मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
नामस्मरण.

विविध विषय - नामस्मरण.

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


५५१ .

भवव्यथेसी औषध । रामनाम हे प्रसिद्ध ॥१॥

हिंडणे न लगे रानोरान । पथ्येविण मुक्त होणे ॥२॥

रामीरामदास म्हणे । मज प्रचीत आली येणे ॥३॥

५५२ .

द्रव्य दारा जनी कदा नव्हे धणी । तैसे नाम वाणी असो द्यावे ॥१॥

रात्रंदिवस द्रव्यदारेचे चिंतन । तैसे लावी मन राघवासी ॥२॥

राघवासी मन लावितां आनंद । तेणे तुटे खेद संसारीचा ॥३॥

संसारीचा खेद संसारिका होय । जया नाही सोय राघवाची ॥४॥

राघवाची सोय पूर्व पुण्ये होय । अंतीचा उपाय दास म्हणे ॥५॥

५५३ .

बैसेना ते कां हो श्रीरामा हे मन । ऐका त्याचा गुण सांगतो मी ॥१॥

कुकर्मी जन्मीचा पापाचा पर्वत । त्याचे कैसे चित्त वोळे नामी ॥२॥

रोगिया पक्वान्न आवडेना जैसे । पापियास तैसे रामनाम ॥३॥

रामनामनिष्ठा बैसेना हळुवटा । करंट्यासी ताठा अविद्येचा ॥४॥

रामदास म्हणे सुकृतावांचोनी । रामनामी मन स्थिरावेना ॥५॥

५५४ .

मुक्तपणे करी नामाचा अव्हेरु । तरी तो गव्हारु मुक्त नव्हे ॥१॥

मुक्त नव्हे काय स्वये शूलपाणी । रामनाम वाणी उच्चारितो ॥२॥

उच्चारितो शिव तेथे किती जीव । बापुडे मानव देहधारी ॥३॥

देहधारी नर धन्य तो साचार । वाचे निरंतर रामनाम ॥४॥

रामनाम वाचे रुप अभ्यंतरी । धन्य तो संसारी दास म्हणे ॥५॥

५५५ .

रामनामेविण कांही । अंती सोडविते नाही ॥ध्रु०॥

थोर थोर योगेश्वर । अथवा प्रपंची इतर ॥१॥

थोरपणे धरिती ताठा । तरि तो नागवला करं‍टा ॥२॥

बहुत पूजिली दैवते । योगयागे नाना मते ॥३॥

धोती पोती आणि भुजंगी । लोली कर्म करिती योगी ॥४॥

विनवी रामीरामदास । नाना साधन सायास ॥५॥

५५६ .

आत्मज्ञानी आहे भला । आणि संशय उठिला ॥१॥

त्यास नामचि कारण । नामे शोकनिवारण ॥२॥

नाना दोष केले जनी । अनुताप आला मनी ॥३॥

रामीरामदास म्हणे । जया स्वहित करणे ॥४॥

५५७ .

कलि पातकाचा निधि । एक मोठी कार्यसिद्धि ॥१॥

रामनागाच्या गजरे । कैवल्यचि एकसरे ॥२॥

नाम स्मरतां वैखरी । आळस न करावा चतुरी ॥३॥

नामामृत संजीवनी । मृत्यु निरसिला सज्जनी ॥४॥

रामीरामदास म्हणे । अनुभवाची हे खुण ॥५॥

५५८ .

आरंभी वंदीन आयोध्येचा राजा । भक्तांचिया काजा पावतसे ॥१॥

पावतसे महा संकटी निर्वाणी । रामनाम वाणी उच्चारितां ॥२॥

उच्चारितां राम होय पापक्षय । पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ॥३॥

पुण्यभूमि पुण्यवंतांसी आठवे । पापिया नाठवे कांही केल्या ॥४॥

कांही केल्या तुझे मन पालटेना । दास म्हणे जनां सावधान ॥५॥

५५९ .

सकळ साधनांचे फळ । रामनामचि केवळ ॥१॥

जप तप अनुष्ठान । अंती नामचि प्रमाण ॥२॥

नाना मंत्र यंत्रावळी । सोडवीना अंतकाळी ॥३॥

महापातकी पतित । नामे तारिले अनंत ॥४॥

नाम साराचेही सार । नाम सकळांसी आधार ॥५॥

दास म्हणे सांगो किती । नामेंविण नाही गती ॥६॥

५६० .

सोडी वाउगी वाचाळी । ऐक रामनामावळी ॥१॥

प्रेमे सोड देहबुद्धि । मांडी श्रवणी समाधि ॥२॥

रामीरामदास म्हणे । ऐसे आपुलेचि जाण ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP