मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय १९

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय १९

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

भीष्में कृपाचार्या बोलाविलें ॥ पुत्र अवघे निरविले ॥ मग ते अभ्यासिते जाहले ॥ सकळविद्या ॥१॥

आतां द्रोणद्रुपदांची कथा ॥ कैसी वर्तली अपूर्वता ॥ ते ऐकावी संकलिता ॥ जन्मेजया गा ॥२॥

पांचाळदेशपती पुष्पदंत ॥ तयाचा द्रुपद नामें सुत ॥ तो द्रोणासी चालवी बहुत ॥ मित्रभावो ॥३॥

ते संदीपना जवळी जाउनी ॥ विद्या अभ्यासिती दोनी ॥ पूर्ण जालिया आज्ञा घेउनी ॥ चालिले मार्गे ॥४॥

तंव द्रुपद ह्नणे द्रोणासी ॥ तुह्मी कष्टतसा वनवासीं ॥ तरी चला आमुचे गृहासी ॥ राहूं दोघे संगमेळें ॥५॥

तेव्हां द्रुपदासि ह्नणे द्रोण ॥ जैं राज्य येईल तुजलागुन ॥ तेव्हां भेटावया येईन ॥ काय देशील सांगपां ॥६॥

द्रुपद ह्नणे मित्रा ब्राह्मणा ॥ अर्धराज्य देईन जाणा ॥ येरें भाक घेतली निपुणा ॥ त्रिवारवाचा ॥७॥

मग द्रोण ह्नणे हरुषें ॥ आमुचा आशिर्वाद तुह्मां असे ॥ आतां वाचादत्त भरंवसें ॥ विसरावें ना ॥८॥

असो द्रुपद गेला पांचाळदेशीं ॥ तंव स्वर्गवास जाहला पित्यासी ॥ ह्नणोनि राज्यतिलक द्रुपदासी ॥ सारिला मंत्रिवर्गीं ॥९॥

तो द्रुपद राज्य पावला ॥ त्रिलोकीं कीर्तिमंत जाहला ॥ इकडे द्रोण आश्रमीं गेला ॥ स्वपितयाचे ॥१०॥

मग तो विद्यासंपन्न जाणोनी ॥ मेळविली कृपाची बहिणी ॥ कृपी नामें कामिनी ॥ द्रोणासि भार्या ॥११॥

पुढें कितीयेकां दिवसीं ॥ अश्वत्थामा पुत्र जाहला द्रोणासी ॥ परि दुर्बळत्वें बाळकासी ॥ न मिळे क्षीर ॥१२॥

मग कृपी ह्नणे प्राणनापा ॥ काहीं याचावें रेणुकासुता ॥ तो ब्राह्मणांचा असे दाता ॥ वधिलें दैत्या धनुर्बळें ॥१३॥

येरु निघाला तत्क्षणीं ॥ आला परशरामाचे स्थानीं ॥ शिरसाष्टांग प्रणाम करोनी ॥ बद्धांजुळी ठाकला ॥१४॥

ह्नणे मज काहीं द्या जी दक्षिणा ॥ येरु ह्नणे ऐकें द्रोणा ॥ म्यां अवघे वेंचिले ब्राह्मणां ॥ धनुर्विद्या उरली असे ॥१५॥

ऐसें बोलिला रेणुकानंदन ॥ तंव संतोषला द्रोण ॥ मग धनुर्विद्या संपादून ॥ चालिला स्वस्थानीं ॥१६॥

खांदां घालोनि धनुष्यभाता ॥ विचार करी जातजातां ॥ कीं हे विद्या द्यावी सर्वथा ॥ द्रुपदालागीं ॥१७॥

ऐसें ह्नणोनि पांचाळनगरीं ॥ शीघ्र पावला महाद्वारीं ॥ परि जावों नेदी भीतरीं ॥ द्वारपाळ ॥१८॥

द्रोण ह्नणे द्वारपाळा ॥ जाणीव करीं भूपाळा ॥ कीं द्रोण गुरुबंधु असे आला ॥ भेटावया तुह्मांसी ॥१९॥

येरे जाणविलें रायासी ॥ जी द्रोण आलासे भेटीसी ॥ तंव राव ह्नणे प्रधानासी ॥ काहीं देवोनि पामकिणें ॥२०॥

मग वस्त्रालंकार धन ॥ द्यावया आला प्रधान ॥ तंव नेघें ह्नणे ब्राह्मण ॥ न भेटतां राजा ॥२१॥

प्रधान जावोनि ह्नणे वेगें ॥ तो भेटल्याविण काहीं नेघे ॥ मग द्रुपदें बोलाविला जागे ॥ आपुलीया ॥२२॥

परि न करीचि आदरमान ॥ ह्नणोनि कोपला गुरुद्रोण ॥ ह्नणे धरिला गर्वाभिमान ॥ द्रुपदा नष्टा ॥२३॥

पूर्वी मार्गी चालतां कैसी ॥ तुवां भाक दीधली मजसी ॥ ते राज्यमदें विसरलासी ॥ खिळा मानेसी बैसला ॥२४॥

अरे देखतांही न देखे ॥ ऐकतांही न आइके ॥ बोलावयाचें न बोले मुखें ॥ हें मदाचें लक्षण ॥२५॥

द्रुपद ह्नणे पहाहो भिकारी ॥ भलतेंचि बोले अविचारीं ॥ तरी शीघ्र घालवा बाहेरी ॥ अर्धचंद्रदक्षिणेसह ॥२६॥

द्रोण सक्रोध बोले उत्तर ॥ देई आमुचें अर्धराष्ट्र ॥ नातरी शिष्याकरवीं शीघ्र ॥ नेईन बांधोनी ॥२७॥

इयेविद्येचें बळें जाण ॥ तुज करवीन बंधन ॥ ह्नणोनि दाविले धनुष्यबाण ॥ परशुरामाचे ॥२८॥

येरु ह्नणे तुझेनि होईल ॥ तें करी जा दीधली सेल ॥ द्रोणें जावोनि वृत्त सकळ ॥ सांगीतले कृपीसी ॥२९॥

मग आरोगणा करोनी ॥ अश्वत्थामा कडिये घेउनी ॥ द्रोण गेला मिथिलास्थानीं ॥ जनकाकडे ॥३०॥

तेणें षोडशोपचारीं पूजिला ॥ कंठीं घातली रत्नमाळा ॥ द्रोणें द्रुपदाचा वृत्तांत कथिला ॥ जनकालागीं ॥३१॥

येरु ऐकोनि ह्नणे स्वामी ॥ हें कराया अशक्त आह्मीं ॥ तरी भीष्मासि भेटा तुह्मी ॥ तेणें मनोरथ पुरतील ॥३२॥

मग जावोनि हस्तनापुरासी ॥ द्रोण भेटला कृपाचार्यासी ॥ ह्नणे धनुर्विद्या आह्मासी ॥ दीधल्या परशरामें ॥३३॥

तरी कुटुंबाच्या निस्तरा ॥ काहीं सांगा जी श्वशुरा ॥ येरु न बोलेचि उत्तरा ॥ खोंचला जिव्हारीं ॥३४॥

ह्नणे आतां सांडोनि आमुतें ॥ भीष्म कृपा करील यातें ॥ मग ह्नणे सुमुहूर्ती रायातें ॥ भेटवूं तुह्मां ॥३५॥

काहीं देववूं तुह्मांसी ॥ मग भोजनांतीं क्रमिली निशी ॥ प्रभातीं द्रोण भागीरथीसी ॥ स्त्रान सारोनि येत असे ॥३६॥

तंव कौरवपांडव तेथ ॥ चेंडूफळी होते खेळत ॥ तो चेंडू पडला आडांत ॥ काढावया विचारिती ॥३७॥

तेथें येवोनि द्रोण ह्नणे ॥ चेंडू काढा कां संधानें ॥ ऐकोनि ह्नाणितले दुर्योधनें ॥ काय भलतेंचि बोलतां ॥३८॥

उपरी द्रोण ह्नणे आवेशें ॥ तुह्मासि काढणें लक्ष नसे ॥ विद्या अभ्यासितां कैसे ॥ आचार्याजवळी ॥३९॥

मग स्वयें दर्भशलाका घेउनी ॥ चेंडू भेदिला अभिमंत्रोनी ॥ वायुवेगें त्या संधानी ॥ चेंडू काढिला बाहेरी ॥४०॥

ऐसा देखोनि चमत्कारु ॥ समस्तां विस्मय जाहला थोरु ॥ ह्नणती ऐसा मिळेल गुरु ॥ तरीच आह्मीच धन्य पैं ॥४१॥

मग नांव पुसे दुर्योधन ॥ येरु ह्नणे मी द्रोण ब्राह्मण ॥ कृपाचार्य श्वशुर ह्नणोन ॥ आलों नगरीं तूमचे ॥ ॥४२॥

ऐकोनि दुर्योधन धांवला ॥ वृत्तांत भीष्मा सांगीतला ॥ ह्नणे तो करा जी गुरु भला ॥ ऐकोनि तोषला गंगात्मज ॥४३॥

मग पुरोचत पाठविला ॥ तो कृपाचे घरी गेला ॥ द्रोणासि घेवोनिया आला ॥ आदरमातें ॥४४॥

भीष्में आसनीं बैसविला ॥ षोडशोपचारें पूजिला ॥ मग विनंती करुं लागला ॥ कीं तुह्मीं येथें राहिजे ॥४५॥

तंव द्रुपदाचा वृत्तांत ॥ द्रोणें भीष्मासि केला श्रुत ॥ भीष्म ह्नणे मनोरथ ॥ पूर्ण करीन स्वामिया ॥४६॥

यापारि भाषनिश्वया केलें ॥ मग पुत्रांसी निरविलें ॥ तुह्मी विद्या सांगा वहिले ॥ ह्नणोनि दीधलें गुरुपण ॥४७॥

द्रोण बोले नीतिभावें ॥ आधीं कृपाचार्यासि पूजावें ॥ मग बोलावोनि भीष्मदेवें ॥ पूजिला कृपाचार्य ॥४८॥

ह्नणे आज्ञा द्या जी द्रोणासी ॥ येरु ह्नणे शिकवा पुत्रांसी ॥ मग द्रोण नानाप्रयासीं ॥ शिकवी विद्या ॥४९॥

छत्तीस दंडायुधें अवधारा ॥ शस्त्र अस्त्रें मंत्रतंत्रां ॥ शिकवोनियां राजकुमरां ॥ केले पूर्ण ॥५०॥

मग द्रोण ह्नणे भीष्मासी ॥ परीक्षा विद्येची पाहा समरसीं ॥ येरें बोलावोनि कुमरांसी ॥ ह्नणे झडती द्या आतां ॥५१॥

द्रोणें काष्ठपुसा करोनी ॥ कंठीं रेषा काढिल्या तिनी ॥ मध्यें काळी आरक्त दोनी ॥ वेळुवावरी बांधिला ॥५२॥

वेळू वटावरी बांधिला ॥ सवें दुर्योधन बोलाविला ॥ ह्नणे लक्ष्य भेदीं वहिला ॥ त्रिबाणअवघी ॥५३॥

दुर्योधन न्याहाळूं लागला ॥ तंव काष्ठपुसाचि देखिला ॥ जंव पूर्ण कानाडीं विंधिला ॥ तंव चुकलें संधान ॥५४॥

तीनही बाण वृथा गेले ॥ मग गुरु द्रोणें वारिलें ॥ कीं पूर्नलक्ष्य नाहीं साधलें ॥ पुरें करीं दुर्योधना ॥५५॥

मग अर्जुनासि ह्नणे द्रोण ॥ लक्ष भेदाया घेई त्रिबाण ॥ येरु पाहोनि अनुमान ॥ बोले गुरुसी ॥५६॥

जी पक्षी वेळुवाग्रीं दिसत ॥ कंठीं तीनरेषा अलंकृत ॥ मध्यें कृष्णरेषा मंडित ॥ दोन आरक्त दोंभागीं ॥५७॥

तरी कवणी रेषा भेदणें ॥ ऐकोनि बोलिलें गुरुद्रोणे ॥ कीं काळी भेदोनि पाडणें ॥ लक्ष बापा ॥५८॥

येरें अनुलक्षें सोडिला बाण ॥ पाडिला कृष्णरेषा भेदोन ॥ द्रोणें आलिंगिला धांवोन ॥ संतोषले भीष्मादिक ॥५९॥

आपुली अनर्घ रत्नमाळा ॥ द्रोणें घातली पार्थाचे गळां ॥ सभा विसर्जिली ते वेळां ॥ परि खोंचला गांधार ॥६०॥

मग तो पुरोचनासि ह्नणे ॥ या अर्जुनासि समरीं जिणे ॥ ऐसा कोणी क्षत्रिय पाहणें ॥ तंव पुरोचन बोलिला ॥६१॥

सूतराजगृहीं महावीर ॥ असे कर्णनामें कुमर ॥ ऐसा ऐकोनि विचार ॥ तेथें धाडिलें पुरोचना ॥६२॥

मग मान सन्मान करोन ॥ गांधारे आणिला सूर्यनंदन ॥ तयासि अंगदेश देवोन ॥ राहविला निजनगरीं ॥६३॥

प्रीतिभाव करी तया ॥ तो महावीर कर्ण आर्या ॥ कौरवांमाजी सकल कार्या ॥ अग्रगण्य ॥६४॥

असो कर्ण आणिलिया वरी ॥ कवणी येके अवसरीं ॥ पार्था बोलावोनि झडकरी ॥ ह्नणे द्रोणाचार्य ॥६५॥

नित्यनेम देवपूजावया ॥ आणीं अग्रोदक धनंजया ॥ येरु कनकझारी घेवोनियां ॥ गेला भागीरथीये ॥६६॥

तंव तिये संधी दुर्योधनें ॥ केलें द्रोणासि विनवणें ॥ ह्नणे काहीं अपूर्व सांगणे ॥ विद्या मज स्वामिया ॥६७॥

पार्थ गेला होता अग्रोदका ॥ दोघे मार्ग चालती देखा ॥ वटवृक्षातळीं बैसोनि लक्षा ॥ सांगता होय गुरुद्रोण ॥६८॥

ह्नणे न सांगीतलें अर्जुना ॥ तें तूं अभ्यासीं दुर्योधना ॥ जेणें खेवीं त्रिभुवना ॥ जिंकिजे सहज ॥६९॥

जैसीं वटपत्रें छेदिजती ॥ तैसीच अरिशिरें पाडिजती ॥ ह्नणोनि बाण सादोनि शितीं ॥ द्रोणाचार्ये सोडिला ॥७०॥

माहेश्वरठाण मांडोनी ॥ बाण सोडिला अभिमंत्रोनी ॥ तंव विस्तारले येकापासोनी ॥ लक्ष कोडी मार्गण ॥७१॥

देठीं वटाची अर्धपत्रें ॥ छेदोनि पाडिलीं वसुंधरे ॥ मग तैसेंचि संधाम गांधारे ॥ मांडिलें देखा ॥७२॥

उरलीं जी कां पर्णाग्रें ॥ तीं छेदावी संधानमात्रें ॥ ह्नणोनि बाण सोडिला गांधारे ॥ तंव पडलें येक पत्र ॥७३॥

द्रोण ह्नणे पुरे पुरे ॥ संधान न करीं गा दूसरें ॥ तुज हे विद्या न स्फुरें ॥ कदाकाळीं ॥७४॥

दोघे स्वमंदिरीं गेले ॥ इकडे पार्थे उदक भरिले ॥ तंव क्रीडतां देखिलें ॥ जळदेवतांसी ॥७५॥

स्तुती करी धनंजया ॥ तंव संतोषलिया तया ॥ आसरा पार्थासि बोलिलिया ॥ जालों प्रसन्न तुजलागीं ॥७६॥

अगा चिंतिले पावसी मनोरथ ॥ अदृष्ट तें दिसेल समस्त ॥ अवघड तेंही क्षणाआंत ॥ अभ्यासिसी अर्जुना ॥७७॥

येरें नमस्कार केला तयां ॥ तंव अदृष्ट आहल्या तिया ॥ मग संतोषें धनंजया ॥ चालिला अग्रोदकेंसीं ॥७८॥

वटवृक्षातळीं जंव आला ॥ तंव तो चमत्कार देखिला ॥ ह्नणोनि अनुमानूं लागला ॥ कळलें विंदान गुरुचें ॥७९॥

हें लक्ष्य वंचिलें द्रोणें मातें ॥ तरी साधोनि पाहूं निरुतें ॥ ह्नणोनि ठाण मांडिलें पार्थे ॥ माहेश्वरी ॥८०॥

मनीं विचारोनि पाहे ॥ अग्रोदक असे झारिये ॥ ह्नणे कैसी ठेवों धरणीयें ॥ तंव आठवली सुबुद्धी ॥८१॥

मग बाणाग्रीं बांधूनि झारी ॥ अर्जुन ऊर्ध्वसंधान करी ॥ ते पाठविली अंतरीं ॥ पडों नेदी धरणीये ॥८२॥

जंव झारी येई खालती ॥ तंव बाणें पिटीतसे मागुती ॥ उडवोनि अंतरिक्षगती ॥ केलें दुजें संधान ॥८३॥

खेचरीतें चिंतोनि मनीं ॥ बाण सोडिला सितापासोनी ॥ तंव तो कोटिगुण विस्तारोनी ॥ पाडिली अवघीं वटपत्रें ॥८४॥

ऐसी अदृष्ट विद्या साधली ॥ तंव झारी गगनौनि उतरली ॥ ते पार्थे करीं झेलिली ॥ मग चालिला सवेग ॥८५॥

इकडे चिंता करी द्रोण ॥ ह्नणे कां न येचि अर्जुन ॥ तंव येरु धांवत येवोन ॥ लागला गुरुचरणीं ॥८६॥

द्रोणें उदकझारी घेतली ॥ देवपूजा समस्त सारिली ॥ अर्जुना पाठवणी दीधली ॥ स्वमंदिरीं जावया ॥८७॥

ऐसी कमिली ते निशी ॥ उदय जाहला दिनकरासी ॥ तंव कौरवांसह द्रोणापाशीं ॥ आला दुर्योधन ॥८८॥

बद्धांजुळी ठाकोनि विनवी ॥ ह्नणे कालची विद्या सांगावी ॥ तंव तियेचि समयीं पांडवीं ॥ केलें बिजें त्या ठायां ॥८९॥

मग कौरव पांडवासहित ॥ चालिन्नला तो गुरुनाथ ॥ वटाजवळी येवोनि पाहते ॥ तंव देखिला नवलावो ॥९०॥

ह्नणे अर्धपर्णे म्यां छेदिलीं ॥ मागुतीं अर्ध कवणें पाडिलीं ॥ तंव पार्थे विनवणी केली ॥ सांगीतला वृत्तांत ॥९१॥

ऐकोनि आचार्य कोपला ॥ ह्नणे माझा व्रतभंग केला ॥ तूं शिष्य भलारे भला ॥ झारी ठेविली धरणीये ॥९२॥

अर्जुन विनवोनि ह्नणे स्वामी ॥ झारी ठेविली नाहीं भूमीं ॥ लक्ष साधिलें असे आह्मी ॥ तुमचिये कृपें ॥९३॥

आश्वर्य मानोनि ह्नणे गुरु ॥ दाखवीं रे चमत्कारु ॥ येरें झारितळीं लावोनि शरु ॥ केलें संधान पूर्वील ॥९४॥

झारी पाठवोनि गगनीं ॥ दुजें संधान केलें तत्क्षणीं ॥ पाडिलीं देंठपत्रें छेदुनी ॥ राहिलीं जीं कां ॥९५॥

ऐसें द्विधा संधान केलें ॥ पाहोनि गुरु दुर्योधनासि बोले ॥ पाहें पां आश्वर्य केतुलें ॥ या अर्जुनाचें ॥९६॥

ऐसा लागवेग करुनी ॥ झारी झेलिली पडतपडतेनी ॥ मग लागला गुरुचरणीं ॥ तृतीयपार्थ ॥९७॥

द्रोणे आलिंगिला कवळोनी ॥ मग आले द्रोणभुवनीं ॥ समस्तां जाहली पाठवणी ॥ खेदावला गांधार ॥९८॥

पुढें कोणेयेके दिवशीं ॥ द्रोण गेला बहिर्भूमीसी ॥ सवें पार्थ कमंडलेंसी ॥ गुरु करी दीर्घशंका ॥९९॥

अर्जुनें गुरुचे सन्निधानासी ॥ कमंडलू योजिला आकाशीं ॥ संधान करोनि बाणासी ॥ थांबविला कमंडलू ॥१००॥

शौचांतीं द्रोण ह्नणे पार्था ॥ कमंडलू देई आतां ॥ येरें उतरिला खालता ॥ गगनींहुनी ॥१॥

ऐसें देखोनि द्रोणाचार्य ॥ मनीं मानी परम विस्मय ॥ ह्नणे हा वीर धनंजय ॥ निपजलासे प्रतापी ॥२॥

मग संतोषें आलिंगिला ॥ ह्नणे जन्म माझा सफळ जाहला ॥ मग भीष्माजवळी जाऊनि वहिला ॥ सांगीतला वृत्तांत ॥३॥

तें ऐकोनि दुर्योधन ॥ थोर जाहला खेदखिन्न ॥ मग सकळही विद्या द्रोण ॥ सांगे पार्थासी ॥४॥

छत्तीस दंडायुधें जाण ॥ प्रेरणा आणि आकर्षण ॥ सव्यापसव्य लघुलाघव पूर्ण ॥ दृढ शीघ्र दुरापात ॥५॥

यापरि सकळही संपूर्णता ॥ वेळ न लागे अभ्यासितां ॥ महोत्साह द्रोणचिता ॥ प्रेम पार्था करी थोर ॥६॥

मग भीष्मासि द्रोणगुरु ॥ अवघा सांगती प्रकारु ॥ कीं निपजला हा धनुर्धरु ॥ सकलविद्यासाधक ॥७॥

मजहूनि याचा आगळा वेग ॥ द्विगुण त्रिगुण असे चांग ॥ हा महावीर अभंग ॥ जाहला सोमवंशीं ॥८॥

ऐसें ऐकोनि कौरवां ॥ खेद उपजला अत्यंत जीवा ॥ मग कर्णवीर बरवा ॥ पुढां करिती ॥९॥

तो विद्यासाधक पूर्ण ॥ देखोनि पुसे गुरुद्रोण ॥ हा शिष्य कवणाचा कवण ॥ तंव दुर्योधन बोलिला ॥११०॥

अजी हा सूर्याचा कुमरु ॥ परशराम याचा गुरु ॥ अंगदेश देवोनि अधिकारु ॥ अणिला असे आह्मी पैं ॥११॥

तो अर्जुनाचा द्वेष करी ॥ संधानें संधान खालीं उतरीं ॥ परि पार्थाची आगळी परी ॥ नकळेचि त्या ॥१२॥

गर्वोक्तीनें ह्नणे कर्ण ॥ अद्यापि धाकुटा असे अर्जुन ॥ अतिरथी होईल पूर्ण ॥ पुरवील इच्छा आमुची ॥१३॥

कर्णे धाकुटा ह्नाणितला ॥ ह्नणोनि द्रोण कोपें बोलिला ॥ ह्नणे विद्येअर्थी वडील धाकुला ॥ ह्नणतां लाज न रे कांरे ॥१४॥

तंव भीष्म ह्नणे द्रोणा ॥ तुह्मी वायां कोपतां कर्णा ॥ हाही महावीर जाणा ॥ बळसामर्थ्ये आगळा ॥१५॥

पार्थ ह्नणे हा बळराशी ॥ परि कृत्रिमें राहिला भार्गवाशीं ॥ मग तेणें शापिलें यासी ॥ ह्नणोनि देशीं परतला ॥१६॥

ऐसी कथा जालिया अंतीं ॥ द्रोण मानेल दक्षिणप्रती ॥ ते कथा पुढें ऐकावी संतीं ॥ ह्नणे मधुकरकवी ॥१७॥ इति श्रीक०अ० कौरवपांडवविद्याप्रकारु ॥ एकोनविं० ॥११८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP