मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
दृष्ट

देवताविषयक पदे - दृष्ट

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


१०९१.
( राग-सोरट; ताल-धुमाळी )
रामा हो जय जयरामा हो ॥ध्रु०॥
श्रापिली अहिल्यासती । हृदयी चिंतीत होती ॥१॥
वाहिली विमानावरी । गणिका चिंतन करी ॥२॥
राघवी बैसली बुद्धि । रामदासी कार्यसिद्धि ॥३॥

१०९२.
( राग-मांड; ताल-दादरा )
राजीवनयन राम जीवाचे जीवन राम ।
कृपाळु दीनाचा राम पतितपावन ॥ध्रु०॥
पुण्यपरायण सूर्यवंशाचे मंडण राम ।
रामनामे तारियेले वानरी पाषाण ॥१॥
जीवींचा जिव्हाळा राम मनींचा कोंवळा राम ।
अनाथाचा नाथ राम कैवारी सकळां ॥२॥
सर्वांगे सुंदर राम दासाचे अंतर राम ।
विसंबो नको रे मना राम निरंतर ॥३॥

१०९३.
( राग-खमाज; ताल-धुमाळी )
पूर्णकामा हो सुखधामा । विबुधविमोचन रामा ॥ध्रु०॥
पावन भूवन जीवन माझे । कोण करी गुणसीमा ॥१॥
वाल्मिक व्यास विरंची नेणे । काय वदो गुणसीमा ॥२॥

१०९४.
( राग-मारु; ताल-त्रिताल )
राम करी ते होय । राजाराम करी ते होय ॥ध्रु०॥
संशय कल्पी तोचि विकल्पी । महिमा कळलि न जाय ॥१॥
करुनि गर्व रावण सर्व । परिवार निमाला ।
अहंभावे मानव किंकर कोण आहे ज्याला ॥२॥
जवळी आहे संग न साहे राम हा निजबोध ।
रामदासी प्रारब्धासी नाही देहसंबंध ॥३॥

१०९५.
( राग-कल्याण; ताल-धुमाळी )
तो हा रघुनंदनू सुंदरपंकजदललोचनु रे ॥ध्रु०॥
रवि शशि वैश्वानर ज्याचे सत्ते ते आज्ञा मानी निरंतर रे ।
योगी ऋषीश्वर ज्याचे भजनी अति तत्पर रे ॥१॥
जीवींचा संशय तुटे जन्ममरणाचे भय फिटे रे ।
चिदानंदि वोहटे शांति सर्वांगी लिगटे रे ।
मीतूंपण नुमटे ऐक्यी ऐक्यता उमटे रे ।
गौप्य ते प्रगटे ज्याचे भजनी मन पालटे रे ॥२॥
भक्तांला सांकडी पडतां धांवूनि ये तांतडी रे ।
चिंतेचे मुळ खोडी प्रेमळ दासाची निजगोदी रे ॥३॥

१०९६.
( राग-कानडा; ताल-त्रिताल; चाल-कष्ट करिती० )
जनकतनयापति रे । चुकवितो विपती रे ॥ध्रु०॥
पतितपावन दीनदयाळ । सकळजन सांगती रे ॥१॥
विषहरण सुखकारण । तारण पशुपति जपती रे ॥२॥
दास म्हणे निजध्यास धरावा । अखंड तोचि मति रे ॥३॥

१०९७.
( राग-श्रीराग; ताल-द्रुत एकताल; चाल-हर हर० )
दिनमणिमंडणा अमरभूषणा । सजलजलदघना रे राघवा ॥ध्रु०॥
राजिवलोचना विबुधविमोचना । विमळगुणा सगुणा रे० ॥१॥
दास म्हणे मना अंतरजीवना । स्वजनसज्जना रे० ॥२॥

१०९८.
( राग-मारु; ताल-त्रिताल )
महिमा कळलि न जाय राघवा ॥ध्रु०॥
कोण वानर कोण गिरिवर । बती सागर काय ॥१॥
कोण सुरवर कोण निशाचर । अघटित घटित उपाय ॥२॥
गुणी गुणागर नागर लीळा । दास सदा गुण गाय ॥३॥

१०९९.
( राग-भैरवी; ताल-दादरा )
सखये बाई कमलनयन राम दाखवा ॥ध्रु०॥
घननिळांग नळिननाभ । अनळमित्रतनयवरद ।
सकळ भूपतळ नृपेंद्र । मैथिळीमुखाब्जभृंग ॥१॥
पंक्तिशतकरांशतिलक । पंक्तिरथकुमारश्रेष्ठ । पंक्तिवदनवंशनाश ।
पार्वतीशप्राणमित्र ॥२॥
निकट शरयुपुलिनवास । प्रथम पूर अयोध्याधीश ।
मुनिमनोज्ञराजहंस । रामसहृदयभूष ॥३॥

११००
( राग-काफी; ताल-दीपचंदी )
धरा धरा सांवळी मूर्ति मनी ॥ध्रु०॥
रविकुळविभूषणी धनुशरधारिणी । असुरकुळसंहारिणी ॥१॥
ध्यातसे निशिदिनी तत्पर होउनि । शिव निजहृद्भुवनी ॥२॥
अयोध्यानिवासिनी दासाची स्वामिनी । पाहोनि निजनयनी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP