उपदेशपर पदे - भाग ४

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे


१४६१
( राग-प्रभाती; ताल-धुमाळी )
आहा रे, आहा रे, ऐसें काय केलें ॥ दुर्ल्लभ आयुष्य तुझें व्यर्थ गेलें ॥ध्रु०॥
जननी कष्टली वांया जन्मलासी ॥ हरिभजनेंविण तूं तंव पापरासी ॥१॥
पूर्वजबुडवण्या निंदका रे ॥ हरिभक्तिवीण तृणतुल्य कां रे ॥२॥
दास म्हणें केलें कर्म पावसील ॥ रौख भोगितां तुज जाणवेल ॥३॥

१४६२
( राग-सिंधकाफी; ताल-दादरा )
नाहीं रे नाहीं रे नाहीं राहणें रे । आपुलें आपण हित पाहणें रे ॥ध्रु०॥
गेलें रे गेलें रे वय गेलें रे ॥ दिवसंदिवस काळें नेलें रे ॥१॥
देवासी नेणतां केला शीण रे ॥ अंतकाळीं होईल कठिण रे ॥२॥
सांवरासांवरी आतां करावी रे ॥ दास म्हणे भक्ति धरावी रे ॥३॥

१४६३
( चाल-धर्म जागो० )
सांकडींमध्यें पाहें । कष्टी जाहले थोर । कोणासी उपकार । नाहीं पाहिला विचार ॥ध्रु०॥
इरेचे दूर जाती । नाना विद्या शिकती । विद्येनें वाढताती । भाग्यवंत मानिती ॥१॥
गांवीं च वाढताती । ते तों करंटे होती । कोणी विद्या शिकताती । तरी विदेशा जाती ॥२॥
आपुल्या लोकांमध्यें । भाग्य वैभव आलें । परंतु ऐसा थोडा । प्रचितीनें निवाडा ॥३॥
दास म्हणे किती सांगों । किती सांगता भागों । कोणाचे पाठीं लागों । लोक लागती रागों ॥४॥

१४६४
( चाला-वरील )
आपुले गांवीं जाला । तेथें कोण वाढला । लोकांमध्यें कष्टी झाला । दुःख सांगों लागला ॥ध्रु०॥
आपुल्यांतून निघोनि गेलें । तेणें भाग्य भोगिलें । कदाचित्‌ गांवा आलें । लोक येळील केले ॥१॥
जाणोनी सावध होणें । प्रचितीचें बोलणें । मानेल तरी घेणें । नाहीं तरी सोडूनि देणें ॥२॥
झाडाखालें झाड नव्हे । सलगीमध्यें काहीं नव्हे । पाहावें होय नव्हे । न पाहतां नव्हे नव्हे ॥३॥
एरेचें काम आहे । इरेवीण न राहें । सांकडीचें दुःख आहे । दास म्हणे रे पाहें ॥४॥

१४६५
( राग-मारु; ताल-धुमाळी; चाल-देव पावला रे० )
जाईजणें रे वैमव जाईजणें रे । थोर थोर होउनि गेले परि हें नेलें कोणें रे ॥धु०॥
विधिकुलभूषण राक्षसमंडण । सांडुनि गेला रावण ॥१॥
एकट यावें एकट जावें । तरि कां गुंडाळावें ॥२॥
म्हणोनि त्यास केलें उदास । रामदास तेणें ॥३॥

१४६६
( राग-कामोद; ताल-धुमाळी; चाल-लावुनियां लोचन० )
संसार करिता गेला । ऐसा कोण उद्धरला । सीण चि उरला । सावकाश रे ॥ध्रु०॥
श्रीहरिभजनेंवीण । जाणावा सकळ सीण । दुःख तें कठीण । जाणवेल रे ॥१॥
जाईल सकळ सुख । उरेल निखळ दुःख । म्हणोनि ओळख । आपणासी रे ॥२॥
रामीरामदास म्हणे । सर्वहि जाईजणें । राग धरणें । मूर्खपण रे ॥३॥

१४६७
( राग-कामोद; ताल-धुमाळी )
लोकिकी बोलसी बोल । अंतरीं सकळ फोल । पाहतां न दिसे वोल । काय रे ॥ध्रु०॥
पुढीलां शिकवण । तेचि घ्यावी आपण । न घेतां सकळ शीण । आहे रे ॥१॥
सांगतां जन्म गेला । आपण तैसाचि ठेला । न घेतां कोण तरला । सांग रे ॥२॥
भाव नसतां पोटीं । व्यर्थचि आटाआटी । कासया करिसी खोटी । बुद्धि रे ॥३॥
रामीरामदास म्हणे । देवासी चोरावें कोणें । आतां तरी सावधान । होय रे ॥३॥

१४६९
( राग-सारंग; ताल-धुमाळी )
पहा रे जाणते हो । कितेक दिवस देहो ॥ध्रु०॥
एक चढे रे एक पडे रे । एक घडे विघडे रे ॥१॥
हांसत रडत कितेक गेले । गेले सकळहि निमाले ॥२॥
दास म्हणे मज कांहीं न साहे । देव सदोदित आहे ॥३॥

१४७०
( राग-कामोद; ताल-धुमाळी; चाल-कारण पाहिजे० )
जागेतचि निजेले जणोनि नेणते जाले । हातींचें निघोनि गेलें हित रे ॥ध्रु०॥
असोनि जवळी राम नेणती विश्रामधाम । तेणें गुणें होय भवभ्रम रे ॥१॥
सन्मुखचि चहूंकडे असोनि न सांपडे । मीपणें नातुडे रामरूप रे ॥२॥
घरींचे घरीं चोरी आपणचि खाणोरी । आपुला आपण घात करि रे ॥३॥
आपण करूं गेलें म्हणे हें विधीनें केलें । होणारीं घातलें जाणतांचि रे ॥४॥
आपणा मारिलें जीवें तया कोणें राखावें । रामदास सांगें जीवें भावें रे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP