श्रीगणेशाय नमः
एकदा दुर्योधन येकांतीं ॥ बैसोनि बोले शकुनीप्रती ॥ मामा वैरिघातार्थ निश्वितीं ॥ उपाय कैसा करावा ॥१॥
मग शकुनी सांगे प्रयत्न ॥ कीं भीम आणावा विश्वासोन ॥ जेणें समस्तांसी बुडवोन ॥ काढिला पार्थ ॥२॥
तयासि विष घालोनि मारूं ॥ अवघीयां करील संहारु ॥ तोचि पराक्रमी असे थोरु ॥ सकळांमाजी ॥३॥
ऐसें ऐकोनि दुर्योधन ॥ धृतराष्ट्राजवळी जावोन ॥ विनीतकंधर होऊन ॥ विनवी गांधारीसह ॥४॥
ह्नणे बहुत दिवस जाहले ॥ पांडव मज नाहीं भेटले ॥ तेणें उताविळ असे जाहलें ॥ अंतःकरण ॥५॥
धर्म वडील आह्मां सकळांसी ॥ मी तया जाईन भेटावयासी ॥ तंव गांधारी ह्नणे पुत्रासी ॥ आणीं भीमासी भेटावया ॥६॥
येरु येकलाचि निघाला ॥ वेगें इंद्रप्रस्थीं पातला ॥ पांचां पांडवां भेटला ॥ गहिंवरला ममत्वें ॥७॥
कुंतीमातेसि भेटोची ॥ विनविता जाहला दीनवदनीं ॥ ह्नणे जी सांडिला निष्ठुरपणीं ॥ सांभाळ आमुचा ॥८॥
उत्कंठा उपजली आह्मा ॥ ह्नणोनि भेटों आलों तुह्मां ॥ ऐसें वाक्य ऐकोनि धर्मा ॥ उपजला स्नेह ॥९॥
मग आरोगणां सारुन ॥ आज्ञा मागे दुर्योधन ॥ येरें ह्नणती आजिचा दिन ॥ क्रमोनि जाई प्रभातीं ॥१०॥
येरु ह्नणे भेटी जाहलीं ॥ तेणें माझी तनु निवाली ॥ आतां आज्ञा पाहिजे दिली ॥ जावयासी ॥११॥
ऐसें पुनःपुनः विनवी ॥ तें साच मानिलें पांडवीं ॥ ह्नणती स्नेह धरिला कौरवीं ॥ नवल थोर ॥१२॥
परि दुर्जनाचे मधुरवचनें ॥ सहसा विश्वास न मानणें ॥ जिव्हाग्रीं अमृत जाणणें ॥ हदयीं कालकूट ॥१३॥
असो पांडव भावें विश्वासले ॥ येरे आज्ञेतें मागीतलें ॥ तंव कुंतीयें ह्नणितलें ॥ राहिजे आजिची रात्री ॥१४॥
दुर्योधन ह्नणे हो माते ॥ तृप्ती जाहली देखोनि तूतें ॥ आतां आज्ञा दीजे अगत्यें ॥ कृपा करोनी ॥१५॥
आज्ञा दिली जाणोनि आग्रहो ॥ बोळवीत चालिला धर्मरावो ॥ तंव गांधार धरुनि सद्भावो ॥ विनविता जाहला ॥१६॥
ह्नणे गांधारियें सांगितलें तुह्मां ॥ कीं भेटों धाडिजे भीमा ॥ तरी हा सवें देइजे आह्मां ॥ उदयीक देऊं पाठवोनी ॥१७॥
मी मार्गी जातां येकला ॥ सवें जरी भीम असला ॥ तरी न भियें कळिकाळा ॥ त्याचेनि बळें ॥१८॥
येरें भावार्थे नेणती काहीं ॥ ह्नणती भीमा यासवें जाई ॥ समस्तांसी भेटोनि येई ॥ येरें आज्ञा मानिली ॥१९॥
मग ते गेले हस्तनापुरी ॥ भीम सकळां नमस्कारी ॥ तंव दुर्योधन विचारी ॥ कौरवांसह ॥२०॥
एक ह्नणती सर्वोपायें ॥ हा बळिया वधिला न जाये ॥ तंव बोलिलें शकुनीयें ॥ येकांतीं दुर्योधनासी ॥२१॥
ह्नणे भीमा लाडुवांची प्रीती ॥ तरी विषयुक्त घालोनि करीं शांती ॥ येरें पाकशाळे निष्पत्ती ॥ करविली मग ॥२२॥
उपरी बोलावोनि भीमासी ॥ दुर्योधन ह्नणे तयासी ॥ आमुचें येक कार्य करिसी ॥ तरी लाडू घालीन पोटभरी ॥२३॥
येरु ह्नणे कार्य सांगणें ॥ तंव बोलिलें दुर्योधनें ॥ कीं त्वां दक्षिणदिशेसि जाणें ॥ मानससरोवरीं ॥२४॥
तेथें हेमकमळें असती ॥ तीं आणोनि देई आह्माप्रती ॥ येरु चालिला शीघ्रगती ॥ तये वेळे ॥२५॥
मलयाचळदक्षिणदिशे ॥ दुसरा मानस तडाग असे ॥ तेथें भीम गेला उल्हासे ॥ आणावया कनककमळें ॥२६॥
तंव वाटेसि भेटला हनुमंत ॥ तो सर्वथा न सोडी पंथ ॥ मग भीम तयासि ह्नणत ॥ देई वाट आह्मासी ॥२७॥
येरु ह्नणे रे सरे परता ॥ अन्य मार्गे जाई सर्वथा ॥ भीमें गदा घाई हनुमंता ॥ हाणिलें हदयीं ॥ ॥२८॥
कोपोनि कपी झोंबिन्नला ॥ दोघां संग्राम थोर जाहला ॥ धडधडाट प्रवर्तला ॥ मुष्टिघायीं ॥२९॥
हनुमंत गेला उडोनी ॥ वृक्ष आणिला उपडोनी ॥ तो झोडिला तत्क्षनीं ॥ भीमावरुता ॥३०॥
येरें गदेनें चूर्ण केला ॥ कपि मागुता झोंबिन्नला ॥ संग्राम घोरांदर जाहला ॥ सांगतां ग्रंथ विस्तारेल ॥३१॥
भीमाचेनि मुष्टिघातें ॥ मूर्छना मानिली हनुमंते ॥ मनीं ह्नणे कोणीही मातें ॥ जिंकी ऐसा वीर नाहीं ॥३२॥
परि यासी काहीं नचले माझें ॥ आतां बुद्धि करोनि दाविजे ॥ मग भीमासि पुसिले वोजें ॥ कवण मातापिता ॥३३॥
भीम ह्नणे जी कपिनाथा ॥ तूं पुससी कां झुंजतां ॥ येरु ह्नणे जाहला चित्ता ॥ तुज पाहतां संतोष ॥३४॥
भीम ह्नणे गा परियेसीं ॥ पंडुरावो पिता सोमवंशी ॥ आणि कुंतिमाता आह्मासी ॥ असों पांच बंधु ॥३५॥
मागुती हनुमंत ह्नणे ॥ कीं पंडु शापिल ब्राह्मणें ॥ तरी तयासी पुत्र होणें ॥ हें बोलणें अघटित ॥३६॥
मग दुर्वासांची प्रसन्नता ॥ आदिकरुनि सकळ कथा ॥ भीमें कथिली हनुमंता ॥ तये वेळीं ॥३७॥
भीम जाणोनि वायुसुत ॥ बोलता जाहला हनुमंत ॥ ह्नणे तूं माझा बंधु सत्य ॥ वायु पिता उभयांसी ॥३८॥
तरी क्षेम देयी भीमसेना ॥ येरु करी विचारणा ॥ कीं युद्ध जाहलें दोघांजणा ॥ न कळतां संबंध ॥ ॥३९॥
यासि भेटतां कथचित ॥ कवळोनि करील माझा घात ॥ मग अर्धाग चोरोनि पंडुसुत ॥ भेटता जाहला हनुमंता ॥४०॥
येरा कळेनकळे ऐसें भासलें ॥ मग आशीर्वचन दीधलें ॥ कीं जेणें भावें आलिंगिलें ॥ तितुकें होईल वज्रमय ॥४१॥
यापरि भीमाचे अर्धाग ॥ जाहलें वज्रमय अभंग ॥ मग नमस्कारोनि प्लवंग ॥ मार्ग धरिला भीमसेनें ॥४२॥
तो जाऊनि सरोवरीं ॥ कमळें घेतलीं सहस्त्र चारी ॥ वेगें येवोनि हस्तनापुरीं ॥ दुर्योधना दीधलीं ॥४३॥
तंव विषलाडू निपजविले ॥ सुगंधशर्करें घोळिले ॥ सर्वोपचार करोनि वाढिले ॥ भीमसेनासी ॥४४॥
येरु संतोषला मनीं ॥ अन्न जेविला पोटभरोनी ॥ अंगीं विष चढोनि तत्क्षणीं ॥ जाहला विकळ ॥४५॥
मग तो शय्यास्थळीं नेला ॥ दुर्योधनें पहुडविला ॥ तंव अवघा प्राण गेला ॥ जाणितलें निश्वयें ॥४६॥
मग शकुनीमामासि ह्नणे ॥ जंव हें कृत्य कवणी नेणें ॥ तंव रात्रीमाजीच करणें ॥ दहन यासी ॥४७॥
श्रुत होईल जनांप्रती ॥ पांडव कोपोनि येथ येती ॥ येकादा अनर्थ झणीं करिती ॥ ह्नणोनि गुप्त विचार हा ॥४८॥
तंव समस्त बंधु बोलिले ॥ जावोंद्या मोठे पांडव काढिले ॥ होणार तें तरी असे जाहलें ॥ जाळूं यासी प्रातःकाळी ॥४९॥
असो मग ते क्रमिली निशी ॥ उदय जाहला दिनकरासी ॥ सेवक येवोनि उठवी भीमासी ॥ परि तो हालेचि ना ॥५०॥
पाहती श्वासोश्वास प्राण ॥ तंव मृत्यु पावला भीमसेन ॥ मग रुदनध्वनी करोन ॥ बाहेरि आला ॥५१॥
ह्नणे भीम गेला प्राणें ॥ अवघे दुःखें करिती रुदनें ॥ तंव येवोनि दुर्योधनें ॥ अंग धरणीं घातलें ॥५२॥
बाह्यात्कारीं कटकटा करी ॥ परि सुख जाहलें अंतरीं ॥ असो भीष्मादि नरनारी ॥ मिळालीं तेथ ॥५३॥
विदुर कृपाचार्य द्रोण ॥ पाहती तंव गेला प्राण ॥ जाहलासे हरितवर्ण ॥ विषें प्राण गेला ह्नणती ॥५४॥
विदुर ह्नणे गांधारियेसी ॥ कौरव द्वेषिती भीमासी ॥ येरी धांय मोकलोनि करुणेंसी ॥ आळवी दुःखशब्द ॥५५॥
भीष्मादि ह्नणती धृतराष्ट्रातें ॥ कां पाठविलें दुर्योधनातें ॥ येरु ह्नणे नकळतां मातें ॥ आणिलें भीमा ॥५६॥
गांधारी ह्नणे भेटावया ॥ आणविलें भीमासि मियां ॥ परि हा प्रवर्तला अपाया ॥ तें न कळे मज ॥५७॥
आतां पार्थापासोनि विदुरा ॥ वांचवावें या गांधारा ॥ दुर्योधन ह्नणे आळ शिरा ॥ बैसला माझे ॥५८॥
हें ऐकोनि शकुनी बोले ॥ सकळीं तुझे माथां बैसविलें ॥ आतां दहन करा वहिलें ॥ भीमसेनासी ॥५९॥
विदुर ह्नणे न घडे ऐसें ॥ धर्मावांचोनि जाळावें कैसें ॥ सेवक सांगों गेला असे ॥ येती तोंवरी धीर धरा ॥६०॥
हा कवणे गतीं मेला ॥ विष दीधलें कीं सर्पे डंखिला ॥ ऐसा निश्वयो नाहीं जाहला ॥ तरी केवी जाळावें ॥६१॥
तें भीष्मद्रोणां मानवलें ॥ ह्नणती सर्वथा न जाय जाळिलें ॥ जंव यातें नाहीं देखिलें ॥ धर्मार्जुनाहीं ॥६२॥
तंव बोलिली गांधारी ॥ प्रेत पडिलें असे मंदिरी ॥ हें नेवोनि टाका बाहेरी ॥ पुढें भलता विचार ॥६३॥
मग भीष्म सकळां बोलिला ॥ हा भागीरथीतटीं घाला ॥ सेवकीं उचलोनियां नेला ॥ भागीरथीतीरीं ॥६४॥
इकडे दूत जावोनि इंद्रप्रस्थीं ॥ महशब्दें सांगे स्थिती ॥ तें ऐकोनियां समस्तीं ॥ अंग धरणीं घातलें ॥६५॥
भीमसेन मृत्यु पावला ॥ थोर हाहाःकार जाहला ॥ धर्मादिकी मोकलिला ॥ करुणारस ॥६६॥
धर्मासि ह्नणे अर्जुन ॥ चला तेथ जाऊं आपण ॥ मग सकळीं शोक सांडोन ॥ चालिलीं धर्मकुंती ॥६७॥
मार्गी चालतां ह्नणे पार्थ ॥ करीन कौरवांचा निःपात ॥ त्यांहीच घात केला निभ्रांत ॥ ऐसें मज वाटते ॥६८॥
मग सहितजन समग्र ॥ वेगां पावले हस्तनापुर ॥ तेव्हां भय उपजलें थोर ॥ कौरवांसी ॥६९॥
दुर्योधन ह्नणे भीष्मद्रोणां ॥ पार्थ घेईल आमुच्या प्राणा ॥ तरी शांत करा पांचही जणां ॥ नातरी अनर्थ होइल ॥७०॥
मग ह्नणती द्रोण भीष्म ॥ कीं विष देवोनि मारिला भीम ॥ आतां फिटेल तुमचा भ्रम ॥ काहीं नचले आमुचें ॥७१॥
तरी शरण जारे विदुरासी ॥ तो वांचवील तुह्मांसी ॥ मग सांगोनि गांधारीसी ॥ आणविलें विदुरा ॥७२॥
विनविती गांधारी धृतराष्ट्र ॥ जाहला होणार तो अपकार ॥ परि आलासे पार्थवीर ॥ तो संहार करील ॥७३॥
तरी भलतैसें करोनी ॥ कौरव वांचवावे मरणी ॥ ऐसी ऐकोनि विनवणी ॥ ज्ञानीं विदुरें पाहिलें ॥७४॥
तो त्रिकाळज्ञानी ह्नणवोनी ॥ पुढील भविष्य भासलें मनीं ॥ मग नाभिकार देउनी ॥ चालिला भागीरथीये ॥७५॥
तंव सिंहनादें गर्जत ॥ पुढें आला वीरपार्थ ॥ ह्नणे आधीं करीन घात ॥ दुर्योधनाचा ॥७६॥
जंव तेणें कौरवां वधावें ॥ तंव आड घातलें भीष्मदेवें ॥ ह्नणे विचारें कार्य करावें ॥ सानथोर धनुर्धरा ॥७७॥
विदुर ह्नणे जिवलगा पार्था ॥ बोलावीं बंधु आणि माता ॥ सांगेन येक अपूर्वता ॥ ते धनरावी चित्तीं ॥७८॥
तंव अवघीं मिळालीं तेथ ॥ विदुर तयांसी बोलत ॥ कीं होणार तें होय निभ्रांत ॥ तेथें उपाय न चाले ॥७९॥
धर्मा कुंतिये नेवोनि येकांता ॥ ह्नणे भीम वांचेल मागुता ॥ पद्मावती वासुकीसुता ॥ तियेचेनि प्रसंगें ॥८०॥
धर्म ह्नणे ते सांगा स्थिती ॥ मग विदुर ह्नणे तयांप्रती ॥ कीं पूर्वी कश्यपकन्या ज्योती ॥ तप करी मृत्युलोकीं ॥८१॥
भ्रतार चिंतोनि मानसीं ॥ घ्यानीं ब्रह्मया उपासी ॥ तंव मनुऋषी भिक्षेसी ॥ आला तेथें ॥८२॥
तियें केला त्याचा अव्हेर ॥ कोपोनि शापी ऋषीश्वर ॥ ह्नणे आतांचि होसी भस्मार ॥ मग मृतभ्रतार पावसी ॥८३॥
ते काकुळतीं विनवित ॥ ह्नणे मी होत्यें ध्यानस्य ॥ स्वामी होवोनि कृपावंत ॥ उःशाप दीजे ॥८४॥
मग उःशाप बोले ऋषी ॥ पती द्वापारामाजी पावसी ॥ पंडुपुत्र बळराशी ॥ गिरिजाप्रसादें ॥८५॥
ऐसें ह्नणोनि ऋषि गेला ॥ तंव येरीचा देहपात जाहला ॥ मग ते उपजली बाळा ॥ वासुकीउदरीं ॥८६॥
तियेचें जातक वर्तविलें ॥ तंव मागील प्रकाशलें ॥ ज्योतिषी वासुकीसि बोलिले ॥ कीं हे पावेल मृतपती ॥८७॥
ह्नणोनिया तेणें भयें ॥ कोणीचे नवरी तिये ॥ पर्णितांचि मृत होये ॥ तरी कोणकार्य ऐसींचें ॥८८॥
एकदा वासुकी ह्नणे ही कुमरी ॥ तुवां प्रसन्न करावी गौरी ॥ येरी येऊनि भागीरथीतीरीं ॥ करी चिंतन अंबेचें ॥८९॥
गौरी प्रसन्नत्वें वरदान देत ॥ कीं जळीं वाहात येईल प्रेत ॥ त्यासी लग्न लावोनि निभ्रांत ॥ मग जीववीं अमृतें ॥९०॥
अमृत देवोनि तिचे करीं ॥ ह्नणे हें घालीं प्रेतवक्रीं ॥ मग तो उठोनि झडकरी ॥ जिंकील पन्नगासी ॥९१॥
तो अमृतकुंडे शोषील ॥ तुज पुत्रफळ देईल ॥ हें स्वल्पकाळीं होईल ॥ ऐसें ह्नणोनि अदृष्टली ॥९२॥
येरी जावोनियां पाताळीं ॥ राजमंदिरें उभविली ॥ मग येवोनि राखित राहिली ॥ तीरीं भागीरथीच्या ॥९३॥
विदुर ह्नणे धर्मालागुन ॥ ह्नणोनि जळीं घालावा भीमसेन ॥ तो भेटेल मागुता येवोन ॥ तुह्मालागीं ॥९४॥
तें सत्य मानोनि धर्मकुंती ॥ पार्था जाहलीं निवारितीं ॥ ह्नणती होणर जाहली गती ॥ बापा अनर्थ न करावा ॥९५॥
ऐसें बुजावोनि पांडवातें ॥ विदुरें ह्नणितलें भीष्मादिकांतें ॥ कीं वांचविलें म्यां कौरवांतें ॥ थोर सायासें ॥९६॥
तंव ह्नणती गांधारी धृतराष्ट्र ॥ विदुरा केला थोर उपकार ॥ तरी त्यां भेटवोनि गांधार ॥ करा मनोहर तयांचें ॥९७॥
मग विदुरादि भीष्मद्रोण ॥ दुर्योधना गेले घेउन ॥ पांडवांचे पायीं घालोन ॥ केली बुझावणी ॥९८॥
गांधारा जाहली चरणस्थिती ॥ तंव बोलिली माता कुंती ॥ कीं होणार ते जाहली गती ॥ अन्य नाहीं विचार ॥९९॥
मग समस्तीं मिळोनी ॥ भीम घातला गंगाजीवनीं ॥ तो वाहात जाय तत्क्षणीं ॥ पर्वत जैसा ॥१००॥
कोल्हाळ करुणाशब्द करोनी ॥ सकळ गेले आपुले स्थानीं ॥ पांडव गेले तिये क्षणीं ॥ इंद्रप्रस्थीं ॥१॥
ऐसें थोर दुःख समस्तां ॥ ह्नणती अनर्थ जाहला केउता ॥ परि अपेश बैसलें माथां ॥ दुर्योधनाचे ॥२॥
संस्कृतआदिपर्वीची कथा ॥ पंचमस्तबकीं संक्षेपता ॥ परि हे पुराणांतर व्यवस्था ॥ असे पृथक ॥ ॥३॥
आतां भीम पद्मावतीची कथा ॥ सावधान ऐकावी श्रोतां ॥ समस्तां जाहला विनविता ॥ मधुकरकवी ॥४॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ कौरवपांडवविरोधप्रकारु ॥ त्रयोविंशाध्यायीं कथियेला ॥१०५॥