मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय १७

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय १७

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनीसि ह्नणे जन्मेजयो ॥ वैशंपायना तूं ज्ञानडोहो ॥ तरी चित्रविचित्रांचा विवाहो ॥ सांगावा मज ॥१॥

मग ह्नणे मुनीश्वर ॥ कीं काशिराजा काशीश्वर ॥ महाक्षत्रिय धनुर्धर ॥ तीन कन्या तयासी ॥२॥

अंबा अंबिका अंबालिका ॥ त्यांचें स्वयंवर मांडलें देखा ॥ राजे मीनले सकलिका ॥ भूमंडळींचें ॥३॥

त्या सकळश्रृंगार करुनी ॥ गजस्थिता माळापाणी ॥ तेथें भीष्म गेला ऐकोनी ॥ दळभारेंसीं ॥४॥

रथ पेलितां गडगडाटें ॥ राजे पळाले बारावाटे ॥ मग कन्या वाहिल्या बळिष्ठें ॥ भीष्में रथावरी ॥५॥

तंव जाहला हाहाःकार ॥ उठावला रायांचा भार ॥ भीष्में संग्राम करोनि थोर ॥ संहारिले छत्रपती ॥६॥

देवव्रताच्या चापबाणीं ॥ व्यापिन्नली आकाशधरणी ॥ राजे घायवटले रणीं ॥ सैन्यासह ॥७॥

मग पराक्रमें घेवोनि कुमरी ॥ भीष्म गेला हस्तनापुरी ॥ अंबिका अंबालिका सुंदरी ॥ दीधल्या चित्रविचित्रां ॥८॥

दोनी स्वयंवरें जाहलीं ॥ तंव वडील अंबा बोलिली ॥ कीं म्यां वासना होती धरिली ॥ शाल्वा वरावया ॥९॥

ऐकोनि भीष्म ह्नणे तियेसी ॥ तरी तूं जाई शाल्वापाशीं ॥ मग चातुरंगसैन्यासीं ॥ भीष्में तिये पाठविलें ॥१०॥

ते जावोनि शाल्वाप्रती ॥ सर्व वृत्तांत जाहली सांगती ॥ येरु ह्नणे ऐसें त्रिजगतीं ॥ नघडे मज भामिनी ॥११॥

तुज हरिलें गंगानंदनें ॥ आतां जरी म्यां अंगिकारणें ॥ तरी अपकीर्ती वूथा जिणें ॥ आणि पतन पूर्वजां ॥१२॥

मग मुरडोनि आली तयेवेळां ॥ भीष्मासि घालावया माळा ॥ येरु ह्नणे स्त्रिया सकळा ॥ मज गंगेसमान ॥१३॥

अंबा ह्नणे तूंचि भ्रतार ॥ पिता तैसे अन्य नर ॥ तंव भीष्म ह्नणे निर्धार ॥ तूं माझी माता पैं ॥१४॥

यापरि भीष्में अव्हेरिली ॥ मग ते भार्गवा शरण गेली ॥ अवधी व्यवस्था सांगोनि आकुळी ॥ आक्रंदली विलापें ॥१५॥

येरें देवोनि नाभिकार ॥ बोलाविला गंगाकुमर ॥ ह्नणे इयेचा केला अव्हेर ॥ तरी हरिली कां पां ॥१६॥

आतां आमुचें ह्नणितलें करीं ॥ इये अंबेसि तूं वरीं ॥ भीष्म ह्नणे विनंती अवधारीं ॥ हे मज गंगेसमान ॥१७॥

ऐकतां परशुराम कोपला ॥ ह्नणे माझा शब्द मोडिला ॥ तरी थोर अपराध केला ॥ आह्मींचि गा ॥१८॥

तुज अस्त्रविद्या दीधली ॥ हे म्यां कुबुद्धी आचरिली ॥ असो आतां प्रतिज्ञा वहिली ॥ ऐकें भीष्मा ॥१९॥

आतां तूं मजसीं युद्ध करीं ॥ हारी आलिया इयेतें वरीं ॥ आह्मी हरुं तरी अव्हेरीं ॥ अंबेसि या ॥२०॥

भीष्म ह्नणे जी श्रीगुरु ॥ तूजसीं संग्राम कैसा करुं ॥ तरी मी गंगेचा असतां कुमरु ॥ तेचि यश देईल ॥२१॥

उपरी ह्नणे परशुराम ॥ भीष्मा तूं न करीं अभिमान ॥ मजसवें करितां संग्राम ॥ हारी पावसी सर्वथा ॥२२॥

अरे एकवीसवेळा पाहीं ॥ म्यां निःक्षत्रीय केली मही ॥ तरी यश न पावसी काहीं ॥ झुंजतां मजसवें ॥२३॥

तंव ह्नणितले गंगात्मजें ॥ येकवीसवेळां जिंकिले राजे ॥ तेणें भ्रमें न वंचिजे ॥ तें विदित असे मज ॥२४॥

प्रथम मायादेवीचा रावो ॥ जिंतिला नामें मुंडबाहो ॥ दुसरेन वधिला विकटबाहो ॥ सहस्त्रार्जुन ॥२५॥

शंखसेन नामें राक्षस ॥ तिसरेन केला त्याचा नाश ॥ चौथा विरोध आसमास ॥ केला श्रीदत्ताची ॥२६॥

कलिंगीचा जळसेन कुमर ॥ त्याचा सातवेनि संहार ॥ आठवेन ऊर्ध्वसेनवीर ॥ पाताळसेनात्मज ॥२८॥

मग नववा संग्राम केला ॥ शंबरात्मज उग्रसेन वधिला ॥ दहावे संग्रामीं मारिला ॥ उग्रात्मज ॥२९॥

विद्याधरा आणि अतिबळा ॥ वधिलें अकराविया वेळां ॥ जयंती नगरींच्या राक्षसकुळा ॥ विंधिले मग ॥३०॥

बाराविये समरंगणीं ॥ बाराकोटी पाडिले धरणीं ॥ तैसेचि तेरावे अवसानीं ॥ तेराकोटी निशाचार ॥३१॥

पुढें चौदावे संग्रामीं ॥ चौदाकोटी पाडिले भूमीं ॥ काळ नामें पराक्रमी ॥ तुह्मीं मारविला ॥३२॥

छत्तिसकोटी राक्षसेसीं ॥ वधियेलें सत्यनगरीसी ॥ जैत आलें गुरो तुह्मासी ॥ युद्धीं पंधरावें ॥३३॥

सोळाविये संग्रामीं जाणा ॥ जिंकोनि जयंतीची सेना ॥ बाह्या उपडोनि घेतलें प्राणा ॥ अनंगवीराचे ॥३४॥

सतराविये समरीं राक्षस ॥ तुह्मीं निर्घातिले बहुवस ॥ तैसेचि वधिले आसमास ॥ वेळीं अठराविये ॥३५॥

एकुणिसावा संग्राम जिंकिला ॥ तैं मल्लिकार्जुन नमविला ॥ पोट फाडोनि विसावे वेळां ॥ कृतांत वधिला बाळकेतु ॥३६॥

यावरी धनुष्याचे अडणीं ॥ सिंधु ओसरविला बाणीं ॥ चौदाताल कोंकण रचोनी ॥ केली वस्ती गुरुवर्या ॥३७॥

एकविसावा संग्राम तुमसीं ॥ जाहला चंडमुंडेंसी ॥ वधोनि तत्पुत्रा बाबरासी ॥ राहिलासि वैतरणीये ॥३८॥

ऐसा तूं पराक्रमी गुरुनांथा ॥ परि वधिली रेणुका माता ॥ ते तुह्मां घडली मातृहत्या ॥ वधिलें दैत्यां तदाज्ञें ॥३९॥

मी नव्हें तुह्मासारिखा ॥ गंगामाता यशदायका ॥ अवश्य हारी तुह्मांसि देखा ॥ माझेनि कृतनिश्वयें ॥४०॥

तंव अधिकाधिकचि थोर ॥ कोपला तो फरशधर ॥ करोनि धनुष्या टणत्कार ॥ वेगें शर सोडिला ॥४१॥

साउमा येतांचि बाण ॥ भीष्में सांडिला तोडोन ॥ ऐसा जाहला संग्राम दारुण ॥ संवत्सर येक ॥४२॥

मग भार्गवा बोलिला भीष्म ॥ कां जी वृथा करितां श्रम ॥ निर्वाणीं झुंजतां तुमचा भ्रम ॥ फिटेल सर्व ॥४३॥

येणे बोलें तिरस्कारला ॥ राम शस्त्रास्त्रीं वर्षिन्नला ॥ तीं सर्व निवारिता जाहला ॥ देवव्रत ॥४४॥

मग गांगेयें संधान केलें ॥ कोदंड भार्गवाचें छेदिलें ॥ सर्वेचि शरधनुष्य ठेविलें ॥ चरण वंदिले गुरुचे ॥४५॥

ह्नणे माझा पण सत्य जाहला ॥ तंव अविनाशें शापिला ॥ कीं मरशील रे वहिला ॥ इचेनि हातें ॥४६॥

भीष्म नायकतचि निघाला ॥ अंबेनें अग्निप्रवेश केला ॥ तो कुंडीं शिखंडी जन्मला । द्रुपदरायाचे ॥४७॥

ते कथा असे परोती ॥ असो भीष्म गेला हस्तनावती ॥ भेटोनि सत्यवतीप्रती ॥ सांगीतला वृत्तांत ॥४८॥

यानंतरें अपुर्वकथा ॥ ऐकें राया भारता ॥ पुत्र वयें सान असतां ॥ राज्य चालवी सत्यवती ॥४९॥

भीष्म राजमंदिरीं सचिंत ॥ राहिला असे अखंडित ॥ बाहेरि न ये सभेआंत ॥ न करी पडताळा ॥५०॥

तंव लोक अपवाद बोलती ॥ कीं माता असोनि सत्यवती ॥ परि वाटतो भीष्माच्या चित्तीं ॥ अन्यभावो ॥५१॥

तैसेंचि मानिलें दोनी कुमरीं ॥ ह्नणती भीष्म अखंड मंदिरीं ॥ रुपें आगळी मत्स्योदरी ॥ काहीं अनर्थ निर्धारें ॥५२॥

आतां येकादेनि प्रकारें ॥ भीष्म वधावा निर्धारें ॥ हा मात्रागमनी खरें ॥ ऐसें पिशुन बोलती ॥५३॥

तेणें पातकें विचित्रासी ॥ क्षयरोग लागला अहर्निशी ॥ आणि नाश जाहला चित्रासी ॥ तें आश्वर्य अवधारा ॥५४॥

एकदा माघस्त्रान करावया ॥ गंगेसि गेला गांगेया ॥ मग निघाला वधावया ॥ चित्र तयासी ॥५५॥

तंव चिंता पडली मुकुंदा ॥ तेणें चेष्टविलें चित्रागंदा ॥ तो पारधीसि आला विनोदा ॥ हस्तनापुरीं ॥५६॥

गेला न्हावोनि गंगाकुमर ॥ मग गंधर्वे देखिला चित्र ॥ दोघां संग्राम होवोनि थोर ॥ गंधर्वे चित्र पाडिला ॥५७॥

ऐसा रणीं चित्र पाडिला ॥ विचित्र क्षयरोगें निमाला ॥ कृतापराध फळा आला ॥ दोघां बंधूंसी ॥५८॥

तरी जो दृढाचारी सत्त्ववंत ॥ त्याचिये निंदेनें होय घात ॥ कीं परमेश्वर साक्षभूत ॥ सर्वकर्ता प्रेरकु ॥५९॥

असो हे पुत्र निमाल्यावरी ॥ सत्यवती शोक करी ॥ ते संबोधिली नानापरी ॥ भीष्मदेवें ॥६०॥

मग ह्नणे सत्यवती माता ॥ राज्य अंगिकारीं रे भाग्यवंता ॥ तूं उत्तीर्ण झालासि सर्वथा ॥ करीं आतां विवाहो ॥६१॥

देवव्रत ह्नणे माते ॥ म्यां तारुण्य दीधलें पित्यातें ॥ आतां राज्य आणि स्त्रियेतें ॥ न करणें मज ॥६२॥

परि येथ वाटतो खंतिवेश ॥ कीं न वाढेचि सोमवंश ॥ तरी वृद्धिलागीं उद्देश ॥ काहीं विचारीं सत्यवती ॥ ॥६३॥

येरी ह्नणे भीष्मा पवित्रा ॥ येक आलें माझिये अंतरा ॥ तरी उपावो पुसों कुमरा ॥ व्यासालागीं ॥६४॥

मी असतां नौकेवरी ॥ तैं पराशरापासोनि उदरीं ॥ पुत्र जन्मला अवधारीं ॥ व्यास नामें ॥६५॥

तेणें मज ह्नाणितलें माते ॥ कीं अवघडीं चिंतीं मातें ॥ तैं पावेन वो निरुतें ॥ स्मरणमात्रें ॥६६॥

तरी आतां तयासि पुसणें ॥ तंव आज्ञा दीधली गंगानंदनें ॥ मग येरीनें चिंतिला मनें ॥ व्यासदेवो ॥६७॥

स्मरतां पावला तत्क्षणीं ॥ भेटला माते लागुनी ॥ भीष्में षोडशोपचारें करुनी ॥ पूजिला बंधु ॥६८॥

तैं सर्व व्यवस्था व्यासाप्रती ॥ कथिती जाहली सत्यवती ॥ ह्नणे वंश वाढेल ऐशी स्थिती ॥ करीं पुत्रा ॥६९॥

ऐकोनि व्यास ह्नणती माते ॥ नग्न करोनि वधुवातें ॥ मजजवळी तयांतें ॥ पाठवीं येकांतीं ॥७०॥

तें मानवोनि सत्यवतीसी ॥ ह्नणे पुत्र होवो कां वंशीं ॥ जेणें राज्यादि समस्तांसी ॥ आधार होय ॥७१॥

मग अंबिके अंबालिकेप्रती ॥ प्रबोधी ते सत्यवती ॥ ह्नणे जालिया संतती ॥ सर्व साह्य होइल ॥७२॥

जैसे चित्र आणि विचित्र ॥ तैसाचि व्यास माझा कुमर ॥ तुह्मी नग्न होवोनि पुत्र ॥ जोडावा वंशीं ॥७३॥

मग तो मुनी येकांतस्थानीं ॥ व्यास बैसला दृढासनीं ॥ तंव श्रृंगारोनि कामिनी ॥ सत्यवती पाठवी ॥७४॥

परि ते अंबिका लाजोनी ॥ तेथें गेली नेत्र झांकोनी ॥ डोळियांसी पट बांधोनी ॥ उभी ठेली त्यापुढें ॥७५॥

अंबालिकेनें काय केलें ॥ सर्वाग चंदनें लेपिलें ॥ नग्न ठेलीतिये वेळे ॥ व्यासासन्मुख ॥७६॥

एकी परिचारिका श्रृंगारोनी ॥ तेही धाडिली तिये स्थानीं ॥ कीं वंश वाढावा ह्नणवोनी ॥ सत्यवतीनें ॥७७॥

त्या नग्न श्रृंगारायुक्ता ॥ उभ्या राहिल्या जावोनि त्वरिता ॥ मग व्यास होय अभिमंत्रिता ॥ उदरें तयांची ॥७८॥

दृष्टीं देखतां नग्निता ॥ व्यास जाहला वरदान देता ॥ कीं जो भाव जियेचां सर्वथा ॥ तैसाचि सिद्ध होईल ॥७९॥

दृष्टीनें संभवले गर्भजात ॥ हें भविष्योत्तरींचें मत ॥ परि व्यास रमला भारतोक्त ॥ तिघीजणींसीं ॥८०॥

परि रमला हें बोलतां ॥ दूषण लागतसे महंता ॥ ह्नणोनि अवलोकनेंचि कांता ॥ केल्या गरोदरी ॥८१॥

मग भीष्मा मातेसि पुसोनी ॥ व्यास गेले निजस्थानीं ॥ पुढें पूर्णदिनीं तिघीजणी ॥ प्रसवलीया ॥८२॥

अंबिकें डोळां पट बांधिला ॥ ह्नणोनि पुत्र अंध जाहला ॥ तो नांव धृतराष्ट्र पावला ॥ तेणें गुणें ॥८३॥

अंबालिकें चंदन लेपिला ॥ तियेसि कुष्ठिया उपजला ॥ ह्नणोनि तो नांव पावला ॥ पंडु ऐसें ॥८४॥

परिचारिकेचा कुमर ॥ सर्वावयवीं जाहला सुंदर ॥ तया नांव ठेविलें विदुर ॥ भीष्मदेवें ॥८५॥

तंव भारत ह्नणे कुमर ॥ जन्मले हें न गमे उत्तर ॥ मुनी ह्नणे गा सामर्थ्यथोर ॥ तापसांचें ॥८६॥

अगस्तीं समुद्रचूळ केला ॥ गाधिज सृष्टि निर्मिता जाहला ॥ तैसाचि तपोबळें आगळा ॥ व्यासदेवो ॥८७॥

आतां असो हे व्यवस्था ॥ वंशवृद्धीनें हर्ष समस्तां ॥ मग राज्य जाहला देता ॥ भीष्म विचारोनी ॥८८॥

अंध तंव अनाधिकारी ॥ विदुर जन्मला दासीउदरीं ॥ ह्नणोनि समुहूर्ती टिळा सारी ॥ पंडूकारणें ॥८९॥

यानंतरें त्याचा विवाहो ॥ मनी विचारी भीष्मदेवो ॥ तो संक्षेपें कथान्वयो ॥ सांगेल मधुकरकवी ॥९०॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ धृतराष्ट्रादिउत्पत्तिप्रकारु ॥ सप्तदशाध्यायीं कथियेला ॥९१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP