मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
श्रीसंप्रदाय लक्षणें

विविध विषय - श्रीसंप्रदाय लक्षणें

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


१३५

प्रथम लिहिणें दुसरें वाचणें । तिसरें सांगणें अर्थांतर ॥१॥

आशंकानिवृत्ति ऐसी चौथी स्थिति । पांचवी प्रचीति अनुभवें ॥२॥

साहावें तें गाणें सातवें नाचणें । ताळी वाजवणें आठवें तें ॥३॥

नवा अर्थभेद दहावा प्रबंध । अकरावा प्रबोध प्रचीतीसीं ॥४॥

बारावें वैराग्य तेरावा विवेक । चौदावा तो लोक राजी राखे ॥५॥

पंध्रावें लक्षण तें राजकारण । सोळावें तें जाण अव्यग्रता ॥६॥

प्रसंग जाणावा हा गुण सत्रावा । काळ समजावा सर्वां ठायीं ॥७॥

अठरावें लक्षण वृत्ति उदासीन । लोलंगता जाण तेथें नाहीं ॥८॥

एकोणिसावें चिन्ह सर्वांसी समान । राखे समाधान ज्याचें त्याचें ॥९॥

विसावें लक्षण रामउपासना । वेध लावी जनां भक्तिरंगें ॥१०॥

भक्तिरंगें देव देवाल्यें शिखरें । ओटे मनोहरें वृंदावनें ॥११॥

बावी पोखरणी रम्य सरोवरें । मंडप विवरें धर्मशाळा ॥१२॥

धर्मशाळा नाना नाना दीपमाळा । तेथें रविकुळा वाखाणावें ॥१३॥

तरुवर पुष्पवाटिका जीवनें । पावनें भुवनें होमशाळा ॥१४॥

उदंड ब्राम्हण ब्रम्हसंतर्पण । पुराणश्रवण आध्यात्मिक ॥१५॥

जन्मासी येऊनी अध्यात्म साधावें । नित्य विवरावें सारासार ॥१६॥

असार संसार येणें साधे सार । पाविजेतो पार भवसिंधु ॥१७॥

आयुष्य हें थोडें फार आटाआटी । कठीण सेवटीं वृद्धपण ॥१८॥

एकलेंचि यावें एकलेंचि जावें । मध्येंचि स्वभावें मायाजाळ ॥१९॥

मायाजाळ तुटे तरी देव भेटे । दास ह्मणे खोटें भक्तिहीण ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP