मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
अध्यात्म

विविध विषय - अध्यात्म

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


८२१.
तत्त्वपसि आणि अहं ब्रह्म ऐसे । जाण हे विश्वासे महावाक्य ॥१॥
अयमात्मा ब्रह्म आणि ज्ञानब्रह्म । दास म्हणे वर्म वेदवाक्य ॥२॥
वेदवाक्य रामीरामदास पाहे । मुख्य पद लाहे निवेदने ॥३॥

८२२.
देव हे समर्थ आणि देहधारी । कष्टी परोपरी ब्रह्मादिक ॥१॥
ब्रह्मादिक तया रावणाचे बंदी । दैत्य उणी संधी पाहताती ॥२॥
पाहताती एकी केल्या हजामती । रासभे राखती एक देव ॥३॥
देवचि गादले बहु दगदले । कासावीस जाले कारागृही ॥४॥
कारागृही देहसंबंधाने होती । विवेके राहाती देहातीत ॥५॥
देहातीत दुःख सांडुनी संसार । येथे काय सार सांपडले ॥६॥
सांपडले नाही कष्ट जन्मवरी । दीनाचिये परी दैन्यवाणे ॥७॥
दैन्यवाणे देव जाहले संसारी । मनुष्याचा करी कोण लेखा ॥८॥
लेखा नाही ऐसे कासया करावे । निश्चळचि व्हावे दास म्हणे ॥९॥

८२३.
राघवाचे घरी सदा निरुपण । श्रवण मनन निजध्यास ॥१॥
निजध्यासे सत्य प्रचीत बाणली । साक्षात्कारे जाली सायुज्यता ॥२॥
सायुज्यता मुक्ति विवेके पहावी । अंतरी रहावी विचारणा ॥३॥
विचारणा सारासार थोर आहे । अनुभवे पाहे साधका रे ॥४॥
साधका रे साध्य तूंचि तूं आहेसी । रामीरामदासी समाधान ॥५॥

८२४.
दुर्लभ हा जन्म विशेष नरदेह । याहिवरी सोय राघवाची ॥१॥
राघवाची सोय सद्भाव भजन । आणि संतजन समागमी ॥२॥
समागमी संत श्रवणी निवांत । अनंताचा अंत ठायी पाडी ॥३॥
ठायी पाडी देव संतसमागमे । आपुल्या स्वधर्मे पुण्यशीळ ॥४॥
पुण्यशीळ देह ज्ञाने निःसंदेह । सर्वकाळ राहे सस्वरुपी ॥५॥
सस्वरुपी मन गेलियां उन्मन । मग मिथ्या भान आढळेना ॥६॥
आढळेना कदा मिथ्या मायाजाळ । तोचि तो केवळ समाधानी ॥७॥
समाधान साधू जेथे ज्ञानबोधू । रामदासी वेधु स्वरुपाचा ॥८॥

८२५.
ओकितां ओकितां मन कंटाळले । राखेने झांकिले सावकाश ॥१॥
सावकाश तया कोण अभिळासी । कोणाला असोसी कासयाची ॥२॥
कासयाची आतां वासना धरावी । गोडी विवरावी विषयांची ॥३॥
विषयांची गोडी कंटाळले मन । नागवले जन असोसीचे ॥४॥
असोसीचे जन ते जन्म घेईल । जीवचि देईल विषयांसी ॥५॥
विषयांसी वीट मनापासुनीयां । निर्वासना तया जन्म नाही ॥६॥
जन्म नाही ऐसे केले देवराये । वासना उपाये सोडविली ॥७॥
सोडविली देव धन्य दयानिधि । तुटली उपाधि सर्व कांही ॥८॥
सर्व कांही नाही हेंचि हे प्रमाण । दास म्हणे खूण देव जाणे ॥९॥
देव जाणे सर्व राहिला विकार । ब्रह्म निर्विकार दास म्हणे ॥१०॥

८२६.
ऐका ऐका थांबा थांबा । वांया अधोगति कां लोंबा ।
जाउनी निरंजनासी झोंबा । लागवेगे ॥१॥
वाउनी विवेकाच्या थापा । काळा विक्राळाला दापा ।
कोपा अहंकाराला कापा विचाराने ॥२॥
दास म्हणे रे तगटा । ज्ञाने भ्रमाला झुगटा ।
मीपण सांडुनि लिगटा । निरंजनी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 29, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP