मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय ३१

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय ३१

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

राया अपावो घडला पार्थासी ॥ मग तो निघाला तीर्थयात्रेसी ॥ माजी हरिलें सुभद्रेसी ॥ सकळ यादवां जिंकोनी ॥१॥

तंव जन्मेजयो विनवी ॥ कीं हे अपूर्वता सांगावी ॥ माझी ब्रह्महत्या हरावी ॥ स्वामिनाथा ॥२॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ भारता ऐकें सावधान ॥ खेद धरोनि दुर्योधन ॥ विचार करी कर्णासीं ॥३॥

कीं शिशुपाळा चेष्टवुनी ॥ द्यावा पांडवांसि लावोनी ॥ तो सूड उगवील निर्वाणी ॥ पांडवांचा ॥४॥

मग पत्र लिहूनि धाडिलें ॥ तें शिशुपाळें वाचिलें ॥ कीं युधिष्ठिरें श्राद्ध केलें ॥ पंडु पितयाचें ॥५॥

तेथ सकळ राये बोलाविले ॥ परि तुह्मांसि अवगणिलें ॥ तरी वृथा संसारीं जियाळें ॥ निरभिमानी पुरुषाचें ॥६॥

ऐसा वृत्तांत मनीं आणोनी ॥ सकळ सैन्य पालाणोनी ॥ इंद्रप्रस्थासि जावोनी ॥ वळिलीं गोधनें विप्रांची ॥७॥

विप्र शंखध्वनी करोनियां ॥ आले पार्थासि सांगावया ॥ ते वेळीं तो धनंजया ॥ काय करिता जाहला ॥८॥

ह्नणे गाईब्राह्मणाकाजीं ॥ आपुला प्राणही वेंचणें आजी ॥ हा किर्तिघोष जगामाजी ॥ विस्तारेल क्षात्रधर्म ॥९॥

असो हें शस्त्रशाळे आंत ॥ धर्मद्रौपदी होतीं निद्रिस्थ ॥ तेथें प्रवेशला वीर पार्थ ॥ डोळां पट बांधोनी ॥१०॥

धनुष्यबाण धांडोळितां ॥ धर्मचरण लागला अवचिता ॥ जागृत होवोनि जाहला पाहता ॥ तंव पार्था देखिलें ॥११॥

पार्थे धनुष्यबाण घेउनी ॥ आगमन केलें तेथुनी ॥ रथारुढ होवोनि तत्क्षणीं ॥ गेला धांवणेया ॥१२॥

तैं शिशुपाळ वोडगिला ॥ दोघां संग्राम थोर जाहला ॥ परि शेवटीं पळविला ॥ पार्थे शिशुपाळ ॥१३॥

वळवोनि आणिलीं गोधनें ॥ सुखी केलीं ब्राह्मणें ॥ धर्म संतोषला मनें ॥ ऐकोनि वृत्त ॥१४॥

मग समस्तां वडिलांकारणें ॥ पुसिलें कर जोडोनि अर्जुनें ॥ कीं अदृष्ट देखिलें नयनें ॥ तया सांगणें प्रायश्वित्त ॥१५॥

वडील पार्थासि बोलिले ॥ जें नारदें असे कथिलें ॥ तेंचि करावे गा वहिलें ॥ अंगिकारोनि ब्रह्मचर्य ॥१६॥

तीर्थे करावीं आघवीं ॥ यज्ञदीक्षा स्वीकारावी ॥ तें वाक्य धरोनि जीवीं ॥ आज्ञा घेतली अर्जुनें ॥१७॥

मग सज्ज करोनि रथ ॥ तीर्थयात्रे चालिला पार्थ । तो तीर्थाभिधान वृत्तांत ॥ असे पंचमस्तबकीं ॥१८॥

पूर्वोत्तर पश्विमेसी ॥ तीर्थी न्हावोनि दक्षिणेसी ॥ गेला मणिपूरनगरीसी ॥ भद्रसेनाचे ॥१९॥

तेथें तीर्थविधी साधावया ॥ गेला अमृत तळेया ॥ तंव वारिलें धनंजया ॥ उलुपीचित्रांगीयें ॥२०॥

ह्नणे येथें सावज असे थोर ॥ तेणें बहुतांचा केला संहार ॥ तंव ह्नणे धनुर्धर ॥ सांगा वृत्तांत आपुला ॥२१॥

चित्रांगी ह्नणे अवधारीं ॥ मी चित्रसेन गंधर्वाची कुमरी ॥ ताल चुकलें नृत्यकारीं ॥ ह्नणोनि पितयें शापिलें ॥२२॥

कीं तूं जन्मसी भूमंडळीं ॥ ते मी भद्रसेनाचे कुळीं ॥ जन्मलें परि शैलबाळी ॥ पूजीं सर्वदा ॥२३॥

गौरी धरिली होती ध्यानीं ॥ तंव आले दुर्वासमुनी ॥ परि त्या महंतां देखोनी ॥ मी न उठिलें ॥२४॥

तेणें कोपला ऋषीश्वर ॥ ह्नणे केलासि अनादर ॥ तरी तुज न मिळे भ्रतार ॥ तारुण्यसमयीं ॥२५॥

ऐसें शापदान ऐकोनी ॥ मी लागलें मुनिचरणीं ॥ ह्नणें कृपा कीजे उश्शापोनी ॥ मी अज्ञान बाळक ॥२६॥

मुनि ह्नणे प्रमाण परियेसीं ॥ जो वधील या नाडेसावजासी ॥ तो त्वां वरावा निश्वयेंसीं ॥ तया नाम पार्थवीर ॥२७॥

तयांसि सावजवृत्त पुसिलें ॥ तेवेळीं दुर्वासें सांगीतलें ॥ कीं पूर्वी देवांसि त्रासिलें ॥ इंद्रसेन दैत्येंद्रें ॥२८॥

तो नारायणें वधिला ॥ मागुता दैत्ययोनी पावला ॥ अमरकंद नामें भला ॥ ग्रासिले ऋषि ब्राह्मण ॥२९॥

ह्नणोनि शापिलें ऋषीश्वरीं ॥ कीं सुसर होई उदकाभीतरीं ॥ मृत्यु पावतां पार्थशरीं ॥ तैं होईल उद्धार ॥३०॥

ऐसें सांगोनि दुर्वास मुनी ॥ आपण गेले बदरिकावनीं ॥ मग मी राहिलें राखोनी ॥ यया सावजासी ॥३१॥

आतां शेषरायाची नंदिनी ॥ उलुपी नामें मृगनयनी ॥ ते हे जोडली सांगातिणी ॥ येथें मज ॥३२॥

इयें कंबलाश्वतर पाताळीं ॥ अव्हेरिले पूर्वकाळीं ॥ त्यांहीं शाप दिला कीं महीतळीं ॥ पावसी पार्थ कांत ॥३३॥

ह्नणोनि हेही येथें आली ॥ निरंतर राखित राहिली ॥ ऐसी व्यवस्था आयकिली ॥ धनुर्धरें ॥३४॥

मग पूर्ण कानाडी भरोनी ॥ रिघाला तळेयाजीवनीं ॥ तंव आलें मुख पसरोनी ॥ सावज देखा ॥३५॥

पार्थे चंद्रबाण सोडिला ॥ डांचे चिरोनियां गेला ॥ नाडेसावजा वध जाहला ॥ मग टाकिलें बाहेरी ॥३६॥

देखोनि कुमरें आश्वर्य मानिलें ॥ कोण ह्नणोनि पार्थासि पुसिलें ॥ येरें सर्व वृत्त कथिलें ॥ स्वकीय पैं ॥३७॥

तंव त्या देखोनि लाजिन्नल्या ॥ पुष्पमाळा घेवोनि आल्या ॥ अर्जुनालागीं वरावया ॥ पार्थ तयांसी ह्नणतसे ॥३८॥

कीं मी ब्रह्मचर्यागिकारें ॥ तीर्थे करितो समग्रें ॥ तरी हें अयुक्त सर्वप्रकारें ॥ निंद्य मज ॥३९॥

यावरी चित्रांगी ह्नणे ॥ माळा कंठीं घालों देणें ॥ मग स्वदेशीं गेलिया नेणें ॥ आह्मालागीं ॥४०॥

परि तेंही न मानी पार्थ ॥ ह्नणोनि येरीनें तो वृत्तांत ॥ भद्रसेनासि केला श्रुत ॥ नाडेसावजापासोनी ॥४१॥

ऐकोनि भद्रसेन ह्नणत ॥ जेणें सावजा केला घात ॥ तो महावीर पंडुसुत ॥ निर्धारेंसीं ॥४२॥

मग दळभारें सहित ॥ येवोनि आलिंगिला पार्थ ॥ ह्नणे अंगिकार करीं सत्य ॥ कुमारिकांचा ॥४३॥

येरें तीर्थयात्रा ब्रह्मचर्य ॥ सांगीतलें सविस्तर कार्य ॥ तंव विनवूनि बोले राय ॥ करुं विवाहमात्रची ॥४४॥

पुढें स्वगृहीं गेल्यावरी ॥ तुह्मी घेवोनि जावें कुमरी ॥ ऐसा आग्रहो देखोनि भारी ॥ मानिलें पार्थे ॥४५॥

मग त्या दोघी बरवंटी ॥ माळा घालिती पार्थकंठीं ॥ तेव्हा वाद्यगजरें सृष्टी ॥ आनंदलीसे ॥४६॥

सोहळा केला दिवस चारी ॥ तंव पार्थ विज्ञप्ती करीं ॥ कीं आज्ञा दीजे झडकरी ॥ जाईन तीर्थयात्रे ॥४७॥

रावो ह्नणे मी निपुत्रिक जाणा ॥ राज्य देईन तुमच्या नंदना ॥ तरी पुत्रफळ पावती अंगना ॥ तंव राहिजे ॥४८॥

पार्थ ह्नणे न घडे ऐसें ॥ मज तीर्थासि जाणें असे ॥ मागुती येईन विशेंषें ॥ तुमच्या गृहीं ॥४९॥

रावो बोळवीत चालिला ॥ तो पार्थे राहविला ॥ ऐसा स्त्रियांचा अंगिकार केला ॥ तीर्थयात्रे भ्रमतां पैं ॥५१॥

वैशंपायन ह्नणती नृपवरा ॥ मग पार्थ गेला रामेश्वरा ॥ सेतुबंधीं अवधारा ॥ साधिला तीर्थविधी ॥५२॥

तंव श्रृंगारवनाआंत ॥ पार्थे देखिला हनुमंत ॥ तो जाणोनि रामभक्त ॥ केला प्रणिपात अर्जुनें ॥५३॥

दोघां क्षेमालिंगन जाहलें ॥ वनफळीं भोजन केलें ॥ सकर्पूर विडे घेतले ॥ मग बैसले उल्हासें ॥५४॥

संभ्रमें पुसे अर्जुनवीर ॥ राम हा परम धनुर्धर ॥ तरी संधानचमत्कार ॥ सांगा कैसा ॥५५॥

कपि ह्नणे गा पंडुकुमरा ॥ रामचंद्राचिया शरा ॥ लक्षितां फांके अवधारा ॥ दृष्टी आमुची ॥५६॥

संधान करितां मुद्रिका झळके ॥ परि बाण काढितां सोडितां न देखें ॥ ह्नणोनि येकदा कौतुकें ॥ पुसिलें मियां ॥५७॥

तुमच्या शरसंधानी ॥ देवारी लोळविले धरणीं ॥ तरी लक्षवेग मजहुनी ॥ कैसा अधिक दाखाविजे ॥५८॥

मग रामें शर सोडिला ॥ मियां वेगवत्तर उडाला ॥ बाण धरावया वहिला ॥ तंव न दिसे दृष्टीं ॥५९॥

तो मजहूनियां पुढां ॥ बाण पडिला साठपाडां ॥ ऐसा दुरापाती गाढा ॥ वीर नाहीं त्रिभुवनीं ॥६०॥

यावरी पार्थ ह्नणे कपीक्षा ॥ याचा नवलावो कायसा ॥ येरु ह्नणे निंदका मानुषा ॥ तरी दावीं स्वसंधान ॥६१॥

तेव्हां पार्थे सोडिला शर ॥ कपी धांवला वेगवत्तर ॥ न लागतां येक क्षणांतर ॥ करीं धरोनि आणिला ॥६२॥

ऐसे शतवेळां आणिले बाण ॥ तेणें पार्थ पावला अपमान ॥ मग बोलों लागला वचन ॥ निंदारुप ॥६३॥

येवढा राम बळिवंत ॥ तरी कां न बांधी शरीं सेत ॥ ऐकोनि ह्नणे हनुमंत ॥ केवीं राहिल आह्मांभारें ॥६४॥

अठरापद्में वानर ॥ शस्त्रें तरी गिरितरुवर ॥ ऐसियांचा थोर भार ॥ केवीं शर साहती ॥६५॥

पार्थ ह्नणे गा हनुमंता ॥ तरी कायसी धनुर्धरता ॥ मी जरी करीन शरसेता ॥ तरी तो कोणा न भंगवे ॥६६॥

तो तूं जरी सेतु भंगिसी ॥ तरी अग्निप्रवेश करणें मजसी ॥ कपी ह्नणे नाहीं गा मजसी ॥ भय मृत्यूचें कदाही ॥६७॥

परि तुझे ध्वजस्तंभीं सतत ॥ न भंगतां सेतु राहीन सत्य ॥ ऐसी प्रतिज्ञा होवोनि उभयांत ॥ पार्थे सेतु बांधिला ॥६८॥

तेव्हां पुच्छीं बांधोनि गिरिवर ॥ वरी चढला हनुमंतवीर ॥ तेणें भारें जाहला चूर ॥ शरबंधांचा ॥६९॥

मग काष्ठें मेळवोनी ॥ अर्जुनें पेटविला अग्नी ॥ ऐसें गोपालकृष्णें जाणोनी ॥ विप्ररुपें आला तेथ ॥७०॥

जंव पार्थ अग्निप्रवेश करी ॥ तंव तया विप्र करीं धरी ॥ ह्नणे कैसीरे जाहली परी ॥ ते सांगें मज ॥७१॥

मग तो पूर्व वृत्तांत ॥ दोघीं अवघा केला श्रुत ॥ ऐकोनि विप्र उभयांसि ह्नणत ॥ कीं लटिके तुह्मी ॥७२॥

यासी कोणी साक्ष नाहीं ॥ वायां प्रवर्तलेति अपायीं ॥ आतां मज दाखवा दोघेही ॥ सामर्थ्य आपुलें ॥७३॥

तो दोघां मानवला वृत्तांत ॥ पार्थे मागुतीं बांधिला सेत ॥ विप्र ह्नणे हा अभंग दिसत ॥ मजकारणें ॥७४॥

हनुमंत कोपोनि उडाला ॥ शिरीं पर्वत घेवोनि आला ॥ तंव विप्रें घातलें सुदर्शन तळा ॥ सेतुचेनी ॥७५॥

कपी जावोनियां गगनीं ॥ उडी घालिता होय तेथोनी ॥ तंव पडिला उसळोनी ॥ सेतुवातळीं ॥७६॥

यावरी निघोनि बाहेरी ॥ ह्नणे दोघां जाहली सरोबरी ॥ आतां पुनरपि न भंगवे तरी ॥ राहीन ध्वजस्तंभीं ॥७७॥

द्विज ह्नणे गा वायुसुता ॥ हा सेतु अभंग सर्वथा ॥ येरु ह्नणे कळेल आतां ॥ ह्नणोनि उडाल सवेग ॥७८॥

मैनाक महेंद्र दोनी करीं ॥ मंदराचळ घेतला शिरीं ॥ निषध किष्किंध झडकरी ॥ पुच्छीं तेणें गुंडाळिले ॥७९॥

मग जावोनि गगनांतरीं ॥ उडी घातली सेतूवरी ॥ परि उसळोनि पडिला दूरी ॥ सेतु अभंग तैसाचि ॥८०॥

बाहेर येवोनि विचारित ॥ ह्नणे हा नवलाहो अद्भुत ॥ तरी विप्ररुपें हा महंत ॥ असावा कोणी ॥८१॥

येवोनि ह्नणे गा ब्राह्मणा ॥ त्वां वर दीधला सेतुबंधना ॥ ह्नणोनि न भंगे माझ्या उड्डाणा ॥ तरी तूं कोण सत्य सांग ॥८२॥

ऐसें बोले जंव हनुमंत ॥ तंव विप्र जाहला रघुनाथ ॥ येरु चरणीं लागोनि ह्नणत ॥ मनोरथ पूर्ण केला जी ॥८३॥

मग ध्यानस्थ राहिला ॥ राम हनुमंतें कैसा देखिला ॥ तें ऐकें गा भूपाळा ॥ चित्त देवोनी ॥८४॥

श्लोकः ॥ ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ॥ वामांकारुढसीतामुहकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं दधतमुरुजटामंडनं रामचंद्रम् ॥१॥ ॥

ऐसी ध्यानीं मूर्ती भासली ॥ नानापरी स्तुति केली ॥ तंव बोलिले वनमाळी ॥ कीं पुरेपुरे हनुमंता ॥८५॥

तुवां पार्थाचे ध्वजीं बैसावें ॥ यासी संकटीं सांभाळावें ॥ मग पार्थ दीधला देवें ॥ हातीं हनुमंताचे ॥८६॥

नानापरी निरोविला ॥ देव तेथोनि उदृश्य जाहला ॥ पार्थ हनुमंता पुसोनि चालिला ॥ तीर्थयात्रेसी ॥८७॥

गेला इंद्रकीलपर्वती ॥ तेथें तप करीतसे पशुपती ॥ तंव देखिला द्रौपदीपती ॥ महारुद्रें ॥८८॥

ह्नणे हें माझें येकांतवन ॥ तरी त्वां केलें कां आगमन ॥ यावरी पार्थ बोलिल वचन ॥ कीं तीर्थयात्रे कारणें ॥८९॥

येथें राहोनि सप्तरात्री ॥ मग मी जाईन अवधारीं ॥ तंव कोपोनि ह्नणे त्रिपुरारी ॥ क्षणही येथें बैसूं नको ॥९०॥

पार्थ ह्नणे दिगंबरा ॥ राहीन पंचरात्री अवधारा ॥ येरु ह्नणे क्षणमात्रा ॥ न राहिजे त्वां ॥९१॥

पार्थ ह्नणे गा परियेस ॥ राहोंदेयीं तीन दिवस ॥ अथवा एकदिवस विशेष ॥ राहों देयीं ॥९२॥

रुद्र ह्नणे बोलसी वृथा ॥ क्षणभरी राहों नेदीं सर्वथा ॥ पार्थ ह्नणे रे निर्दया अतीता ॥ तुज भावेल तें करावें ॥९३॥

रुद्र ह्नणे रे कापडिय ॥ मरणां कां इच्छितोसि वायां ॥ पार्थ ह्नणे रे तापसिया ॥ हा भ्रम सांडोनि देयीं ॥९४॥

ऐसें परस्परां विरोधितां ॥ कोप आला उमाकांता ॥ मग त्रिशूळें हाणिलें पार्था ॥ येरु करी काय तेव्हां ॥९५॥

दर्भशलाका अभिमंत्रोनी ॥ त्रिशूळावरी घातली तत्क्षणीं ॥ तेणें खंडें जाहली तीनी ॥ त्रिशूळाचीं ॥९६॥

तंव ह्नणे जन्मेजयो ॥ एक उपजला संदेहो ॥ पंचवक्र जो महादेवो ॥ तोचि पांडव अवतरला ॥९७॥

हें पूर्वी तुह्मीं कथिलें ॥ तरी येथ कां युद्ध मांडलें ॥ मग वैशंपायन बोलिले ॥ ऐकें राया ॥९८॥

हरिहरांच्या गतिमती ॥ वेदशास्त्रां नेणवती ॥ ह्नणोनि जीव उद्धराया क्षितीं ॥ प्रकटले स्वयें ॥९९॥

पार्थाची करावी कीतीं ॥ जे वर्णितां जीव तरती ॥ आणि मुकुट द्यावया त्याप्रती ॥ मृडानीपतीनें चाळविलें ॥१००॥

पुढील होणारा सारिखें ॥ अंगिकारिलें असे त्र्यंबकें ॥ हें आत्मज्ञान बहिर्मुखें ॥ जाणावें केवीं ॥१॥

तंव ह्नणे जन्मेजयो ॥ हा फिटला जी संदेहो ॥ मुकुट द्यावया उपावो ॥ रचिला शिवें ॥२॥

तरी आतां अग्रकथा ॥ मज सांगा जी मुनिनाथा ॥ यावरी जाहला बोलता ॥ वैशंपायना ॥३॥

त्रिशूळ भंगिला देखोनी ॥ रुद्रें विंधिलें अमितबाणीं ॥ तंव पार्थे संधान करोंनी ॥ शरें शर निवटिले ॥४॥

ऐसा दारुण संग्राम जाहला ॥ शस्त्रास्त्रांचा वन्ही पेटला ॥ त्रैलोक्या आकांत वर्तला ॥ तये वेळीं ॥५॥

शिवें अग्न्यस्त्र मोकलिलें ॥ पार्थे पर्जन्यास्त्र प्रेरिलें ॥ तें शंकरें पिटोनि नेलें ॥ मारुतास्त्रें ॥६॥

असो हा संग्राम सांगतां ॥ येथेंचि विस्तार होईल ग्रंथा ॥ यालागीं संकलोनि कथा ॥ केली कथन ॥७॥

कोपें धावोनि शूळपाणी ॥ पार्थ धरिला दोंही चरणीं ॥ ऊर्ध्व टाकिला झुगारोनी ॥ तो सूर्यमंडळीं पडियेला ॥८॥

भ्रांतमनें पाहे पार्थ ॥ ह्नणे हा तेजोरुप अतीत ॥ आतां याचा करुं निःपात ॥ ह्नणोनि विंधिला सत्राणें ॥९॥

नेहटें सूर्य उडविला शरीं ॥ पाडिला पश्विमसमुद्रनीरीं ॥ अंधकार पडिला धरित्रीं ॥ देव अंबरीं गजबजिले ॥११०॥

नारद जावोनि शिवा जवळी ॥ ह्नणे पार्थे बुडविला अंशुमाळी ॥ आकांत वर्तला भूमंडळीं ॥ तुमचिये संग्रामें ॥११॥

मग शिवे सोडिला बाणु ॥ पार्थ आणिला आकर्षोनु ॥ तंव सूर्यमंडळीं जावोनि भानु ॥ प्रकाशलें ब्रह्मांड ॥१२॥

तेव्हां पार्थे शंकरासी ॥ पायीं धरोनि टाकिलें कैलासी ॥ तेणें गजरें त्रिलोकासी ॥ सुटला पळ ॥१३॥

बिभिषण पहावया आला ॥ तेणें उमाकांत देखिला ॥ शिरसाष्टांग अभिवंदिला ॥ मग पुसिला वृत्तांत ॥१४॥

येरें पार्थवृत्त कथिलें ॥ तेव्हां बिभीषणें काय केलें ॥ विमानीं वाहूनियं आणिलें ॥ इंद्रकीलीं शिवासी ॥१५॥

पार्थे देखोनि शंकरु ॥ केला धनुष्या टणत्कारु ॥ मनीं स्मरोंनि द्रोण गुरु ॥ साहें ह्नणोनि पाचारिलें ॥१६॥

शिवें सक्रोधें विंधिलें ॥ ते शर पार्थे निवारिले ॥ युद्ध घोरांदर जाहलें ॥ गजबजिलें त्रैलोक्य ॥१७॥

यावरी पार्थे मोहनीबाण ॥ शिवावरी सोडिला अभिमंत्रोन ॥ तेणें निद्राभूत त्रिनयन ॥ धनुष्य गळालें हातींचें ॥१८॥

तें देखोनि ब्रह्मसुत ॥ कैलासीं गेला धांवत ॥ अवघा सांगीतला वृत्तांत ॥ शिवार्जुनांचा ॥१९॥

मग शीघ्र येवोनि पार्वती ॥ जाहली पार्थासी बोलती ॥ कीं धन्य वीरा त्रिजगतीं ॥ जीवें मत्पती राखिला ॥१२०॥

पार्थ ह्नणे हो जननी ॥ धन्य मी येकचि त्रिभुवनीं ॥ देखिलें तुह्मां दोघां नयनीं ॥ येणें मिषें ॥२१॥

तंव तेतीसकोटी देवेंसीं ॥ इंद्र आला पार्थापाशीं ॥ ह्नणे उठवीं वेगें शिवासी ॥ काढोनि मोहनी ॥२२॥

येरें मोहनीबाण काढिला ॥ तंव शंकर जागिन्नला ॥ सुरवरं देखतां जाहला ॥ पार्था आणि भवानीये ॥२३॥

अर्जुन लागलासे चरणीं ॥ प्रसन्न जाहला शूळपाणी ॥ मस्तकींचा किरीट काढोनी ॥ घातला शिरीं पार्थाचे ॥२४॥

रुद्र ह्नणे कृपादृष्टीं ॥ तुझें नांव गा किरीटी ॥ जिंकितां हे सकळ सृष्टी ॥ होसील जयवंत ॥२५॥

ऐसें वरदान दीधलें ॥ पार्था विमानीं बैसविलें ॥ मग कैलासभुवनीं गेले ॥ शिवार्जुन सुरवर ॥२६॥

तेथें अष्टनायकांचें गायन ॥ जाहला महोत्साह संपूर्ण ॥ यावरी देवीं करोनि नमन ॥ आज्ञा जावया मागीतली ॥२७॥

सुरवर अर्जुनातें घेउनी ॥ आले भिलीं ॥ पर्था देखोनि रंभा भुलली ॥ कामबासनेंकरोनी ॥२९॥

सकळ सभा विसर्जिली ॥ रंभा विरहज्वरें व्यापिली ॥ ह्नणोनि दूतासि बोलिली ॥ कीं पर्थ निजतां करीं श्रुत ।१३०॥

ऐसें सांगोनि गेली स्वभुवनीं ॥ तंव मावळला दिनमणी ॥ पार्था पाठवी वज्रपाणी ॥ चित्रशाळे निजावया ॥३१॥

तें देखोनियां दूतें ॥ जावोनि कथिलें रंभेतें ॥ कीं शयन केलें असे पार्थ ॥ चित्रशाळेंत ॥३२॥

मग श्रृंगार करोनि वेगेंसी ॥ रंभा आली पार्थापाशीं ॥ जवळीं बैसोनि ह्नणे मजसी ॥ रती देई भाग्यवंता ॥३३॥

ऐकोनि ह्नणे कैतिय ॥ रंभे मज असे ब्रह्मचर्य ॥ तीर्थयात्रा जंव होय ॥ तंव न करणें हे गोष्टी ॥३४॥

मागील चित्रांगीची स्थिती ॥ अवघी सांगीतली तीप्रती ॥ परि येरी न धरी चित्तीं ॥ घेतला आग्रहो ॥३५॥

यावरी ह्नणितलें पांडवें ॥ तुज भावेल तैसें करावें ॥ परि हें न घडे सद्भावें ॥ असे महत्कारण ॥३६॥

देवेंद्र तरी माझा पिता ॥ तयाची आपण प्रिय कांता ॥ तूं वो आमुची होसी माता ॥ कुंतीसमान ॥३७॥

येरी ऐसें ऐकोनि उठिली ॥ हतमनोरथ जाहली ॥ मग कोपोनियां बोलिली ॥ कीं होसी राज्यीभ्रष्ट ॥३८॥

ऐसें शापोनी रंभा गेली ॥ तंव पूर्वदिशा उजळली ॥ पार्थे इंद्राची आज्ञा घेतली ॥ मग निघाला तीर्थयात्रे ॥३९॥

स्वर्गीचीं तीर्थे करोनी ॥ स्त्रान केले मंदाकिनी ॥ मग भूमंडळीं येवोनी ॥ रथीं बैसोनि चालिला ॥१४०॥

सकळही तीर्थे करोनी ॥ हिडत आला दारुकवनीं ॥ तेथें नागनथा वंदोनी ॥ सारिला तीर्थविधी ॥४१॥

मग येक ऋषि पाठविला ॥ भीम बोलावोनि आणिला ॥ सर्व वृत्तांत सांगीतला ॥ पर्यटणाचा ॥४२॥

ह्नणे प्रासाद उभवीं नागेशासी ॥ मी जावोनि येतों द्वारकेसी ॥ मग रथ ठेवोनि भीमापाशीं ॥ निघाला वेगें ॥४३॥

भीमें प्रासादकाम लाविलें ॥ पार्थे द्वारके बिजें केलें ॥ तीर्थविधान सारोनि वहिलें ॥ बैसला शंखोद्धारीं ॥४४॥

आतां श्रीकृष्ण भेटेल ॥ कैसें चरित्र अपूर्व रचील ॥ पार्थ सुबद्रेतें हरील ॥ छळ होईल दुर्योधन ॥४५॥

हरिकृपेची अपूर्वकथा ॥ वैशंपायन सांगती भारता ॥ ते ऐकावी संतश्रोतां ॥ ह्नणे मधुकरकवी ॥४६॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ पार्थतीर्थयात्राप्रकारु ॥ एकत्रिंशाऽध्यायीं कथियेला ॥१४७॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP