मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय २२

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय २२

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

रायासि ह्नणती वैशंपायन ॥ गांधारी दुःखित अनुदिन ॥ ते पीडा हरावयाकारण ॥ दुर्योधन यत्न करी ॥१॥

मग कर्ण आणि बंधुवां ॥ शकुनी आदि बाहोनि सर्वां ॥ एकांतीं आलोच बरवा ॥ करिता जाहला गांधार ॥२॥

ह्नणे पुरुषार्थ केला पार्थे ॥ येथोनि बरवें न दिसे मातें ॥ काहीं विदान योजा भलतें ॥ होय तयाचा पराजयो ॥३॥

शकुनी ह्नणे कौरवनाथा ॥ कर्ण असतां कायसी चिंता ॥ हें ऐकोनि जाहला बोलता ॥ दुर्योधन कर्णासी ॥४॥

अगा सूर्यसुता अवधारिजे ॥ तुवां हस्ती मागुता उतरिजे ॥ सोहळा महोत्साह कीजे ॥ गांधारिमातेचा ॥५॥

कर्ण ह्नणे दुर्योधनासी ॥ हे विद्या नाहीं मजसी ॥ परि साधोनि सूर्यमंत्रासी ॥ करीन पार्थासी निर्वाण ॥६॥

मग हे केवीं राहती येथें ॥ तें निश्वयें कळों येईल तूतें ॥ राया खेद न करावा चित्तें ॥ ऐसें दुर्योधना संबोखिलें ॥७॥

येथोनि वैर अहर्निशीं ॥ कौरव करिती पांडवांसी ॥ तें जन्मेजया परियेसीं ॥ अपूर्व कथन ॥८॥

असो विचारुनि सूर्यपुत्र ॥ जपिन्नला षडाक्षरी मंत्र ॥ अभीचारिक विधानीं उग्र ॥ प्रवर्तला देखा ॥९॥

बोलावोनि मंत्रविद ब्राह्मण ॥ मांडिले अष्टदिक्पाळपूजन ॥ होमिलें जयाचें जें जें अवदान ॥ तेणें प्रसन्न जाहले ॥१०॥

मग सूर्याकर्षणीय मंत्र ॥ उच्चारिती अथर्वणीय विप्र ॥ द्रव्य वेंचिलें अपार ॥ ब्राह्मणासी ॥११॥

मागुती घ्यानीं चिंती कर्ण ॥ तंव प्रकटला सूर्यनारायण ॥ ह्नणे माग जाहलों प्रसन्न ॥ आव्हानिलेंसि कां पुत्रा ॥१२॥

येरु नमस्कारुनि ह्नणे ताता ॥ पांडव जिंकोनि वधिजे पार्था ॥ ऐसा उपावो स्वामिनाथा ॥ देई मज ॥१३॥

सूर्ये संतोषोनि मानसीं ॥ दीधलें वज्रकवच कर्णासी ॥ आणि पांचबाण निर्वाणराशी ॥ अर्जुनवधार्थ दीधले ॥१४॥

उपरी सूर्य गेला गगनीं ॥ इकडे कर्णे चिंतिला शूळपाणी ॥ मंत्रबीजें आकर्षोनी ॥ उभा केला सन्मुख ॥१५॥

रुद्र ह्नणे गा वीरा कर्णा ॥ मागें पूर्ण करीन वासना ॥ येरु ह्नणे जी आदिकारणा ॥ कर्पूरगौरा ॥१६॥

जीजी मी जिंकीन अर्जुनातें ॥ हेंचि द्यावें वरदान मातें ॥ तंव रुद्र ह्नणे गा निरुतें ॥ ऐकें कर्णा ॥१७॥

एका वांचोनि अर्जुना ॥ तूं जिंकिशील त्रिभुवना ॥ तुझिये बळा आणि बाणां ॥ न पुरे कोणी ॥१८॥

राधेय ह्नणे जाश्वनीळा ॥ कां अर्जुन केला वेगळा ॥ कीं शंकलासि दयाळा ॥ कीं तय वश अससी ॥१९॥

रुद्र ह्नणे सूर्युसुत ॥ तो इंद्रात्मज नर निरुता ॥ कार्यकारण निमित्ता ॥ जन्मला सोमवंशीं ॥२०॥

येथिंची खुण तूं नेणसी ॥ हे नरनारायण भूमंडळासी ॥ अवतरले गा पारियेसीं ॥ भूभारहरणार्थ ॥२१॥

सहजकवचीं अभेदता ॥ आणि पांच बाण अर्जुनघाता ॥ इतुकें पावलासि सूर्यसुता ॥ दिनकरापासाव ॥२२॥

तरी हे कवचबाण पूर्वकाळीं ॥ तपें मेळविले अंशुमाळीं ॥ तेचि आले तुजजवळी ॥ आतां चिंता कायसी ॥२३॥

आणि तुज दीधली कुंडलें ॥ तिहीं प्राण तुझे वांचले ॥ जीं अमृत स्त्रवती वेळोवेळे ॥ दुजा प्रभाव परियेसीं ॥२४॥

जितुकें द्रव्य चिंतिसी चित्तीं ॥ तितुकें नित्यानीं प्रसवती ॥ दान द्यावें सर्वाभूती ॥ होईल कीर्ती त्रिभुवनीं ॥२५॥

आतां चिंता न करीं काहीं ॥ मनोरथ पुरतील सर्वही ॥ सुखें आपुले गृहीं जाई ॥ ह्नणोनि अदृश्य जाहल ॥२६॥

मग कर्ण आला स्वस्थानीं ॥ कुंडलें प्रसवती चिंतामणी ॥ भजन मांडिलें नित्यानी ॥ सर्वाभूतीं राधेयें ॥२७॥

इकडें चिंताग्रस्त जाहला कृष्ण ॥ कीं आतेबंधु होय अर्जुन ॥ तयासि वधील हा कर्ण ॥ निर्वाण पांचांबाणीं ॥२८॥

आणी अभेद कवच आंगीं ॥ तेणें अवघ्य होईल जगीं ॥ मृत होताचि उठेल वेगीं ॥ अमृतकुंडलांस्तव ॥२९॥

आणीक अष्ट महासिद्धी ॥ कुंडलें प्रसवती नवनिधी ॥ तरी सकळ त्रिलोकीमधीं ॥ होईल ख्याती कर्णाची ॥३०॥

मग इंद्राचिये मानसीं ॥ चेष्टविता होय हषीकेशी ॥ तंव इंद्रें बृहस्पतीसी ॥ पुसिला विचार ॥३१॥

ह्नणे सूर्यशंकर जाहले प्रसन्न ॥ यास्तव कर्णे वधिजेल अर्जुन ॥ कुंडलांच्या द्रव्यें करुन ॥ घेईल अमरावतीसी ॥३२॥

तरी ऐसियासि काय करणें ॥ तंव इंद्रासि बृहस्पति ह्नणे ॥ विप्रवेषें जावोनि याचनें ॥ करणें कार्य ॥३३॥

येरें द्विजरुप धरोनि वहिलें ॥ कर्णाजवळी बिजें केलें ॥ करी श्रीफळ वोपिलें ॥ देवोनियां आशिर्वाद ॥३४॥

येरें साष्टांग प्रणाम केला ॥ षोडशोपचारीं पूजिला ॥ स्तुती करोनि मग विनविला ॥ कीं मागिजे विप्रोत्तमा ॥३५॥

येरु ह्नणे मी दुर्बळ ब्राह्मण ॥ सीतें पीडिलीं असें जाण ॥ ह्नणोनि वस्त्र मागावया लागुन ॥ आलों तुजपाशीं ॥३६॥

कर्णे वस्त्रें असंख्यातें ॥ देवोनि आदरिलें विप्रातें ॥ तंव तो ह्नणे कर्णातें ॥ हीं जातील फाटोनी ॥३७॥

मग धनरत्न अलंकार ॥ देवों आदरिले अपार ॥ तंव तो ह्नणे हे समग्र ॥ नासोनि जाती शेवटी ॥३८॥

तूं इच्छेचा उदार दाता ॥ ह्नणोनि आलों सूर्यसूता ॥ तंव येरु ह्नणे द्विजनाथा ॥ मागिजे अपेक्षित ॥३९॥

द्विज ह्नणे कवचकुंडलें देणें ॥ नातरी सत्व घेवोनि मज जाणें ॥ ते वेळीं ओळखिला कर्णे ॥ हा द्विजरुपें सुरेंद्र ॥४०॥

तरी धन्य माझा संसार ॥ कीं मागावया आला सुरेश्वर ॥ मग कवचकुंडलें देवोनि विप्र ॥ कर्णे नमस्कारिला ॥४१॥

ब्राह्मण ह्नणे गा कर्णा परियेसीं ॥ तूं उदारदाता निश्वयेंसी ॥ तरी पावसी वैकुंठासी ॥ अंतराळीं वीरोत्तमा ॥४२॥

असो हीं कवचकुंडलें घेवोनी ॥ द्विज गेला इंद्रभुवनीं ॥ तंव कर्णासि ह्नणे नारदमुनी ॥ इंद्रें तुज छीतरिलें ॥४३॥

कर्ण ह्नणे जी ब्रह्मसुता ॥ हें मज कळलें तेव्हांचि तत्वतां ॥ परि मी दाता इंद्र मागता ॥ हे कीर्ती जाहली त्रिभुवनीं ॥४४॥

नारद ह्नणे गा भलाभला ॥ तुझा मनोभाव कळों आला ॥ येरें षोडशोपचारें पूजिला ॥ मग निघाला ब्रह्मसुत ॥४५॥

ऐसा द्विजवेष धरोनी ॥ पार्था वांचवी वज्रपाणी ॥ हें श्रीकृष्णें आइकोनी ॥ मनीं संतोष मानिला ॥४६॥

आतां असो हे कर्णकथा ॥ प्रकृत ऐकें गा भारता ॥ दुर्योधनें बोलाविलें येकांता ॥ कौरवांसी ॥४७॥

ह्नणे अर्जुनाचा पुरुषार्थ ॥ मज असह्य होतो बहुत ॥ तरी ऐसियासि वृत्तांत ॥ कैस करणें ॥४८॥

तंव गांधारा शकुनी ह्नणे ॥ हें सूर्यनंदनासि पुसणें ॥ येरें बोलाविला तत्क्षणें ॥ कर्ण एकांतीं ॥४९॥

ह्नणे देखोनि पार्थ पुरुषाचारु ॥ मज होतसे अपकारु ॥ तरी ऐसियासि काय करुं ॥ सांगा उपाय येखादा ॥५०॥

तंव एक ह्नणती राया ॥ तूं गा चिंता करिसी वायां ॥ आह्मी समस्त धनंजया ॥ वधूं भलते उपायीं ॥५१॥

द्रुपदराजा जिंकोनि आणिला ॥ हस्ती गगनोनी उतरिला ॥ इतुकेनचि काय बळी जाहला ॥ परि हें फावलें अवचट ॥५२॥

आतां तुझिये अभिमानें राया ॥ आह्मीं जिंकूं त्रिभुवना यया ॥ तरी आह्मां वाटतो धनंजया ॥ तृणप्राय ॥५३॥

उपरी कर्ण ह्नणे सर्वार्थे ॥ पांच बाण मिळाले मातें ॥ त्यांही करोनि पार्थातें ॥ वधीन समरीं ॥५४॥

येणें बोलें सुयोधन तोषला ॥ कर्ण उपचारीं सन्मानिला ॥ आणीकही दुसरें बोलिला ॥ सूर्यात्मज ॥५५॥

जंव ते सबळ नाहीं जाहले ॥ तंव काहीं विचारा वहिलें ॥ तेव्हां शकुनीलागीं पुसिलें ॥ दुर्योधनें ॥५६॥

मामा तुह्मी बुद्धिसागरु ॥ सांगा कांहीं यासि प्रतिकारु ॥ ऐसें ऐकतां बोलिला येरु ॥ स्वविचारातें ॥५७॥

राया खेळाचें मिस करोनी ॥ पार्थ बुडवावा जीवनीं ॥ हा मंत्र मानोनि सर्वजनीं ॥ बोलाविले भीमार्जुन ॥५८॥

सुबल राव ह्नणे तयांसी ॥ चला खेळों भागीरथीसी ॥ तें मानवलें भीमार्जुनांसी ॥ मग चालिले समस्त ॥५९॥

खेळावयासी सुरकाडी ॥ अवघे जाताति झडाडी ॥ करिती येकमेकां ईडपाडी ॥ जिंकावया ॥६०॥

मार्गी जातां तत्क्षणें ॥ आम्र देखिला भीमसेनें ॥ गदा हातीं वसविली तेणें ॥ अभिमंत्रोनी ॥६१॥

ते वृक्षावरी मोकलिली ॥ तियां अर्धफळें पाडिलीं ॥ भीमापुढें राशी जाहली । आकर्षोनि गदामंत्रें ॥६२॥

तंव कर्ण ह्नणे समस्तांसी ॥ हे विद्या कोठोनि आली यासी ॥ मग शकुनी ह्नणे परियेसीं ॥ कर्णवीरा ॥६३॥

हे विद्या शिवापासोनी ॥ मिळाली एकलव्यालागोनी ॥ तेणें उपदेशिली कानीं ॥ भीमाचिये ॥६४॥

वाळुवेचा करोनि द्रोण ॥ जाहला एकलव्य विद्यापूर्ण ॥ हें ऐकोनि ह्नणे कर्ण ॥ सांगें वृत्त सविस्तर ॥६५॥

मग शकुनीनें सर्ववृत्त ॥ केलें कर्णालागी श्रुत ॥ तें ऐकें गा संकलित । जन्मेजया ॥६६॥

पूर्वी सुबाहूनामें कोळी ॥ त्याचा पुत्र एकलव्य बळी ॥ तो येवोनि द्रोणाजवळी ॥ मागे धनुर्विद्या ॥६७॥

द्रोण ह्नणे तूं हीनजाती ॥ अधिकार नाहीं वेदश्रुती ॥ ह्नणोनियां गा तुजप्रती ॥ न सांगवे मज ॥६८॥

मी तरी कौरवपांडवांचा गुरु ॥ ते तुज करितील अपकारु ॥ ह्नणोनि नेदीं निर्धारु ॥ विद्या तुज ॥६९॥

येणें बोलें अहंतापला ॥ जावोनि शंभूसी धरणें बैसला ॥ आग्रह देखोनि प्रसन्न जाहला ॥ जाश्वनीळ ॥७०॥

ह्नणे वाळूचा द्रोण करोनी ॥ गुरुत्वें पूजावा नित्यानीं ॥ तेणें धनुर्विद्या निर्वाणी ॥ होईल तुज ॥७१॥

मग तो जावोनि गंगातीरीं ॥ वाळुवेचा द्रोण करी ॥ पूजोनि षोडश उपचारीं ॥ गुरुशिष्यत्वें भावना ॥७२॥

मूर्तीसि भावितां गुरुपणा ॥ माजी संचरला कैलासराणा ॥ तो द्रोण ह्नणे रे नंदना ॥ जाहलों प्रसन्न ॥७३॥

मग धनुर्बाण घेवोनि करीं ॥ वाळुवंटीं संधान करी ॥ तंव स्फूर्ती होत अंतरीं ॥ लघुलाघवाची ॥७४॥

भृंगी आणि भोयाळी ॥ मार्गज आणि वेताळीं ॥ शीघ्र दृढ तात्काळीं ॥ दूरापात साधिलें ॥७५॥

मग छत्तीस दंडायुधें ॥ कळाकुसरी आणि विविधें ॥ सांगीतलीं सर्व प्रसिद्धें ॥ द्रोणरुपें शंकरें ॥७६॥

तंव कोणे येके काळीं ॥ कौरव पांडव चालिले व्याहाळी ॥ हिंडताती वनस्थळीं ॥ गंगातटाकीं ॥७७॥

तेथें एकलव्याची चाहुळी ॥ श्वानाचिये श्रवणीं पडली ॥ तें भुंकत गेलें तयाजवळी ॥ येरें केलें संधान ॥७८॥

मुखामाजी भरिले बाण ॥ तें पळताचि आलें श्वान ॥ राजपुत्रीं देखिलें विंदान ॥ अत्यद्भुत तें ॥७९॥

ह्नणोनि पाहत पाहत चालिले ॥ तंव एकलव्यासी देखिलें ॥ पुढें द्रोणरुप असे मांडिलें ॥ वाळुवेचें ॥८०॥

पाहोनि ह्नणितलें दुर्योधनें ॥ आह्मांसि वंचोनि गुरुद्रोणें ॥ कपटें विद्या दीधली तेणें ॥ कोळियासी ॥८१॥

तैं मुरडोनि आले हस्तनापुरी । क्रोधें पाचारिला द्रोणाचारी ॥ ह्नणती आह्मां वंचोनि वनांतरी ॥ पूर्ण केला कौलिक ॥८२॥

यापरी ते समस्त कथा ॥ ऐकोनि द्रोण जाहला बोलता ॥ ह्नणे मज तो दाखवा निरुता ॥ असे कवणिये स्थानीं ॥८३॥

मग ते द्रोणासि घेवोनि गेले ॥ अवघें तयासिं दाखविलें ॥ तंव येकलव्यें देखिलें ॥ आचार्यासी ॥८४॥

येवोनियाम चरणीं लागला ॥ ह्नणे मनोरथ सिद्धीसि नेला ॥ तंव द्रोण ह्नणे भलारे भला ॥ शिष्य माझा तूं ॥८५॥

तरी गुरुदक्षिणा देई आतां ॥ येरु ह्नणे मागिजे ताता ॥ द्रोण ह्नणे गा देयीं सर्वथा ॥ अंगुष्ठ उजवा ॥८६॥

येरें छेदोनि ओळंगविला ॥ द्रोण अंतरीं संतोषला ॥ कौरवपांडवांसि बोलिला ॥ कीं ऐसा व्हावा सच्छिष्य ॥८७॥

कौरवपांडव संकोचोनी ॥ उगेचि लागले द्रोणचरणी ॥ तैं एकलव्य दोनी बोटें लावोनी ॥ करी संधान सामर्थ्ये ॥८८॥

ऐसा तो कोळी वनांतरी ॥ नित्य विद्याभ्यास करी ॥ मग मुरडोनियां स्वनगरीं ॥ आले समस्त ॥८९॥

हे एकलव्याची कथा ॥ पंचमस्तबकीं असे भारता ॥ परि बोलिलों संक्षेपता ॥ भिन्नप्रकार ॥९०॥

मग कवणा नेणतां तात्काळीं ॥ भीम गेला तयाजवळी ॥ ह्नणे प्रसन्न जाहला चंद्रमौळी ॥ तुज द्रोणरुपें ॥९१॥

तुं माझा गुरुबंधु सत्य ॥ हें सहजेंचि जाहलें घटित ॥ यास्तव आतां होई निभ्रांत ॥ सद्रुरु माझा ॥९२॥

त्या शिवप्रणीत समस्ता ॥ विद्या सांगें जी गुरुनाथा ॥ मग येरु जाहला शिकविता ॥ दंडायुधें छत्तिस ॥९३॥

माजील गदायुद्ध जें चांग ॥ तें भीमासि जाहलें सांग ॥ अभ्यासयोगें जाहला अभंग ॥ सकळार्थसिद्धि ॥९४॥

मग नमस्कारोनि गुरुसी ॥ भीम आला स्वगृहासी ॥ हें सांगीतलें कर्णासी ॥ सौबळे देखा ॥९५॥

तें ऐकोनि गांधार बोले ॥ जेवीं गदेनें आणिलीं आम्रफळें ॥ तैशीच हा शिरकमळें ॥ तोडील अरींची ॥९६॥

तरी हें बरवें न वाटे मातें ॥ काहीं विचारा ऐसियातें ॥ तंव शकुनी ह्नणे एक तयातें ॥ असे प्रतिकारु ॥९७॥

तुह्मीं पुसावें भीमासी ॥ कवण गुरु जाहला तुजसी ॥ गदा साधिली कौलिकापाशीं ॥ हें सांगतां तो लाजेल ॥९८॥

जैं हा गुरुलोप करील ॥ तैं विद्यासामर्थ्य जाइल ॥ हें आतांचि कळों येईल ॥ आम्रफळें दुजीं पाडितां ॥९९॥

मग दुर्योधन ह्नणे भीमा ॥ हे गदाविद्या उत्तमा ॥ कोणें सांगीतली तुह्मां ॥ कोण गुरु आराधिला ॥१००॥

तंव भीम उगाचि राहिला ॥ लज्जा अनुमानूं लागला ॥ सवेंचि तयासि बोलिला ॥ दुर्योधन ॥१॥

भीमा उरली फळें पाडावीं ॥ सकळ आपणाजवळी आणावीं ॥ मग येरें मंत्रोनि सद्भावीं ॥ प्रेरिली गदा ॥२॥

तेणें फळें पडलीं सर्वही ॥ परि गोळा न होती येके ठायी ॥ गुरुलोप होतांचि पाहीं ॥ गेलें विद्यासामर्थ्य ॥३॥

ऐसा छळवाद वैरें केला ॥ भीम विद्याभ्रष्ट जाहला ॥ कौरवसमुदाय संतोषला ॥ मग चालिले भागीरथीये ॥४॥

कोळी गुरु आइकोन ॥ कौरव निंदितील ह्नणोन ॥ उगाचि ठेला भीमसेन ॥ तेणें सामर्थ्य लोपलें ॥५॥

तंव जन्मेजयो विनवी ॥ स्वामी अग्रकथा सांगावी ॥ ऋषि ह्नणे ऐकें सद्भावीं ॥ भारता गा ॥६॥

अवघे भागीरथीसि चालिले ॥ मार्गी वटवृक्षातें देखिलें ॥ तेथें दुर्योधन बोले ॥ येथ खेळों सुरकांडी ॥७॥

खेळ मांडोनि तिये अवसरीं ॥ डाव आणिला भीमावरी ॥ येरु खेदखिन्न जाहला भारी ॥ कौरव तरुवरीं वेंधलें ॥८॥

मग कोपोनि भीमसेनें ॥ तो वृक्ष उन्मळिला सत्राणें ॥ सकळ कौरव पाडिले तेणें ॥ फळें जैसीं ॥९॥

येकासि चडकणा मारी ॥ येकासि रगडी भूमीवरी ॥ कोल्हाळ केला असे भारी ॥ शंखध्वनी कौरवीं ॥११०॥

तंव सौबल ह्नणे पुरे करा ॥ चला जावों गंगातीरा ॥ ऐकतां चालिले समग्रा ॥ पोंहावयासी ॥११॥

भागीरथीच्या खोल डोहीं ॥ पाणी तोडिती दोहीं बाहीं ॥ तये क्रीडत आणिली डाही ॥ अर्जुनावरी ॥१२॥

मग अवधियांनीं कवळोनी ॥ पार्थ बुडविला जीवनीं ॥ भीमें न देखतांचि नयनीं ॥ डोहीं उडी घातली ॥१३॥

अवघे कौरव कवळिले ॥ डोहामाजी बुडविले ॥ हाहाःकारा प्रवर्तले ॥ महाशब्दें ॥१४॥

भीमें भीतरीं बुडी देवोनी ॥ पार्थ काढिला गिंवसोनी ॥ मग भेटलें बंधु दोनी ॥ बुडाले जीवनीं कौरव ॥१५॥

नावाडियांहीं देवोनि बुडिया ॥ मग काढिलें कौरवां तयां ॥ समस्त मंदिरा येवोनियां ॥ सांगती भीष्मादिकासी ॥१६॥

धृतराष्ट्र गांधारी कुंती ॥ धर्मा विदुरांदिका प्रती ॥ भीमार्जुन कर्तुत्व सांगती ॥ कौरवांचें ॥१७॥

मग भीष्मद्रोणादि समस्तीं ॥ सांगीतलें धृतराष्ट्राप्रती ॥ पार्थ बुडविला होता जळांतीं ॥ तुझेनि दुर्योधनें ॥१८॥

तरी शिकवोनि दुर्योधनासी ॥ राज्य विभागोनि द्यावें धर्मासी ॥ नातरी उठेल येकादी विवशी ॥ ऐसें आह्मां वाटतें ॥१९॥

विंदुर त्रिकाळज्ञानिया ॥ तेणें धृतराष्ट्रा शिकवोनियां ॥ बोलावोनि दुर्योधना तया ॥ कोपली धृतराष्ट्र गांधारी ॥१२०॥

अरे अर्जुनाचा पराक्रम अद्भुत ॥ तुज कां पां असह्य होत ॥ आजि मारिला होता जळांत ॥ ऐसा अससी अनर्थिया ॥२१॥

तुह्मांसि न पडे येकेठायीं ॥ तरी राज्य वाटावें तुह्मी त्यांहीं ॥ नातरी उपजेल कुडें काहीं ॥ ऐसें आह्मां भासतें ॥२२॥

तंव भीष्म द्रोणादिक बोलिले ॥ हें अगत्य पाहिजे केलें ॥ नातरी उठेल येखादे वेळे ॥ महाविघ्न ॥ ॥२३॥

मग इंद्रप्रस्थ तैल्यप्रस्थ ॥ वारुणावत खांडवप्रस्थ ॥ सोरट काश्मीर भडोच समस्त ॥ उभयतट गंगेचे ॥ ॥२४॥

चीनभोत महाभोट ॥ नूतननगर कल्याणकोट ॥ ऐसें अर्धराज्य कामवट ॥ दीधलें पांडवां ॥२५॥

तंव बोलिलें दुर्योधनें ॥ एकलें वारुणावतचि देणें ॥ तेथ बोलिलें गंगानंदनें ॥ सकल राज्य तरी पंडूचें ॥२६॥

आह्मीच अनीती करोनी ॥ अर्ध देतसों तुजलागोनी ॥ तंव गांधारी करी विनवणी ॥ तुमचेनि विचारें वर्तणें ॥२७॥

मग इंद्रप्रस्थ तैल्यप्रस्थ ॥ भडोच सोरट खांडवप्रस्थ ॥ ऐसीं पांचनगरें समस्त ॥ दीधलीं पांची पांडवां ॥२८॥

बंधूंसहित धर्मकुंती ॥ बोलावोनि अवघे ह्नणती ॥ तुह्मां कौरवां न वाढे प्रीती ॥ तरी कीजे राज्यविभाग ॥२९॥

ह्नणोनि इंद्रप्रस्थादि पांच नगरें ॥ पांचांसि दीधलीं धृतराष्ट्रें ॥ ह्नणे तुह्मीं सपरिवारें ॥ राज्य करावें त्या ठाया ॥१३०॥

परि अर्जुन ह्नणे जी स्वामी ॥ राज्य करुं काय आह्मी ॥ भूजाबळें जिंकोनि भूमी ॥ घेऊं राष्ट्रें आणिक ॥३१॥

तंव ह्नणती द्रोणविदुरु ॥ कीं भीष्मवाक्य नका अव्हेरुं ॥ इतुक्याचा करोनि अंगिकारु ॥ मग स्वेच्छा वर्तावें ॥३२॥

मग बोलिला युधिष्ठिरु ॥ तुमची आज्ञा केविं अव्हेरुं ॥ मग दीधले वस्त्रालंकारु ॥ अर्धभांडारपदार्थ ॥३३॥

एकी क्षोणी रहंवर ॥ पांच अर्बुदें असिवार ॥ पांच सहस्त्र मत्त कुंजर ॥ परिवार अर्ध जाणिजे ॥३४॥

वेळ पाहूनि सुमुहूर्ती ॥ पांडव धाडिले इंद्रप्रस्थीं ॥ तया भीष्मादिकीं समस्तीं ॥ बोळविलें उत्साहें ॥३५॥

भीष्मादिकां पुसोनि वहिलें ॥ नगरीं जावया निघाले ॥ तंव विदुरें धर्मा शिकविलें ॥ कीं कौरवां न विश्वासिजे ॥३६॥

झणी दुर्योधन तेथ येईल ॥ तुह्मां मानमहत्व करील ॥ तयाचा विश्वास जरी न धराल ॥ तरीच तुह्मां वांचणें ॥३७॥

असो विदुर गेला हस्तनापुरीं ॥ धर्म इंद्रप्रस्थीं राज्य करी ॥ महोत्साहे निरंतरी ॥ नांदताती नारीनर ॥३८॥

ऐसे बहुत दिवस क्रमिले ॥ तंव गांधारें शकुनीसि पुसिलें ॥ तें पुढें ऐकावें वहिलें ॥ ह्नणे मधुकरकवी ॥३९॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ पांडवराज्यविभागप्रकारु ॥ द्वाविंशोऽध्यायीं कथियेला ॥१४०॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP