मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय ५

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय ५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥ मुनि ह्मणे पिपीलिकापाठारीं ॥ राव उतरला नगराबाहेरी ॥ दुसें देवोनि नानापरी ॥ मेळविला परिवार ॥१॥

तंव वार्तकारी दूत आला ॥ तेणें सौदागर सांगीतला ॥ मग राव भेटिसि निघाला ॥ व्यासवाक्य विसरोनी ॥२॥

तंव तो आपणचि सौदागर ॥ रायासि भेटों आला शीघ्र ॥ भेटी दीधला रत्‍नहार ॥ तेथें सभा घनवटली ॥३॥

राव ह्मणे काय सवदा अपूर्व ॥ येरू ह्मणे भोट चीनभोट अश्व ॥ ह्मणोनि पाहूं चालिला राव विसर्जूनि सभा ॥४॥

घोडे देखोनि राव संतोषे ॥ सकळ भोंवतें पाहतसे ॥ तंव मध्यें पागा दिसे ॥ अष्टोत्तरशतांची ॥५॥

ते पाहिली व्याहळोनी ॥ तंव येक वारु आला मनीं ॥ जो वारिला होता व्यासमुनीनीं ॥ तोचि देखा ॥६॥

तो रायें विकत घेतला ॥ वरी आरुढोनि चालिला ॥ मग दळामाजी प्रवेशला ॥ आपुलीया ॥७॥

परि नगरींचे सकळि९क ॥ आपकीर्तीं बोलतीं लोक ॥ कीं रायासि फळलें पातक ॥ ह्मणोनि जयो नाहीं ॥८॥

असो मग कोणे येक दिनीं ॥ रायें घावो देवविला निशाणीं ॥ सैन्यासि करोनि पालाणि ॥ चालिला असे ॥९॥

परि कोणातें कळोंनदी ॥ संग्राम किंवा पारधी ॥ येर न पडतां कांहीं शुद्धी ॥ चालिले दक्षिणे ॥१०॥

रायें मंजिष्ठा वारु पालाणिला ॥ विचित्र कर्णीं शोभला ॥ ऐसें देखोनि संतोषला ॥ सैन्यपरिवार ॥११॥

रायें सांडोनि रहंवरू ॥ वरी आरुढला वेगवत्तरू ॥ तंव गगनीं शब्द जाहला सुस्वरु ॥ शुभंनास्ति ऐसा ॥१२॥

वीर ह्मणती सांडोनि रहंवर ॥ वायां आरुढला नृपवर ॥ परि मनीं न करिता विचार ॥ चलिला पुढें ॥१३॥

ह्मणे पारधी खेळारे आतां ॥ वीर चालिले रान झोडितां ॥ तंव मृग येक अवचिता ॥ देखिला रायें ॥१४॥

राव लागला तया पाठीं ॥ तेणे सैन्या पडली तुटी ॥ मृग चलिला गिरिकपाटीं ॥ परि घोडा नेहटीं दुळवत ॥१५॥

चमत्कारला देखोनि वेग ॥ मग खड्गें हाणिला मृग ॥ येकोचि घायें निर्वेग ॥ पाडिला तो ॥१६॥

आणि उतरोनि अश्वाखालीं ॥ स्वहस्तीं सुरी घेतली ॥ मृग काया जंव विदारिली ॥ तंव निघाली पेटी येक ॥१७॥

मग ते उघडितां बळें ॥ आंतूनि कन्यारत्‍न निघालें ॥ तयेनें रायासी वरिलें ॥ जाहलें स्वयंवर ॥१८॥

तंव मावळला दिनकरु ॥ वनींचि राहिला नृपवरु ॥ जवळी कामिनी आणि वारु ॥ चौथें कोणी नसे ॥१९॥

इकडे शुद्धी करितां श्रमले ॥ वीरही अरण्यांत राहिले ॥ तंव उदयासि पावलें ॥ भास्करबिंब ॥२०॥

मागुती पाहों लागले ॥ तंव राया सस्त्रीक देखिलें ॥ समस्तीं येवोनि जोहारिलें ॥ ह्मणती शोभलीं वधुवरें ॥२१॥

मग लावोनि वाधावणीं ॥ परिवारें करिती वोंवाळणी ॥ ह्मणती चल जी नृपमणी ॥ जावों नग्रा ॥२२॥

राव राणिये ह्मणे प्रीतीं ॥ कीं चला जाऊं नगराप्रती ॥ तंव बोलिली ते युवती ॥ मी नयें जी स्वामिया ॥२३॥

नृप ह्मणे ह प्राणेश्वरी ॥ तूंचि प्रभुत्वें राज्य करीं ॥ मी उदकही न स्वीकारीं ॥ तव‍आज्ञेविण ॥२४॥

मग बोलिली सुंदरा ॥ कोठें जात होतां प्राणेश्वरा॥ तें मजलागीं श्रुत करा ॥ मग येरु सांगतसे ॥२५॥

कीं मी जातहोतों युद्धासी ॥ आतां समूळ वृत्तांत परियेसी ॥ सपें डंखिलें ममपित्यासी ॥ पिपिलिकपर्वतीं ॥२६॥

तेथ मी राहिलों सपरिवारें ॥ परि स्वराज्य गेलें सुंदरें ॥ मग जाऊनि समभारें ॥ संग्राम केला शत्रूसी ॥२७॥

असो हारी आली झुंजतां ॥ ह्मणोनि जातहोतों मागुता ॥ पुढें येकदा पारधी खेळतां ॥ वधिला मृग सुंदरें ॥२८॥

तयाचिये उदरांतुनी ॥ तूं निघालिस कामिनी ॥ तरी चाल जाऊं नगरस्थानीं ॥ प्राणप्रिये ॥२९॥

मग ते संतोषीनि ह्मणे ॥ आतां तुमचा संदेह फेडणें ॥ आणी नगरासि असे येणें ॥ अगत्य मज ॥३०॥

तिये सुखासनीं वाहूनी ॥ राव निघाला झडकरोनी ॥ वाद्यगजरें राजधानी ॥ प्रवेशला ॥३१॥

जनीं नगरी श्रूंगारिली ॥ माता कमळाकरा आली ॥ स्नेंहें वोंवाळिती जाहली ॥ वधुवरांसी ॥३२॥

नाम ठेविलें चंद्रवदना ॥ प्रवेशलीं राजभुवना ॥ प्रीती वेधिलें नृपनंदना ॥ भोगिती अष्टभोग ॥३३॥

चंद्रवदना सांगे कथा ॥ रावो वश्य जाहला सर्वथा ॥ राहिली सकळ राज्यव्यवस्था ॥ भुलला विषयसुखें ॥३४॥

असो मग कोणे येके काळीं ॥ रायासि आठवलें हृदयकमळीं ॥ कीं सकळ व्यवस्था राहिली ॥ गेलें राज्य ॥३५॥

कांतेसि ह्मणे नृपनाथ ॥ आतां जाईन अरण्यांत ॥ राज्य गेलें हे जनांत ॥ जाहली अपकीर्तीं ॥३६॥

ऐकोनि येरी ह्मणे राया ॥ उद्देश करितां जी वायां ॥ तुह्मी जिंकाल लोकत्रया ॥ ऐसा उपाय सांगेन मी ॥३७॥

तुह्मी सांडोनि सर्वभ्रम ॥ एक यज्ञ करावा उत्तम ॥ जेणें नपविजे अल्पही श्रम ॥ जिंकितां त्रैलोक्य ॥३८॥

ऐकोनि राव ह्मणे कांते ॥ यज्ञ नपवे कीं सिद्धीतें ॥ मागां होमावया सर्पांतें ॥ म्या मांडिला होता ॥३९॥

तो विध्वंसिला इंद्रे ॥ ब्राह्मणवेर्ष सुंदरें ॥ ह्मणोनि म्या दवडिली विप्रें ॥ देशांतुनी ॥४०॥

तंव बोलिली ते कातां ॥ जो मागां यज्ञ केला होता ॥ तोचि सिद्धिस जावोनि आतां ॥ जिंकाल त्रैलोक्य ॥४१॥

तरी आरंभावें यज्ञा ॥ बोलवोनि ब्राह्मणां ॥ उशीर न लावावा हवना ॥ ह्मणे प्राणेश्वरी ॥४२॥

रायें वचन ऐकोनी ॥ विप्र बाहिले तत्क्षणीं ॥ तंव ते आले मिळोनी ॥ देशोदेशीचें ॥४३॥

संपूर्ण सभा घनवटली ॥ रायें चंद्रवदना बोलाविली ॥ दोघीं ऋषिकुळें नमिलीं ॥ मग पूजिलें उपचारें ॥४४॥

तेणें समस्त संतुष्ट जाहले ॥ मग चंद्रवदना विप्रांसि बोले ॥ कीं रायें तुह्मां कष्टविलें ॥ तें उपसाहिजे जी ॥४५॥

आतां रायाचा मनोरथ ॥ तुह्मी सिद्धीस न्यावा समस्त ॥ तंव आशिर्वादे बोलत ॥ समस्त ऋषी ॥४६॥

कीं तुमची आज्ञा समस्त ॥ आह्मां करणीय अगत्य ॥ मग चंद्रवदना ह्मणत ॥ जी करावा नरयज्ञ ॥४७॥

तंव ते ह्मणती चंद्रवदने ॥ पुरुष बत्तीसलक्षणी मेळविणें ॥ समिधा साहित्य आणविणें ॥ यज्ञालागीं ॥४८॥

मग सेवक धाडिले देशोदेशीं ॥ ठायीं पाडिलें बत्तीसलक्षणासी ॥ रायें जावोनि दळभारेंसीं ॥ आणिला धरोनी ॥४९॥

तो येका रायाचा कुमर ॥ होता सर्वलक्षणसुंदर ॥ त्यासि पाहता आनंद थोर ॥ जाहला ऋषींसी ॥५०॥

मग माघवद्य तेरसु ॥ बुधानुराधा शुभदिवसु ॥ होम निश्चयोनि राजसु ॥ स्थापिलें कुंड ॥५१॥

सिद्ध केलीं यज्ञद्रव्यें ॥ पेलोवेलीं पावली अपूर्वें ॥ मग दोघीं स्नान केलें बरवें ॥ रायें राणिया ॥५२॥

यज्ञदीक्षा स्वीकारिली ॥ ब्राह्मणीं उदकें अभिमंत्रिलीं ॥ तीं भूतनिवारणार्थ ॥ ठेविलीं ॥ शास्त्रप्रमाण ॥५३॥

अठरादिवसांचा नेम केला ॥ कुंडीं आग्नि आव्हानिला ॥ मंत्रबळें तो प्रकटला ॥ मूर्तिमंत ॥५४॥

देखतां आनंदले समस्त ॥ तंव अग्नि असे बोलत ॥ कीं सांगिजे जी कवण कृत्य ॥ तें नेईन सिद्धी ॥५५॥

आचार्यं बोलती उत्तर ॥ कीं अष्ट कुळें आणि अमरपुर ॥ देवदंडकादि समग्र ॥ जाळार्वे स्वामिया ॥५६॥

येरु तथास्तु ह्मणोनी ॥ अदृश्य जाहला कुंडस्थानीं ॥ ज्वाळा धडाडिल्या गगनीं ॥ दाटला धूम्र ॥५७॥

मग मंत्रोच्जारें स्वाहाकारीं ॥ आहुती घातल्या ऋषीश्वरीं ॥ अठराही ब्राह्मणीं तिये अवसरीं ॥ ह्मणितलें रायासी ॥५८॥

कीं राया तुह्मी दोघांजणीं ॥ आतां जाइजें स्वस्थानीं ॥ पूर्णहुतीसि अठरावे दिनीं ॥ येईजे मग ॥५९॥

मग आज्ञाप्रमाण रायें ॥ मंदिरीं बीजें केलें उत्साहें ॥ तैसाचि सर्वपरिवार जाय ॥ आपुलाले गृही ॥६०॥

तेथें अवघें ब्राह्मणची ॥ आणिक कोणी नसेची ॥ रायें वोजकेली यज्ञाची ॥ येणे प्रकारें ॥६१॥

रावो राणियेसी गुंतला ॥ तेणे यज्ञविप्रां विसरला ॥ ब्राह्मणीं क्रोधें होम मांडिला ॥ आहुती घालिती अघोरमंत्रें ॥६२॥

तंव तो बत्तीसलक्षणी नर ॥ द्विजांसि बोले विचार ॥ कीं मज ज्ञानीं दिसे प्रकार ॥ तो श्रवण करा ॥६३॥

तुह्मीं यज्ञ मांडिला वृथा ॥ चिंता पडलीसे सुरनाथा ॥ तो यज्ञा विध्वंसोनि सर्वथा ॥ सोडवील मातें ॥६४॥

ऐसें ऐकतां ब्राह्मणीं वारिला ॥ मग मंत्राचा पुरावा केला ॥ इंद्र देवेंसि आव्हानिला ॥ सर्पासह ॥६५॥

स्वर्गीं आणि सिंदुरगिरीवरी ॥ आटु भविन्नला कांपती भारीं ॥ देव सर्प मंत्रोज्चारीं ॥ आकर्षिले ॥६६॥

कित्येक पडले अग्निआंत ॥ कित्येकांसी उच्चाट बहुत ॥ तंव गुरुसि पुसे सुरनाथ ॥ कीं जीवनोपाय सागिजे ॥६७॥

गुरु ह्मणे जावें कैलासीं ॥ तेणें चुकेल हे विवशी । इतुक्यांत अष्टकुळें वेगेंसीं ॥ पावली अमरावतीये ॥६८॥

देव आणि शेषादिक ॥ मूर्छित पडले सकळिक ॥ देखतां पावला सत्यलोक ॥ नारदस्वामी ॥६९॥

तेणें सर्पदेवांचा वृत्तांत । ब्रह्मयासी केला श्रृत ॥ तो ऐकतां निघाला त्वरित ॥ अमरावतीये ॥७०॥

आणि नारद जावोनि वैकुंठीं ॥ विष्णूसि सांगीतली गोष्टी ॥ तंव तोही आला उठाउठी ॥ अमरावतीसी ॥७१॥

कैलासी जावोनि ब्रह्मसुत ॥ शिवा सांगीतला वृत्तांत ॥ मग तोही आला धांवत ॥ इंद्रभुवना ॥७२॥

तिन्ही देव मुख्य करोनि ॥ आकांत वर्तला त्रिभुवनीं ॥ इंद्रादि आणि सकळ फणी ॥ करिती काकुळती ॥७३॥

असो नरयागाची समर्थता ॥ नपुरे सविस्तर सांगतां ॥ तंव दुर्वासा जाहला पुसता ॥ पराशरासी ॥७४॥

अहो पूर्वी नरयाग पाहीं ॥ कोणीं केला होता कीं नाहीं ॥ तें सांगावें जी सर्वही ॥ महामुनें ॥७५॥

पराशर ह्मणे अवधारीं ॥ कृतयुगीं अयोध्यामाजाझारी ॥ विजयो राजा राज्य करीं ॥ सूर्यवंशींचा ॥७६॥

तेणें एकछत्रीं राज्य केलें ॥ अवघें भूमंडळ जिंकिलें ॥ मग नरयागासि आरंभिलें ॥ तंव गजबजिले त्रैलोक्य ॥७७॥

इंद्र आकर्षिला मंत्रशक्तीं ॥ तंव धांवण्या आला श्रीपती ॥ तेणें यज्ञ विध्वंसोनि शांती ॥ केली देखा ॥७८॥

पराशर ह्मणे आइका ॥ ऐसें पूर्वी जाहलें त्रिलोका ॥ तेचिपरी जाहली देखा ॥ प्रस्तुत वेळीं ॥७९॥

तेतीसकोटीं सुरवर ॥ अष्टकुळींचे फणिवर ॥ मंत्रें आकर्षिलें शीघ्र ॥ चालिले मृत्युलोका ॥८०॥

ऐसें देखोनि शूळपाणी ॥ शर सांदिला पिनाकगुणीं ॥ ह्मणे जन्मेजयातें संहारूनी ॥ विध्वसूं याग ॥८१॥

असो जंव करावें संधान ॥ तंव नारद आला आपण ॥ ह्मणे तुह्मीं करावें स्मरण ॥ नारायणाचें ॥८२॥

मग शस्त्रें सांडोनि त्रिमूर्ती ॥ करिते जाहले निर्गुणस्तुती ॥ ह्मणती धांवधांव गा श्रीपती ॥ आदिपुरुष ॥८३॥

पराशरासि पुसती मुनी ॥ कीं येक संदेह उपजला मनीं ॥ तरि तो आदिपुरुष कवणे स्थानीं ॥ जो स्तविला तिहीं देवीं ॥८४॥

अहो जी तिहीं देवांपरतें ॥ आणिक नाहीं आमुचें मतें ॥ तरी हें सांगावें निरुतें ॥ कृपा करोनी ॥८५॥

पराशर ह्मणे हो ऐका मुनी ॥ जयाचिये त्रिगुणा पासोनी ॥ उपनले हे देव तिन्ही ॥ ती शार्ड्गपाणी परात्पर ॥८६॥

जेणें अष्टधा प्रकृतिद्वारें ॥ भुगोल रचिला इच्छामात्रें ॥ तो निर्गुणाक्षर नकळे खरें ॥ वेदशास्त्रां ॥८७॥

ह्मणोनि ऋषि हो आइका ऐसिया देवा परमपुरुषा ॥ स्वविलें नानास्तवीं देखा ॥ देवीं तिहीं ॥८८॥

तंव तो क्षीरब्धीहुनी ॥ तेथें पातला तत्क्षणीं ॥ शंखचक्र गदापाणीं ॥ कमळमंडित ॥८९॥

तिहीं देवासि भेटला ॥ येरीं वृत्तांत सांगीतला ॥ तंव शेषशाई बोलिला ॥ कीं आह्मी जाऊं मृत्युलोका ॥९०॥

तेथें उपाय करणें काहीं ॥ ह्मणोनि चालिला लवलाहीं ॥ पिपीलिकाद्रीसि येवोनि पाहीं ॥ राहिला अदृश्य ॥९१॥

जंव घालावी पूर्णहुती ॥ तंव काय करी श्रीपती ॥ मोहिनी प्रेरिली शीघ्रगती ॥ तेणें मोहिले ब्राह्मण ॥९२॥

मग मंदिरांत जाउनी ॥ स्वप्न दाविलें रायाराणीं ॥ कीं ब्राह्मण राहिले निजोनी ॥ अग्नि शांत जाहला ॥९३॥

चंद्रवदना होवोनि जागृत ॥ रावो चेवविला त्वरित ॥ ह्मणे द्वारकाधीश मूर्तिमंत ॥ देखिला स्वप्नी ॥९४॥

तेणें मज सांगीतलें ॥ कीं याज्ञिक ब्राह्मण निजेले ॥ आणि कुंडिचे आग्नि विझाले ॥ समस्तही ॥९५॥

मग निघालीं रावराणीं ॥ मध्यमान क्रमिलीसे रजनी ॥ पाहती येवोनि तंव निजोनी ॥ राहिले ब्राह्मण ॥९६॥

तंव अकस्मात तिये स्थानीं ॥ उदयो पावला वासरमणी ॥ चंद्रवदना ह्मणे नृपमणी ॥ उठवावें या ब्राह्मणां ॥९७॥

परि राव ह्मणे निद्राभंग ॥ करुंनये हा विहितमार्ग ॥ येरी ह्मणे तरी राहिला उद्देग ॥ पूर्णाहुतीचा ॥९८॥

रावो ह्मणे होवो भलतें ॥ परि मी हात न लावीं यांतें ॥ मग राणी ह्माणे रायातें ॥ ऐक बुद्धी ॥९९॥

उदक शिपावें शीघ्र ॥ तेणें उठतील हे विप्र ॥ रायें घेवोनि मंत्रितनीर ॥ शिंपिलें ब्राह्मणांवरी ॥१००॥

साह्य रचिलें सर्वेश्वरें ॥ उदकांची जाहलीं शस्त्रें ॥ तेणें भेदलीं कलेवरें ॥ जाहला ब्रह्मघात ॥१॥

आश्चर्य करी नृपनाथ ॥ कैसा जाहला द्विजघात ॥ यज्ञनाशनें पुरला अंत ॥ कां पां अनंत कोपला ॥२॥

त्या अठराही ब्रह्महत्या ॥ घडल्या तया नृपनाथा ॥ रावराणी करिती चिंता ॥ यज्ञविध्वंसास्तव ॥३॥

परि आनंद जाहला त्रिभुवनीं ॥ देव आले यज्ञस्थानीं ॥ तया बत्तीसलक्षणिया सोडोनि ॥ विध्वंसिलें होमकुंड ॥४॥

मग इंद्र गेला अमरपुरीं ॥ पाताळ सेविलें विखारीं ॥ येक गेले सिंदुरगिरिवरी ॥ देव स्वमंदिरीं प्रवेशले ॥५॥

इतुक्यांत चंद्रवदना राणी ॥ वारुवा सहित गेली गगनीं ॥ आणि मावळला दिनमणी ॥ पडलें आंधारें ॥६॥

दृष्टीसि काहींच न दिसे ॥ राव पडिला थोर वळसे ॥ तंव भानु उगवतां पूर्व दिशे ॥ सैन्यपरिवार मिळाला ॥७॥

दृष्टी देखती आन आन ॥ ह्मणती रायासि पाप दारुण ॥ राणीवारुवें पलायन ॥ ह्मणोनीच केलें ॥८॥

ऋषि ह्मणती हो पराशरा ॥ हे संदेहनिवृत्ती करा ॥ कां पां गेलीं अश्वदारा ॥ नृपवरा सांडोनी ॥९॥

मग ह्मणे पराशरमुनी ॥ रावो व्यासांसिन मानी ॥ ह्मणोनि तेणें रचिली मोहनी ॥ आणि माववारु ॥११०॥

हें ऋषिसामर्थ्य अकळ ॥ तेणें कार्य रचिलें प्रबळ ॥ तेंचि सांगीतलें सकळ ॥ संक्षेपता ॥११॥

असो राव जाहला शोकाक्रांत ॥ ह्मणे थोर वर्तला अनर्थ ॥ गेली स्त्री आणि वारु निश्चित ॥ ब्रह्महत्या घडलिया ॥१२॥

व्यासें वारिलें होतें तेतुलें ॥ प्रमादमदें मज सर्व घडलें ॥ तयाचेंचि हें फळ जाहलें ॥ रायें मांडिलें रुदन ॥१३॥

परि संबोखोनि राजवर्गीं ॥ प्रधान ह्मणती रायालागीं ॥ कीं या ब्राह्मणांसि वेगीं ॥ करूं अग्निसंस्कार ॥१४॥

राव ह्मणे तयांतें ॥ मज काय पुसतां पापियातें ॥ मुखहीं न पाहावें निरुतें ॥ माझें तुह्मीं ॥१५॥

आतां काहीं विचार करणें ॥ तंव प्रधान रायासि ह्मणे ॥ जी जी आपण व्यासां स्मरणें ॥ ते सांगतील तें कंरू ॥१६॥

तंव राव ह्मणे गा प्रधाना ॥ म्यां पूर्वी केली व्यासांची अवज्ञा ॥ ते आतां नयेति जाणा ॥ मज पापियासी ॥१७॥

तंव दुर्वास ह्मणे पराशरासी ॥ रात्रो न मनितां व्यासासी ॥ तरी मग प्रधानें तयासी ॥ कां स्मरविलें ॥१८॥

पराशर ह्मणे आइका ॥ तें व्यासचरित्र अकल लोकां ॥ आणि महाज्ञानी नेटका ॥ सकलार्थ संपूर्ण ॥१९॥

तो ब्राह्मणांतें उठवूं शके ॥ पुरश्वरण सांगोनि नेटकें ॥ जेणें कुष्ठ पाप अशेषें ॥ हरेल रायाचें ॥१२०॥

असो तियेचे अवसरी ॥ राव जावला कुष्ठशरीरी ॥ कांतिवर्ण तिळहीभरी ॥ उरला नाहीं ॥२१॥

नखाशिखाग्र परियंत ॥ जिव्हा मुख जाहलें श्वेत ॥ मग स्पर्शेचि न निभ्रांत ॥ कोणी तया ॥२२॥

असो प्रधानें झडकरी ॥ ब्राह्मण ठेविले आसनावरी ॥ आणि रायासि उष्णनीरीं ॥ करविलें स्नान ॥२३॥

मग रावो आसनस्थिर ॥ व्यासांसि चिंती मनांत ॥ ह्मणे तूंचि प्रतिपाळक सत्य ॥ सोमवंशासी ॥२४॥

ऐसा धांवा ऐकोनी ॥ कृपें वोळले व्यासमुनी ॥ मग निघाले तत्क्षणीं ॥ पिपीलिकाद्रीसी ॥२५॥

अस्ता न जातां सूर्यदेवो ॥ तेथें पातले व्यासदेवो ॥ तंव समस्तांसह जन्मेजयो ॥ गेला लोटांगणीं ॥२६॥

मुनि स्तविला करुणावचनीं ॥ राव राहिला चरण धरोनी ॥ मग कृपाळुपणें मुनीनी ॥ उठविला स्वहस्तें ॥२७॥

येरें आसनीं व्यासां बसविलें ॥ अवघें वृत्त निवेदिलें ॥ तंव बादरायण ॥ बोलिले रायाप्रती ॥२८॥

कीं ब्रह्महत्या आणि कुष्ठदेहो ॥ यासी काय करिसी उपावो ॥ तंव ह्मणेज भारतरावो ॥ हेंचि पुसणें चरणांसी ॥२९॥

माझें कुष्ठ फेडिजे ॥ ब्राह्मण उठवूनि हत्या हरिजे ॥ यासी उपाय सांगिजे ॥ कृपाळपणें ॥१३०॥

ऐकोनि व्यास ह्मणती राया ॥ हें तूं बोलिलासि गा वायां ॥ कैसें उठवावें ब्राह्मणां या ॥ कुष्टहत्या नासती केवीं ॥३१॥

मागुती जन्मेजय ह्मणे ॥ स्वामी अगत्य हें करणें ॥ जी हा सोमवंश रक्षिणे ॥ कृपाळुत्वें ॥३२॥

व्यास ह्मणती अवधारीं ॥ देवस्थानी पाहोनि निरिवरी ॥ तेथें मंडप घालावे कुसरी ॥ असे मनीं विचार ॥३३॥

मग पर्वता पश्चिमे गेले ॥ तेथें शिवालय देखिलें ॥ अवस्थान असे केलें ॥ उमापतिया ॥३४॥

तेथें मंडप घातला ॥ ऋषी ध्यानस्थ बैसला ॥ तंव अकस्मात प्रकटला ॥ श्रीकृष्णनाथ ॥३५॥

व्यासु उभाठेला होवोनी ॥ भेटों पसारिले दोनी पाणी ॥ तंव ह्मणती चक्रपाणी ॥ कीं कलियुगीं भेटोंनये ॥३६॥

आतां व्यासा तूं येक करीं ॥ यासी भारत सांगावें झडकरी ॥ तेणें कुष्ठ आणि हत्या अवधारीं ॥ फिटती जाण ॥३७॥

ब्राह्मण उठतील अठराहे ॥ तूं विचार न करीं काहीं ॥ ऐसा वर देवोनि पाहीं ॥ गेला वैकुंठीं श्रीपती ॥३८॥

तंव मुनीसि दुर्वासा पुसे ॥ कां पां बीजें केलें सर्वेशें ॥ तेव्हां पराशरु सांगतसे ॥ कीं ऐका हो ऋषी ॥३९॥

तो सोमवंशाचा सारथी ॥ ह्मणोनि पावला आकांतीं ॥ जे कराया सोमवंशा सन्दती ॥ नसे कोणी दूसरा ॥१४०॥

कलियुगीं घडती पापें दारूणें ॥ ह्मणोनि प्रकट न भेटिजे कृष्णें ॥ परि व्याससारिखें जेणें होणें ॥ तेणें देखणें प्रत्यक्ष ॥४१॥

आतां असो हें निरुपण ॥ पुढें ऐकावें अग्रकथन ॥ मग घालोनि व्यासासन ॥ प्रेतें आणिलीं विप्रांचीं ॥४२॥

तीं देवतेपुढां ठेविलीं ॥ नानासुगधीं चर्चिलीं ॥ मग गोष्टी आरंभिली ॥ व्यासदेवें ॥४३॥

ह्मणती पूर्वजांतें तुवां निदिलें ॥ आणि भारतकथेसि खंडिलें ॥ ह्मणोनि दोषी व्यापिन्नलें ॥ तुजला राया ॥४४॥

तरी ते कथा ऐकें भारती ॥ जेणें कूष्ट आणि हत्या नासती ॥ मग हे ब्राह्मणही उठती ॥ त्याचि प्रतीतीं ॥४५॥

काळें वस्त्र अठराहात ॥ येक आणावें गा त्वरित ॥ येरें रंगवोनि गुळिआंत ॥ आणविलें देखा ॥४६॥

तें स्नेहें भिजवोनी ॥ अंत्रपाट बांधिला तिये स्थानीं ॥ मग ह्मणती व्यासमुनी ॥ कथा साबध ऐकें गा ॥४७॥

अठरापर्वें भारत ॥ भावें ऐकावें समस्त ॥ पर्वाप्रति हात हात ॥ उजळेल वस्त्र ॥४८॥

आणी पर्वाप्रति येकेक विप्र ॥ उठेल हा चमत्कार ॥ ऐसेइया प्रचीतीनें पवित्र ॥ होसी कुष्ठावेगळा ॥४९॥

ऐकोनि रावो हरुषला ॥ स्नान करोनि बैसला ॥ ह्मणे स्वामी सांगें वहिला ॥ ऐकेन भावर्थें ॥१५०॥

अंत्रपाटा आड भूपती ॥ व्यासें नारळ दीधला हातीं ॥ ह्मणें अवधारीं येकाग्रचित्तीं ॥ कथा भारती सोमवंशिया ॥५१॥

रावो ह्मणे जी ऋषिनाथा ॥ न कोपावें संदेह पुसतां ॥ तंव व्यास ह्मणती सर्वथा ॥ उत्कंठित पुसावें ॥५२॥

वैशंपायनासि ह्मणती व्यास ॥ तूं पूर्ण अससी माझा शिष्य ॥ तरी कथा सांगें सावकाश ॥ रायाप्रती ॥५३॥

मग येरें सारोनि षट्‍कर्म ॥ आसनीं बैसला उत्तम ॥ भारत सोडिलें सर्वोत्तम ॥ भोंवती मांदी बैसली ॥५४॥

व्यासगुरु आज्ञे प्रमाणें ॥ भारत सांगितलें ॥ वैशंपायनें ॥ अठरापर्वें संपूर्णें ॥ अनुक्रमेंसीं ॥५५॥

पराशर ह्मणे ऋषीश्वरांसी ॥ हेंचि कारण जाहलें भारतासी ॥ वैशंपायनें कथिलें रायासी ॥ व्यासोक्त देखा ॥५६॥

तंव संतोषोनि ह्मणती ऋषी ॥ भलें पुनीत केलें आह्मासी ॥ आतां चलावें स्नानासी ॥ भागीरथीये ॥५७॥

ऐसें ऐकोनि उठिले अवघें ॥ स्नानार्थ चालिले गंगे ॥ तेंचि वैशंपायन सांगे ॥ जन्मेजयासी ॥५८॥

ऐसें परिक्षितीआख्यान ॥ आणि तुझे दोषकारण ॥ ऋषीश्वरां कथिलें संपूर्ण ॥ बदरिकाश्रमीं ॥५९॥

मुनि ह्मणे राया तुजप्रती ॥ जे म्यां निवेदिली कथा भारती ॥ ते सोमवंशांची विप्तत्ती ॥ सांगिजते पुनरपी ॥१६०॥

ऐसें मूळभूत आख्यान ॥ ऋषिप्रणित जाहलें श्रवण ॥ तंव वैशपायनां करूनि नमन ॥ रावो पुसता जाहला ॥६१॥

तो जन्मेजय वैशंपायनसंवाद ॥ संकलित कीजेल अनुवाद ॥ श्रोतयां व्हावया आनंद ॥ ह्मणे मधुकरकवी ॥६२॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ जन्मेजयचरित्रप्रकारु ॥ पंचमोऽध्यायीं कथियेला ॥१६३॥

॥ श्रीकृष्णर्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP