मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
नवविधा भक्ति.

विविध विषय - नवविधा भक्ति.

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


५१२ .

वाणी शुद्ध करी नामे । चित्त शुद्ध करी प्रेमे ॥१॥

नित्य शुद्ध होय नामी । वसतांहि कामी धामी ॥२॥

कान शुध्द करी कीर्तन । प्राण शुद्ध करी सुमन ॥३॥

कर शुद्ध राम पूजितां । पाद शुद्ध देउळी जातां ॥४॥

त्वचा शुद्ध करी रज । मस्तक नमितां पादांबुज ॥५॥

नेम लिंग करी शुद्ध । अंतरनिर्मळपणे गुद ॥६॥

रामापायी राहतां बुद्धि । रामदासा सकळ शुद्धि ॥७॥

५१३ .

श्रवण म्हणिजे ऐकतचि जावे । बरे विवरावे ग्रंथांतरी ॥१॥

ग्रंथांतरी कळे ते मुखे बोलावे । कीर्तन जाणावे याचे नांव ॥२॥

नांव घ्यावे साचे सर्वदा देवाचे । तिसरे भक्तीचे लक्षण हे ॥३॥

लक्षण चौथीचे ते ऐसे जाणावे । पाउले सेवावी सद्गुरुची ॥४॥

गुरुदेवपूजा तेंचि ते अर्चन । सहावे वंदन नमस्कार ॥५॥

नमस्कार कीजे सर्व दास्यभावे । भक्तीचे जाणावे लक्षण हे ॥६॥

लक्षण हे सख्य आठवे भक्तीचे । सांगावे जीवीचे देवापाशी ॥७॥

देवापाशी होतां उरेना मीपण । आत्मनिवेदन रामदासी ॥८॥

५१४ .

वाटे संसार दुस्तर । होती दुःखाचे डोंगर ॥१॥

तरी श्रवण करावे । तेणे दुःख विसरावे ॥ध्रु०॥

पुढे काय करुं आतां । वाटे संसाराची चिंता ॥२॥

येतां उभंड धरेना । मायाजाळ आवरेना ॥३॥

दुरी जाऊनि विवेक । आंगी आदळतो शोक ॥४॥

रामीरामदास म्हणे । दुःखे जीव धरी उणे ॥५॥

५१५ .

काम क्रोध मद मत्सर । जरी हे जाले अनावर ॥१॥

यास करावे साधन । सदा श्रवण मनन ॥ध्रु०॥

बोलाऐसे चालवेना । जीवभ्रांति हालवेना ॥२॥

दृढ लौकिक सांडेना । ज्ञानविवेक मांडेना ॥३॥

पोटी विकल्प सुटेना । नष्ट संदेह तुटेना ॥४॥

दास म्हणे निर्बुजले । मन संसारी बुडाले ॥५॥

५१६ .

रात्रंदिवस दुश्चित । चार घटिका सावचित्त ॥१॥

होउनि कीर्तनी बैसावे । भावे भगवंतासी गावे ॥२॥

सदा संसार कथन । क्षणएक सावधान ॥३॥

दास म्हणे वारंवार । बहूसाल खबरदार ॥४॥

५१७ .

रामनामकथा श्रवणी पडतां । होय सार्थकता श्रवणाची ॥१॥

मुखे नाम घेतां रुप आठवले । प्रेम दुणावले पहावया ॥२॥

राम माझे मनी शोभे सिंहासनी । एकाएकी ध्यानी सांपडला ॥३॥

रामदास म्हणे विश्रांति मागेन । जीवीचे सांगेन राघवासी ॥४॥

५१८ .

रामनाम कथा गंगा । श्रवणे पावन करी जगा ॥१॥

तिसी प्रेमपूर आला । शंकरहृदयी सामवला ॥२॥

रामदासाची माउली । आळशावरुनी गंगा आली ॥३॥

५१९ .

श्रवण करावे जेथे ब्रह्मज्ञान । ज्ञानेवीण शीण कामा नये ॥१॥

कामा नये जेथे सारासार नाही । कथेचे प्रवाही कोण साध्य ॥२॥

साध्य तेंचि घ्यावे येर ते त्यागावे । विचाराच्या नांवे जेथे शून्य ॥३॥

जेथे शून्य ज्ञान सर्व अनुमान । अनुमाने धन्य होइजेना ॥४॥

होइजेना धन्य निरंजनेविण । रामदास खूण सांगतसे ॥५॥

५२० .

धन्य धन्य ते नगर । जेथे कथा निरंतर ॥१॥

गुण गाती भगवंताचे । तेचि मानव दैवाचे ॥२॥

स्वये बोले जगज्जीवन । थोर कलियुगी कीर्तन ॥३॥

रामदास म्हणे भले । हरिभक्ती उद्धरिले ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP