मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
नवविधा भक्ति.

विविध विषय - नवविधा भक्ति.

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


५२१ .

कथा भगवंताची सार । सकळ तीर्थांचे माहेर ॥१॥

सेतुबंध वाराणसी । पुण्य लाभे हरिकथेसी ॥२॥

गंगा यमुना सरस्वती । कृष्णा वेण्या भागीरथी ॥३॥

दास म्हणे संतसंगे । सदा कथेचा प्रसंग ॥४॥

५२२ .

निरुपणाऐसे नाही समाधान । आणिक साधन आढळेना ॥१॥

भक्ति ज्ञान घडे वैराग्य आतुडे । भावार्थ सांपडे निरुपणे ॥२॥

शांति क्षमा दया नैराश्यता मनी । अवस्था उन्मनी निरुपणे ॥३॥

ऋद्धि सिद्धि दासी होती निरुपणे । श्रवणे मनने निजध्यासे ॥४॥

भ्रांतीचा संदेह तुटे एकसरां । दास म्हणे करा निरुपण ॥५॥

५२३ .

निरुपणे भक्ति निरुपणे ज्ञान । अनुताप पूर्ण निरुपणे ॥१॥

निरुपणे योग योगाचा संयोग । निरुपणे त्याग घडतसे ॥२॥

घडतसे सर्व कांही निरुपणे । बाणती लक्षणे सज्जनाची ॥३॥

सज्जनाची मते सज्जन जाणती । येर ते नेणती जाणपणे ॥४॥

जाणत्या नेणत्या होय समाधान । करावे मनन संगातीत ॥५॥

५२४ .

निरुपणी जनी लाभे सर्व कांही । दुजे ऐसे नाही पाहो जाता ॥१॥

साराचेहि सार वेदां अगोचर । ते लाभे साचार निरुपणे ॥२॥

दाखवितां नये बोलिले न जाय । त्याची कळे सोय निरुपणे ॥३॥

मनासी नाकळे मीपणा नाडळे । ते गुज निवळे निरुपणे ॥४॥

व्युत्पत्तीचे कोडे तर्काचे सांकडे । ते जोडे रोकडे निरुपणे ॥५॥

मन हे चंचळ ते होय निश्चळ । साधनाचे फळ दास म्हणे ॥६॥

५२५ .

गतीचे लक्षण हेंचि हे प्रमाण । श्रवण मनन सर्वकाळ ॥१॥

सर्वकाळ सारासार विचारणा । वस्तूची चाळणा निरंतर ॥२॥

निरंतर ध्यास लागला अंतरी । धारणा हे धरी निर्गुणाची ॥३॥

निर्गुणसंगती निर्गुण होइजे । प्रत्यावृत्ति कीजे निरुपण ॥४॥

निरुपणे होय अलभ्याचा लाभ । साधन सुलभ दास म्हणे ॥५॥

५२६ .

सर्व समाधान होय निरुपणे । परी जाणपणे बुडवीले ॥१॥

बुडविले देहातीत समाधान । देहअभिमान वाढवीला ॥२॥

वाढविला तर्क वायां निरुपणी । जाणिवे पापिणी काय केले ॥३॥

काय केले ऐसे जाणत जाणतां । स्वरुपी अहंत कामा नये ॥४॥

कामा नये देहबुद्धीचे जाणणे । दास निरुपणे सावधान ॥५॥

५२७ .

केलेंचि करावे पुन्हां निरुपण । तरि बाणे खूण कांही एक ॥१॥

कांही एक काळ निरुपणे गेला । तोचि एक भला समाधानी ॥२॥

समाधानी भला निरुपणे राहे । पाहिलेंचि पाहे निरुपण ॥३॥

निरुपण पाहे श्रवण मनन । होय समाधान निजध्यासे ॥४॥

निजध्यास मनी वस्तूचा करावा । संसार तरावा दास म्हणे ॥५॥

५२८ .

एकदां जेवितां नव्हे समाधान । प्रतिदिनी अन्न खाणे लागे ॥१॥

तैसे निरुपण केलेचि करावे । परी न करावे उदासीन ॥२॥

प्रतिदिनी अन्न प्रतिदिनी जीवन । देहसंरक्षण करावया ॥३॥

प्रत्यही संसारी बोलावे लागते । कांही केलिया ते सुटेना की ॥४॥

प्रत्यही हा देहो पाहावा लागतो । शुद्ध करावा तो रात्रंदिस ॥५॥

प्रत्यही देहाने भोगिले भोगावे । त्यागिले त्यागावे दास म्हणे ॥६॥

५२९ .

वस्तूचा निर्धार होय पारंपार । साधनाचे सार निरुपण ॥१॥

निरुपणाऐसे सार नाही दुजे । जेणे सर्व बीजे हातां येती ॥२॥

हातां येती बीजे ज्ञानाची सहजे । निःसंदेह भोजे नाचतसे ॥३॥

नाचतसे सदा विवेक अंतरी । मायामोहपुरी बुडो नेदी ॥४॥

बुडो नेदी कदा काळी निरुपण । रामदास खूण सांगतसे ॥५॥

५३० .

निरुपण सार अद्वैत करावे । तेणे उद्धरावे निश्चयेसी ॥१॥

निश्चयेसी पाहे आपुली ओळखी । तोचि एक सुखी जनांमध्ये ॥२॥

जनांमध्ये सुखी परत्रसाधने । संसारबंधने तया नाही ॥३॥

तया नाही देहबुद्धीची अहंता । देही विदेहता वस्तुरुप ॥४॥

वस्तुरुप आहे मीपण त्यागितां । शाश्वत भोगितां दास मुक्त ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP