मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय ६

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय ६

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥ जन्मेजय ह्मणे मुनीश्वरा ॥ उत्तीर्ण नव्हें जी तव‍उपकारा ॥ जरी अर्पिजती भूतिसंभारा ॥ नानवस्तु ॥१॥

तूं कृपावशें बोलिलासी ॥ ह्मणोनि बोलिलासी ॥ ह्मणोनि ऐकिलें अपूर्वकथेसी ॥ आतां सांगिजे सेवकासी ॥ समूळ भारत ॥२॥

वैशंपायन ह्मणे अवधारीं ॥ स्नान केलिया ऋषीश्वरीं ॥ बैसोनि भागरिथीतीरीं ॥ पुसिली कथा भारती ॥३॥

तेयें पराशरु वक्ता ॥ समूळ कथिली भारतकथा ॥ परि जे व्यासोक्त अपूर्वता ॥ ते पूर्वीचे सांगितली ॥४॥

आतां संवाद ऋषीश्वरांचा ॥ तुज सांगों संकलितवाचा ॥ राया भावोभक्तिसत्वाचा ॥ तूंचि मेरु ॥५॥

तरी ऐकें सावधान ॥ कथा रसिक पुण्यपावन ॥ अनादिसिद्ध पुरातन ॥ सोमवंशाची ॥६॥

समूळ सोमवंश आदी ॥ ह्मणोनि आदिपर्व नाम बुद्धी ॥ व्यासें ठेविलें तें पूर्णभेदीं ॥ ऐकें राया ॥७॥

अनादिसिद्ध नारायण ॥ होता निरालंबीं करोनि शयन ॥ तंव उपजला चतुरानन ॥ तयाच्या नाभिकमळीं ॥८॥

तेणें अनंतब्रह्माडें निर्माण ॥ स्वसामर्थ्यें केलीं जाण ॥ मग राहिला आपण ॥ ब्रह्माडामाजी ॥९॥

तंव जन्मेजयो करी विनंती ॥ कीं मुख्य ब्रह्माडें किती असती ॥ आणि राहिला सावित्रीपती ॥ कवणिये ब्रह्माडीं ॥१०॥

वैशंपायन ह्मणती परियेस ॥ अनंतब्रह्माडें विशेष ॥ परि मुख्य तीं येकवीस ॥ ब्रह्माडें जाण ॥११॥

एकविसांचे तळवटीं ॥ तेथें ब्रह्मा राहिला मूळपीठीं ॥ तंव अत्री जन्मला ते गोष्टी ॥ ऐकें राया ॥१२॥

कवणे येके अवसरी ॥ ब्रह्मदेव भोजन करी ॥ तंव आपोशनाभीतरीं ॥ देखिलें बालक ॥१३॥

मग तें ठेविलें भूमीवरी ॥ तंव बालक रूदन करी ॥ आणि न्याहाळी नेत्रीं ॥ तंव देखे आजानुबाहू ॥१४॥

तया अत्रि ऐसें नाम ठेविलें ॥ बरवें पाळिग्रहण केलें ॥ वेदशास्त्री पूर्ण जाहलें ॥ मग गेलें रेतकुंडा ॥१५॥

भीतरीं उडी घालोनी ॥ एकाग्र बैसला असे ध्यानीं ॥ तुंव मुखीं नासिकी पाणी ॥ प्रवेशले ॥१६॥

ते रेतोदक प्रबळ ॥ घडघडीत अग्निज्वाळ ॥ परि कृतयुगीं असे शीतळ ॥ आणि प्रतप्त कलियुगीं ॥१७॥

दुजें कारण तो ब्रह्माकुमरु ॥ ह्मणोनि तें न करी अपकारु ॥ असो कोटिवरुषें ऋषीश्वरु ॥ होता रेता आंत ॥१८॥

तयाच्या तपा शेवट जाहला ॥ मग अत्री बाहेर आला ॥ तंव चंद्रोदय देखिला ॥ पौर्णिमे वैशाख्ये ॥१९॥

येरु संतोषला देखोनी ॥ ह्मणे हे देवांगना कामिनी ॥ मग काय भावो धरिता मनी ॥ द्रवला रेत ॥२०॥

तेथ तात्काळ जाहला कुमरु ॥ त्याचें नाम ठेवी ऋतीश्वरु ॥ कीं सोमानिमित्त जाहला साकारु ॥ ह्मणोनि सोमऋषी ऐसें ॥२१॥

परि लज्जा उपजली अत्रीसी ॥ ह्मणे भंग जाहला तपासी ॥ मग पुनरपि गेला परियेसी ॥ तपसाधने ॥२२॥

तंव संभ्रमें राव ह्मणे ॥ कीं जन्मतांचि गेला तपसाधने ॥ तो स्त्रीपुरुषविभाग नेणे ॥ मग स्त्रीभावें कां द्रवला ॥२३॥

वैशंपायन ह्मणे अवधारीं ॥ अत्री ब्रह्मयाचे उदरीं ॥ कोटिसंख्या वरुषेवरी ॥ होता जाण ॥२४॥

तो आपोशन करीतां नीरी ॥ श्वासें पडिला अंजुळीभीतरीं ॥ पुढें विद्याम्यास करी तोंवरी ॥ जाहला बहुत काळ ॥२५॥

त्या उपरी रेतकुंडांत ॥ कोटिवरुषे तपस्थिती ॥ ह्मणॊनि ऋषी जुनाट बहुत ॥ त्रिकाळज्ञानी ॥२६॥

स्त्रीपुषांचे हवभाव ॥ तो ज्ञानदृष्टी देखे सर्व ॥ तथा प्रत्यक्ष देखे रमतां जीव ॥ पशुपक्षी जळसरें ॥२७॥

दुसरें काममय शरीर ॥ तें न सांडीच स्वविकार ॥ तप पुरलिया आला पूर ॥ मदनजळाचा ॥२८॥

ह्मणोनि राय तपनाशक ॥ मदनाऐंसे नाहीं आणिक ॥ आतां असो हा विवेक ॥ ऐकें अग्रकथा ॥२९॥

मग तो अत्रीचा वीर्यजात ॥ सोमऋषी नामें विख्यात ॥ अविनाश बळी अद्भुत ॥ पावला वृद्धी ॥३०॥

तो अवलोकी त्रिभुवन ॥ करी पृथ्वीचें पर्यटन ॥ गिरि पठ्ठणें वनोपवन ॥ भ्रमण करी ॥३१॥

अष्टभोगीं संसारभोगिजे ॥ भूमंडळीं राज्य कीजे ॥ ऐसें चितोनियां वोजें ॥ फिरे सोमऋषी तो ॥३२॥

भागीरथीसि येकदा आला ॥ तेथें स्नान करिता जाहला ॥ पूजाविधी सारोनि चालिला ॥ ऋषीश्वरतो ॥३३॥

पुढां देखिला येक तरु ॥ तयाचा जंव करे न्याहारु ॥ तंव देखिला चमत्कारु ॥ पक्षिये कुंजंर मारिला ॥३४॥

पूर्वीग्राम होता वसिन्नला ॥ तो उद्वस असे पडला ॥ तेथें वृक्ष हा वाढिन्नला ॥ गगनाकार ॥३५॥

वरी खोपां करोनि कपोती ॥ पिलीं जनौनि राहत होती ॥ तेथें येक येवोनि भद्रजाती ॥ आसुडिला वृक्ष तेणें ॥३६॥

कपोती गेली होती चारया ॥ इकडे आकांत वर्तला पिलयां ॥ तंव येणें जाहलें कपोतेया ॥ तेचि समयीं ॥३७॥

कुंजरें वृक्ष पाडों आदरिला ॥ तंव कपोता धाविन्नला ॥ कुंजरु मस्तकीं हाणीतला ॥ उभयां जाहला संग्रामु ॥३८॥

तंव कपोती घाघाइली ॥ पक्षिकुळें मेळविलीं ॥ अनंतकोटी धाविन्नली ॥ झुंजिन्नलीं हस्तीसवें ॥३९॥

चुंचुवें व्याकुळ केला थोर ॥ शिर फोडोनि पाडिला कुंजर ॥ तें देखोनि सोमऋषेश्वर ॥ मनीं विस्मित जाहला ॥४०॥

ह्मणे हेचि भूमिका सबळ ॥ कैसें बलिष्ठ पक्षिकुळ ॥ वृक्ष साभिमानी देवी असेल ॥ ह्मणोनी मारिला कुंजरु ॥४१॥

इये भूमिके कीजे वास ॥ तरीच विजयी होईल ॥ तरी आतां कीजे उद्देश ॥ आपण स्त्रियेचा ॥४२॥

मग ज्ञानदृष्टीं पाहिलें ॥ तंव येक निधान देखिलें ॥ तें खाणोनिया काढिलें ॥ असंख्यात धन ॥४३॥

मग तेथें तो बैसला ॥ मेळवोनी सैन्यमेळा ॥ द्रव्य वेंची तया वेळा ॥ अगणित देखा ॥४४॥

आणि वसविलें थोर नगर ॥ हाट चौबारे आवार ॥ माडिया धवलारें सुंदर ॥ राजमंदिरादी ॥४५॥

पायदळ आणि गज रथ ॥ मेळविले असंख्यात ॥ दुर्ग घातले लोहबंदित ॥ तया वृक्षाभोंवते ॥४६॥

नाव ठेविलें हस्तनापुर ॥ तो ऐकें राया विचार ॥ कपोतीं वधिला हस्तिथोरं ॥ ह्मणोनियां ॥४७॥

ऐसा सोमराव देवऋषी ॥ राज्य करी परिवारेंसी ॥ आधार केला सोमवंशासी ॥ हस्तनापुर ॥४८॥

तंव जन्मेजय राव ह्मणे ॥ तें पूर्वी नगर वोस कवणेंगुणें ॥ मग ऐकें ह्मणे सावधानें ॥ वैशंपायन ॥४९॥

ब्रह्में सृष्टिनिर्माण केलें ॥ तैं ओंकारराया बसविलें ॥ अविनाश नाम ठेविलें ॥ ते कथा ऐक ॥५०॥

श्रीमती भागीरथीचे तीरी ॥ अविनाश नामें असे नगरीं ॥ ओंकार रावो राज्य करी ॥ त्याची अंतुरी सत्यवती ॥५१॥

मग तयांच्या श्रृंगारमेळीं ॥ पुत्र उपजले नेत्रकमळीं ॥ रावो राणी संतोषलीं ॥ ह्मणती जाहली वंशवृद्धी ॥५२॥

ऐसे जाहले चोवीस कुमर ॥ महापराक्रमी थोर ॥ परि तमोगुणे आप पर ॥ न ओळखती ॥५३॥

कुटुंबकलहो मांडिला देखा ॥ न मानिती येकमेकां ॥ संहार करिते जाहले गोत्रिका ॥ तें परियेसें भारता ॥५४॥

तयांचे दोनी भाग जाहले ॥ अठरा येकीकडे मीनले ॥ आणि साहीजण ठेले ॥ येकीकडे ॥५५॥

सारोनि षट‍कर्म प्रातःकाळीं ॥ येती ओंकार राया जवळी ॥ आपुलाले विचार सकळी ॥ सांगती पितयापुढें ॥५६॥

अठराही बोलती निरुतें ॥ कीं वर्म आतुडलें आमुतें ॥ साही ह्मणती तुह्मातें ॥ ठाउकें न पडे ॥५७॥

अठरा ह्मणती नृपनाथा ॥ तूं आमुचा समस्तांचा पिता ॥ तरी या सहाजणां सुता ॥ कां शिकविशीना ॥५८॥

ऐकोनि ओंकार राव ह्मणे ॥ तुमचें कलहकारण मी नेणें ॥ भांडोनियां व्यर्थपणें ॥ घडवितां पाप ॥५९॥

ऐसें बोलतां भूपती ॥ सहा तें उठले निर्घातीं ॥ त्यांहीं अठरांची केली शांती ॥ पितयासहित ॥६०॥

समस्तही गोत्रपरिवार जाहला सकळांचा संहार ॥ आणि अविनाश पुरीचा थोर ॥ जाहला नाश ॥६१॥

मग ते नगरी वोस पडली ॥ चौदायुगें अतिक्रमिली ॥ त्याउपरे पांढरी वसली ॥ सोमऋषीची ॥६२॥

तये ह्स्तनापुरीं सोमराजा ॥ प्रतिपाळी परिवार प्रजा ॥ ज्याची भूमंडळी बोजा ॥ जाहला कीर्ती ॥६३॥

देशोदेशींचे नृपवर ॥ भेटों येती घेऊनि करभार ॥ भैद्रीं बैसतां महावीर ॥ सोमराजा ॥६४॥

परि पत्‍नी नाहीं तयासी ॥ ह्मणोनि चिंता करी मानसीं ॥ तंव अशरीरिणी ह्मणे आकाशी ॥ कीं स्त्री रायासि मिळेल ॥६५॥

ऐकतां विस्मित राव मुनीं ॥ तंव पातला नारदमुनी ॥ मग आदरमान देवोनी ॥ पूजिला षोडशोपचारें ॥६६॥

नारद ह्मणे गा भुपति ॥ कैसी जाहली राज्यप्राप्ती ॥ येरें गजकृपोतां पासूनि स्थिती ॥ सांगितली सकळिक ॥६७॥

आणि ह्मणे वंशवृद्धीकारणें ॥ इतुकें जंजाल पडलें करणें ॥ परि स्त्रियेवांचोनि मनें ॥ घेतलासे उच्चाटु ॥६८॥

मुनि ह्मणे गा अवधारीं ॥ खेचरी देव्या पद्मसरोवरीं ॥ तीतें पुजावया राजकुमरी ॥ येती जाण ॥६९॥

माजी पद्मगंध जियेचे आंगीं ॥ ते तुवां वरावी वेगीं ॥ तियेचें सौदर्य नसमाय जगीं ॥ वंशवृद्धी होईल ॥७०॥

ऐसें सांगोनि नारद गेला ॥ रायें श्वेतवाहन पुरोहित बाहिला ॥ मग तयासि विचार पुसला ॥ नारदोक्ताचा ॥७१॥

श्वेतवाहन ह्मणे राया ॥ सपरिवार जावें तया ठाया ॥ मग निशाणी घाव देवोनियां ॥ चालिला राव ॥७२॥

तंव सत्यलोकी ध्यानस्थ ॥ ब्रह्मा होता निवांत ॥ तेणें निशाण ऐकोनि अद्भुत ॥ बिसर्जिलें ध्यान ॥७३॥

मुनी करोनियां विचारु ॥ ह्मणे सोम हा अत्रिकुमरु ॥ जात असे कन्या हरुं ॥ पद्मसरोवरीं ॥७४॥

तेथें धांवण्य पावेल इंदु ॥ सोम नेणें संग्राम करुं ॥ इंद्र करील संहारू ॥ ह्मणोनि वेगें चालिला ॥७५॥

सोमा पुढे उभा ठेला ॥ रायें साष्टांग प्रमाण केला ॥ मग वृत्तांत पुसिला ॥ चतुर्मुखें ॥७६॥

येरें नारदोक्त सांगीतलें तंव ब्रह्मा तयासि बोले ॥ तुज अत्रीपासोनि जन्म जाहलें ॥ ह्मणोनि माझा तूं नातु ॥७७॥

तरी कन्येसि हरितां शीघ्र ॥ धांवणेया येईल इंद्र ॥ संग्राम होईल महाघोर ॥ तरी घेई शस्त्रास्त्रविद्या ॥७८॥

तीं छत्तीस दंडायुर्धे ॥ देवोनि पूर्ण केला विद्ये ॥ मग ब्रह्मा गेला आनंदें ॥ सत्यलोकासी ॥७९॥

इकडे सोम चालिला परिवारें ॥ साठसिंहस्त्र वाजंतरे ॥ मही कापे पायभारें ॥ आढावू धनुर्धर ॥८०॥

अठराक्षोणी कुंजर ॥ पन्नासकोटी रहवर ॥ साठकोटी असिवार ॥ नांदें अंबर गर्जिन्नलें ॥८१॥

सर्वें सप्तद्दीपावतीचे ॥ राजे चालिले मुकुटांचे ॥ भार पडिले कटकांचे ॥ शतयोजनें ॥८२॥

उडोनि चालिलें अंबरीं ॥ तंव देखिला हिमवंतगिरी ॥ पुढें निर्गम नाहीं ह्मणोनि विचारीं ॥ पडिला सोम राव ॥८३॥

परि विद्या स्मरतां अग्निदीप्ती ॥ तेणें हिम पळालें पर्वतीं ॥ मग चालिले शीघ्रगती ॥ पावले पद्मसरोवर ॥८४॥

तंव ईशान्ये उदयगिरी ॥ तेथें निर्माल्य राजा ख्याति थोरी ॥ तोही पातला तिये अवसरीं पद्मावतीजनक ॥८५॥

ऐसा मेळा मिळाला समस्तां ॥ तंव सखियांसह पद्मदुहिता ॥ पूजोनि खेचरी देवता ॥ बैसली ध्यानस्थ ॥८६॥

ह्मणे मी पूजितसें तुज ॥ तरी माते वर द्यावा मज ॥ तंव देवी बोलिली सहज ॥ कीं आतांचि पावसी ॥८७॥

असो तयेचि अवसरीं ॥ राव आला सैन्यपरिवारीं ॥ त्यासी देखोनि समस्त कुमरीं ॥ गजबजिल्या पैं ॥८८॥

ह्मणती आजी चैत्रशुद्धचतुर्दश ॥ देवतेचा पूजादिवस ॥ ह्मणोनि द्यावयानवस ॥ कोणी राजा पातला ॥८९॥

तंव राजदूत पुढें आला ॥ तो पद्मावतीसि बोलिला ॥ कीं हा निर्माल्य भक्त पातला ॥ सपरिवारें ॥९०॥

तेणें स्थिरावलीया कुमरी ॥ तंव सुखासनीं रावो नारी ॥ बैसोनि पावलीं झडकरी ॥ देवालयासी ॥९१॥

राव उतरला सरोवरपाळीं ॥ तंव धाविन्नली पद्मबाळी ॥ दीधली क्षेमालिंगन कवळी ॥ मातापितया ॥९२॥

थोर आनंदें रावराणी ॥ करीं धरोनियां नंदिनी ॥ देउळीं प्रवेशलीं तत्क्षणीं ॥ पूजावया देवीतें ॥९३॥

जंव खेचरी नमस्कारिली ॥ तंव ते अव्यक्त बोलिली ॥ कीं हे पद्मदुहिता जाहली ॥ मरणमूळ राया तुज ॥९४॥

हें ऐकोनि चिंतावला राजा ॥ लगबगोनि केली पूजा ॥ मग बांधिली संग्रामध्वजा ॥ पर्वतावरी ॥९५॥

तंव हेर आले धांवत ॥ त्यांहीं सोमासि केलें श्रुत ॥ जो वर्तला होता वृत्तांत ॥ निर्माल्यरायाचा ॥९६॥

तो ऐकोनि कोपला रावो ॥ मग निशाणा दीधला घावो ॥ चला उठा ह्मणे जावों ॥ वेढूं पर्वतासी ॥९७॥

ऐकतां वीर धाविन्नले ॥ सकळीं पर्वता वेढिलें ॥ तंव सैन्य आड आलें ॥ निर्माल्यरायांचें ॥९८॥

युत्धा भडभडाटु जाहला ॥ परि सोमवीरें नेट मांडिला ॥ तंव दूत धांवत गेला ॥ निर्माल्याजवळी ॥९९॥

ह्मणे जी परदळ आलें थोर ॥ गिरिवरा झोंबले वीर ॥ रवह्मणे जाहले विचित्र ॥ अकस्मात कैसें ॥१००॥

मग मानसीं विचार करी ॥ ह्मणे उपवर जाणोनि कुमरी ॥ धाडी आली हे निर्धारी ॥ कवणिये रायाची ॥१॥

आणि आताचि बोलिली खेचरीं ॥ कीं मरणमूळ हे कुमरी ॥ तरी संग्रामासि झडकरी ॥ चलावें आपण ॥२॥

मग चातुरंग संसारोनी ॥ गिरिपाठारीं उतरोनी ॥ भाट पाठविले तत्क्षणीं ॥ सोमाकडे ॥३॥

सहाशतें येकवीस भाट ॥ वेगें पातले राया निकट ॥ स्तवो करुनियां प्रकट ॥ वानिला सोमवंश ॥४॥

आणिक ह्मणती नृपवरा ॥ कां वेढिलें या गिरिवरा ॥ तें सकळ आह्मां श्रुत करा ॥ फेडोनि सदेह ॥५॥

राव ह्मणे कल्याणकीर्तीं ॥ नारदें सांगीतली पद्मावती ॥ ह्मणोनि अलों या पर्वतीं ॥ ते युवती हरावया ॥६॥

तंव ऐकिलें दूतद्वारें ॥ कीं ध्वजा बांधिली निर्माल्यवीरें ॥ तरी तयासि बघोनि निर्धारें ॥ हरूं पद्मावती ॥७॥

चंड ह्मणती हांसोनी ॥ हें वायां बोलिलेति नृपमणी ॥ जेणें जिंकिला वज्रपाणी ॥ तया कैसें वघात ॥८॥

येणे अमरावती घेतली ॥ तैं इंद्रे कन्या समर्पिली ॥ जांवई करोनि राखिली ॥ इंद्रपुरी स्वराज्य ॥९॥

त्याची हे कन्या पद्मावती ॥ जे सुरेश्वराची असे नाती ॥ तरी ते हरावयासि भूपती ॥ वृथा अभिमान धरियेला ॥११०॥

ऐकोनि नृप कोपला भाटा ॥ ह्मणे शिखलासि रे वाजटा ॥ तंव प्रधान ह्मणे सुभटा ॥ कीं चंडासि मारूं नये ॥११॥

आतां यासी त्यांग देवोनी ॥ पाठवीं राजशिरोमणी ॥ येरें प्रधानवाक्य ऐकोनी ॥ बोळविले भाट ॥१२॥

तेथूनि भाट मुरडले ॥ ते निर्माल्यासि भेटले ॥ सकळही वृत्त सांगीतलें ॥ सोमेश्वराचें ॥१३॥

ऐकतां निर्माल्य कोपला ॥ निशाणा घावो दीधला ॥ सैन्यभाऊ उठावला ॥ सोमावरी ॥१४॥

वाद्यें गर्जलीं दोहीं दळीं ॥ थरथर कांपें महीतळीं ॥ हांका गर्जनाच्या कल्लोळीं ॥ दुमदुमलें नभें ॥१५॥

वीर उठावले आईणी ॥ थोर जाहली केशधरणी ॥ सैन्य संख्य पदिलें रणीं ॥ रक्त धरणी रापलीं ॥१६॥

झुंज जाहलें घोरांदर ॥ पडले पायद अश्वकुंजर ॥ गणीत जाहलें समग्र ॥ खर्व साठी ॥१७॥

सप्तद्दीपींचे भूपाळ ॥ पडलें असे तयांचें दळ । चातुरंग सैन्य सकळ ॥ धरणी वरी ॥१८॥

ऐसा संग्राम जाहला थोरु ॥ तो सांगता विस्तरेल कल्पतरु ॥ असो तें देखोनि ब्रह्मकुमरु ॥ गेला अमरावतीये ॥१९॥

सोमानिर्माल्यांचा वृत्तांत ॥ तेणें इंद्रासि केला श्रुत ॥ ह्मणे आतां निर्माल्यघात ॥ होईल निश्चयें ॥१२०॥

सोमें उदयगिरी वेढिला ॥ तुझा जामत असे कोंडिला ॥ तरी धांवणें करीं वहिला ॥ सुरेश्वरा गा ॥२१॥

मग कोपोनि वज्रपाणी ॥ दुंदुभी त्राहाटिल्या गगनीं ॥ परिवारेंसिं आला तत्क्षणीं ॥ जामातसाह्या ॥२२॥

ऐसा पातला उदयगिरी ॥ वाद्यें लाओनि अंबरीं ॥ ते ध्वनी ऐकोनि श्रोत्रीं ॥ संतोषला निर्माल्य ॥२३॥

इकडे सोमराव ह्मणे प्रधानासी ॥ इंद्र आला गा धांवण्यासी ॥ तरी वोज करणें सैन्यासी ॥ थाटोनि दळभार ॥२४॥

मग प्रधानें तत्क्षणीं ॥ दळ थाटिलें वोज करोनी ॥ तंव उतरला गगनींहुनी ॥ सुरेश्वर ॥२५॥

तो निर्माल्यासी भेटला ॥ ह्मणे तवपुरुर्षार्थ काय जाहला ॥ येरें इंद्रदेव वर्जिन्नला ॥ कीं ऐसें न वदावें जी ॥२६॥

मग संसारोनि दळभार ॥ पुढें ऐरावती कुंजर ॥ वरी आरुढला सुरेश्वर ॥ युद्धलागीं ॥२७॥

येकीकडे निर्माल्याचा भार ॥ येकीकडे सुरेश्वर ॥ तो यावा देखोनि थोर ॥ सोमेश्वर उठावला ॥२८॥

असंख्य शस्त्रजाळ सुटलें ॥ बाणीं भूमंडळ व्यापलें ॥ परस्परीं निवारिलें ॥ थोर जाहलें कंदन ॥२९॥

तो संग्रम सांगतां थोरु ॥ विस्तारेल कल्पतरु ॥ यास्तव करोनि सारोद्धारु ॥ कथाचारु सांगतसें ॥१३०॥

मग तो सोमराजा तत्क्षणीं ॥ बाण अभिमंत्रोनी ॥ तो विस्तारला गगनीं ॥ शरीं धरणीं व्यापिली ॥३१॥

अवघें देवदल व्यापिन्नलें ॥ सैन्य बहुत खोंचलें ॥ निर्माल्यासी भेदलें ॥ पाचांबाणीं ॥३२॥

तंव इंद्र धाविन्नला ॥ बाणजाळी वर्षताजाहला ॥ तो शरसंघ निवारिला ॥ भला क्षत्रिय सोमेश्वर ॥३३॥

बृहस्पति ह्मणे इंद्रासी ॥ झुंजतां न पुरवे ययासी ॥ हा ब्रह्मवरद सोमवंशीं ॥ विद्या यासी संपुर्ण ॥३४॥

तंव सोमेश्वराचा शर ॥ देवेंद्रासि भेदला शीघ्र ॥ मूर्छा मानूनि सुरेश्वर ॥ करी विचार देवेंसि ॥३५॥

यासी न पुरवे झुंजतो ॥ तरी पळ काढावा सर्वथा ॥ मग निर्माल्यें पद्मदुहिता ॥ घेवोनि समस्त पळाले ॥३६॥

स्वर्गी गेले अदृष्ट देखा ॥ चिंता वर्तली सोमकटका ॥ पुढां कथा वर्तली ते ऐक ॥ ह्मणे मधुकरकवी ॥३७॥

इति श्रीं कथाकल्पतरू ॥ अष्टमस्तबक मनोहरू ॥ सोमनिर्माल्यसंग्रामप्रकारू ॥ षष्ठोऽध्यायीं कथियेला ॥१३८॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP