मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
दृष्ट

देवताविषयक पदे - दृष्ट

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


१०८०.
( राग-भूप; ताल-धुमाळी )
बरवा वो माय सुंदरा हो । राम घननीळ सांवळा ॥
माझे जीवींचा जिव्हाळा । शोभे जानकीजवळा ॥
तो म्यां जीवे वोवाळिला ॥ध्रु०॥
ठाण ठकार कैसे मनोहर । करी शोभे शरचाप ॥
डोळस सांवळा म्हणो हा मदनमूर्ति ॥
तरि हा मदनाचा बाप ॥१॥
चरणी वांकी तोडर वो गर्जतसे ।
पिंवळा साउला नेसला । अचंचळ विजु मुगुटी झळकतसे ।
कांसे पीतांबरु कासिला ॥२॥
नवरत्न मुद्रिका शोभती करपल्लवी ।
वीर कंकण मणगटी । अजानुबाहू दंडी शोभती कीर्तिमुखे ।
रत्ने जडियली बाहुवटी ॥३॥
वाम करी कोदंड वो धरियले । त्यासी कट्ट वो सोनियाचे ॥
दक्षिणे सपिच्छबाण शोभताती ।
वरी पुट पावकाचे ॥४॥
पदक एकावळी हृदयी शोभतसे । शोभे वैजयंती माळा ॥
मकराकार श्रवणी कुंडले झळकताती । तेज फांके गंडस्थळा ॥५॥
चंदनाची उटी अंगी बाणलीसे । कंठी पुष्पांचिया माळा ॥
मृगनाभीमळवट शोभतसे । त्यावरी केशराचा टिळा ॥६॥
तयावरि अक्षता वो कुंकुमाच्या । मुगुटी शोभतसे किरीटी ॥
चाचर कुरळी सुमने वो गुंफियेली । तेथे मधुकरांची दाटी ॥७॥
ऐसा दूर्वादळशाम सुंदर आत्माराम । लक्ष्मण हेमकांति ॥
केतकेगर्भपत्र जनकनंदिनी हे । नीळपर्वत मारुती ॥८॥
जानकी वो लक्ष्मण मध्यभागी । पुढे रुद्र जोडल्या करी ।
रामदास म्हणे झणी दृष्टि लागे । जीवे निंबलोण करी ॥९॥

१०८१.
( चाल-माय मोरे नयन बसे रघुवीर । )
परम दयाळु माझा राम ॥ध्रु०॥
दशमुख भगिनी ताटिका ते । वधुनि केले विश्राम ॥१॥
रावण मारुनि अमर स्थापी । पाववुनी स्वधाम ॥२॥
जानकि घेउनि अयोध्येसि आले । दास म्हणे प्रियनाम ॥३॥

१०८२.
( ताल-दीपचंदी; चाल-निर्गुणरुप मिळाले० )
वंश रघुनाथजीचा । प्रगट प्रताप जयाचा ॥ध्रु०॥
पुण्यपरायण धार्मिक राजे । काय वदावे वाचा ॥१॥
सत्वधीर महावीर बळाचे । वोघ चि थोर नितीचा ॥२॥
दास म्हणे मज ध्यास तयाचा । खडतर सूर्य तपाचा ॥३॥

१०८३.
( राग-काफी; ताल-धुमाळी )
राजिवलोचन । भवभयमोचन पतितपावन राम ॥ध्रु०॥
श्रीरघुनंदन राक्षसकंदन । दशकंठछेदन राम ॥१॥
संसारखंडण दानवदंडण । रामदासमंडण राम ॥२॥

१०८४.
( राग-कल्याण; ताल-त्रिताल )
अरे तूं पावन देवा राघवा रे ॥ध्रु०॥
वांकी खळाळित तोडर गाजे । परम दीनवत्सल रामा ॥१॥
अभिनव कीर्ति पुरंदर जाणे । सकळभुवनसुखदायक तूं एक ॥२॥
दास म्हणे भवपाशनिवारण । नाम सकळजनपावन लीळा ॥३॥

१०८५.
( राग-कौशिया; ताल-धुमाळी )
दशशतकरवंशी अवतरणा । दशमुखकुळसंहरणा ।
दशशतवदनाग्रजरुपा मदना । दशरथनृपनंदन गुणसदना ॥ध्रु०॥
कौसल्यात्मज निजसुखकरणा । कौशिकमखपालन शिवस्मरण ।
राजीवलोचन जानकीरमणा । भवचिंताहरणा ॥१॥
निजचरणी अहल्याउद्धरणा । भार्गववीर क्षितिपाळा हरमर्दना ।
वालीकर्मुकधरणा । अंजनीसुत सेवित तव चरणां ॥२॥
दृश्यादृश्य व्यापक गुणसगुणा । आत्माराम समस्तां भरणा ।
जीवकदंबकपोतसंस्मरणा । रामदास वंदित तव चरणा ॥३॥

१०८६.
( राग-कामोद; ताल-द्रुत एकताल; चाल-सामर्थ्याचा गाभा० )
रघुविर सुरवरदानी । भक्तांचा अभिमानी ।
योगी मुनिजन ध्यानी । राहती समाधानी ॥ध्रु०॥
भूषणमंडित माळा । तेजाचा उमाळा ।
सुंदर सुमनमाळा । भोंवता मधुकरपाळा ॥१॥
पीतवसन घन साजे । मुरडिव वांकी वाजे ।
वर तोडरी ब्रीद गाजे । कीर्ति विशाळचि माजे ॥२॥
अभिनव कार्मुकपाणी । निगम गाती पुराणी ।
विगळित होते वाणी । समजतसे शूळपाणी ॥३॥
राम सकळ जन पाळी । भक्तांला सांभाळी ।
जन्ममरण दुःख टाळी । अगणित सुख नव्हाळी ॥४॥
दास म्हणे मज हीत । माझे कुळदैवत ।
जे जन होती रत । ते सकळहि तरत ॥५॥

१०८७.
( राग-जयजयवंती; ताल-त्रिताल; चाल-पाळिले पोसीले० )
वेधिले मानस रामे । भक्तजनपूर्ण कामे । सेवक तारियले नेमे ।
बुध्दियोगे भूमंडळी ॥ध्रु०॥
निरंतर उत्सव । हरिकथा महोत्साव ।
प्रसन्न जाहला देव । सकळ कामनासिद्धि ॥१॥
पुरविल्या भडसा । धन्य तूं गा जगदीशा ।
कोणीएक दुराशा । उरली नाही हे खरे ॥२॥
राज्यपदाहूनि पदे । पदेंचि केली विशदे ।
दास म्हणे सदानंदे । आनंद केला बहुत ॥३॥

१०८८.
( चाल-अलभ्याचा हा लाभ मज० )
ऐसा दुसर देव आढळेना । कीर्ति राघवेंसी तुळिता तुळेना ।
अगाध महिमा या देवाचा कळेना । वो साजणी ॥ध्रु०॥
सूर्यवंशासी नाही उपमा वो । तेथे जन्म जाला सर्वोत्तमा वो ।
देव म्हणिती हा सोडवील आम्हां । वो साजणी ॥१॥
संपूर्ण लक्षणी राम राजयोगी । नसे कापट्य ना मनी ना वचनी वो० ।
राज्य त्यागियेले मातेच्या वचनी ॥ वो० ॥२॥
राघव हा परस्त्रीसहोदर । ऐसा नाही कोठे नीतीचा विचार वो० ।
रामे वैकुंठीसी नेले नगर वो सा० ॥३॥
अद्यापि जयाचे दास चिरंजीव । नामे बिभीषण आणि तो मारुति वो० ।
सर्व काळ राम दासाची संपत्ती ॥ वो सा० ॥४॥

१०८९.
( राग-धनाश्री; ताल-दादरा; चाल-जप रे० )
या राघवाचे भजन सौख्यकारी । दुःखशोकापहारी ॥ध्रु०॥
भक्ताभिमानी देव सोडवितो जीव । नामे चिंता निवारी ॥१॥
नित्य निरंतर जाणतो अंतर । मनासारिखे करी ॥२॥
दुर्जना संहारु सज्जना आधारु । तो हा कोदंडधारी ॥३॥
अंतरी हव्यास पुरते भडस । सत्ता समस्तांवरी ॥४॥
अनन्य शरण चिंतितो चरण । रामदास अंतरी ॥५॥

१०९०.
( राग-काफी; ताल-दीपचंदी; चाल-आनंदरुप वनारी० )
तो राघव शरधनुधारी रे ॥ध्रु०॥
कौशिकमखदुःखार्णव खंडुनि । खरदुषणाते मारी ॥१॥
सुमनशरारिधनु भंगुनियां । वरिली जनककुमारी ॥२॥
श्रावणारिसुते सागर बांधुनि । वैश्रवणानुज मारी ॥३॥
दास म्हणे पदवारी जडलो । भवनदीपार उतारी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP