मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
अध्यात्म

विविध विषय - अध्यात्म

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


८२८.
दिसे ते नासेल सर्वत्र जाणती । या बोला वित्पत्ती काय काज ॥१॥
काज कारण हा विवेक पाहिजे । तरीच लाहिजे शाश्वतासी ॥२॥
शाश्वतासी येणे जाणे हे न घडे । आकार हा मोडे दास म्हणे ॥३॥

८२९.
छायेमाजी छाया लोपे । तरि काय पुरुष हरपे ॥१॥
तैसा देह लोपतां जाण । कदा न घडे मरण ॥२॥
खेळा अंती डाव हरपत । तरी कां नटासि आला मृत्यु ॥३॥
रामदासी रामी राम । जन्म मरणे कैचा भ्रम ॥४॥

८३०.
सृष्टि नांदताहे सर्व लोक पाहे । तया अंतरी हे परब्रह्म ॥१॥
परब्रह्म आहे निर्मळ निश्चळ । चंचळ चपळ सृष्टि नांदे ॥२॥
सृष्टि नांदे तिचे शोधावे अंतर । नित्य निरंतर ओळखावे ॥३॥
ओळखावे निजगुज वेदबीज । सहजे सहज सदोदित ॥४॥
सदोदित देव येर सर्व माव । ऐसा अभिप्राव दास म्हणे ॥५॥

८३१.
बहुरत्ना वसुंधरा । मायादेवीचा पसारा ॥१॥
अहो बोलतां सरेना । अवघे आयुष्य पुरेना ॥२॥
नाना भेद नाना मते । बहुविध असंख्याते ॥३॥
दास म्हणे नवलपरी । सृष्टि वर्ते नानापरी ॥४॥

८३२.
पडसादेसी करी वाद । खळाळा सवेंचि वेवाद ॥१॥
तेथे चालेना मीपण । शीण पावावा आपण ॥२॥
व्यवधानासवे जावे । प्रतिबिंबेसी भांडावे ॥३॥
रामदास म्हणे जीवे । समुद्रासी गडगडावे ॥४॥

८३३.
सांत बोले बहुविध । तेथे कैंचे एकविध ॥१॥
तेथे कोणासी भांडावे । कोणा पंथासी मांडावे ॥२॥
बहु यात्रा पृथ्वीवरी । बहु शब्द परोपरी ॥३॥
नाना सैन्य नाना पुरे । दास म्हणे ते उत्तरे ॥४॥

८३४.
माया अविद्येचे बंड । नाना प्रकारी थोतांड ॥१॥
अवघे सोडूनियां द्यावे । एका भगवंता पहावे ॥२॥
पंचभूतांचा मेळावा । दृश्य पदार्थ आघवा ॥३॥
म्हणे रामीरामदास । दृश्यभास मनोभास ॥४॥

८३५.
बहु रुपे दिसती बहुरुपी दिसेना । खेळवितो नाना बहुरुपे ॥१॥
खेळ हा मांडला उणे कांही नाही । खेळाकारे पाही आलया रे ॥२॥
बोलवी चालवी सोंग संपादणी । जयाची करणी तो शोधावा ॥३॥
रामदास म्हणे सोंगेचि दिसतो । खेळत्याची गती तोचि जाणे ॥४॥

८३६.
बाह्य नारिकेळ भीतरी करोटी । तैसी परी सृष्टि सस्वरुपी ॥१॥
सस्वरुपी माया जैसी द्रुमी छाया । कां ते भासे वायां मृगजळ ॥२॥
मृगजळ भासे मार्तंडाकरितां । स्वरुपी पाहतां बिंब नाही ॥३॥
नाही जेथे बिंब कैंचे प्रतिबिंब । एकचि स्वयंभ सस्वरुप ॥४॥
सस्वरुपी भास नाथिला आभास । धरिजे विश्वास दास म्हणे ॥५॥

८३७.
कण सांडुनीयां घेऊं नये भूस । गर्भेविण फणस खाऊं नये ॥१॥
खाऊं नये नारिकेळाचे करोटे । सालपट खोटे डाळिंबाचे ॥२॥
डाळिंबाची त्वचा चोवड ऊंसाचा । स्तंभ कर्दळीचा खातां नये ॥३॥
खातां नये नाना फळांची आंठोळी । असो हे वाचाळी वाउगीच ॥४॥
वाउगे सांडुनी सार तेंचि घ्यावे । येर ते सांडावे मिथ्याभूत ॥५॥
मिथ्याभूत जे जे तत्त्व दृष्टी पडे । म्हणोनियां घडे त्याग त्याचा ॥६॥
त्याग त्याचा कीजे जे मने कल्पावे । मग अनुभवे जाणिजेल ॥७॥
जाणिजेल सार त्यागितां असार । बोलावा विस्तार कासयासी ॥८॥
कासयासी आतां धरावा संदेहो । कल्पनेचा देहो नाशिवंत ॥९॥
नाशिवंत आहे नाम आणि रुप । पाहे आपेआप दास म्हणे ॥१०॥

८३८.
लागलासे मुळी हा देहसमंधु । करीतसे खेदु अहंभाव ॥१॥
अहंभाव कदा नये पुरवल्या । भवभ्रमे जाल्या दुःखरासी ॥२॥
दुःखरासी जाल्या देहाच्या संबंधे । सर्व ज्ञानबोधे तुटतील ॥३॥
तुटती संबंध संतांचे राहणी । होईल झाडणी पंचभूतां ॥४॥
पंचभूतां लय स्वरुपाअन्वये । तुटला संशय साधनाचा ॥५॥

८३९.
स्वप्नी जे देखिले स्वप्नावारी गेले । जागृतीने केले तेंचि खरे ॥१॥
तेंचि खरे होते येर सर्व जाते । तैसे ज्ञानियाते संसारिक ॥२॥
संसारींची माया जाईल विलया । जाणाराची वायां चिंता काय ॥३॥
चिंता काय आतां स्वप्नींच्या सुखाची । सर्व चाले तोंचि बरे दिसे ॥४॥
बरे दिसे तरी ज्ञाते न मानिती । दास म्हणे स्थिति पालटेना ॥५॥

८४०.
जे जे कांही दिसे ते ते सर्व नासे । अविनाश असे आत्मरुप ॥१॥
आत्मरुपी दृष्टि घातिलां निवळे । आपेआप कळे मिथ्या माया ॥२॥
मिथ्या माया वाटे साचाचिसारिखी । स्वरुपी ओळखी जंव नाही ॥३॥
जंव नाही जाली संदेहनिवृत्ति । तंव हे प्रचीति जाणवेना ॥४॥
जाणवेना मनी निश्वयावांचूनी । निश्वयो श्रवणी दास म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 29, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP