॥ श्रीगणेशाय नमः ॥
मुनीसि ह्मणे जन्मेजयो ॥ सागां जी अग्रकथान्वयो ॥ तंव मुनि ह्मणे ऐकें भावो ॥ पराशरोक्त ॥१॥
दक्षिणदिशेसि विख्यात ॥ ब्रह्मागिरि नामें पर्वत ॥ तेथें ब्राह्मण विश्वनाथ ॥ नांदत असे सकुंटुंबें ॥२॥
तयाचा पुत्र मूर्ख जाहला ॥ ह्मणोनि तेणें दवडिला ॥ येरु साभिमानें चालिला ॥ पूर्वदिशेसी ॥३॥
देश नगरें वनो पवनें ॥ सांडीन गिरिकंदरें दारुणें ॥ टाकिला काउरदेश तेणें ॥ अनंत पुत्रें ॥४॥
तेथें नानाकष्ट करूनी ॥ विद्या साधिल्या प्रयत्नीं ॥ तंव तो राजकन्येनें नयनीं ॥ देखिला सौंदर्यराशीं ॥५॥
ते कुसुमना नामें कुमरी ॥ पितयालागीं विनंती करी ॥ कीं ताता गरुडध्वजा झडकरी ॥ मेळवीं मजसी पती हा ॥६॥
रायें शंखवाहान कुमर ॥ पांचारोनि पुसिला ॥ विचार ॥ मग प्रार्थोनि अनंतविप्र ॥ त्यासी कन्या वोपिली ॥७॥
प्रीती वाढिन्नली परस्परें ॥ तयां काहीं न स्मरे दुसरें ॥ सुखंसंभोगी निरंतरें ॥ क्रमिती काळ ॥८॥
कुजांत्र कौटाळ कामनें ॥ दोघें जाणती परिपूर्णें ॥ पतीसि शिकवी वश्यपणें ॥ कुसुमना ते ॥९॥
विद्या जपोनि वोडंबरी ॥ दोघें अवलोकिती दिशा चारी ॥ मनीं मानेल तिये नगरीं ॥ जाती क्षणार्धें ॥१०॥
तियेसि मंत्रचमत्कार भारी ॥ ह्मणोनि बैसोनि वृक्षावरी ॥ तो वृक्ष उडवितां अंबरीं ॥ जाती चिंतिलिया ठाया ॥११॥
ऐसें तयांसि असतां ॥ मृत्यु जाहला राजसुता ॥ सर्पे झोंबिन्नला अवचिता ॥ शंखवाहनासी ॥१२॥
गरुडध्वजें विलाप केला ॥ भद्रसेनप्रधानासि बोलिला ॥ कीं वंशछेद आतां जाहला ॥ कैसा कोपला शंकर ॥१३॥
मग दहन केलें शंखवाहना ॥ नगरीं नसमाये करुणा ॥ रावो प्रवेशला स्वभुवना ॥ शोकाक्रांत ॥१४॥
तया स्मशानामाझारी ॥ रौद्री देव्या होती खेचरी ॥ ते गुप्त बोलिली अंबरी ॥ राजजामाता स्वभक्तपणें ॥१५॥
कीं माझिये प्रासादा मागें ॥ खाणोनि ऋषी काढावा वेगें ॥ तो पुत्रासि उठवील सांगें ॥ रायासि शीघ्र ॥१६॥
ऐसें बोलिनि गुप्त जाहली ॥ येरें गोष्टी रायासि कळविली ॥ मग खाणविलें तत्काळीं ॥ देउळामागें ॥१७॥
तंव्र प्रेतें देखिली भूमी आंत ॥ मध्यें बैसलासे महंत ॥ तो टाळी विसर्जुनी पाहत ॥ रायासि सपरिवारें ॥१८॥
रायें साष्टांग प्रणाम केला ॥ येरं आशिर्वाद दीधला ॥ ह्मणे पुत्रवंत होसी वहिला ॥ तंव गहिंवरला नरेंद्र ॥१९॥
ह्मणे सर्पदंशें मेला सुत ॥ जाळोनि केला भस्मभूत ॥ आतां कैंचा पुत्रवंत ॥ शरणागत आलों तुज ॥२०॥
तो वासुकीचा प्रधान ॥ कृतयुगींचा ब्राह्मण ॥ आचारशीळ विद्यापूर्ण ॥ नांवें श्रृंगारभट ॥२१॥
त्यासी परस्त्रीचा पल्लव लागला ॥ ह्मणोनि प्रायश्चितार्थ तपीं बैसला ॥ येवोनि मृत्युलोकीं वहिला ॥ पातालहोनी ॥२२॥
तया विद्या असे मृतसंजीविनी ॥ ते उपदेशिली रायाकर्णीं ॥ ह्मणे विभूती अभिमंत्रोनी ॥ उठवीं पुत्र आपुला ॥२३॥
रायें पुत्र रक्षा येकवटली ॥ विद्या अभिमंत्रोनि घातली ॥ तंव सजीव मूर्ती जाहली ॥ शंखवाहनपुत्राची ॥२४॥
जालीं क्षेमालिंगनें नमस्कार ॥ महोत्साह केला अपार ॥ मग पाताळीं गेला शीघ्र ॥ श्रृंगारभटु ॥२५॥
भारता ते विद्या नॄपनाथें ॥ दीधली अनंताजामातातें ॥ येरु न पुसतां तयातें ॥ चालिला स्वदेशासी ॥२६॥
रात्रीं चालता असे श्रमला ॥ प्रभातीं वृक्षाखालीं बैसला ॥ तंव मनीं ह्मणों लागला ॥ कीं जावें पिपीलिकपर्वतीं ॥२७॥
तेथें उठवोनि परिक्षिते ॥ पाहूं विद्येची प्रचीती ॥ ऐसें ह्मणोनि पंथीं ॥ तंव जाहला अस्तमान ॥२८॥
रात्रीं राहिला वृक्षातळीं ॥ तंव अशरीरिणी वाचा जाहली ॥ कीं तुज कुबुद्दी संचरली ॥ उदयीक मृत्यु पावसी ॥२९॥
ऐकोनि चिंतावला मनीं ॥ असो उगवला वासरमणीं ॥ मग चालिला झडकरोनी ॥ सचिंतमनें ॥३०॥
ह्मणे जरी परिक्षिती उठेल ॥ तरी मज अर्धराज्य देईल ॥ मग आणोनि मातापिता सकळ ॥ अष्टभोग भोगीन पैं ॥३१॥
इतुक्यांत तयासी अवचिता ॥ तक्षक भेटला भ्रमण करितां ॥ कपटें विप्रवेष धरिता ॥ जाहला असे ॥३२॥
नमस्करिलें परस्परें ॥ अनंतासि पुसिलें विखारें ॥ कीं स्वामीं कोठोनि सत्वनें ॥ जाहलें गमन ॥३३॥
मग आपुलीं समूळ कथा ॥ येरु जाहला सांगता ॥ जेथोनि कोपला होता पिता ॥ तेथोनि संजीवनीपरियंत ॥३४॥
ह्मणे हो ब्रह्मन ऐका निरुतें ॥ तरी मी उठवीन परिक्षितीतें ॥ ऐकोनि तक्षक ह्मणे तयातें ॥ तो भस्मचि केला असे ॥३५॥
येरु ह्मणे असतां विभुती तरीही उठवीन मंत्रशक्तीं ॥ तेणें अर्धराज्याची प्राप्ती ॥ होईल मज ॥३६॥
तंव काळु ह्मणे झणीझणीं ॥ हा छंद न करीं जासी मरणीं ॥ येरु न मानितां त्यावरि कोपोनी ॥ मार्गीं लागला ॥३७॥
विखार बाहूनि ह्मणे तयासि ॥ दाखवीं मंत्रप्रतीति आह्मासी ॥ मग फेडिन निश्वयेंसीं ॥ भ्रांती तुझी ब्राह्मणा ॥३८॥
ऐकोनि येरु ह्मणे कैसी ॥ माझी भ्रांती तूं फेडिसी ॥ तंव काळू ह्मणे परियेसीं ॥ तक्षक तो मीचि गा ॥३९॥
अनंत ह्मणे सद्भावें ॥ तरी त्वा आपुलें रूप दावावें ॥ मग विद्येचें कौतुक पहावें ॥ माझिये तुवां ॥४०॥
तंव तो सहस्त्रफणी जाहला ॥ धुंधुवातें गर्जिन्नला ॥ ह्मणे आतां डंखीन तुजला ॥ कैसा पाहुं वांचविसी ॥४१॥
विप्र ह्मणे रे डसडस ॥ पाहूं कैसें तुझें विष ॥ येरु ह्मणे तूं बापुड्यापरिस ॥ पाहें कौतुक माझें आतां ॥४२॥
ह्मणोनि डसला एका वडासी ॥ तंव ज्वाळा लागल्या आकाशीं ॥ समुळ जळोनि परियेसीं ॥ जाहली विभूती ॥४३॥
उपरीं फूंफुकारला काळू ॥ तंव वायु सुटला बहळू ॥ रक्षा उडवितां नलगे वेळु ॥ काहींच नुरे वृक्षाचें ॥४४॥
होता वडाचा निःपात ॥ तक्षक राहिला निवांत ॥ मग संजीवनी अनंता ॥ जपता जाहला ॥४५॥
चिमुटी येकी होती रक्षा ॥ तीवरी विद्या घातली देखा ॥ तंव विस्तार जाहला वृक्षा ॥ पूर्ववत पैं ॥४६॥
अनंत ह्मणे तक्षकासी ॥ पाहें विद्येची प्रचीती ऐसी ॥ मग सानंद होवोनि मानसीं ॥ निघाला तो ॥४७॥
तंव तक्षक होवोनि ब्राह्मण ॥ ह्मणे मागमाग जाहलों प्रसन्न ॥ अनंत ह्मणे तूंचि दीन ॥ मागमातें ॥४८॥
तक्षक ह्मणे विप्रनाथा ॥ तूं दाता मीचि मागता ॥ तरी त्वां रक्षावें शरणागता ॥ सर्वथा मज ॥४९॥
आतां भाष द्यावी मज ॥ मंग मी इच्छित मागेन तुज ॥ तंव येरें दीधली सहज ॥ भाश देखा ॥५०॥
तक्षक ह्मणे विप्रोत्तमातें ॥ तुझी दृष्टी पडेल जेथजेथें ॥ मग त्वां रक्षावें तेथतेथें ॥ अन्यत्र विद्या न घालावी ॥५१॥
येरु ह्मणे तथास्तु ॥ ह्मणोनि पुनरपि भाष देतु ॥ तंव सर्प ह्मणे आतां घातु ॥ करूं याचाची ॥५२॥
नातरी हा उठावील रायासी ॥ मग बोल लागेल आपणासी ॥ ह्मणोनि डसला गुदद्दारासी ॥ न विचारी ब्रह्महत्या ॥५३॥
तेणें अनंत गजबजोनी ॥ मागें पाहे परतोनी ॥ विद्या स्मरिली संजीवनी ॥ तंव सहस्त्रफणी ॥ काय करी ॥५४॥
तक्षकें विप्रमूर्तीं धीरली ॥ ह्मणे भाष आठवीं आपुली ॥ येरें संजीवनी सांडिली ॥ दीधला प्राण ॥५५॥
सुरवर गजबजोनि ह्मणती ॥ हा वांचविता परिक्षिती ॥ परि न चुकेचि कर्मगती ॥ केली शांती तक्षकें ॥५६॥
ऐसें करोनि तक्षक गेला ॥ तो वृत्तांत एके विप्रें देखिला ॥ मग तो सांगावया निघाला ॥ जन्मेजयासी ॥५७॥
पावला पिपीलिका पर्वत ॥ जन्मेजया कथिला वृत्तांत ॥ जो श्रृतदृष्ट असे समस्त ॥ त्या विप्रासी ॥५८॥
ह्मणे जन्मेजयां नृपनाथा ॥ तो विप्र जरी येथें येता ॥ तरी निश्चयें उठविता ॥ परिक्षितीसी ॥५९॥
ऐकतां रायाचें दुणावलें दुःख ॥ ह्मणे आह्मा दैव विमुख ॥ यानंतरें केला शोक ॥ त्याब्राह्मणाचा ॥६०॥
असो जन्मेजयो प्रधानमंत्रीं ॥ संबोखिला सुष्टोत्तरी ॥ यापरि पिपालिकाद्रीवरी ॥ असे राया ॥६१॥
पराशर ह्मणे ऋषीश्वरांतें ॥ दुजें नवल जाहलें अवचितें ॥ तें ऐका दत्तचित्तें ॥ अग्रकथन ॥६२॥
कोणी उत्तक नामें ऋषी ॥ असे तपश्रियेचा राशी ॥ तो आषाढशुद्ध येकादशींसी ॥ बैसला ध्यानीं ॥६३॥
तयासि तपीं लागली टाळी ॥ तंव तक्षक आला तये स्थळीं ॥ तेणे देखिला नेत्रकमळीं ॥ काष्ठभूत ब्राह्मण ॥६४॥
सर्प ह्मणे जगप्रसिद्ध ॥ ऐसें बोलती ब्रह्मविद ॥ कीं अजरामर होईजे अभेद ॥ गुरुप्रसादें ॥६५॥
तरी पाहों ययाचा देह ॥ अमर अभेद कैसा आहे ॥ ह्मणोनि विषज्वाळा लाहें ॥ वमिला देखा ॥६६॥
तेणें आसपाशीं तूणतरु ॥ जळोनि जाहले भस्मरु ॥ तये अग्निज्वाळीं दिनकरु ॥ तप्त जाहला आकाशीं ॥६७॥
परि विष न स्पर्शीं मुनीतें ॥ तेणें सर्प करी आश्चर्यातें ॥ ह्मणे हा तपसिधु निरुतें ॥ होय योगीश्वर ॥६८॥
जरी हा क्रोधें नेत्र उघडील ॥ तरी ब्रह्मांड भस्म करील ॥ आतां पळिजे उतावेळ ॥ तरीच वांचणें ॥६९॥
प्रसाद घेवोनि काहींतरीं ॥ येथोनि जावें झडकरी ॥ तंव तेथें कमंडलु नेत्रीं ॥ देखिला जळपूर्ण ॥७०॥
ह्मणे हें सर्वतीर्थीचें नीर ॥ प्राशितां होइजे अजरामर ॥ मग तें घेवोनि जळपात्र ॥ गेला पाताळासी ॥७१॥
जळे विखार शिंपिले ॥ तंव ते प्रतत्प शीतळ जाहले ॥ आणि आपणही घेतलें ॥ कमंडलूउदक ॥७२॥
असो इतुकें जंव वर्तलें ॥ तं ऋषीनें ध्यान विसर्जिलें ॥ भोवतें स्थळ अवलोकिलें ॥ तंव न देखे कमंडलु ॥७३॥
जळाले देखे तृणतरु ॥ जाहला जंतूंचा संहारु ॥ मग करिता जाहला विचारु ॥ मनामाजी ॥७४॥
त्यासी तक्षकाचें कर्तुत्व ॥ ध्यानीं भासलें समग्र ॥ ह्मणे निरर्थक वैरभाव ॥ येणें केला आह्मासी ॥७५॥
आतां नवकुळें सहित ॥ या सर्पांचा करुं निःपात ॥ मग चालिला वारुळें खणित ॥ घेवोनि कुदळी ॥७६॥
ऐसें कृत्य जनीं देखोनी ॥ तें वृत्त घातलें राया श्रवणीं ॥ मग आला आश्चर्य मानोनी ॥ जन्मेजय तेथ ॥७७॥
रायें तयासि कारण पुसिलें ॥ येरें समूळ सांगितलें ॥ तें ऐकोन राव बोले ॥ ऋषिवर्यासी ॥७८॥
कीं तुह्मी शास्त्रज्ञ पवित्र ॥ आत्मज्ञानीं निर्वेंर ॥ तरी हें कां मांडिलें अखर ॥ कायसा तमोगुण ॥७९॥
ऋषि ह्मणे भलारे भला ॥ तुझा अभिप्रावो कळों आला ॥ पिता तक्षकें डंखिला ॥ तें सुखाचि मानिसी ॥८०॥
असे पुत्र जन्मोनि संसारीं ॥ जो न निर्दाळी पितृवैरी ॥ तो अखंड पचिजे अघोरीं ॥ माते उदरीं पाषाण तो ॥८१॥
ऐकोनि ह्मणे जन्मेजयो ॥ जरि म्या केला सर्पक्षयो ॥ तरी नये कीं परिक्षितीरावो ॥ पिता आपुला ॥८२॥
माथां कासया पाप घेणें ॥ सर्वात्मबुत्धीनें वर्तणें ॥ तंव तो निंदिला ब्राह्मणें ॥ जन्मेजयो ॥८३॥
ह्मणे सर्पें डंखिलें पितयासी ॥ ह्मणोनि राज्य पावलासी ॥ तो तूं उपकरचि मानिसी ॥ ऐसें मज कळों आलें ॥८४॥
तरि न पाहिजे तुझें मुख ॥ तुवां पितृघातें मानिलें सुख ॥ वर्जितांहीं न मानी मूर्ख ॥ तो निर्लज्ज पैं ॥८५॥
ह्मणोनि उत्तंक निघोनि गेला ॥ तंव जन्मेजयो चिंतावला ॥ ह्मणे उपदेश दीधला भला ॥ परि पुसावें व्यासांसी ॥८६॥
ध्यानीं बैसला जन्मेजयो ॥ मनीं चिंतिला व्यासदेवो ॥ तंव नलगतां क्षणही खेवों ॥ आला मुनी त्या ठाया ॥८७॥
रायें पूजिला षोडशोपचारीं ॥ प्रार्थना करोनि ह्मणे अवधारीं ॥ जिवंत असे पितृवैरी ॥ ह्मणोनि मी व्यग्रचित्त ॥८८॥
तरी पितयातें कुडंविजे ॥ वैरियासी निर्दाळिजे ॥ ऐसा उपाय कांहीं सांगिजें ॥ स्वामी मज ॥८९॥
ऐकोनि ह्मणती व्यासमुनी ॥ मंत्रबळें आव्हानोनी ॥ सकळ सर्प होमावे यज्ञीं ॥ तैं होय उत्तीर्णता ॥९०॥
ब्राह्मन आणावे मंत्रविद ॥ अथर्वणिये वेदविद ॥ मग होमावे विविध ॥ सर्प देखा ॥९१॥
ऐसें ऐकोनि जन्मेजयो ॥ करी सर्पयागनिश्चयो ॥ आणि गेले व्यासदेवो ॥ स्वाश्रमासी ॥९२॥
वैशंपायन ह्मणें नृपवरा ॥ हें पराशर सांगे ऋषीश्वरां ॥ तुझें चरित्र गा समग्रां ॥ बद्रिकाश्रमीं ॥९३॥
या नंतरें ॥ पुढील कथा ॥ पराशरू जाहला सांगता ॥ ते ऐकावी सकळ श्रोतां ॥ ह्मणे मधुकरकवी ॥९४॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरू ॥ तक्षककापट्यप्रकारु ॥ तृतीयोऽध्यायी कथियेल ॥९५॥
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥