मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
पंचीकरण

विविध विषय - पंचीकरण

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


७५१.
मायेचे स्वरुप ब्रह्मी उद्भवले । तिच्या पोटां आले महत्तत्त्व ॥१॥
महत्तत्त्वी सत्व सत्त्वी रजोगुण । तिजा तमोगुण रजापोटी ॥२॥
पोटां पंचभूते तयाचिया आली । दास म्हणे जाली सृष्टि ऐसी ॥३॥

७५२.
पांच ही प्रळय सांगईन आतां । जाणिजे तत्त्वता दोनी पिंडी ॥१॥
दोनी पिंडी दोनी ब्रह्मांडी प्रळय । पांचवा अन्वय विवेकाचा ॥२॥
विवेकाचा पंथ विवेकी जाणावा । योगियांचा ठेवा निरुपणी ॥३॥
निरुपणी निद्राप्रळय बोलिला । दुजा मृत्यु जाला प्राणियांसी ॥४॥
प्राणियांसी पिंडी हे दोन्ही प्रळय । ब्रह्म निद्राक्षय ब्रह्मयाचा ॥५॥
ब्रह्मयाचा क्षय तो ब्रह्मप्रळय । व्यतिरेकान्वय विवेकाचा ॥६॥
विवेकाचा अर्थ माईक सर्वही । सस्वरुपी नाही चराचर ॥७॥
चराचर पंचभूतिक माईक । सिद्ध हा विवेक सज्जनांचा ॥८॥
सज्जनांचा भाव सर्व दृश्य वाव । दृश्यातीत देव जैसा तैसा ॥९॥
जैसा तैसा देव तोचि ओळखावा । प्रळय पांचवा दास म्हणे ॥१०॥

७५३.
अनावृष्टि धरा शतसंवत्सर । तेणे जीवमात्र संहारती ॥१॥
संहारती कोणी नसे भूमंडळी । सूर्य बाराकळी तपईल ॥२॥
तपईल तेणे जळेल धरणी । कां द्रव्याचे फणी पोळईल ॥३॥
पोळईल तेणे विषांचे हळाळ । मार्तंडाचे ज्वाळ एक होती ॥४॥
होती गिरिश्रृंगे सर्व भस्मरुप । तयांलागी आप बुडवील ॥५॥
बुडईल धरा जळचि निखळ । तयासी अनळ सोखूं पाहे ॥६॥
सोखूं पाहे जळा उरला अनळ । तयासी अनीळ विझविता ॥७॥
विझवीता  होय वायु त्या वन्हीसी । विश्रांती वायूसी नभापोती ॥८॥
नभापोटी चारी भूते सामावली । नभाकार जाली वृत्ति तेव्हां ॥९॥
वृत्ति नभा ऐसी आडळे अन्वय । पांचवा प्रळय दास म्हणे ॥१०॥

७५४.
कल्पनेचे पोटी अष्टविध सृष्टि । तेचि आतां गोष्टी सांगईन ॥१॥
सांगईन सृष्टि एक कल्पनेची । दुजी ते शब्दाची शब्दसृष्टि ॥२॥
शब्दसृष्टि दुजी तिजी ते प्रत्यक्ष । चौथी जाण लक्ष चित्रलेप ॥३॥
चित्रलेप चौथी पांचवी स्वप्नींची । सृष्टि गंधर्वाची सहावी ते ॥४॥
सहावी ते सृष्टि गंधर्वनगर । सातवी ते ज्वरसृष्टि जाण ॥५॥
सृष्टि जाण दृष्टिबंधन आठवी । सर्व ही मानवी काल्पनीक ॥६॥
काल्पनिक अष्टसृष्टीचे स्वरुप । शुद्ध सस्वरुप निर्विकल्प ॥७॥
निर्विकल्प देव कल्पनेरहित । जाणिजे स्वहित हेंचि बापा ॥८॥
हेंचि बापा बुझे संतांचे संगती । चुके अधोगती दास म्हणे ॥९॥
७५५.
देवाचिये पोटी आयुष्याच्या कोटी । ऐशा किती सृष्टी होती जाती ॥१॥
होती जाती किती रंक जीव जंतु । परी तो अनंतु जैसा तैसा ॥२॥
जैसा तैसा देव आम्हां सांपडला । संदेह तुटला फुटायाचा ॥३॥
फुटायाचा भाव फुटोनियां गेला । थोर लाभ जाला शाश्वताचा ॥४॥
शाश्वताचा लाभ रामीरामदासी । कल्पांती तयासी भय नाही ॥५॥

७५६.
शरीराची तत्वे तत्वांचे शरीर । पाहावा विस्तार विस्तारोनी ॥१॥
विस्तारुनी गुंती तत्त्वांची मांडणी । सिद्धांते झाडणी आरंभावी ॥२॥
आरंभिता तत्वे तत्व वेगळाले । मीपण गळाले विवेकाने ॥३॥
विवेके पाहातां कोणीच नाडळे । समजतां कळे सर्व कांही ॥४॥
सर्व कांही लाभ होती निरुपणे । श्रवणमनने दास म्हणे ॥५॥

७५७.
सावधान व्हावे विवेका पहावे । वायोच्या स्वभावे सर्व कांही ॥१॥
सर्व कांही घडे वायोचि करितां । वायो पाहो जातां आडळेना ॥२॥
आडळेना वायो आकाशी विराला । कर्ता काय जाला अंतरीचा ॥३॥
अंतरीचा सर्व विवेक पाहातां । ब्रह्मरुप आतां सहजचि ॥४॥
सहजचि जाले विचाराने केले । माणुस पाहिले शोधुनीयां ॥५॥
शोधुनीयां जीत माणूस पहावे । वर्म पडे ठावे दास म्हणे ॥६॥

७५८.
माझे थोरपण वेद वाखाणिती । ऐसी एह प्रचीति सिद्ध आतां ॥१॥
सिद्ध आतां बोध देखतदेखतां । होते सार्थकता शीघ्रकाळे ॥२॥
शीघ्रकाळे काळ सर्व संहारला । अनुभव आला रोकडाचि ॥३॥
रोकडाचि आतां तुम्ही तरी पाहा । विवेकाने आहा काय नेणो ॥४॥
नेणो महिमान विवेकी जनांचे । होय सज्जनांचे मूळस्थान ॥५॥
मूळस्थान मूळ होइजे केवळ । कोण रे चांडाळ मिथ्या बोले ॥६॥
मिथ्या बोलवेना पहा विवंचना । सिद्ध अनुमाना कैसे येते ॥७॥
कैसे येते आत्मप्रचीती आपण । मीतूं ऐसे कोण सांग बापा ॥८॥
सांग बापा मनी बरे विचारुनि । तत्त्वांची झाडणी करुनीयां ॥९॥
करुनियां पंचीकर्णविवरण । पुढे मीतूंपण कोठे आहे ॥१०॥
आहे तैसे आहे प्रत्यये जाणावे । कोणासी म्हणावे काय आतां ॥११॥
काय आतां होते बहु बोलोनियां । घेतलेसे जाया सर्व कांही ॥१२॥
सर्व कांही आहे दृश्य जाइजणे । माझे मीच जाणे कोण सांगो ॥१३॥
कोणा सांगो आतां हे कोण घेईल । वायांचि जाईल अभिमाने ॥१४॥
अभिमाने सत्य राम कोपताहे । सिद्धचि न लाहे आत्मरुप ॥१५॥
आत्मरुप स्वये आपण नव्हीजे । तरी वायां कीजे रामदास्य ॥१६॥
रामदास्य आणि हे वाक्य जाईल । ऐसे न घडेल कदाकाळी ॥१७॥
कदाकाळी राम दासां उपेक्षीना । रामउपासना ऐसी आहे ॥१८॥
ऐसी आहे सार राघवाची भक्ति । विभक्तिची भक्ति तेथे नाही ॥१९॥
तेथे नाही कांही वाउगे माईक । रामउपासक रामदास ॥२०॥

७५९.
अंती पंचभूते पांचांसी मिळाली । वासना राहिली कोणे ठायी ॥१॥
कोणे ठाई तेव्हां वासना हे राहे । कैसे रुप आहे वासनेचे ॥२॥
वासनेचे रुप सूक्षम जाणावे । संकल्प स्वभावे रुप तिचे ॥३॥
रुप तिचे अंतकाळी कोठे राहे । अनुभवे पाहे आपुलिया ॥४॥
आपुला संकल्प जये वस्तूवरी । तेथे वस्ति करी वासना हे ॥५॥
वासना हे वस्ति करी अगोदर । जंव कळेवर सचेतन ॥६॥
सचेतन काया कारणी लावावी । वासना गोवावी रामरुपी ॥७॥
रामरुपी सत्य संकल्प धरावा । संसार तरावा अवळीला ॥८॥
अवलीळा भवसागर ओसरे । जरी मनी धरे गुरुवाक्य ॥९॥
गुरुवाक्ये गति रामदासी जाली । मुक्ति हे लाधली सायोज्यता ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP