०॥
दीनानाथ करी सनाथ । सकळ अर्थ पुरवीता ॥१॥
भजन सार पैलपार । पावविता जड जीवा ॥२॥
रामदास मनी उदास । भजन सार करितसे ॥३॥
११९३.
( राग-काफी; ताल-दीपचंदी )
मानमदिरा भुलवी, सकळजन ॥ध्रु०॥
जग तृण मानी ऐसा तो विरळा ।
लोक शाहणे उगवी ॥१॥
लौकिक सांडुनि जाणेचि लागे ।
कवि जना शिकवी ॥२॥
११९४.
( राग-गौरी; ताल-धुमाळी )
वैभवा कोण पुसे । गेले रावणाऐसे ।
वैभव चालत नसे । रघुनाथी ॥ध्रु०॥
दंभ तोंवरि फावे । आहेत सर्वहि यावे ।
देह खंगतां जाणावे । खरे की खोटे ॥१॥
सत्य वाटे लटिके । जाणावे पूर्वपातक ।
सोडवीता नाही एक । रघुनायकावीण ॥२॥
रामदासाचा स्वामी । धरा हृदयी तुम्ही ।
वायां आसक्त कामी । गुंडाळो नका ॥३॥
११९५.
( राग-काफी; ताल-दीपचंदी )
ते काय हे काय योग काय भोग काय ॥ध्रु०॥
वरि वरि स्मरणी माळा काय । आंत हे चोढाळ काय ॥१॥
वरि वरि शाटीदंड काय । अंतरी हे भंड काय ॥२॥
वरि वरि ब्रह्मज्ञान काय । आंत मद्यपान काय ॥३॥
रामदासी भगली काय । ज्याचे भगले त्यासी खाय ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2011
TOP