नानाविध भक्ति - भाग १
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे
(१) श्रवन
१३७७
( राग-कल्याण; ताल-धुमाळी; चाल-सद्गुरु सेवीं० )
श्रोतीं असावें सावध । तेणें गुणें अर्थ होतसे विशद ॥ध्रु०॥
श्रोते श्रवणमननें । मननशीळ होतीं सुचित्त मनें ॥१॥
वाच्यांश सांडिला मागें । लक्ष्यांश पुढें भेदिला लागवेगें ॥२॥
तिनीं पाहाव्या प्रचिती । प्रचितीविण कदापि न घडे गति ॥३॥
दास म्हणे रे भावें । श्रोते तुम्हीं सावधान असावें ॥४॥
(२) कीर्तन.
१३७८
रामकथा दुल्लभ । दुल्लभ हे रामकथा ॥ध्रु०॥
सार साराचें हि सार । जाला त्निलोकीं विस्तार ॥१॥
जडजीवाचें जीवन । नाम पतितपावन ॥२॥
रामीरामदास म्हणे । संत जाणती शाहणे ॥३॥
१३७९
( राग-बरवा; ताल-दादर )
आनंदरूप गावें । गावें पदा उमगावें ॥ध्रु०॥
स्वरीं मिळावें । ताळीं मिळावें । मिळावें निवळावें ॥१॥
लिहीत जावेम वाचीत जावें । तान मान समजावें ॥२॥
पाठ करावें द्दढ धरावें । सर्वकाळ विवरावें ॥३॥
दंम त्यजावें नाचत जावें । दास म्हणे निज भावें ॥४॥
१३८०
( राग-जयजयवंती; ताल-धुमाळी. )
मानत मानत गावें । अंतर तें जगवावें । विरंग पडों नेदावें । जानतयांनीं रे कदा ॥ध्रु०॥
गायलें चि गाऊं नये । तेणेंचि विरंग होय । बहुत जनासी सोय । गायनकळा हे बरी ॥१॥
श्रोतयांचें मनोगत । तैसेंचि गावें संगीत । एकचित्त दुश्चित्त । समजत जावें बरें ॥२॥
दास म्हणे बहु गाती । सांगणें कोणासि किती । विवरतां कळे चित्तीं । सकळ कांहीं प्रसंगें ॥३॥
१३८१
( राग-कामोद; ताल-धुमाळी, चाल-लावुनिया लोचन० )
हरित दुरित कथा । रामाची पावन । श्रवन मनन करीं । करीं रे ॥ध्रु०॥
एक एक अक्षर । तारी भावसागर । धरावें अंतर । भविष्याचें रे ॥१॥
कथेचें आरत पोटीं । धरितां पूर्वजकोटी । उद्धरती उठाउठी । जाण रे ॥२॥
रामदास म्हणे साचें । अंतर सदाशिवाचें । सर्वकाळ वाचें । राम राम रे ॥३॥
१३८२
( राग-श्रीराग, ताल-धुमाळी )
भेक्षे भात परमान्न । न करितां साधन । तैसी हरिकथा जाण । भावार्थेंविण ॥१॥
चुना सुपारी पान । रंगेना कातेंविन । तैसी हरिकथा जाण । आवडीविण ॥२॥
दास म्हणे जीवन । सकळां समाधान । तैसी हरिकथा जाण । ज्ञानेंविण ॥३॥
१३८३
( राग-कामोद; ताल-धुमाळी; चाल-लावुनिया० )
कथेचें करोनि मिष । निंदा करी सावकाश । तया जगदीश । अंतरला रे ॥ध्रु०॥
धावणें नागवी त्यांसी । विष घेतां वैद्यापाशीं । जाऊनि तीर्थासी । दोष केले रे ॥१॥
अमृतसागरीं गेला । पोहतांचि बुडाला । आंनदीं असोनि जाला । दुःखी रे ॥२॥
पशु गेले वर्हाडें । तयापुढें काबाडें । सज्जना निदितें वेडें । जाण रे बापा ॥३॥
रामीरामदास म्हणे । हरिकथानिरूपणें । स्वहित करणें । सर्व काळ रे ॥४॥
१३८४
( राग-भूप; ताल-धुपाळी )
धन्य लीळा गायनी कळा । एकमेळा जीवीं जिव्हाळा । ताळबंद वाजती टाळा ॥ध्रु०॥
नाना छंदबंद प्रबंद । रसिक पदें पद विशद । प्रेमभरें नाचती छंदें ॥१॥
रामदास मनीं उदास । रात्नंदिस देवाची वास । निजध्यास मनीं प्रकाशे ॥२॥
१३८५
( राग-जयंत; ताल-त्निताल )
मनु हा वेधला हो मनु० ॥ध्रु०॥
रंगित मानस संगित सज्जन । मज्जन होत मनु ॥ देखत देखत रंगत रंगत रंगा सुरंग तनु ॥१॥
खण खण खण खण ताळ उमाळे । झन झण झण झण तंत । तंत वितंत संत आळापें । गायक संत महंत ॥२॥
धिकिटी थोंगिताता धिकिटि थोंगिताताथै । द्रिगिदां द्रिगिदां झंकिटि किटि किटि ततीं गणधतीं गणथैं ॥३॥
नाना बदें प्रबंदें छंदें हरिदास विळास वसे । नाना गंध सुगंध विलेपन । राम आराम दिसे ॥४॥
१३८६
( राग-अहेरी; ताल-धुमाळी )
वोळला रे रंग वोळला रे । टाळमृदंगें भव्य कल्लोळला रे ॥ध्रु०॥
नाहीं विताळाचा लेश । ताळाबंधें सुंदर वेष । कथेमध्यें तो जगदीश । भक्तांलागीं तिष्ठतु ॥१॥
कीर्ति प्रतापाचें गाणें । भक्तांलागीं श्लाध्यवाणें । नाना संमती पुराणें । वाग्विलास होतसे ॥२॥
जेथें कथानिरूपण । तेंचि उत्तम लक्षण । रामदास सांगे खूण । गावें गुण विचारें ॥३॥
१३८७
( राग श्रीराग; । ताल-धुमाळी )
ताळमृदांगघमंडी । मिळोनि जातां उठे अधिक आवडी ॥ध्रु०॥
ताळमृदांग ताळया । पदें करुनि मेळवी नाचतया ॥१॥
मागं पुढें चळों नका । चळतां बैसें विताळाचा येऊनि धका ॥२॥
दास म्हणे बरें सांभाळा । विताळी तो विताळेंचि पडे वेगळा ॥३॥
१३८८
( राग-जयजयवंती; ताल-धुमाळी )
तानें स्वर रंगवाचा । मग तो रघूनाथ ध्यावा । साहित संगीत यावा । कथेचा प्रसंग बरा ॥ध्रु०॥
तानें स्वर भिजाविला । तेथें ताळ मेळविला । अर्थ प्रबंदीं मिळाला । रंगरस म्हणिजे याला ॥१॥
गाणार वाजविणार तैसेचि ऐकणारे । बहुकळा नृत्यकार । घमंड तडाका गाजे ॥२॥
दास म्हणे सावधान । सकळांचें एक मन । तेणें गुणें समाधान । इतर जनांसी होतें ॥३॥
१३८९
( राग-कामोद; ताल-द्रुतएकताल )
विमळगुणशीळ वर्णितां मार्तंडकूळ । वाचा हे बरळ होताहे रे ॥ध्रु०॥
नित्य निरंतर आठवे रघुवीर । कीर्तनतत्पर मन माझें रे ॥१॥
टाळ घोळ मृदंग रंगीं रंगला रंग । सज्जनाचा संग मनीं भावीं रे ॥२॥
वेधीं वेघलें मन जाहलें समाधान । लागलेंसे ध्यान राघवाचें ॥३॥
१३९०
( राग-कफी; ताल-धुमाळी; चाल-सामर्थ्या० )
रंगामध्यें रंग कथेचा प्रसंग । होत असे धिंग वाजती मृदंग ॥ध्रु०॥
टाळा खणखणाटें नामाच्या बोभाटें । कीर्ति घडघडाटें हरिदासांची थाटें ॥१॥
एकें अनुसंधानें एक होति मनें । मग तें सुमनें मान्य होती जनें ॥२॥
वैराग्याच्या वाटा भक्तीचा चोहटा । देउनीयां दाटा तेथें काळा लाटा ॥३॥
चौ देहांचा झाडा पाहतां निवाडा । विचार उघडा येणें पंथें चढा ॥४॥
सज्जनांच्या खुणा जाणे तो शाहणा । नव्हे दैन्यवाणा दास म्हणे बाणा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 16, 2011
TOP