मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
अध्यात्म

विविध विषय - अध्यात्म

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


८६६.
मुख्य समाधान आत्मनिवेदन । निर्गुणी अनन्य होतां बरे ॥१॥
होतां बरे वस्तु रुपचि केवळ । दृश्य-तळमळ जेथे नाही ॥२॥
जेथे नाही चिंता होणाराची आतां । तोचि तो तत्त्वतां दास म्हणे ॥३॥

८६७.
अंतरीचा भाव अंतरे जाणावा । देव ओळखावा सर्वां घटी ॥१॥
सर्वां घटी देव एकलाचि पुरे । पुरोनी वावरे वायुचक्री ॥२॥
वायुचक्री दृश्य सर्वही सांडुनी । हरी निरंजनी एकलाची ॥३॥
एकलाचि हरी कोठे पवाडला । दास म्हणे जाला निरंजन ॥४॥

८६८.
प्रगटला देव जयाचे अंतरी । तया नाही उरी मीपणाची ॥१॥
मीपणाची उरी तूंपणा भेटतां । आपण पाहतां वाव जाली ॥२॥
वाव जाली देव देखतां दाटणी । दास म्हणे वाणी वेडावली ॥३॥

८६९.
वेडावली वाणी वेदाची बोलतां । देव बोलो जातां अनिर्वाच्य ॥१॥
अनिर्वाच्य देव वाचा बोलो गेली । जिव्हा हे चिरली भूधराची ॥२॥
भूधराची जिव्हा जाहली कुंठीत । दास म्हणे अंत अनंताचा ॥३॥

८७०.
अनंताचा अंत पहावया गेलो । तेणे विसरलो आपणासी ॥१॥
आपणा आपण पाहतां दिसेना । रुप गवसेना दोहींकडे ॥२॥
दोहींकडे देव आपणचि आहे । संग हा न साहे माझा मज ॥३॥
माझा मज भार जाहला बहुत । देखतां अनंत कळो आला ॥४॥
कळो आला भार पाहिला विचार । पुढे सारासार विचारणा ॥५॥
विचारणा जाली रामीरामदासी । सर्वहि संगासी मुक्त केले ॥६॥
मुक्त केले मोक्षा मुक्तीची उपेक्षा । तुटली अपेक्षा कोणीएक ॥७॥

८७१.
तूं काय जालासी अगा निरंजना । आम्हां भक्तजनां सांभाळावे ॥१॥
सांभाळावे सदा बाह्यअभ्यंतरी । आम्हां क्षणभरी सोडूं नये ॥२॥
सोडूं नको वायां गुप्त का जालासी । देवा देखिलासी संतसंगे ॥३॥
संतसंगे गुप्त होउनी पाहिले । संगत्यागे जाले दरुशण ॥४॥
दरुशण जाले तेंचि ते जाणती । नसोनी असती कल्पकोडी ॥५॥
कल्पकोडी जोडी जाली निर्गुणाची । दास म्हणे कैंची देहबुद्धि ॥६॥

८७२.
संतसंगे तुज काय प्राप्त जाले । सांग पां वहिले मजपाशी ॥१॥
मजपाशी सांगे कोण मंत्र तुज । काय आहे गुज अंतरीचे ॥२॥
अंतरीचे गुज काय समाधान । मंत्र जप ध्यान कैसे आहे ॥३॥
कैसे आवाहन कैसे विसर्जन । कैसे पिंडज्ञान सांगे मज ॥४॥
सांगे मज मने काय उपासणे । मुद्रा ते आसने सांग आतां ॥५॥
सांग पंचीकर्ण कोणे चित्तचतुष्ट्य । कैसे ते अद्वैय जीवशीव ॥६॥
जीवशीवऐक्य जाले कोणे रीती । सांग मजप्रति अष्ट देह ॥७॥
अष्ट देह पिंडब्रह्मांडरचना । तत्त्वविंवचना सांग मज ॥८॥
सांग मज भक्ति कैसी ते विरक्ति । सायुज्यता मुक्ति ते कवण ॥९॥
कोण ते साधन कोणाचे भजन । ऐसे केले प्रश्न रामदासे ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 29, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP