मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय २६

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय २६

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

भीम हेडंबीच्या असतां मंदिरीं ॥ नवल जाहलें वनांतरीं ॥ काउरदेशीं राज्य करी ॥ प्रळयवगाळ राक्षस ॥१॥

तयाची श्रृंगारवती राणी ॥ डोहळे उपजले तिये गुर्विणी ॥ कीं कामाक्षीं पूजावी स्वामिणी ॥ शिरीं पांडवांचे ॥२॥

ते डोहळे पुरवावया जाणा ॥ राक्षस आला हिडिंबवना ॥ मावें रचिलीं तत्क्षणा ॥ देऊळ आणि सरोवर ॥३॥

आपण ऋषिवेष धरोनी ॥ भेटला धर्मादिकांलागुनी ॥ ह्नणे बहुदिवस असें सेवुनी ॥ शिवालय हें ॥४॥

अर्जुन ह्नणे धर्माकुंतीसी ॥ चला जावों शिवदर्शनासी ॥ मग कुंतियेसहित वेगेंसी ॥ चालिले देउळीं ॥५॥

सरोवरीं स्त्रानें केलीं ॥ तंव राक्षसें मोहनी घातली ॥ मग प्रवेशलीं देउळी ॥ घेवोनि कमळपूजा ॥६॥

येरे कवाडें देउनी ॥ उडाला देऊळ घेउनी ॥ ऐसा स्वनगरीं जाउनी ॥ उतरिलें देउळ ॥७॥

भारता होणार तें न टळे ॥ ह्नणोनि पांडव बांधिले ॥ पार्थे द्रुपदासि धरिलें ॥ तोही व्यापला मोहनीयां ॥८॥

येरें मोहनी करितां परती ॥ परस्परें टकमकां पाहती ॥ राक्षस ह्नणती आतां निगुती ॥ उदयीक देऊं देवतेसी ॥९॥

इकडे भीम ह्नणे कांते ॥ धर्माजवळी न्यावें मातें ॥ येरी अवघा वृत्तांत पतीतें ॥ सांगती जाहली ॥१०॥

ते जाणे निशाचरी ह्नणोनी ॥ ह्नणे उदयीक चतुर्दशीदिनीं ॥ पांचांजणांसि वधूनी ॥ राक्षस पूजील कामाक्ष्या ॥११॥

येरु चिंताग्रस्त होवोनी ॥ ह्नणे मी जाईन तिये स्थानीं ॥ येरी ह्नणे आड जळतो वन्ही ॥ पर्वतीं योजनें बारा ॥१२॥

तेथें न जाववे तुह्मांसी ॥ तंव भीम ह्नणे हेडंबीसी ॥ तुवांचि न्यावें गे मजसी ॥ तिये देवालयीं ॥१३॥

येरी भीमासि घेवोनि उडाली ॥ ती देवालयीं उतरली ॥ मग भीमें आज्ञा दीधली ॥ कीं त्वां जावें स्वस्थानीं ॥१४॥

भीम वायुरुप जाहला ॥ देउळांत प्रवेशला ॥ तये देवते आड लपाला ॥ तंव प्रकाशला दिनकर ॥१५॥

ते वेळीं प्रळयघंगाळ आला ॥ तपन आरंभिता जाहला ॥ आपण बाहेर असे बैसला ॥ राक्षस करिती अभीचारिक ॥१६॥

ते अवघे भीमें ग्रासिले ॥ सेवकीं रायासि श्रुत केलें ॥ येरु आश्वर्य मानोनि बोले ॥ कीं क्षुधातुर देवता ॥१७॥

भीतरीं जावोनि करी स्तुती ॥ ह्नणे पांचही देवोनि करीन तृप्ती ॥ तंव भीम बोले अदृष्टगती ॥ तुझी भक्ती पावली गा ॥१८॥

पांचही सोडावी देउळांत ॥ स्वेच्छा आहुती घेईन निभ्रांत ॥ ऐकोनि तोषले समस्त ॥ देव्या प्रत्यक्ष बोलिली कीं ॥१९॥

मग पांचहीजणें आणिलीं ॥ त्यांचीं बंधनें ढिली केलीं ॥ ह्नणती स्मरारे आतां आपुली ॥ कुळदेवता ॥२०॥

यावरी चौघे बोलती ॥ देव्या द्वारके श्रीपती ॥ ते दूरी असे आणि कपटगतीं ॥ आणिलें तुह्मीं ॥२१॥

मग ह्नणती कुंतियेसी ॥ तूं स्मरें कां वो देवतेसी ॥ येरी ह्नणे स्मरावें भीमासी ॥ परि तो नेला हेडंबीनें ॥२२॥

असो तीं पांचहीं देउळी घातलीं ॥ कवाडें बाहेरुनि लाविलीं ॥ भीम भेटला तिये वेळीं ॥ मौनत्वेंचि पांचांसी ॥२३॥

मग हाक देवोनि तत्क्षणीं ॥ बाहेर आला कवाडें मोडुनी ॥ राक्षस लोळविले धरणीं ॥ येक बारावाटां पळाले ॥२४॥

प्रळयधंगाळ होता पळतु ॥ तो पायीं धरोनि आणिला ओढितु ॥ देवतेसि ह्नणे हा घेई तूं ॥ ह्नणोनि द्वारीं आपटिला ॥२५॥

राक्षस धरोनियां अवघे ॥ देवतेपुढें आपटी रागें ॥ आणि श्रृंगारवतीचें वेगें ॥ चिरिलें जठर ॥२६॥

गर्भ काढिला भीमसेनें ॥ तंव अशरीरिणी ह्नणे यासी न मारणें ॥ येरु भवंडिता सत्राणे ॥ निसुटला हातींचा ॥२७॥

तो धर्मपुरीसि जावोनि पडिला ॥ पुढें भीक्षण नाम पावला ॥ इकडे देवीनें वर दीधला ॥ भीमसेनासी ॥२८॥

कीं तुजसी सिंहनाद करितां ॥ वैरी पळतील वायुसुता ॥ येरु चरणीं लागोनि त्वरिता ॥ ह्नणे तूंचि साह्यकत्रीं ॥२९॥

भीम धर्मादिकीं आलिंगिला ॥ तो ह्नणे हेडंबीगृहीं चला ॥ विचार अवधियां मानवला ॥ मग वायु स्मरिला वृकोदरें ॥३०॥

तेणें येवोनि अवधियांसी ॥ उचलोनि नेलें हेडंबीपाशीं ॥ येरी लागोनि चरणासी ॥ पूजिले समस्तां ॥३१॥

धर्म पुसे हेडंबीसी ॥ प्रळयधंगाळ नाम कां त्यासी ॥ येरी ह्नणे मोहक प्राणियांसी ॥ ह्नणोनि प्रळयघंघाळ नाम ॥३२॥

आणि दुसरें नांव कर्मिया ॥ तें कारण ऐका स्वामिया ॥ महाकर्म आचरोनियां ॥ तेणें पूजिली देवता ॥३३॥

असो मग तयेसि धर्म ह्नणे ॥ आतां येकचक्रनगरीं जाणें ॥ येरी ह्नणे हे रात्रि क्रमणें ॥ उदयीक सांगेन विचार ॥३४॥

असो पांडव येरा दिवशीं ॥ आज्ञा मागती हेडंबीसी ॥ तंव ते ह्नणे येकचक्रीसी ॥ नवचावें स्वामिया ॥३५॥

तेथें असे बकराक्षस ॥ त्यासी नित्य मनुष्याचा ग्रास ॥ गाडा येक प्रतिदिवस ॥ भक्षी अन्न ॥३६॥

ऐकोनि ह्नणे वृकोदर ॥ तरी त्याचा मीं करीन संहार ॥ तुह्मी नव्हावें चिंतातुर ॥ होईल उपकार बहुतांसी ॥३७॥

मग तिये दिवशीं राहाविले ॥ प्रभातीं हेडंबीनें पृष्ठी वाहिले ॥ नेवोनि येकचक्रीं उतरिलें ॥ समस्तांसी ॥३८॥

कर जोडोनि विनंती करी ॥ कीं गर्भ असे माझे उदरीं ॥ तया जाहले मास चारी ॥ कैसी परी करावी ॥३९॥

तंव ह्नणे वृकोदर ॥ उदर दिसे घटाकार ॥ तरी तुज होईल कुमर ॥ त्याचें नाम घटोत्कच ॥४०॥

हेडंबी ह्नणे परियेसा ॥ जे वेळीं तुह्मां उपजेल इच्छा ॥ तेव्हां पुत्रासह येईन भरंवसा ॥ जेथ तुह्मी असाल ॥४१॥

धर्म ह्नणे तूं पतिव्रता ॥ तुझे उपकार आमुच्या माथां ॥ तरी नेवोनि आणावें वायुसुता ॥ जेथ असों आह्मी ॥४२॥

ऐकोनि हेडंबी गेली स्वदेशीं ॥ पांडव आले येकचक्रीसी ॥ येका विप्राचे घरासी ॥ उतरले पैं ॥४३॥

तैं बकराक्षसाची पाळी ॥ तेचि ब्राह्मणावरी आली ॥ तो जावोनि तिये वेळीं ॥ बोलिला महाजनांसी ॥४४॥

जें द्रव्य लागेल तें घ्यावें ॥ मनुष्य येक विकत द्यावें ॥ तंव कोपोनि ह्नणती आघवे ॥ द्रव्य काय करुं आह्मी ॥४५॥

तो तळ्याचे कांठीं असे निशाचार ॥ उदयीक पाठवीं आहार ॥ एक मनुष्य आणि रहंवर ॥ भरुनि अन्न ॥४६॥

विष्णुशर्मा दुखावला ॥ येवोनि स्त्रियेसि विचार मांडिला ॥ ह्नणे कैसा देव कोपला ॥ आतां द्यावें कवणासी ॥४७॥

तंव गौतमी नामें कांता ॥ ह्नणे मज द्याजी प्राणनाथा ॥ पुत्र देवशर्मा ह्नणे ताता ॥ द्यावें मजचिलागीं ॥४८॥

रुक्मांगदा सांकडें पडलें ॥ तैं धर्मागदातें दीधलें ॥ श्रियाळरायें तैसेंचि केलें ॥ देवोनि चिलयासी ॥४९॥

त्याची कमळा नामें स्त्री ह्नणे ॥ मजचि त्या राक्षसासि देणें ॥ तुह्मी वांचलिया तिघें जणें ॥ स्त्रुषा आणिक मिळेल ॥५०॥

ऐसीं तिघें ग्लानी भाषिती ॥ तंव भीमें विनविलीं धर्मकुंती ॥ ह्नणे राक्षसा वधीन द्विजार्थी ॥ मज आज्ञा देइंजे ॥५१॥

त्यासी धर्म ह्नणेरे मूढा ॥ हे गोष्टी न करीं मजपुढां ॥ तो राक्षस बळियाढा ॥ होईल काहीं अनर्थ ॥५२॥

कुंती ह्नणे हा बाळपणीं ॥ पडिला माझिये हातौनी ॥ तैं शिळा चूर्ण जाहली ह्नणोनी ॥ सर्वा अजित मी जाणें ॥५३॥

ऐकोनि धर्म ह्नणे मातेसी ॥ तरी सांगें ब्राह्मणासी ॥ मग कुंती जावोनि द्विजासी ॥ जाहली पुसती ॥५४॥

येरें कथिली सर्व व्यवस्था ॥ कुंती ह्नणे न करा चिंता ॥ मी पुत्र देतें निरुता ॥ पाठवा राक्षसाकडे ॥५५॥

चौघें लोळती चरणावरी ॥ कांही द्रव्य मागें वो झडकरी ॥ येरी ह्नणे धर्मार्थ उपकारीं ॥ दीधला पुत्र ॥५६॥

परि राक्षसाचेनि चौगुणें ॥ तुह्मी तया भोजन घालणें ॥ मग द्विजी संतोषोनि अन्नें ॥ निपजविलीं अपार ॥५७॥

कुंतीनें येवोनि धर्माप्रती ॥ सांगीतली सर्व स्थिती ॥ ऐसी क्रमिली दिवसराती ॥ काय केलें येरा दिवशीं ॥५८॥

आदरें भीमसेन बोलाविला ॥ पूजोनि आकंठ जेवविला ॥ लोक पहावया मीनला ॥ देखोनि आश्वर्य करिताती ॥५९॥

वाढितां अवघे शीणले ॥ परि तो पुरे ऐसें न बोले ॥ एक ह्नणती बळ केतुलें ॥ असेल याचें ॥६०॥

असो येतां न देखे अन्न ॥ ह्नणोनि भीमें केलें आचमन ॥ मग अन्नगाड्यावरी बैसोन ॥ वृकोदर चालिला ॥६१॥

बक होता तळेयापाळीं ॥ तेथें भीम पातला बळी ॥ नगरजन दुरोनि न्याहाळी ॥ कौतुकार्थ ॥६२॥

तळेया पैलाडीं निशाचर ॥ ऐलाडीं उतरला वृकोदर ॥ अन्नाचा मांडिला स्वीकार ॥ आंगोळिया दावी तया ॥६३॥

असुर देखोनि आवेशला ॥ ग्रासावया धाविन्नला ॥ येरं अन्नस्वीकार केला ॥ तया दावी वांकुल्या ॥६४॥

तंव तो राक्षस कोपोनी ॥ मुष्टी हाणी हदयस्थानीं ॥ तेणें न्याहो उठिला गगनीं ॥ परि तो जेवितां नुठेचि ॥६५॥

ह्नणे ग्रास गुंतला होता ॥ तो घायें गेला परौता ॥ तरी मी जेवीं तंव निश्विता ॥ राहों नको राक्षसा ॥६६॥

भीम जेऊनि पिये पाणी ॥ येरु हदयीं लत्ता हाणी ॥ भीमें तोचि चरण धरोनी ॥ हाणितला सत्राणें ॥६७॥

राक्षस रक्तगुरळी सांडित ॥ भीम उठिला कोपाक्रांत ॥ मुष्टिघातें संग्राम बहुत ॥ जाहला दोघां ॥६८॥

ऐसा दारुण संग्राम जाहला ॥ भीमें राक्षस पायीं धरिला ॥ आकाशीं गरगरां फिरविला ॥ आपटिला धरणीये ॥६९॥

तो राक्षस प्राणें घेतला ॥ भीम विजयातें पावला ॥ गाड्यावरी बैसोनि चालिला ॥ नगरामाजी ॥७०॥

बक नामें निशाचर ॥ हा संस्कृतभारतीं कथाचार ॥ परि पुराणांतरीं नामोच्चार ॥ जोंडिया राक्षसु ॥७१॥

असो हा दुतोंडिया वधोनी ॥ विप्रगृहीं गेला तिये क्षणीं ॥ अवघीं करोनि वोंवाळणी ॥ लागती चरणीं भीमाचे ॥७२॥

येरु धर्म कुंतीयेसी ॥ प्रेमें भेटला बंधुवर्गासी ॥ उत्साह जाहला नगरजनांसी ॥ वधिला राक्षस ह्नणोनियां ॥७३॥

असो हें प्रवर्तली निशी ॥ भोजनें जाहलीं महोल्हासीं ॥ तंव द्विज विनवी धर्मासी ॥ कीं होतें द्रौपदीस्वयंवर ॥७४॥

तुह्मी दीधलें जीवदान ॥ आतां भिक्षेसि तेथ जाईन ॥ पांडव ह्नणती येऊं मागून ॥ आह्मी समस्त ॥७५॥

तंव धर्मासि ह्नणे ब्राह्मण ॥ ऐका द्रुपदाचा अवघड पण ॥ खालीं तैलकढयी उकळवोन ॥ मत्स्य भ्रमे आकाशीं ॥७६॥

तो अधोदृष्टीं पहावा ॥ तीनबाणीं ऊर्ध्व विंधावा ॥ लक्ष न पाडवे तरी घालावा ॥ कढईआंत ॥७७॥

ऐसें लक्ष जो भेदील ॥ तया द्रौपदी माळ घालील ॥ धर्म ह्नणे हें कवणा होईल ॥ प्राप्त असाध्य ॥७८॥

विप्र ह्नणे ऐकिलें पूर्वी ॥ कीं द्रुपदें धरिलें असे जीवीं ॥ जीवदान दीधलें पांडवीं ॥ तरी कन्या द्यावी अर्जुना ॥७९॥

परि ते जोहरीं निमाले ऐकोनी ॥ द्रुपदें पुसिलें चक्रपाणी ॥ मग ऐसें यंत्र तत्क्षणी ॥ मांडविलें कृष्णें ॥८०॥

जरी पार्थ वांचला असेल ॥ तरी तो येवोनि लक्ष भेदील ॥ येर पृथ्वीचे भूपाळ ॥ अजयातें पावती ॥८१॥

ऐसें ऐकोनि बोलणें ॥ निर्धार मानिती साहीजणें ॥ आतां पुढील कथा मनीं ॥ श्रोतीं आणिजे ॥८२॥

ऐसा विचार करुनी ॥ निशी क्रमिली साहीजणीं ॥ आतां पुढील कथा मनीं ॥ श्रोतीं आणिजे ॥८३॥

संस्कृत आदिपर्वमिसें ॥ ग्रंथग्रंथीचें कथिलें विशेषें ॥ संस्कृत प्राकृत सांगत असें ॥ पुराणांतरीचें ॥८४॥

अपूर्व नूतनकथालाग ॥ संकलित मर्‍हाठी संयोग ॥ करुनि सांगिजतो प्रसंग ॥ ह्नणे मधुकरकवी ॥८५॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ प्रळयघंघाळबकासुरप्रकारु ॥ षडविंशाध्यायीं कथियेला ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP