मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
कर्मकांड

विविध विषय - कर्मकांड

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


२२६ .

कोणत्या उद्योगी नाही घडे पाप । संसारी निष्पाप कोणता चि ॥१॥

होऊनिया पांगे दूरदेशी जावे । अनाथा लुटावे हा धर्म की ॥२॥

श्रीमंताचे आम्ही सेवक म्हणावे । गर्वाने तंडावे येणे धर्म ॥३॥

कमावसि द्यावी अन्याय शोधावे । येणे देव पावे कैसा सांग ॥४॥

रामदास म्हणे राजाश्रयी लोक । तयांलागी नर्क नाही नाही ॥५॥

२२७ .

वृद्ध ते म्हणती संसार करावा । जनाहाती घ्यावा म्हणुनी बरे ॥१॥

म्हणताती जन बरे ते कोणाला । बुडवीति त्याला ऐशा बोधी ॥२॥

वैश्वदेव दान अतिथी तो घडे । टाकी एकीकडे केले दोष ॥३॥

मूर्ख तो म्हणावा काय जी वाल्मिक । टाकितां सकळीक मुक्त जाला ॥४॥

रामदास म्हणे कथिले जे वेदी । तया मात्र बंदी इतर थोर ॥५॥

२२८ .

सर्वस्व बुडती ऐसी जे मातोक्ति । न धरावी चित्ती साधकांनी ॥१॥

भरत तो मूर्ख काय होता सांग । मातेचा तो त्याग केला जेणे ॥२॥

पित्याने त्यागिले दैत्येंद्र प्रल्हादे । कां त्यांसी गोविंदे स्नेह केला ॥३॥

दैत्य बिभीषणे टाकीयेला बंधु । रामासी संबंधु जोडियेला ॥४॥

रामदास म्हणे शुक्र होता गुरु । परंतु दातारु धन्य बळी ॥५॥

२२९ .

संसारी नव्हता काय तो जनक । म्हणती विवेक न करितां ॥१॥

सत्ययुग आणि आयुष्यभरंवसा । याज्ञवल्क्य ऐसा उपदेशिता ॥२॥

ऋषीश्वर नित्य येती जाती घरी । तेणे वनांतरी कां जावे हो ॥३॥

असे तुम्हां काय ऐसी अनुकूळता । मूर्ख नाश थिता कां करितां ॥४॥

रामदास म्हणे कलयुगी हेचि । वाट साधनाची बरी सोपी ॥५॥

२३० .

मुनीश्वराऐसे न करा नियम । जनकासि सम कां करा रे ॥१॥

ज्या गोत्रीचे तुम्ही तया ऋषेश्वरी । केले तया करी आचरणा ॥२॥

प्रथम साधका लक्षणे इतुकी । पुढे आतां भाकी सिद्धिचिन्ह ॥३॥

सांगोनि लक्षण कथिन आचरण । पूर्णासि जी विघ्ने ती ही सांगो ॥४॥

रामदास म्हणे साधन जे केले । पुढिले चुकविले जन्मफेरे ॥५॥

२३१ .

व्हावया तो योगी कैसा अधिकार । तयाला साचार प्राप्ति होय ॥१॥

पाहिजे अनुताप तापलो मी फार । विश्रांतीला थार नाही नाही ॥२॥

नरदेही जन्मुनि विषयीक जालो । स्वार्थासि चूकलो हेचिं शोधी ॥३॥

ऐसा अनुताप नित्य तो वाहतां । वैराग्य ये हातां त्या प्राण्याच्या ॥४॥

रामदास म्हणे त्रिविध वैराग्य । भोगोनि आरोग्य केले देहा ॥५॥

२३२ .

सात्विक राजस तामस त्रिविध । वैराग्याचे भेद योगी वदती ॥१॥

देवीमत्त करी मनधरणी मांसाचे । टाकी ब्राह्मणाचे नेमधर्म ॥२॥

होऊनि गोसांवी लाविती कौपीन । दयाक्षमाज्ञानहीन राख ॥३॥

मठाते बांधोनि व्यवहार करीति । कल्पांती श्रीपति न भेटेला ॥४॥

रामदास म्हणे हे तामसयोगी । रवरवाचे भोगी केले देवे ॥५॥

२३३ .

करोनि कीर्तन योग्यता मिरवणे । देशोदेशी जाणे द्रव्यासाठी ॥१॥

द्रव्य येतां पुढे प्रेमी मी कीर्तनी । सुचवितो मानी धनइच्छा ॥२॥

राजा देऊं जातां देऊळ बांधणे । येवढिया धने काय होते ॥३॥

दात्यांनी त्रासावे सर्वांनी हांसावे । त्या देहाला पावे देव कैसा ॥४॥

रामदास म्हणे करितो निवाड । सोडविती खोड मान तुझा ॥५॥

२३४ .

देउळाचे भिसे द्रव्य ते जोडावे । गांठीचे मोडावे पुण्य धन ॥१॥

येरव्ही ते काय न घडे प्राण्याला । लय करण्याला आग लागो ॥२॥

राजाज्ञे हे वाचे कवन करावे । धन्य म्हणवावे लोकांहाती ॥३॥

राजसा तामसा राघवाची भेटी । गेल्या जन्मकोटी जरी नाही ॥४॥

रामदास म्हणे करितो निवाड । सोडविती खोड मान तुझा ॥५॥

२३५ .

ऐकावे लक्षण विरक्ताचे शुद्ध । टाकियेला क्रोध जेणे सर्व ॥१॥

स्तुति आणि निंदा करी जो श्रवण । परी तेने मन नाही ज्याचे ॥२॥

टाकावे ते काय धरावे श्रवणाते । वैराग्याची माते बहुविधी ॥३॥

भार्याहीन विप्र होउनी संन्यासी । टाकोनी अन्यासी मुक्त व्हावे ॥४॥

रामदास म्हणे शास्त्रार्थ कां ज्ञान । केंवी ते साधणे ऐके मना ॥५॥

२३६ .

पश्चात्ताप जाला संसार करितां । अथवा देखतां परदुःख ॥१॥

तेव्हां पूर्वी तुज निजोक्ति कथिल्या । पाहिजे सोशिल्या त्या आधी बा ॥२॥

कित्येकांसी बोध तयाचाही होतो । संसारी पडतो गळां पडे ॥३॥

नाही तरी मग राजस तामसी । वैराग्याची फांसी गळां पडे ॥४॥

रामदास म्हणे भार्यासह जो की । वैराग्य सात्विकी तोचि धन्य ॥५॥

२३७ .

संसार करावा ऐशा तो रीतीने । मुक्ति होय तेणेकरुनियां ॥१॥

जन्मभूमिकेसी तीर्थी तो अथवा । योग्य ठाव घ्यावा हितोपाधि ॥२॥

नदीतट रम्य रम्य तरुवर । ऐसे ते सुंदर स्थळ ध्यावे ॥३॥

संसारी बुडतो उच्चारु अनुदिनी । उदास मानुनी हो रहावे ॥४॥

रामदास म्हणे संसारी मुक्ति । सांगो तुजप्रति ऐक ते रे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP