मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय ७

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय ७

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥ मग सोम ह्मणे सैनिकांसी ॥ आतां चलावें स्वर्गासी ॥ आपण घेवोनि अमरावतीसी ॥ करूं कार्यसिद्धी ॥१॥

अहो पद्मदुहितेसहित ॥ निर्माल्याचें कटक समस्त ॥ इंद्रें नेलें अमरावतींत ॥ तरी घात करणें तयाचा ॥२॥

मग निशाणनादे दळभारू ॥ दळभारू ॥ लंघित चालिला महामेरु ॥ तो ध्रुवलोकीं वेंगवत्तरु ॥ झोंबिन्नला ॥३॥

धाकें ध्रुव मनीं भ्याला ॥ येवोनि सोमासि भेटला ॥ मग मानसन्मान जाहला ॥ परस्परें ॥४॥

ध्रुवें पुसतां वृत्तांत ॥ सोमें सांगीतला समस्त ॥ आणि ह्मणे अमरावतीचा पंथ ॥ सांगिजो जी ॥५॥

ऐकोनि ध्रुव सोमासि ह्मणे ॥ येथोनि ईशान्यसि जाणें ॥ अष्टौ लोकपाळ जिंकणे ॥ मग घेणें अमरावती ॥६॥

ऐकोनि सोम संतोषला ॥ ध्रुवा प्रदक्षिणोनि चालिला ॥ मग दळभारें चालिला ॥ ईशान्येसी ॥७॥

त्याची ऐकोनि वाद्यध्वनी ॥ ईशान दचकला निजमनीं ॥ ह्मणे कोण साहों शके रणीं ॥ हा मुकुटमणी सोमेश्वर ॥८॥

ह्मणोनि आपुले दळभारें ॥ पळ काढिला ईशानेश्वरें ॥ अमरावतीसि वेगें थोरें ॥ गेला सकुटूंब ॥९॥

इकडे सोमरायाचें दळ ॥ नगरीं प्रवेशलें सकळ ॥ उद्द्स देखोनि भूपाळ ॥ चालिला उत्त्तरेसी ॥१०॥

तेथें कुबेर राज्य करी ॥ परि तो ओळगणे गेला त्रिपुरारी ॥ कोणी वीर नाहीं नगरीं ॥ कुबेराचें ॥११॥

परि प्रधान कोटिध्वजु ॥ दुर्गा आंत असे बळभुज ॥ आणि एकलक्ष परिवार उजु ॥ अंगलग पैं ॥१२॥

तंव सोमचिये वीरीं ॥ अग्नि लाविला असे नगरीं ॥ जाळिली कुबेराची पुरी ॥ तंव आला बाहेर प्रधान ॥१३॥

लक्ष येक परिवारु ॥ करित उठिले शस्त्रमारू ॥ सकळ मोडितां दळभारू ॥ सोमेश्वरु चिंतावला ॥१४॥

परि सांवरूनि सोमवीरीं ॥ थोर मांडिली झुंजारी ॥ मोडोनि घातलें कैलासावरी ॥ कुबेर सैन्य ॥१५॥

कोटिध्वज पळोनि गेला ॥ सोमराजा विजय पावला ॥ मग नगर जाळोनि चालिला ॥ वायव्य कोणीं ॥१६॥

तेथें वाय़ुची असे नगरी ॥ ती वेढियेली चौफेरीं ॥ नागरिकां निशाणगजरीं ॥ सुटला पळ ॥१७॥

तंव वायुदेव परिवारेंसी ॥ चालिला संग्राम करावयासी ॥ तेवेळीम पिटिलें दूतांसी ॥ सोमाचिये ॥१८॥

सोमें गृध्रास्त्र प्रयुंजिलें ॥ पक्षी असंख्यात विस्तारले ॥ त्याही मरुद्रण विदारिले ॥ नखीं पाखीं चंचुवें ॥१९॥

तंव झंझावात सुटला भारी ॥ पक्षी पिटोनि नेले दूरी ॥ एक पाडिले गिरिकंदरीं ॥ एक अंतराळीं उदविले ॥२०॥

देखोनि कोपला सोमराजा ॥ बाणीं त्रासिला वायु वोजा ॥ सैन्य पिटिलें बाणपुजां ॥ गणीत नाहीं ॥२१॥

मग मारुत सपरिवारीं ॥ पळोनि गेला अमरपुरीं ॥ तेव्हा जाळिली वायुनगरी ॥ सोमरायें ॥२२॥

पुढें पुढारें चालिले ॥ पश्चिमेसी पावले ॥ तंव रम्य नगर देखिलें ॥ वरूण देवाचें ॥२३॥

वाजंत्रांचे महागजरीं ॥ पळ सुटला वरूणनगरीं ॥ तंव जळाधिपती परिवारीं ॥ पातला संग्रामा ॥२४॥

तुंबळ जाहलें अद्भुत ॥ सोमसैन्य आटलें बहुत ॥ देखोनि राक्षस उठले समस्त ॥ क्रौंचद्दीपींचे ॥२५॥

त्याहीं ग्रासिली वरूणसेना ॥ ह्मणोनी पळ सुटला वरूणा ॥ ठाकोनि गेला इंद्रभुवना ॥ जाळी सोम नगरीतें ॥२६॥

मग तो नैऋत्य दिशेसी ॥ राव चालिला बेगेंसीं ॥ तंव नगरी देखिली कैशी ॥ भुवनेश्वराची ॥२७॥

सुंदर उभवणी दिव्यरत्‍नी ॥ राजा नैऋत्य मुकुटमणी ॥ तेणें नाद ऐकिला श्रवणी ॥ अनंतवाद्याचा ॥२८॥

तंव धाविन्नले पारके ॥ नगर जाळिलें अशेषें ॥ परि नैऋत्य सहसैनिकें ॥ धांवला संग्रामा ॥२९॥

थोर जाहला धडधडाट ॥ सैन्या भविन्नला आट ॥ न सांवरें परदळलोट ॥ पळाले वीर नैऋत्याचे ॥३०॥

भुवनेश्वर हातीं लागला ॥ सोमराजा विजयी जाहला ॥ मग निशाणनादें चालिला ॥ दक्षिणदेशें ॥३१॥

देखोनि यमाची नगरी ॥ वीरीं वेढिली चौफेरी ॥ लोक खळबळले भीतरीं ॥ गिरिंकंदरीं पळाले ॥३२॥

तंव सन्नद्ध होवोनि यम ॥ चालिला कराया संग्राम ॥ पाचारिला राव सोम ॥ साहें साहें ह्मणवोनी ॥३३॥

यमदूत धाविन्नले ॥ कटक सोमाचें वेढिलें ॥ तंव अनिवार संधान आलें ॥ सोमरायाचें ॥३४॥

असंख्यात बाणघाई ॥ दूत पळाले दिशा दाही ॥ यमराज त्रासिला पाहीं ॥ भेदिला सर्वांगी ॥३५॥

मग झड देवोनि पळाला ॥ तेणेंही स्वलोक टाकिला ॥ सोमा विजयो जाहला ॥ ठावो जाळिला यमाच ॥३६॥

परमानंदें उभवोनि गुढी ॥ चालिला अग्निदिशे प्रौढीं ॥ निशाणें गर्जती लक्षकोडी ॥ पातले अग्निपुर ॥३७॥

तेथें झोंबलें सोमदुत ॥ तंव अग्निआला धांवत ॥ दैदीप्यमान धडाडित ॥ वीर समस्त पळाले ॥३८॥

सोमेश्वरें देखिला अंगारू ॥ ह्मणे हा तंवज आमुचा कुळगुरु ॥ मग रथावरूनी सोमेश्वरू ॥ उतरला देखा ॥३९॥

रायें नमस्कारिला वन्ही ॥ येरें आलिंगिला धावांनी ॥ स्वदेहींचें शांत करोनी ॥ तेज देखा ॥४०॥

राजा करे नमन स्तुती ॥ ह्मणे तूं साह्मकारी गार्हपती ॥ ह्मणोनि जिंकिले दिक्‌पती ॥ देश नगरें जाळोनियां ॥४१॥

तूं जाळिशी तेंचि जळे ॥ ह्मणोनि आह्मां जैत आलें ॥ अग्नि ह्मणे तिये वेळे ॥ तूं अत्रिपुत्र ब्रह्मवंशीं ॥४२॥

तूं आमूचा यजमान ॥ सकळ समृद्धी संपूर्ण ॥ आजि कटकेंकरून ॥ केउता चालिलासी ॥४३॥

मग सोम ह्मणे जी वन्ही ॥ मज जाणें असे इंद्रभुवनीं ॥ माझा वैरी वज्रपाणी ॥ तया रणीं लोळवीन ॥४४॥

मग पद्मावतीची कथा ॥ समूळ जाहला निवेदिता ॥ ते ऐकोनि जाहला बोलता ॥ वैश्वानरु ॥४५॥

अगिन ह्मणे सोमेश्वरा ॥ तुज ते प्राप्त होईल दारा ॥ आतां जाई अमरपुरा ॥ पूर्वदिशेसीं ॥४६॥

मग निशांणांचेनि नादें ॥ राव चालिला आनंदें ॥ सैन्यें चातुरंगें सन्नद्धें ॥ समस्तरायांची ।४७॥

तंव पूर्वदिशेच्या प्रांतीं ॥ देखिली सुंदर अमरावती ॥ सैन्यवेढा चौभोवतीं ॥ पडिला देखा ॥४८॥

इकडे आधीच भयचकित ॥ देवेंसि बैसला सुरनाथ ॥ धाडे देखोनि आकांत ॥ वर्तला देवां ॥४९॥

येक इंद्रासि सांगती दूत ॥ कीं नगर वेढीलें समस्त ॥ सैन्य आलें अगणित ॥ सोमरायांचें ॥५०॥

ऐकतां इंद्र गजबजिला ॥ समस्तदेवेंसीं सन्नद्धला ॥ तंव बृहस्पति बोलिला ॥ इंद्राप्रती ॥५१॥

कीं निर्माल्या आणोनि अमरावती ॥ तुवां मांडिली निश्चिंती ॥ परि सोमेश्वर भूपती ॥ आला क्षिती जिंकोनी ॥५२॥

तंव ह्मणे सुरेश्वरु ॥ कांहीं सांगा जी विचारू । संग्राम करा ह्मणे सुरगुरू ॥ आनप्रकारू चालेना ॥५३॥

ह्मणोनी उठावले सुरवर ॥ दुंदुभीं गर्जिन्नलें अंबर ॥ पश्चिमद्दारें समग्र ॥ चालिले युद्धा ॥५४॥

परि तये दिशे राक्षस राजु ॥ होता क्रौचद्दीपींचा भोजु ॥ ह्मणोनि अमरेश तया उजु ॥ उठावला आयणी ॥५५॥

वज्र प्रेरिलें पाचारोनी ॥ येरु धांवला मुख पसरोनी ॥ रथासहित वज्रपाणी ॥ गिळोनि ठेला ॥५६॥

देवीं केला हाहाःकार ॥ ह्मणती गिळिला सुरेश्वर ॥ थोर जाहला असे गजर ॥ रणवाद्यांचा ॥५७॥

तंव बृहस्पती उठावला ॥ राक्षस अर्धचंद्रे विधिला ॥ उदर फोडोनि इंद्र काढिला ॥ रथें सहित ॥५८॥

परि सातक्षोणी राक्षसीं ॥ गुरु केला कासाविसी ॥ तंव बाणीं भेदोनि राक्षसांसी ॥ संहारित बृहस्पती ॥५९॥

ऐसा क्रौचेश्वरू वधिला ॥ देवभार विजयी जाहला ॥ तंव कुशद्दीपींचा उठावला ॥ पक्षिराज ॥६०॥

पक्षी असंख्यात उठावले ॥ दैवसैन्य पराभविलें ॥ नखीं पांखीं झडपिलें ॥ एका भेदिलें चंचुर्वे ॥६१॥

देव झडा देऊनि पळाले ॥ पक्षिराजें गुरुसि धरिलें ॥ सहस्त्रयोजनें गोफणिलें ॥ मेरूपरतें ।६२॥

मग मूर्छा सांवरूनि गुरू ॥ धाविन्नला वेगवत्तरू ॥ मंत्रोनि प्रेरिला अग्निशरू ॥ तेथ अंगारू दाटला ॥६३॥

पंख जाळिलें पक्षियांचे ॥ गंध सुटले करपटाचे ॥ तंव भक्षण केलें अग्नीचें ॥ पक्षिरायें ॥६४॥

आश्चर्य वर्तलें देवगुरुसी ॥ इकडे जन्मेजय ह्मणे मुनीसी ॥ कीं गिळिलें अग्नयस्त्रासी ॥ मग कैसा वांचला ॥६५॥

वैशंपायन ह्मणती राया ॥ औषधी अग्निबाधेचिया ॥ अखंड भक्षणे पक्षियां ॥ कुशद्दीपीं ॥६६॥

ह्मणोनि बाधिना अंगारू ॥ असो पक्षियें टाळिला गुरु ॥ गिळिला असे बेगवत्तरू ॥ पसरोनि मुख ॥६७॥

तेणें हाहाःकार जाहला ॥ ह्मणती गुरु गिळिला ॥ मग इंद्र धाविन्नला ॥ प्रेरिले बाण ॥६८॥

त्याहीं व्यपिलें अंतराळ ॥ जाहलें बाणांचेंचि जाळ ॥ मग पक्षी धांवोनि सकळ ॥ नेले शर वेंचोनी ॥६९॥

महायेद्धे ते पक्षी ॥ त्यांही देव विदारीले नखीं ॥ एका नेती अंतराक्षीं ॥ उचलोनियां ॥७०॥

मग तेथोनि सोडिती ॥ सैनिक विदारूनि पडती क्षितीं ॥ ऐसी अवकळा जाहली बहुतीं ॥ सुरवरांसी ।७१॥

इंद्र करी विचारु । कीं येणें गिळिला देवगुरु ॥ तरी आतां निर्वाण करूं ॥ ह्मणोनि शरु सोडिला ॥७२॥

तैं पन्नगास्त्र विस्तारलें ॥ असंख्यात सर्प जाहले ॥ ते पक्षियांहीं देखिले ॥ मग उडाले आकाशीं ॥७३॥

सर्प धांवले अनंतकोडी ॥ उभयां जाहलीं लवंडी ॥ नवल सुरेंद्राची प्रौढीं भेदी बाणी पक्षियां ॥७४॥

जन्मेजय पुसे विचारु ॥ कीं सर्प पक्षियांचा आहारु ॥ तरी केंवि होय संहारु ॥ इंद्रे शर घालितां ॥७५॥

मुनि ह्मणे गा भुपती ॥ नकळे देवांचे विंदानगती ॥ सर्पबाणीं दुःखित होती ॥ पक्षीवर ॥७६॥

असो इंद्रे पक्षि भेदिले ॥ छिन्नभिन्न करोनि तोडिले ॥ तेथें पक्षीराजासि पाडिलें ॥ मग चालिले सुरवर ॥७७॥

तंव उठावला सोमेश्वर ॥ तेणें गरुडास्त्र प्रेरिला शर ॥ तये गरुडी केला संहार ॥ पन्नगांचा ॥७८॥

इंद्रे मारुतास्त्र घातलें ॥ येरें पर्वतास्त्रें निवारिलें ॥ पार पक्षिये सावध जाहले ॥ धाविन्नले इंद्रावरी ॥७९॥

सोम पाठीसि घातला इंद्रे वज्रबाण हाणिला ॥ ह्मणोनि तृणमात्र छेदिला ॥ पक्ष पक्षियांच ॥८०॥

इंद्रे हाणितां वज्रबाणीं ॥ ठिणगिया उसळल्या गगनीं ॥ मग पक्षिराजें मुखपसरोनी ॥ घातला वदने देवेंद्र ॥८१॥

इंद्र गिळिलारे गिळिला ॥ अमर लोक गजबजिला ॥ तंव नारदु चालिला ॥ ब्रह्मयाजवळी ॥८२॥

तेणें सोमसुरांचा वृत्तांत ॥ पितयालागीं केला श्रुत ॥ कीं गिळिला देवेंसीं सुरनाथ ॥ पक्षिरायें ॥८३॥

ब्रह्मा ह्मणे ऐक पुत्रा ॥ राज्यमद आलासे सोमेश्वरा ॥ म्या विद्या दीधल्या समग्रा ॥ तो सुरवरां नागवे ॥८४॥

आतां आह्मीं जाऊं तेथें ॥ परि तो न मानी आमुतें ॥ तरी त्वां जावोनि विष्णुगुद्रातें ॥ घेवोनि येई ॥८५॥

मग वैकुंठा गेला ब्रह्मासुत ॥ विष्णुसि सांगितला वृत्तांत ॥ ऐकतां सकळ गणेंसहित ॥ चालिला विष्णु ॥८६॥

नारद जावोनि कैलासा ॥ वर्तमान सांगे महेशा ॥ रुद्र कोर्पे चालिला तैसा ॥ साठसहस्त्र गणेंसी ॥८७॥

आपुलाले परिवारगणी ॥ स्वर्गीं आले देव तीन्ही ॥ तंव इकडे सोम मुकुटमणी ॥ काय करिता जाहला ॥८८॥

सनस्त अमरावती लुटुनी ॥ धरिलीं निर्माल्य राय राणी ॥ पद्मदुहिता तेही कामिनी ॥ लागली हातीं ॥८९॥

अमरावतीचे सिंहासनी ॥ सोम बैसला राज्य घेवोनी ॥ पद्मावती लागली चरणीं ॥ मनीं सुख मानिलें ॥९०॥

यानंतरें अपूर्व कथा ॥ ऐकें राया भारत ॥ सावधानव्हावें श्रोतां ॥ ह्मणे मधुकरकवी ॥९१॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टंमस्तबक मनोहरु ॥ सोमस्वर्गग्रहणप्रकारु ॥ सप्तमोऽध्यायीं कथियेला ॥९२॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP