॥ श्रीगणेशाय नम: ॥
मुनीसी ह्मणे जन्मेजयो ॥ पांडवां सारयी कृष्णदेवो ॥ तरी वैर व्हावया अपावो॥ काय जाहला॥१॥
वैशंपायन ह्मणती अवधारीं काशिये भागीरथीतीरीं॥ दिव्य सहस्त्र वर्षेवरी ॥ तप केलें दुर्वासें ॥२॥
तेणें इंद्रियें त्रासली ॥ मूर्ती धरुनि उभां ठेलीं ॥ ऋषीसि विनवितीं जाहलीं॥ दाहीजणें ॥३॥
श्रोत्रं त्वचा चक्षु जिव्हा घ्राण॥ ह्मणती शब्द्स्पर्शरुपरसगंधेंविण ॥ बहुत पडिलों तरी संपूर्ण ॥ करीं इच्छा आमुची ॥४॥
तंव वाकपाणिपादशिश्र्नगुद ॥ उत्कि शीलन गति प्रसिध्द॥ मूत्र मलोत्सर्गेविण विविध ॥ पीडलों ह्मणती ॥५॥
तरी आमुची मनकामना ॥ पूर्ण कीजे अत्रिनंदना ॥ नातरी तुज सांडोनि जाणा ॥जाऊं आह्मी ॥६॥
मग आमुचेनि व्यापारेंविण॥ मृतप्राय तूं होसी दीन॥ ऐसी विनवनी ऐकोन॥ ऋषी पाहे ज्ञानद्दष्टीं॥७॥
ह्मणे इंद्रियें सोडोनि जाती॥ तरी तपासी कैसी प्रवृत्ती ॥ पायांआधारें सर्व स्थिती ॥ व्यापार चाले ॥८॥
मग तयांसी ह्मणे ऋषी॥ चाला पूर्णकरुं स्वर्गासी ॥ येरे संतोषोनि मानसीं ॥ प्रवेशलीं स्वस्थानीं ॥९॥
तो अमरावतीये निघाला॥ दिगंबरु तपें आथिला ॥ जावोनि इंद्रासि भेटला ॥येरें पूजिला सन्मानें ॥१०॥
इंद्र ह्मणे जी ऋषिराया॥ बिजें केलें कवणकार्या ॥तें सांगा कृपा करोनियां ॥सेवकासी ॥११॥
तेव्हां इंद्रियांची व्यवस्था॥ ऋषीनें कथिली सुरनाथा ॥ आणि ह्मणेअष्टभोगीं समस्तां॥ देंई तृप्ती ॥१२॥
ऐकोनि संतोषला इंद्र ॥ मांडिला अष्टभोगीं उपचार ॥ त्वचेसि स्पर्शविषय आहार॥ कैसा दीधला॥१३॥
मदंन मादंन उपचार केले ॥ वस्त्रालंकार लेवविले ॥ नानासुगंध चर्चिले॥ पुष्पमाळा घ्राणार्थी ॥१४॥
एकी चुंबळी वळिली होती ॥ ती नखें फेडविली शीलनार्थी ॥ दानें देवविलीं विप्रजाती ॥ धनधान्यादिकांचीं ॥१५॥
उपानह घात लें चरणीं ॥ फिरविला भोगविशिष्ट नंदनवनीं ॥मग षड्र्सांचिये पक्वान्नीं॥ के ली जिव्हातृप्ती ॥१६॥
सवाखंडीचा आहार॥ उदरीं होतां दुर्भर ॥ तेणें गुदशिश्र्नव्यापार ॥ जाहला मलोत्सर्गे ॥१७॥
मग सकळ्ही पदार्थ दाविले ॥ रुप देखोनि नेत्र निवाले ॥ आणि तेथें नृत्य मांडिलें ॥ अष्टनायकांचें ॥१८॥
गण गंधर्व यक्षकिन्नर॥ सुस्वरें गाती नारद तुंबर ॥ तेणें शब्दें निवाले श्रोत्र ॥ तैसीच वाचा कथानुवादीं ॥१९॥
असो हें सविस्तर सांगता ॥ येथेंचि विस्तार होईल ग्रंथा ॥ मग विषयभोग रमणार्था ॥ विचारिले इंद्रें ॥२०॥
प्रार्थोनि ह्मणे गा ऋषीश्र्वरा ॥ या अष्टनायिका सुंदरा ॥ रंभा उर्वशी अवधारा ॥ मेनिका आणि तिलोत्त्मा ॥२१॥
घृताची आणि शशिमुखा ॥ मंजुघोषा सुकेशी देखा ॥ संभोगार्थ विषयसुखा ॥ तत्पर असती ॥२२॥
तंव इंद्रासि ह्मणे ऋषी ॥ मजसी मानवते उर्वशी ॥ यावरी देवेंद्र तयेसी ॥ ह्मणता जाहला ॥२३॥
कीं भ्रमरमंचकाचिये शयनीं॥ तुवां सं तुष्ट करावें कामिनी ॥ ययाऋषीश्र्वरा लागुनी ॥ कामशास्त्रें ॥२४॥
तें उर्वशीये मानवलें॥ मग ऋषीसि अवलोकिलें ॥ कटाक्षबाणीं विधिलें॥ तंव चेतला कंदर्प ॥२५॥
येरु सभे होता बैसला ॥ तो कामें व्यग्र जाहला ॥ भ्रमितमनें न्याहाळूं लागला ॥ तियेलागीं ॥२६॥
सभेआंतूनि उठूं पाहे ॥ विरहज्वरें कांहीं न सुहाये॥ इकडे उर्वशी ह्मणे करुं काय ॥ रंभे अवधारींजो ॥२७॥
शिरीं जटा वित्र्काळ दंत ॥ हा दोंदिळ जैसा पर्वत ॥यासी मसीं संभोग उचित॥ नव्हे जाण ॥२८॥
माझें रुपलावण्य पाहतां ॥ माज मुष्टीसि सामावता ॥ केवीं साहों या पर्वता ॥ बीभत्स जरठा ॥२९॥
ऐसें रंभेसि बोलों लागली ॥ तंव कटाक्षदृष्टीं खंडिली ॥ तेणें तनु निश्र्वळ राहिले ॥ क्षणयेक ऋषीची ॥३०॥
मगज्ञानदृष्टीं विचारिलें॥ तंव तें अवघें कळो आलें ॥ ह्मणोनि उर्वशीये शापिलें॥ दुर्वासदेवें ॥३१॥
ह्मणे माझा जाकळोनि धीर॥ मांडिला अन्यभावें विचार ॥ तरी तूं वंडवा होई निर्धार ॥ मृत्युलोकीं डंगदेशीं ॥३२॥
मग उर्वशी ह्मणे माझा हो स्वामी ॥ वायांचि मज शापिले तुह्मीं ॥ सहज विनोदस्वभावें आह्मीं ॥ केलिया गोष्टी ॥३३॥
आतां कृपाळपणें दातारा ॥ द्यावा उश्शाप ऋषीश्र्वरा ॥ तेव्हां बोलिला अवधारा ॥ दुर्वासदेवो ॥३४॥
कीं जरी तुजनिमित्तें क्षितीं ॥ औटवज्रें युध्दीं मिळती ॥ पांदव्यादव जेव्हां झुंजती ॥ तेव्हां होसील शापमुक्त ॥३५॥
आणिक येक अवधारीं ॥ तूं दिवसा वडवा रात्रीं नारी ॥होसील डंगदेशाभीतरीं ॥ नेपाळ पुरीं ॥३६॥
यावरी स्वर्गीहुनि दुर्वासा ॥उतरला खालीं परियेसा ॥ मग तो सिध्दाश्रमीं तापसां ॥ माजी गेला ॥३७॥
शापें तप क्षया गेलें ॥ ह्मणोनि मागुतें आरंभिलें इकडे उर्वशीये जन्म जाहलें ॥ मृत्युलोकीं ॥३८॥
जंबुव्दीपा माझारी ॥ डंगदेशी नेपाळनगरी ॥ तेथें डांगवीराजा राज्य करी ॥ भूमंडळीं विरव्यात ॥३९॥
तये नगर ब्राह्यप्रदेशीं ॥ श्रुंगारवाटिका चहूंदिशीं त्या उद्यानवनाचे सरीसी ॥ नपवे नंदनवन ॥४०॥
तेथें वडवा होवोनि उर्वशी ॥ तृण चराया ये दिवसाशीं ॥ मग स्त्री हो वोनि राहे निशीं ॥ कुंजवनीं त्या ॥४१॥
पुढें येके दिवशीं माळियें ॥ देखिलें तिये घोडिये ॥ जावोनि श्रुतकेलें लाहें॥ रायालागीं॥ ४२॥
तेव्हां निशाणां देवोनि घावो॥ सैन्येंसिं निघाला डंगवीरावो॥ भूपाळांमाजी महाबाहो॥ प्रधान ज्येष्ठ मंत्री ॥४३॥
तीससहस्त्र असिवार॥ चौदासहस्त्र मत्त कुजंर ॥ सातसहस्त्र रहंवर ॥ पायदळ नवलक्ष ॥४४॥
त्यांहीं श्रृंगारवन वेढिलें ॥ तैं रायें सैन्यासि ह्मणितलें॥ कीं घोडी दवडील त्याचें वहिलें ॥ करीन शिरश्छेदन ॥४५॥
मग ते संसारोनि राहिले ॥ सकळीं वडवेसि देखिलें॥ जंव धरावया धाविन्नले ॥ तंव येरी चौताळली ॥४६॥
जिकडे होता नृपमणी ॥ उडोनि चालिली तिकडोनी ॥ मग रावो अश्र्वा दुबळोनी ॥ लागला पाठीं ॥४७॥
सैन्य अवघें मागें राहिलें ॥ आणि दिनकरा अस्त जाहलें ॥ रायें घोडीसि वोळंगिलें ॥वनामाजी ॥४८॥
तंव नवल जाहलें थोर ॥ वडवेचें पालटिले शरीर ॥ बत्तीसलक्षणी तरुणी सुंदर ॥ जाहली देवांगना ॥४९॥
रावो विचारी कीं तूं कवणी ॥ तें सांगें सत्यवचनीं ॥ येरीनें सर्व वृत्तांत मांडोनी ॥ दुर्वासाचा सांगीतला ॥५०॥
मग ह्मणे तूं पवित्र भूपाळ ॥ तरी माझा करीं प्रतिपाळ ॥ होईल औटवज्रां मेळ ॥ तैं फिटेल अश्र्वपण ॥५१॥
रायें ह्मणितलें तथास्तु ॥ दोघां गांधर्व लागलें वनांतु ॥ भोग भोगिला समस्तु॥ तेथेंचि रात्रीं ॥५२॥
जंव ते निशांती त्र्कमली ॥ तंव उर्वशी वडवा लागली ॥मग रायें मंदिरीं आणिली ॥ सानंदमनें ॥५३॥
तियेची गती वानितां ॥ सरी नव्हे मनमारुता ॥ रावो यत्नें जाहला करिता ॥ चित्रशाळा मनोहर ॥५४॥
मग तेथेंचि मंचक घालोनी ॥ येरु राहिला नित्यानीं ॥ अष्टभोग दिवसरजनीं ॥ भोगी तियेसीं ॥५५॥
असो हें ऐसियापरी असतां ॥ तें जाणवलें ब्रह्मसुता ॥ ह्मणे हेम श्रुत करितां गोपिनाथा ॥ फिटेल आपुला उपवास ॥५६॥
ह्मणोणी झडकरी निघाला ॥ जावोनि श्रीकृष्णा भेटला ॥ मग वडवेचा वृत्तांत कथिला ॥ विस्तारोनी ॥५७॥
ह्मणे म्यां सांगितलें डांगवेसी ॥ हे घोडी देई श्रीकृष्णासी ॥ परि तो हिणावोनि तुह्मासी ॥बोलिला देवा ॥ ५८॥
कीं ऐसा वीर नाहीं त्रिभुवनीं जो नवों शके मजपासोनी ॥ तेथे कायसा चऋपाणी ॥काय मजहूनि भोग तया ॥५९॥
देवा तें अमोलिक रत्न ॥ तुज योग्य आहे करीं प्रयत्न ॥ मी त्याचें ऐकोनि वचन ॥ आलों सागाया तुह्मासी ॥६०॥
यापरि गुणकर्म वर्णोनी ॥ स्वर्गा गेला नारदमुनी॥ इकडे दूतीं धाडी चत्र्कपाणी ॥ नेपाळ्नगरा ॥६१॥
ह्मणावें शीघ्र वडवा देई ॥ नातरी संग्रामा उभा राहीं ॥ तें दूतीं जावोनि सर्वही ॥ श्रुत केलें डांगवीसी ॥६२॥
तंव राजा ह्मणे दूतांसी ॥ घोडी नाहीं रें मजपाशीं ॥ यावरी दूत ह्मणती तयासी ॥ ल पविसी गा कितीदि वस ॥६३॥
मग बोलिला भूपती ते घोडी माझी प्राणज्योती ॥ मी नेदीं श्रीपतीप्रती ॥ कां होवो भलतैसें ॥६४॥
दूतीं येवोनि तें शीघ्र॥ देवा जाणविलें समग्र ॥ मागुती कोपोनि वेगवत्त्र्क॥ पाठविले दूत श्रीकृष्णें ॥६५॥
कीं तूं संग्रामा उभा राहें ॥ नातरी पृथ्वी त्यजोनि जायें ॥ तें दूतीं येवोनियां लाहें ॥ सांगीतलें डांगवीसी ॥ ६६॥
राव ह्मणे करीन कदन ॥ परि मी न देई हें रत्न ॥ हें देवासि कळतां वर्तमान ॥ युध्दा सैन्य सन्नध्दविलें ॥६७॥
असो दूत गेलियावरी ॥ रावो सकळांसि विचार करी ॥ घोडी मागतसे मुरारी ॥ परि मी नेदी सर्वथा ॥६८॥
स्त्री ह्मणेहो प्राणेश्र्वरा ॥ घोडी देवोनि शारंधरा ॥ सुखें तदाधारें राज्य करा ॥ चुकावा विवशी हे ॥६९॥
तयासि करितां वैराकार ॥ न पुरती ब्रह्माहर ॥ केउता अगस्तीसि सागर ॥ तैसा पांड आपुला ॥७०॥
परि तें न मानी नृपवर॥ बोलावोनि प्रधान कुमर ॥ ह्मणे चालवा राज्यभार ॥ तुह्मी परिवार ॥७१॥
सैन्येंसीं मांडलें अनर्थाचें कारण ॥ तें मीं प्रयत्नें चुकवीन ॥ जो आतां देईल जीवदान ॥ जाईन शरण तयासी ॥७२॥
ऐसा राज्यभार निरविला ॥मग घोडिये आरुढला ॥ पश्र्विमसमद्रासी गेला ॥ त्राहीं त्राहीं ह्मणोनी॥७३॥
तैं विप्रवेषें भेटला सिंधु ॥येरें अवघा केला अनुवादु ॥ ह्मणे मागतो गोविंदु ॥ ह्मणोनि शरण आलों तुज ॥७४॥
सिंधु ह्मणे डांगवीराया ॥ तूं प्रयत्न करितोसि वायां ॥ घोडी देवोनि यादबराया ॥ सुखें राज्य करीं कां ॥७५॥
तुझा म्यां करितां अंगिकार ॥मज गरुड करील अपकार॥ मागां मथिलें तोचि थोर ॥ धाक असे मजलागीं ॥७६॥
ऐसें ह्मणोनि अदृश्य जाहला ॥ रावो चिंतवणीं पडियेला ॥ मग पातळविवरीं प्रवेशला ॥ भेटला वासुकीसी ॥७७॥
तेथें आपुला सर्व वृत्तांत ॥ रायें सर्पसि केला श्रुत ॥ ह्मणे रक्षार्क्षा मे शरणागत ॥मज कृष्णनाथ कोपला ॥७८॥
वासुकी ह्मणे रे गव्हारा ॥ घोडी देई शारंगधरा ॥ कोण साहेल पक्षिवरा ॥न तव अंगिकारा करोनी ॥७९॥
तूं सत्पपाताळें फिरसी ॥ शेवटीं उरफुटोनि मरसी ॥वैर करितां श्रीकृष्णासी ॥ कैसें पावसी विजयत्व ॥८०॥
ऐसें ऐकोनि नृपवर ॥ तेथोनि चालिला वेगवत्तर ॥ स्वर्गी जावोनियां शीघ्र ॥भेटला इंद्रासी ॥ ८१॥
तया वृत्तांत सांगीतला ॥ तेणेंही त्याचिपरी निरविला ॥ ऐसाचि दिक्पाळीं वाळिला ॥ न करिती अंगिकार ॥८२॥
घोडी देई श्रीपतीप्रती ॥ ऐसेंचि अवघे सांगती ॥ परि तो बोलणें न घे चित्तीं ॥ कवणाचेंही न ॥८३॥
तेव्हा इंद्रादिक ह्मणती ॥तुवां जावें हस्तनावती ॥ आजि दुर्योधनाची रव्याती ॥ भूमंडळीं विरव्यात ॥८४॥
मग तोतेथोनि निघाला ॥येवोनि दुर्योधना भेटला ॥ ह्मणे रक्षीं रक्षीं गा वहिला ॥ शरण तुज मी ॥८५॥
तेणें आपुली सक ळ व्यवस्था ॥ सांगीतली कौखनाथा ॥ तेवेळीं जाहला बोलता ॥ दुर्योधन ॥८६॥
कीं पांडवांनिमित्त वनमाळी ॥ आह्मांसि भावी वैरचाली ॥ परि कळोंनेदी भूतळीं ॥ अपकीर्तीस्तव ॥८७॥
तरी अंगिकारोनि तुह्मांसी ॥ कवण झुंजले श्रीकृष्णासी ॥ परि विचार येक परियेसीं ॥ डांगवीराया ॥८८॥
आधीचि कृष्ण पांडवां सारथी ॥ वरी पार्थासि अति प्रीती ॥ दुणाविली संबंधगती ॥ देवोनि सुभद्रा ॥८९॥
तरी तूं त्यांसी जाई शरण ॥ धर्म निवारील हें व्यसन ॥ तोचि तुझा अंगिकार करोन ॥ समजावील कृष्णासी ॥९०॥
यावरी डांगवी निघाला ॥ इंद्रप्रस्थी प्रवेशला ॥ जावोनि धर्मासी भेटला ॥ ह्नणे रक्षीं स्वामिया ॥९१॥
मग कृष्ण वडवेचा वृत्तांत ॥ युधिष्ठिरा केला श्रुत ॥ ह्नणे श्रमलों गा बहुत ॥ त्रैलोक्य फिरतां ॥९२॥
शेवटीं कौरवीं सांगीतलें मजसी ॥ कीं शरण जाई पांडवांसी ॥ धर्म रक्षील निश्वयेंसीं ॥ श्रीकृष्णासी बुजावोनी ॥९३॥
मज तुमचा भरंवसा थोर ॥ तरी देइजे नाभिकार ॥ तंव ह्नणे युधिष्ठिर ॥ केला अविचार राया तुवां ॥९४॥
अरे जो कृष्णासि वैर करी ॥ तो आह्मी रक्षावा कवणेपरी ॥ कृष्णचि आमुचा साह्यकारी ॥ तो कैसा दुराविणें ॥९५॥
जरी न समजे बुजावितां ॥ तरी कवणें साहावें अनंता ॥ तूंचि शरण जाई आतां ॥ देवोनि वडवा तयासी ॥९६॥
तो तुज प्रसन्न होईल ॥ असंख्यात अश्व देईल ॥ थोर आश्रय जोडेल ॥ नकरीं आन विचारु ॥९७॥
तु ज भेटल्याविण नाहीं गती ॥ ऐसा शिकविला बहुतां रीतीं ॥ परि तें कांहीं न धरी चित्तीं ॥ डांगवीरावो ॥९८॥
मग तो तेथोनि निघाला ॥ भागीरथीतीरीं गेला ॥ श्वासोश्वास सांडी वेळोवेळां ॥ निरुपायपणें ॥९९॥
अंगिकार न करी कोणी ॥ आणि कैसी द्यावी अश्विनी ॥ ह्नणे निंद्य जाहलें त्रिभुवनीं ॥ शरण गेलों भलतेयां ॥१००॥
तरी दोघें अग्निप्रवेश करुं ॥ मग भलता होवो प्रकारु ॥ येरव्हीं घोडी देवोनि दुःखसागरु ॥ न तरवे मज ॥१॥
मग काष्ठें मेळवोनी ॥ तीरीं प्रज्वळिला वन्ही ॥ घोडी बांधिली तयेक्षणीं ॥ कंठीं आपुले ॥२॥
जंव अग्निआंत प्रवेशावें ॥ तंव धांव घेतली दैवें ॥ भारता तयाचें विंदान आघवें ॥ न कळे कवणा ॥३॥
तैं आषाढशुद्ध एकादशी ॥ सवें अभिमन्यु तथा दासी ॥ घेवोनि सुभद्रा आली स्त्रानासी ॥ भागीरथीये ॥४॥
तंव तें सुभद्रेनें देखिलें ॥ मग त्यापाशीं बिजें केलें ॥ कृपावचनीं पुसों आदरिलें ॥ डांगवीसी ॥५॥
तूं कोठील गा नृपनाथ ॥ देव दैत्य किंवा अनाथ ॥ येथें कां पां घोडीसहित ॥ खासी अग्निकाष्ठें ॥६॥
तुज कोणता अपराध घडला ॥ जे हा प्रवर्त मांडिला ॥ तें सांगसांग गा वहिला ॥ सोडोनि कंठ ॥७॥
तेवेळीं अवघा पूर्ववृत्तांत ॥ रायें सुभद्रेसि केला श्रुत ॥ ह्नणे डांगवीराव नेपाळनाथ ॥ नाम माझें ॥८॥
ही येकी वडवा असे ॥ इयेवरी मी सदा बैसें ॥ तिये मागाया हषीकेशें ॥ पाठविले दूत ॥९॥
घोडियेसी मन लागलें ॥ ह्नणोनि नेदीं ऐसें ह्नणितलें ॥ तेणें सैन्य सन्नद्ध केलें ॥ झुंजावया मजसवें ॥११०॥
तो समर्थ बळें आथिला ॥ ह्नणोनि घोडीसहित पळाला ॥ हा देह अवघें त्रैलोक्य भ्रमला ॥ परि कोणी नेदी आधार ॥११॥
हें लाजिरवाणें सांगतां ॥ याहूनि मरण भलें पाहतां ॥ तूं अससी कवणाची कांता ॥ कां पुससी जननीये ॥१२॥
तंव सुभद्रा ह्नणे तयासी ॥ कृष्ण होय बंधु आह्मासी ॥ पार्थ भ्रतार परियेसीं ॥ पंडुराव सासुरा ॥१३॥
धर्मभीम ज्येष्ठ भावें ॥ नकुळसहदेव दीर जाणावे ॥ आणि अभिमन्यु आहे सवें ॥ हा पुत्र माझा ॥१४॥
सुभद्रा नाम बोलिजे मज ॥ तरी मी रक्षीन गा तुज ॥ ह्नणोनि कर उचलिला सहज ॥ भाषेलागीं ॥१५॥
येरें स्वर्गमृत्युपाताळगत ॥ सुभद्रे सांगीतला वृत्तांत ॥ ह्नणे मी जाहलों शरणागत ॥ परि न रक्षवे कवणातें ॥१६॥
तरी तूं कैसें रक्षिसी माते ॥ ऐकोनि येरी ह्नणे तयातें ॥ अगा मी सांगोनि धर्मातें ॥ करीन तुझा अंगिकार ॥१७॥
मग डांगवी ह्नणे माये ॥ म्यां धर्माचे धरिले पाय ॥ परि तेणें कृष्णाचेनि भयें ॥ दवडिलें मज ॥१८॥
सुभद्रा ह्नणे निर्धार ॥ तुज नांगीकारितां युधिष्ठिर ॥ तरी मी भीमा सांगोनि अंगिकार ॥ करवीन तुझा ॥१९॥
जरी तोही करील अवज्ञा ॥ तरी मी प्रार्थीन अर्जुना ॥ तोही नायके विज्ञापना ॥ तरी काष्ठें भक्षीन पुत्रासह ॥१२०॥
ऐसी रायासी भाष देउनी ॥ आली भीमाजवळी तत्क्षणीं ॥ सवें डांगवीसि घेउनी ॥ वडवेसहित ॥२१॥
आड अंत्रपाट धरोनी ॥ भीमासि ह्नणे सुभद्रा वचनीं ॥ कीं भावोजी असे त्रिभुवनीं ॥ ख्याती तुमची ॥२२॥
ह्नणोनियां हा नृपनाथ ॥ तुह्मां आणिला शरणागत ॥ मग सकळही वृत्तांत ॥ श्रुत केला तयाचा ॥२३॥
ह्नणे तुमचेनि बळें यासी ॥ म्यां भाष दीधली निश्वयेंसीं ॥ कीं रक्षणें तुज परियेसीं ॥ सर्वथा गा ॥२४॥
याचें कराल अव्हेरणें ॥ तरि मज पुत्रेंसीं रमणें ॥ ह्नणोनि यासी रक्षणें ॥ सर्वथा तुह्मी ॥२५॥
काय घोडिया नाहींत कृष्णासी ॥ परि गांजावें अनाथासी ॥ ऐसा स्वभावचि तयाची ॥ मूळींहून ॥२६॥
यावरी भीम ह्नणे सुभद्रेंतें ॥ करीन तुझिये वचनातें ॥ मग आलिंगोनि डांगवीतें ॥ दीधलें आश्वासन ॥२७॥
ह्नणे मज असतां भीमासी ॥ कोण गांजों शकेल तुजसी ॥ शिक्षा लावीन श्रीकृष्णासी ॥ बळदेवादि यादवां ॥२८॥
जैं अंगिकार न करीं याचा ॥ तैं म्यां वधचि केला पंडूचा ॥ गर्भी जन्मलों कुंतियेच्या ॥ कालपाथर ॥२९॥
आजि ब्रह्मादिकां देवां ॥ विखांरां दैत्यां दानवां ॥ शिक्षा लावीन मी सर्वी ॥ रक्षोनि शरणागतातें ॥१३०॥
ऐसेंही न करवे मज जरी ॥ तरी प्रवेशेन अग्नि माझारी ॥ यापरि निरोप देवोनि मंदिरीं ॥ पाठविली सुभद्रा ॥३१॥
सुभद्रा गेलिया उपरी ॥ भीमा दाटली वीरश्रे ॥ स्फुरण देखोनियां भारी ॥ भ्याला राजा डांगवी ॥३२॥
ह्नणे हा झणी मजपासोनी ॥ घोडी घेईल हिरावोनी ॥ तरी मग म्यां जावें पळोनी ॥ कोणीकडे ॥३३॥
ऐसा येरु विचारीं पडिला ॥ भीमें व्यग्रचित्त देखिळा ॥ मग अभयंकर ठेविला ॥ मस्तकावरी ॥३४॥
असो हें धर्मे ऐकोनि बाहिली कुंती ॥ अर्जुनादि विचार करिती ॥ कीं भीमें वैरी केला यदुपती ॥ तरी त्या शिकवीं जननीये ॥३५॥
कुंती जावोनि भीमासि ह्नणे ॥ हा डांगवीराजा त्वां दवडणें ॥ नातरी आह्मां वेगळें होणें ॥ वैर सोसणें तुझें तुवां ॥३६॥
येरु ह्नणे तुमचें उचित ॥ परि मी न दवडीं शरणागत ॥ तें कुंतीनें धर्मासि श्रुत ॥ केलें दुर्घट जाणोनी ॥३७॥
अवधीं चिंताग्रस्त जाहलीं ॥ भीमें वृद्धाज्ञा मोडिली ॥ भाक सत्य करुं मांडिली ॥ अंगप्रौढीं ॥३८॥
इकडे सभेसि होता अनंत ॥ तंव आठविली डांगवीची मात ॥ मग दूतांसि पुसिला वृत्तांत ॥ येरीं सर्व श्रुत केला ॥३९॥
कीं तो भीमें शरणागत राखिला ॥ जाणोनि श्रीकृष्ण कोपला ॥ मग प्रद्युम्न शिष्ट पाठविला ॥ तो भेटला धर्मासी ॥१४०॥
आगतस्वागत सर्व जाहलें ॥ प्रद्युम्नें पांडवांसि बोलिलें ॥ कीं कृष्णासि घोडी द्या वहिले ॥ नातरी मांडेल विघ्न थोर ॥४१॥
यावरी भीमाचा वृत्तात ॥ धर्मे मदनासि केला श्रुत ॥ ह्नणे आह्मां वेगळा वायुसुत ॥ तुह्मा मानेल तें करा त्यासी ॥४२॥
येणें वचनें येरु मानवला ॥ येवोनि भीमासि ह्नणता जाहला ॥ कांरे कृष्ण वैरी केला ॥ देई घोडी देवासी ॥४३॥
भीम ह्नने शरणागता सांडितां ॥ पूर्वजां पतन होय सर्वथा ॥ जें होणार तें होवो आतां ॥ परि घोडी अनंता न देववे ॥४४॥
मदनें जावोनि वेगवत्तर ॥ कृष्णासि कथिला समाचार ॥ भीमें केला अंगिकार ॥ तो शिकविलें नायके ॥४५॥
हें ऐकतां कृष्ण कोपला ॥ दळभार सन्नद्ध केला ॥ गणेश कार्तिकेय हाकारिला ॥ शिवात्मज ह्नणोनियां ॥४६॥
पाताळीं विनायक पाठविला ॥ वासुकी नवकुळेंसि आला ॥ कार्तिक स्वर्गासि पाठविला ॥ बोलाविले सुरवर ॥४७॥
तेतीसकोटी देवगण ॥ ब्रह्मा विष्णु त्रिनयन ॥ आले सपरिवारें ससैन्य ॥ भेटले कृष्णासी ॥४८॥
मग प्रद्युम्ना पाठवोनी ॥ मृत्युलोकींचे नृपमणी ॥ देवें बोलाविले ससैन्यीं ॥ मिळाले पाळेगण ॥४९॥
छपन्नकोटी यादववीर ॥ आणि भूपाळदळ अपार ॥ मिळाले सकळ सुरवर ॥ तेणें ब्रह्मांड खळबळलें ॥१५०॥
यावरी इकडे युधिष्ठिर ॥ करी सभेमाजी विचार ॥ तंव नकुळ ह्नणे सर्वेश्वर ॥ कोपला निश्वयें भीमावरी ॥५१॥
भीम तरी न घाली मागां पावो ॥ होईल येखादा अपावो ॥ बंधु वधिलिया मग ठावो ॥ नाहीं आपणासी ॥५२॥
तेणें क्षत्रियधर्म साच केला ॥ कीं शरणागत रक्षिला ॥ आतां तयासि घालितां वेगळा ॥ जन आपणा निंदील ॥५३॥
आतां कौरवपांडव येकत्र ॥ मिळोनि कृष्णासि करुं क्षेत्र ॥ ऐसें ऐकोनियां सर्वत्र ॥ संतोषले पराक्रमी ॥५४॥
भीम समजावोनि आलिंगिला ॥ नकुळ हस्तनापुरीं गेला ॥ कौरवां भेटोनि सांगीतला ॥ वृत्तांत सकळ ॥५५॥
डांगवी रक्षिला वृकोदरें ॥ ह्नणोनि कृष्ण येतो दळभारें ॥ तुह्मी साह्य कीजे सपरिवारें ॥ समरीं कृष्णासि जिंकावया ॥५६॥
इतुकें नकुळें जंव जाणविलें ॥ तंव प्रद्युम्नेंही बिजें केलें ॥ ह्नणे कृष्णें तुह्मां पाचारिलें ॥ चालें सहदळें दुर्योधना ॥५७॥
त्रैलोक्यीचे नायक ॥ देवदानव पन्नगादिक ॥ मिळाले असती सकळिक ॥ झुजावया भीमासी ॥५८॥
ऐकोनि ह्नणे दुर्योधन ॥ येईन सैन्य सिद्ध करोन ॥ दशदिनांचा नेम करोन ॥ निघाला प्रद्युम्न वेगेंसीं ॥५९॥
इकडे भानुमतीसि विचार ॥ जावोनि करी गांधार ॥ ह्नणे कृष्णपांडवां युद्धाचार ॥ कवणा आधार द्यावा म्यां ॥१६०॥
भानुमती ह्नणे हो स्वामी ॥ पांडवां आधार द्यावा तुह्मीं ॥ लोकत्रयीं कीर्ति धर्मी ॥ पावाल तेणें ॥६१॥
सभेसि येवोनि दुर्योधनें ॥ भीष्मादिकां ह्नणितलें तेणें ॥ कीं कवणाचें साह्य करणें ॥ तो सांगावा विचारु ॥६२॥
तंव शकुनिया तोंडशिरु बोले ॥ कीं कृष्णाकडे जातां भलें ॥ पांडव पावती आपुले केलें ॥ तंव खिजला लक्ष्मण ॥६३॥
ह्नणे सर परता रे नष्टा ॥ तुझा सर्व संकल्प वोखटा ॥ साह्य होताम वैकुंठपीठा ॥ येथें थोरी कायसी ॥६४॥
आपुलीं सोयरीं पांडवें ॥ तयाचेचि साह्य करावें ॥ नातरी दोहींकडेही न जावें ॥ ऐसें करणें शूरांसी ॥६५॥
आणि विचारुनि पाहतां ॥ नाश जालिया पंडुसुतां ॥ मग आपणीयां भोंवता ॥ सहजचि कृष्ण लागेल ॥६६॥
तें वर्म सकळांसि मानवलें ॥ मग कौरवदळ मेळविलें ॥ आणि संबंधी पाचारिले ॥ देशोदेशीचे ॥६७॥
अकरा अक्षौहिणीदळभारें ॥ निशाणनादांचिये गजरें ॥ दुर्योधन भेटला वेगवत्तरें ॥ पांडवांसी ॥६८॥
अकरा अक्षौहिणीदळभार ॥ कौरवांचा असे थोर ॥ आणि पांडवांचा निर्धार ॥ सात अक्षौहिणी ॥६९॥
कौरवपांडव येक जाहले ॥ परदळावरी चालोनि आले ॥ पार्थे अभिमन्या पाठविलें ॥ कृष्णाजवळीं ॥१७०॥
तो कृष्णासि भेटोनि ह्नणे ॥ देवा बहिणीचा लळा पाळणें ॥ पांडवांवरी क्षमा करणें ॥ हें लाजिरवाणें आचरितां ॥७१॥
श्रीकृष्ण ह्नणे भाचेया ॥ हें तूं बोलसी गा वायां ॥ वृकोदरासि वधोनियां ॥ घोडी घेणें निश्वयें ॥७२॥
ऐसा अतिशयो जाणोन ॥ मग धर्माजवळी येवोन ॥ सांगता जाहला अभिमन्य ॥ करी न कृष्ण ह्नणितलें ॥७३॥
तरी दळ संसारा वेगें ॥ आतां झुंजिजेल श्रीरंगें ॥ ऐसें ऐकोनियां अवघें ॥ वीर सन्नद्ध जाहले ॥७४॥
पैजा बोलोनि निवडिलें वीरां ॥ ब्रह्मेंसिं युधिष्ठिर इंद्रेंसि गांधारा ॥ द्वंद्व द्रुपदाचक्रधरा ॥ भीष्मा कार्तिकेयासी ॥७५॥
कर्ण पवना शल्य बळभद्रा ॥ नकुळ गणेशा सहदेव रुद्रा ॥ द्रोण अर्का कृप वीरभद्रा ॥ बाल्हिका द्वंद्वीं कृतवर्मा ॥७६॥
भूरिश्रवा सर्पावरी ॥ पार्थ सुरवरांतें समरीं ॥ आण९इ यादवांचिये संहारीं ॥ बभ्रुवाहन ॥७७॥
ऐसे थोरथोर निवडिले ॥ दोन्ही भार सिद्ध जाहले ॥ निशाणीं नंभ गर्जिन्नलें ॥ रोविला रणखांब ॥७८॥
शंख शिंगें रणमोहरीं ॥ दुंदुभी ढोल तुरंगगजरीं ॥ युद्ध जाहलें रणक्षेत्रीं ॥ पायदळा धडधडाट ॥७९॥
खांडेयांचा खणखणाट ॥ बाणांचा होय रुणझुणाट ॥ नानाशस्त्रांचा भडभडाट ॥ जाहला आट पायदां ॥१८०॥
उभय पायद निवाले ॥ देखोनि असिवार उठावले ॥ मध्यें कुंजरभार लोटले ॥ घडघडले रहंवर ॥८१॥
दिशां पडला अंधकार ॥ आटणीं संग्राम जाहला थोर ॥ तो सांगतां होईल पसर ॥ कल्पतरुसी ॥८२॥
धडमुंडीं निवटिले ॥ अशुद्ध पूरें लोटलें ॥ सैन्य अवघें वाहावलें ॥ दळ भंगलें यादवांचें ॥८३॥
तेव्हां चक्र सोडोनि श्रीहरी ॥ कौरव मारिले दळभारीं ॥ पांडवदळ धरणीवरी ॥ लोळविलें देखा ॥८४॥
देखोनि चक्राचा थोर मार ॥ भीमासि ह्मजे युधिष्ठिर ॥ कीं गदा सोडोनि वेगवत्तर ॥ करीं संहार चक्राचा ॥८५॥
तो आकांत देखोनि डांगवी ॥ येवोनि भीमसेना विनवी ॥ कीं हे घोडी कृष्णासि द्यावी ॥ निवरावी झुंजारी ॥८६॥
भीम ह्नणे उगला राहें ॥ जों वरी मी जीवंत आहें ॥ तोंवरी सर्वथा न घडे हें ॥ हा निद्य होय विचारु ॥८७॥
ऐसें ह्नणोनि गदा सोडिली ॥ ते चक्रासि झगटों लागली ॥ दोनी वज्रें एक जाहलीं ॥ पसरे अग्निकल्होळ ॥८८॥
यादवपांडव भस्म जाहले ॥ तेव्हां रुद्रें कृष्णासि ह्नणितलें ॥ या वज्रां निवारीं गा वहिलें ॥ नातरी आटेल त्रैलोक्य ॥८९॥
मग चिंताग्रस्त होउनी ॥ देवें हनुमंत स्मरिला मनीं ॥ तंव तो आला लंकेहूनी ॥ ह्नणे आज्ञा दीजे देवा ॥१९०॥
श्रीकृष्ण ह्नणे वायुकुमरा ॥ निवारीं या दोनी वज्रां ॥ येरु उडोनि अवधारा ॥ शिरला दोहीं माझारी ॥९१॥
गदा धरिली वामकरीं ॥ चक्र धरिलें दक्षिणकारीं ॥ परि वेग न सांवरे भारी ॥ झोंबी तिघाम होतसे ॥९२॥
तेणें अधिकचि पडे वन्ही ॥ शंभु ह्नणे गा शार्ङ्गपाणी ॥ उपावोप करीं ऐशियालागुनी ॥ नातरी होईल अनर्थ ॥९३॥
मग ज्ञानीं पाहोनि भीमासि ॥ ह्नणता जाहला हषीकेशी ॥ शिष्टाई तुह्मांआह्मांसी ॥ तूं या तिघांसी आंवरीं ॥९४॥
तुझें अर्धशरीर वज्रमय ॥ तंव भीमें आफळिले बाहे ॥ ह्नणे मज जैत आलें आहे ॥ मग वोडविलें शरीर ॥९५॥
त्यावरी हनुमंतें उडी घातली ॥ तीं तिन्ही वज्रें भीमें साहिलीं ॥ ऐसीं औटवज्रें मीनलीं ॥ तंव जाहला चमत्कार ॥९६॥
विमानीं बैसवोनि तिये ॥ देवीं नेली अमरावतीये ॥ पांडवां भेटोनि यदुरायें ॥ पाचारिलें गरुडासी ॥९८॥
स्वर्गीचें अमृत आणविलें ॥ वृष्टिमात्रें सैन्य उठविलें ॥ त्रिभुवन अवघें आनंदलें ॥ सकळ गेले स्वस्थानीम ॥९९॥
येथोनि संपलें आदिपर्व ॥ डांगवीपर्व प्राकृतभाव ॥ ऐकें जन्मेजया अपूर्व ॥ आख्यान पूर्वजाचें ॥२००॥
ऐसें बोलिला वैशंपायन ॥ तंव अठरांतील येक ब्राह्मण ॥ उठोनि बैसला आपण ॥ आश्वर्य रायें देखिलें ॥१॥
कंठापासोनि शिरकमळाचें ॥ कुष्ट हरलें असे रायाचें ॥ आणि वस्त्र उजळलें गुळीचें ॥ हात येक ॥२॥
हा चमत्कार देखोनी ॥ जन्मेजयें पूजिला मुनी ॥ ह्नणे अग्रकथा कृपा करोनी ॥ स्वामी कथिजे ॥३॥
मुनि ह्नणे राया भारता ॥ तुझी येक फिटली हत्या ॥ ऐशाचि प्रतिपर्वी समस्ता ॥ फिटतील जाण ॥४॥
श्रीहरीचे वर्णिता गुण ॥ महादोषां होय दहन ॥ तेथें ब्रह्महत्येंचें विघ्न ॥ न बाधी कदा ॥५॥
तये हरीच्य गुणवर्णनीं ॥ अखंड वर्तत असावी वाणी ॥ तया जन्ममरणाची कहाणी ॥ कधीचि नाहीं ॥६॥
म्यां भारतीकथा आरंभिली ॥ पुराणांतरींची संमती घेतली ॥ जे तरी श्रोतयां तोषवी भली ॥ श्रवणमात्रें ॥७॥
आतां असो हा येथ प्रश्न ॥ अष्टमस्तबका जाहलें अवसान ॥ पुढें नवमाचें अनुसंधान ॥ सभापर्व ॥८॥
प्रद्युम्नाचे ज्येष्ठ कुमरें ॥ बहिरामश्याह नृपवरें ॥ आज्ञा केली ह्नणोनि आधारें ॥ रचिला ग्रंथ ॥९॥
त्या रायाचे सभेआंत ॥ चतुशास्त्रवेत्ते पंडित ॥ पुराणचर्चा अखंडित ॥ असे जयांसी ॥२१०॥
त्या सकळांचे आज्ञाधारें ॥ ग्रंथ रचिला मतांतरें ॥ हें करविलें सर्वेश्वरेम ॥ मज रंकाकरवीं ॥११॥
जो वर्मीक असे शाहणा ॥ तोचि येथींच्या खुणा ॥ मूर्खा छांदसांचिया मना ॥ उपजे ताप ॥१२॥
माझी केतुली ती मती ॥ जे साभिमानें बोलावें ग्रंथीं ॥ परि श्रवणमात्रें हरिभक्ती ॥ उपजे ज्ञानवैराग्य ॥१३॥
अनंत शास्त्रें पुराणमतें ॥ वेदाधारें ऋषिप्रणितें ॥ या सकळांचिया आद्यंतातें ॥ पावे ऐसा कोणी नसे ॥१४॥
कविकृष्णयाज्ञवल्कीयें मार्ग दाविला ॥ तोचि म्यां पुढें चालविला ॥ अष्टमस्तबका पासोनि मांडिला ॥ कथाकल्पतरु ॥१५॥
कविमधुकरें कृपाळा ॥ प्रेमें स्तवोनि श्रीगोपाळा ॥ अष्टमस्तबक संपविला ॥ ह्नणे मधुकरकवी ॥१६॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ डांगवीआख्यानप्रकारु ॥ त्रयस्त्रिंशाध्यायीं कथियेला ॥२१७॥
श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ स्तबकओव्यासंख्या ॥४२०४॥ शुभंभवतु ॥ ॥