॥ श्रीगणेशाय नमः ॥
ऐका रत्नखचित व्यासामनीं ॥ वैशंपायना बैसवोनी ॥ षोडशोपचारें पूजोनी ॥ केला साष्टांग प्रणाम ॥१॥
पुनरपि प्रदक्षिणा करोनी ॥ जन्मेजय मुकुटमणी ॥ पुढा बैसला गरुडासनीं ॥ जोडिलें करसंपुट ॥२॥
विनतकंधरु जाहला ॥ जयजयकारें स्तवी वहिला ॥ सप्रेमें सर्वांगी दाटला ॥ उद्धवले रोमांच ॥३॥
मग ह्मणे जन्मेजयो मुनें तूं ज्ञानसागरींचा डोहो ॥ कीं कविताकामिनीचा नाही ॥ अवतरलासी ॥४॥
कीं प्रबोद्धा दिनमणी ॥ ज्ञानहेमचिंतामणी ॥ नातरी वक्तृत्वान्ननंदिनी ॥ कामधेनूची ॥५॥
कीं तुं भवासिंधुतारक ॥ कीं अज्ञानतमघ्न दीपक ॥ चातुर्यदिनप्रकाशक ॥ सूर्य दुसरा ॥६॥
नातरी आर्तचक्रोरचंद्रु ॥ कीं शरणागता अभयंकरु ॥ नानाशिष्यवर्गां सन्दुरु ॥ प्रबोधिता ॥७॥
तुझिये सन्निधान संगतीं ॥ होय त्रिविधतापनिवृत्ती ॥ ज्ञानवैराग्यभक्तिप्राप्ती ॥ तुझेनि प्रसादें ॥८॥
मागां नानाकथा नवरसु ॥ तुवां केलासे प्रकाशु ॥ तेणें फिटोनि संशयक्केशु ॥ जाहलों पुनीत ॥९॥
परि येक संदेह असे मनीं ॥ तो जरी न पुसो तुजलागोनी ॥ तरी निवृत्तिकर्ता त्रिभुवनीं ॥ न दोखों दुसरा ॥१०॥
ह्मणोनि गुरुराया अवधारिजे ॥ पुसतां अपत्या न कोपिजे ॥ उच्छिष्टही प्रसाद दीजे ॥ क्षुधार्थियासी ॥११॥
तंव ह्मणे वैशंपायन ॥ राया तूं महाविचक्षण ॥ तुझिये संगतीं तनुमन ॥ निवालीं माझीं ॥१२॥
आतां जें असेल अपेक्षित ॥ संदेहरूप उत्कंठित ॥ तें सुखें पुसावें मनोरथ ॥ पुरतील ईश्वरप्रसादें ॥१३॥
जन्मेजय ह्मणे हो मुनी ॥ मज भारतापेक्षा असे मनीं ॥ परि आदिपर्व मूळापासोनी ॥ कथिलें तुह्मीं पूर्वीच ॥१४॥
पांडवीं द्रौपदीतें जिंकिलें ॥ मग कौरवीं इंद्रप्रस्थ दिलें ॥ तेथें राज्य करूं लागले ॥ कुंतीसह ॥१५॥
तयाचिये नंतरें पार्थें ॥ करितां पृथ्वीप्रदक्षिणेतें ॥ द्वारके हरिलें सुभद्रेतें ॥ जावोनियां ॥१६॥
मग इंद्रप्रस्थासि आला ॥ धर्मादिकांते भेटला ॥ सुखें राज्य करूं लागला ॥ युधिष्ठिर सकुटुबें ॥१७॥
पांडवकौरवांचें येथपरियंत ॥ आदिचरित्र जाहलें श्रुत ॥ तरी कथांतरें आद्यंत चरित ॥ सांगिजे जो ॥१८॥
असो सप्तमस्तबकीं जाण ॥ कथिलें सोमकलाविवरण ॥ पुढें कथिला विवाह संपूर्ण ॥ अभिमन्याचा ॥१९॥
हे मध्येंचि कथा त्रुटित ॥ कथिली असे संकलित ॥ तेणें संदेहें जाहलें व्याप्त ॥ अंतःकरण ॥२०॥
तरि मतांतर आघवें ॥ मज अनुक्रमें सांगांवे ॥ मनोरथ पूर्ण करावे ॥ सदुरुनाथा ॥२१॥
जंव हें मनींचें न फिटे ॥ तंव स्वस्थता न वाटे ॥ केवीं संतोष प्रकटे ॥ अंतर्बाह्य ॥२२॥
ऐसें जन्मेजयें पुसिलें ॥ तंव मुनीनें भारत सोडिलें ॥ जें लक्षसंख्या असे कथिलें ॥ व्यासदेवें ॥२३॥
ह्मणे ऐक गा भारता ॥ तुझिये पूर्वजांची कथा ॥ अठरापर्वें प्रकाशिता ॥ व्यासदेवो ॥२४॥
आदपर्व सभापर्व ॥ आरण्यकपर्व सद्भाव ॥ चौथें जाणिजे अपूर्व ॥ विराट पैं ॥२५॥
उद्योगपर्व उद्यमाथीं ॥ भीष्मपर्व संग्रामाथीं ॥ द्रोणापर्व व्यूहोप्तत्ती ॥ कर्णपर्व आठवें ॥२६॥
शल्यगदापर्व सौप्तिक ॥ स्त्रीपर्व शांती आईक ॥ आणि तेरावें अनुशासिक ॥ आश्वमेधिक चौदावें ॥२७॥
आश्रमवासिक मौसल जाण ॥ प्रास्थानिक आणि स्वर्गारोहण ॥ ऐसीं अठरापर्वें प्रंमाण ॥ याभारतासी ॥२८॥
विष्णु आदि तुजपर्यंत ॥ सोमवंश आला चालत ॥ असो अठराही पर्वें समस्त ॥ कर्ता व्यासगुरु ॥२९॥
तुज नुपजतांचि पाहीं ॥ सकळ चरित्र तुझेंही ॥ भाषोनि गेला ऐकें सही ॥ द्वैपायन ॥३०॥
तें भारत बदरिकाश्रमीं ॥ सूत सांगे नित्यनेमीं ॥ ऋषींप्रति मनोधर्मी ॥ ग्रंथातरेंसीं ॥३१॥
तुझिय ब्रह्महत्या अठरा ॥ श्रवणें नासल्या समग्रा ॥ ते कथा ऐकोनि ऋषीश्वरां ॥ वाढली प्रीती ॥३२॥
मग समस्ती मुनिजनीं ॥ विचारलें अंतःकरणीं ॥ कीं आतां पराशरापासोनी ॥ करूं भारतश्रवण ॥३३॥
ह्मणोनि समस्तही निघाले ॥ पराशराजवळी पातले ॥ तयासि करसंपुटीं विनविलें ॥ भारतकथना ॥३४॥
मग सोमवंश विष्णुपासोनी ॥ तुजपर्यंत मांडोनी ॥ कथासमुह कथी मुनी ॥ पराशर तो ॥३५॥
तंव ह्मणे जन्मेजयो ॥ मजमर्यत कैसा अन्वयो ॥ सांगता जाहला ऋषिरावो ॥ तें सांगिजे जी ॥३६॥
वैशंपायन ह्मणे भारता ॥ तुझिये पूर्वजांची कथा ॥ तुजपर्तंत जाहला बोलता ॥ पराशर तो ॥३७॥
तें अनुक्रमें संबंधोनी ॥ ऐकें सावधान होवोनी ॥ जें बदारिकाश्रमीं मुनिजनीं ॥ श्रवण केलें ॥३८॥
मुनी ह्मणे गा नृपवरा ॥ पराशर सांगे ऋषीश्वरां ॥ मनिदत्तचित्तें अवधारा ॥ कथा भारती ॥३९॥
श्लोकः ॥ भाति सर्वेषु वेदेषु रतिः सर्वत्र जंतुषु ॥ तरणं सर्वलोकानां ॥ तस्माद्भारतमुच्यते ॥१॥
दुसरें भा ह्मणिजे भगवत्कांती ॥ तेथ रति ह्मणिजे जया प्रीती ॥ तोचि पावे परमगती ॥ कथाश्रवणें ॥४०॥
जन्मेजयाच्या अवधारा ॥ ब्रह्महत्या नासलिया अठरा ॥ तेचि कथा श्रवण करा ॥ व्यासोक्तवाणी ॥४१॥
आतां येथील वृत्तांत तेथें ॥ तैसेंचि तेथील वृत्तांत येथें ॥ ते मी सांगतअसें तूतें ॥ जन्मेजया गा ॥४२॥
पराशर ह्मणे ऋषीप्रती ॥ जन्मेजयाचा पिता परिक्षिती ॥ तो कोणैकसमयांतीं ॥ गेला व्याहाळीसी ॥४३॥
तंव रोही येक निघाला ॥ तयापाठीं नृप लागला ॥ जातां पुढां ध्यानस्थ देखिला ॥ शमिकऋषी ॥४४॥
त्यासी रोहीचा पुसिला वृत्तांत ॥ परि तो न बोलेचि ध्यानस्थ ॥ ह्मणोनि कोपला परिक्षत ॥ तंव मृतसर्प देखिला ॥४५॥
तो ऋषीच्या कंठीं सूदंला ॥ मग रावो नगरासी गेला ॥ स्वर्गींहूनि त्याचा पुत्र आला ॥ नावें श्रृंगऋषी ॥४६॥
तेणें पितृकंठीं देखिला विखारू ॥ कोपोनि शापी कुमरु ॥ कीं हा जेणें केला अपकारु ॥ तया मृत्यु होवो सर्पदशें ॥४७॥
आजपासोनि सातव्या दिवशीं ॥ तक्षकें डंखावें तयासी ॥ तंव ध्यानभंग ऋषीसी ॥ जाहला देखा ॥४८॥
मग शापाचा वृत्तांत ॥ पुत्रें पितयासि केला श्रृत ॥ तो ऐकोनियां महंत ॥ दुखावला जीवीं ॥४९॥
शमीक जंव ज्ञानीं पाहे ॥ तंव तें केलें परिक्षिति रायें ॥ ह्मणे अविचारें शापिलें काय ॥ पुत्रा तुवां ॥५०॥
तुझें तप गेलें वृथा ॥ शाप देऊंनये महंता ॥ तो परिक्षिती बहुतां ॥ प्रतिपाळक ॥५१॥
असो शिष्य पाठवोनि वेगेंसीं ॥ तेणें श्रूत केलें राजयासी ॥ कीं शाप जाहला तुह्मांसी ॥ मृत्यु सर्पदंशें ॥५२॥
रावो विचारी आपण ॥ ह्मणे जन्मपत्रिके हेंचि मरण ॥ पुरोहितें कथिलें मजलागुन ॥ पूवींच कीं ॥५३॥
तरी जातकींचें वर्तविलें ॥ आणि ऋषीचें शापिलें ॥ हें न चुके काहीं केलें ॥ सृष्टीमाजी ॥५४॥
परि सर्पदंशें अपगती ॥ यासि काय कीजे शांती ॥ ह्मणोनि चिंताग्रस्त चित्तीं ॥ होवोनि बाहिलें ब्राह्मणां ॥५५॥
तयांप्रति रावो ह्मणे ॥ कैसं मरण जी निवारणें ॥ ते ह्मणती अवश्य भोगणें ॥ पूर्वार्जिता ॥५६॥
परि करावें आत्महित ॥ जेणें चुकेल अपमृत्य ॥ तंव रावो ह्मणे आत्महित ॥ सांगा मज झडकरी ॥५७॥
जंव काहीं बोलावें सुबुद्धीं ॥ तंव प्रधान नापीक तये संधी ॥ येवोनि रायाजवळी कुबुद्धी ॥ कोपला ब्राह्मणांसी ॥५८॥
ह्मणे या बापुडीं काय सांगावे ॥ तुह्मी दडंकारण्यासि जावें ॥ तेथें तप आचरावें ॥ चुकेल अपमृत्यु ॥५९॥
हें रज्य सांडिलिया विण ॥ तुमचें न चुके जी मरण ॥ ऐसें ऐकोनियां वचन ॥ राज्य प्रधाना निरविलें ॥६०॥
राव निघतां नगरबाहेरी ॥ अपशकुन जाहले नानापरी ॥ काक काष्ठीं करकरी ॥ संर्पें मार्ग खंडिला ॥६१॥
परि तें न मानितां निघालां ॥ रानें वनें सांडिता जाहला ॥ पुढें पिपींलिकद्रीसि पातला ॥ तंव देखिलें सरोवर ॥६२॥
तेथें स्थिरवलें मन ॥ मग उभविलें राजभवन ॥ सुवर्णमय रत्न कोंदण ॥ जडित देखा ॥६३॥
पाळीं बैसला असे रावो ॥ तंव तेथें आला शुकदेवो ॥ य्रेरें पूजिला करूनि भावो ॥ षोडशोपचारीं ॥६४॥
ह्मणे ऐकें जी व्याससुता ॥ मज कांहीं सागां हरिकथा ॥ मग येरु जाहला निरुपिता ॥ श्रीभागवत ॥६५॥
तंव प्रधान नापिक झडकरी ॥ येवोनि तये गिरिवरीं ॥ ह्मणे राया अवधरीं ॥ विनवणी माझी ॥६६॥
स्तंभ रोवोनि जळांत ॥ वरी पंजर कीजे रत्नजडित ॥ तेथें तुह्मी वैसावें ध्यानस्थ ॥ तें मानावलें राजया ॥६७॥
येरें निर्मविला तत्क्षणीं ॥ मग रायें पुत्र बोलाउनी ॥ राज्यतिलक सारोनी ॥ नोरोपिला परिवार ॥६८॥
ऐसें परिक्षति रायें ॥ तुज राज्यों स्थापोनि पाहें ॥ मग आपन निवांत राहे ॥ रत्नपंजरी ॥६९॥
पराशर ह्मणे अगस्तीप्रती ॥ तेथेंचि जन्मेजय भूपती ॥ राहोनिं अन्न विप्रांहातीं ॥ पाठवीतसे पितयातें ॥७०॥
निरवडी केली थोरप्रयत्नीं ॥ कोणा रीघ नाहीं तिये स्थानीं ॥ परिवारेंसीं नृपमणी ॥ राहिला पर्वतीं ॥७१॥
परिक्षित असतां वज्रपंजरीं ॥ तंव वाचा जाहली अंबरीं ॥ कीं समयो पातला अवधारी ॥ आजी दिवस सातवा ॥७२॥
राव गजबजोनि स्वस्थ राहिला ॥ तंव येक माळी तेथ आला ॥ रायासि भेटी देताजाहला ॥ बदरीफळें ॥७३॥
राव ह्मणे अपूर्वता कैसा ॥ पिकलीं बोरें ज्येष्ठमासीं ॥ ह्मणोनि मुखीं घालावयासी ॥ घेतलें येक ॥७४॥
तंव सूक्ष्म अळिकां होवोनी ॥ तक्षक फळीं संचरोनी ॥ राहिलासे तेणे तत्क्षणीं ॥ डंखिला रावो ॥७५॥
कल्हारिये चढलें विष ॥ रावो लहरींनीं व्याकुळ देख ॥ गजबजू जाहला सकळिक ॥ परिवारासी ॥७६॥
जन्मेजयो आणि राणिया ॥ रुदतां न सांभाळती आपणिया ॥ तयां प्रधानें वारोनियां ॥ रावो खालीं उतरविला ॥७७॥
काढिला रत्नपंजरा बहिरी ॥ बोलविले नागमंत्री धन्वंतरी ॥ ते विष उतरिता नानापरी ॥ परि तें नुतरेची ॥७८॥
उपचार करितांचि देखा ॥ मृत्यु जाहला नृपनायका ॥ आकांत वर्तला सकळिकां ॥ करूणारस नावरे ॥७९॥
ह्मणती हायहाय पशुपती ॥ कैसा निधन पावला ॥ नृपती आतां निराधार वसुमती ॥ आह्मां रक्षील कोण ॥८०॥
कां पां परबुद्धीं लागलासी ॥ राज्य सांडोनि वनीं आलासी ॥ परि न चुकेचि विवशी ॥ देह परदेशीं त्यागिला ॥८१॥
जन्मेजय विलाप करी ॥ दुःखें फुटुं पाहे धरत्री ॥ तंव कमळाकरा सुंदरी ॥ काय विचारी मानसीं ॥८२॥
ह्मणे बालक धाकुटें माझें ॥ तरी कैसें सहगमन कौजे ॥ आतां कवणासि निरविजे ॥ जन्मेजयो हा ॥८३॥
भलतैसें कां होवो या सुता ॥ ह्माणोनि सतिय बैसली आकांत ॥ तंव कुळगुरु जाहला बोलता ॥ मंत्रियाप्रती ॥८४॥
कीं अपगती जाहली रायासी ॥ ह्मणोनि न घालावें सतीसी ॥ जो शस्त्रघातें पडेल रणभुमीसी ॥ तेथें सती प्रयुंजावी ॥८५॥
उभयकुळांसी उद्धरी सती ॥ ऐसी धर्मशास्त्रीची मती ॥ एकी बलात्कारे घालिती ॥ त्यांचे वंशीं नाहीं जयो ॥८६॥
हे पुरोहितवणी ऐकोनियां ॥ जनमेययें वारिलें सतियां ॥ मातिसे ह्मणे पुढें पितया ॥ गति करणें असे ॥८७॥
असो राजदेह दहन करायासी ॥ सकळीं नेला गिरिशिखरासी ॥ नरवाहनी वेगेंसी ॥ वाहुनियां ॥८८॥
करोनियां भूमिशोधन ॥ चंदनकाष्ठीं रचिलें सरण ॥ तेथें अग्निदाघ संपूर्ण ॥ दीधला परिक्षिती ॥८९॥
मग उत्तरक्रिया और्ध्वदैहिक ॥ केलें वेदोक्त सकळिक ॥ लोक करोनियां दुःख ॥ निंदिती प्रधान नापिका ॥९०॥
कीं हीनजाती प्रधान नापिक ॥ तेणें करोनि बुद्धीविवेक ॥ पारिक्षिती धाडिला पुण्यात्मक ॥ वनालागीं ॥९१॥
राज्य सांडोनि सेविला गिरिवरु ॥ परि न टळेचि पूर्वकारु ॥ तरि मूर्खासि दीधल्या अधिकरु ॥ अपावो राजयासी ॥९२॥
असो हे परिक्षितीची मात ॥ फांकत दिग्मंडला ॥ आंत ॥ जे ऐकतां होय आकांत ॥ प्राणिमात्रां ॥९३॥
तये पिपीलिकागिरिवरीं ॥ जनमेजयो राज्य करी ॥ सांडोनियां हस्तनापुरी ॥ सपरिवारें ॥९४॥
तंव येक नवल जाहलें ॥ तें परियेसा जी वहिलें ॥ ऐसें पराशरु बोलिले ॥ ऋषीप्रती ॥९५॥
अगा जन्मेजया अवधारीं ॥ जे कथा वर्तली पुढरीं ॥ तेही परिसिली ऋषीश्वरीं ॥ बदरिकाश्रमीं आदरें ॥९६॥
यानंतरें अपूर्व कथा ॥ ऋषी सांगेल राया भारता ॥ ते ऐकावी संतश्रोतां ॥ ह्मणे मधुकरकवी ॥९७॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबकमनोहरु ॥ परिक्षितीनिघनप्रकारु ॥ द्वितीयाध्यायीं कथियेला ॥९८॥
॥ शुभंभवतु ॥