मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
करुणा प्रार्थना

विविध विषय - करुणा प्रार्थना

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


३४१ .

उदरांचा राणा देवांचे मंडण । वेगी माझे गुण पालटावे ॥१॥

हेंचि आतां मज देई रे राघवा । माझी चिंता देवा असो द्यावी ॥२॥

मज अभाविका भावार्थ लागावा । विकल्प त्यागावा अंतरीचा ॥३॥

सर्वकाळ ध्यान तुझेचि चिंतन । ऐसे माझे मन करी देवा ॥४॥

परस्त्रीकांचना निर्मळ वासना । तुझिया भजना सावधान ॥५॥

माझे उणे पुरे देवे सांभाळावे । सनाथ करावे दास म्हणे ॥६॥

३४२ .

उतावेळ चित्त भेटीचे आरत । पुरवी मनोरथ मायबापा ॥१॥

रात्रंदिस जीव लागलासे झासा । उच्चाट मानसा वाटतसे ॥२॥

पराधेन जिणे काय करुं रामा । नेईं निजधामा माहियेरा ॥३॥

तुजविण रामा मज कोण आहे । विचारुनि पाहे मायबाप ॥४॥

रामीरामदास बहू निर्बूजला । मीतूंपणा ठेला बोळवोनी ॥५॥

३४३ .

तुजविण देवा मज कोणी नाही । माझी चिंता कांही असो द्यावी ॥१॥

वैराग्ये कनिष्ठ अभावे वरिष्ठ । माझे मनी नष्ट संदेहता ॥२॥

विवेके सांडिले ज्ञाने वोसंडिले । चित्त हे लागले तुझे पायी ॥३॥

विद्या ना वैभव नेणे हावभाव । परि माझा भाव तुझ्या पायी ॥४॥

तुझे नाम वाचे उच्चारित असे । अंतरी विश्वासे धरियेले ॥५॥

रामदास म्हणे मी तुझे अज्ञान । माझे समाधान करी देवा ॥६॥

३४४ .

संसार करावा जीवे सर्व भावे । तुज विसंभावे अंतरंगा ॥१॥

ऐसे मज नको करुं रे राघवा । माझा सावाधावा तूंचि एक ॥२॥

स्वये महापापी पापचि वर्तावे । सज्जना निंदावे सावकाश ॥३॥

दोष राहाटणे या पोटाकारणे । सज्जनाचे उणे काढूं पाहे ॥४॥

कर्म करवेना धारणा धरवेना । भक्ति उपासना अंतरली ॥५॥

विषयांचे ध्यान लागले अंतरी । दंभ लोकाचारी खटाटोप ॥६॥

निष्ठा भ्रष्ट जाली स्नानसंध्या गेली । दुराशा लागली कांचनाची ॥७॥

देवधर्म धडे ते ठायी वेंचीना । पुण्य ते सांचीना कदाकाळी ॥८॥

स्वधर्म स्वधर्म बुडाला परिग्रहे नेला । वेवादी दादुला भंडरुपी ॥९॥

अशक्त दुर्जन पाहे परन्यून । अभिळासी मन गुंतलेसे ॥१०॥

कीर्तनी बैसला पाहे परनारी । परद्रव्यावरी मन गेले ॥११॥

न दिसे अंतरी देवाची आवडी । पापरुपी जोडी पापराशी ॥१२॥

काम क्रोध दंभ लोभ मोह माया । कीर्तनाच्या ठायां समागम ॥१३॥

घातला उदकी न भिजे पाषाण । हृदय कठिण तयापरी ॥१४॥

स्वये नेणे हित श्रवणी दुश्चित । चंचळ हे चित्त स्थिर नाही ॥१५॥

तुझिये रंगणी राहे अभिमान । नाही समाधान दास म्हणे ॥१६॥

३४५ .

राघोबा उदारा ये माझ्या मंदिरा । जानकीच्या वरा रामराया ॥१॥

संसाराच्या संगे फार दुःखी जालो । म्हणोनिया आलो शरण तुज ॥२॥

चित्त निरंतर जडले तुझे पायी । धांवोनिया येई रामराया ॥३॥

त्राहे त्राहे त्राहे वाट तुझी पाहे । येऊनियां राहे हृदयामाजी ॥४॥

प्रेमे स्फुंदताहे उभारोनि बाहे । वाट तुझे पाहे रामदास ॥५॥

३४६ .

बिभीषण भावे शरण आला परी । तुज सिंधुतीरी ऐकुनीयां ॥१॥

तात्काळाचि तुवां आश्वासिले त्यासी । तैसे हे आम्हांसी रे कैचे रामा ॥ध्रु०॥

धारिष्ट आमुचे पाहे सर्वोत्तमा । कलियुगीचे रे रामा दास तुझे ॥२॥

दर्शन सुग्रीवा आधी सौख्य दिले । मग तेणे केले रे दास्य तुझे ॥३॥

तुजलागी प्राण वेंचिले वानरी । परि तूं धनुर्धारी रे पाठीराखा ॥४॥

तुझे रुप दृष्टी नसोनीयां ठावे । नामी सर्वभावे विश्वासले ॥५॥

सकळांहूनि साना रामदास जालो । परिवारेंसि आलो शरण तुज ॥६॥

३४७ .

गणिकेने देवा काय भजन केले । संकेते घेतले नाम तूझे ॥१॥

काय त्या नामाची वीरे गेली आतां । सांग बा रघुनाथा मायबाप ॥२॥

तैं तुज होते दिनानाथपण । आतां उद्यापन केले त्याचे ॥३॥

पातकाचा निधी अजामेळ जाण । स्मरे नारायण पुत्र मोहे ॥४॥

तयासाठी कैसे विमान उतरावे । आम्हा न पावावे शरणागत ॥५॥

रामदास म्हणे न बोले पुढती । उगला चि श्रीपति येई आतां ॥६॥

३४८ .

तरियेला शिळा किर्ति दिगंतरी । त्याहुनी मी भारी जड जालो ॥१॥

परद्वारी नारी वेश्या हे कुंटिणी । राघवस्मरणे तरियेली ॥२॥

अजामेळ पापी पातकी ब्राह्मण । पुत्र नारायण म्हणताम तरला ॥३॥

ऐसे त्वां पतित अनंत तरिले । किती उद्धरीले असंख्यात ॥४॥

रामदास म्हणे म्यांचि काय केले । मज ती पाउले दाखवाल ॥५॥

३४९ .

रामा तुझ्या स्वामीपणे । मानी ब्रह्मांड ठेंकणे ॥

तुजविण कोण जाणे । अंतर आमुचे ॥१॥

तुजविण मज माया । नाही रामराया ॥

आम्हां अनाथां कासया उपेक्षिसी ॥२॥

तुज समुदाय दासांचा । परी आम्हां स्वामी कैचा ॥

तुजसाठी जिवलगाचा । संग सोडिला ॥३॥

सगुण रघुनाथ मुद्दल । माझे हेंचि भांडवल ॥

दास करुनि पैलपार । टाकीं या भवाचे ॥४॥

३५० .

राम माझी माय कईं भेटईल । वोरसे देईल आलिंगन ॥१॥

संसाराचे दुःख दाटले मानसी । ते मी तुजपाशी सांगईन ॥२॥

उतावीळ चित्त उभारुनि बाहे । रामदास पाहे वाट तुझी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP