मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय २१

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय २१

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनीसि ह्नणे जन्मेजयो ॥ विजयी जाहला धनंजयो ॥ आतां अग्रकथान्वयो ॥ सांगिजे मज ॥१॥

वैशंपायन ह्नणती अवधारीं ॥ पार्थे द्रुपद जिंकिल्यावरी ॥ दुर्योधन मनीं द्वेष करी ॥ पांडवांचा ॥२॥

तंव येकी आडकथा ॥ वर्तली ते ऐकें व्यवस्था ॥ वोवसा करिती दोनी माता ॥ कौरवपांडवांच्या ॥३॥

राजा कवणे येके अवसरीं ॥ व्यास आले हस्तनापुरी ॥ त्यांहीं बोलावोनि कुंतीगांधारी ॥ कथिलें व्रत ॥४॥

ह्नणती गजांतलक्ष्मीचें व्रत ॥ तुह्मी आचरावें शास्त्रोक्त ॥ जेणें पुरतील मनोरथ ॥ समृद्ध नवही निधी ॥५॥

मग दुसरिये जन्मीं अवधारा ॥ हस्ती डुल्लती स्वमंदिरा ॥ शेवटीं स्वर्गलोकीं परिकरा ॥ प्राप्त होय ऐरावती ॥६॥

तंव विनविती दोघीजणी ॥ कीं व्रत सविस्तर सांगा मुनी ॥ येरु ह्नणे चित्त देऊनी ॥ करा श्रवण ॥७॥

भाद्रपद किंवा आश्विनमाशीं ॥ शुक्ल पक्षीं कीं कृष्णपक्षीं ॥ हस्तार्क असेल जिये दिवशीं ॥ तो अमृतसिद्धियोग ॥८॥

तैं आपुले पुत्रांकरवीं ॥ शुद्धमृत्तिका आणवावी ॥ तयेची मूर्ती करावी ॥ ऐरावतीसम ॥९॥

ध्वज पताका अलंकार ॥ हत्तीचीं आभरणें करावीं समग्र ॥ दिव्यांबर घालावें परिकर ॥ कनकरत्नी ॥१०॥

आपण सैचल स्त्रान करावें ॥ षोडशोपचारीं पूजावें ॥ अत्रगंधादि समर्पावे ॥ धूपदीपनैवेद्य ॥११॥

करावें एकाहार भोजन ॥ ब्रह्मचर्य भूमिशयन ॥ श्रीविष्णूचें गायन पुराण ॥ नृत्य कीर्तन करावें ॥१२॥

कण्हेर जास्वंदीचीं पुष्पें ॥ निंबु नारिकेळादि अमूपें ॥ भातुकीं वोळंगावी निष्पापें ॥ न कीजे हिंसा ॥१३॥

सोळादिवस ऐशियापरी ॥ पूजा करावी सर्वोपचारी ॥ सोळा सोळवंडिया अवधारीं ॥ द्याव्या फळांच्या विधानयुक्त ॥१४॥

प्रातःकाळीं स्त्रान करोनी ॥ महालक्ष्मी चिंतोनि मनीं ॥ सोळवंडी द्यावी पूजोनी ॥ ब्राह्मणांसी ॥१५॥

मग बैसोनि त्या हत्तीवरी ॥ वाणें द्यावीं सुवासिनीकरीं ॥ नगरामाजी घरोघरीं ॥ जावोनियां वाद्यगजरें ॥१६॥

उपरी येवोनि स्वमंदिरीं ॥ लक्ष्मी पूजावी सोपचारीं ॥ हस्ती घालोनि गंगेमाझारी ॥ संतर्पण करावें ॥१७॥

अखिल याचकें संतोषवावीं ॥ ऐसी व्रतपद्धती आचरावी ॥ ऐकतां संतोषल्या जीवीं ॥ कुंती आणि गांधारी ॥१८॥

षोडशोपचारीं पूजोनि भलें ॥ मग ऋषीश्वर पामकिले ॥ तंव तें व्रत प्राप्त जाहलें ॥ भाद्रपदमासीं ॥ ॥१९॥

येरी आपुलाल्या मंदिरीं ॥ दोघी मेळविती सामुग्री ॥ सकळ पदार्थ नानाकुसरी ॥ सिद्ध केले ॥२०॥

गांधारियें काय केलें ॥ शतयेक पुत्रां पाचारिलें ॥ दुर्योधनादिकां ह्नणितलें ॥ की आणावी मृत्तिका ॥२१॥

तंव ते पेड आणाया गेले ॥ शतयेक संख्या आणिते जाले ॥ देखोनि मन संतोषलें ॥ गांधारीचें ॥२२॥

मग त्यांचां रचिला कुंजर ॥ सावयव थोर सुंदर ॥ लेवविले सर्व श्रृंगार ॥ समारंभ मांडिला ॥२३॥

परि तें देखोनियां कुंती ॥ चित्तीं करीतसे खंती ॥ ह्नणे धन्य इयेची संतती ॥ माती आणिली बहुतची ॥२४॥

माझीं तरी पांच बाळें ॥ तीं आणितील पांच डिखळें ॥ तेणें कान नाक डोळे ॥ होतील की न होती ॥२५॥

मी हतभाग्य त्रिजगतीं ॥ स्वल्प पावलें संतती ॥ इयेचे शतपुत्र न मावती ॥ भूमंडळामाजी ॥२६॥

ऐसा खेद करोनि जीवीं ॥ सचिंत ठेली कुंतमादेवी ॥ इकडे व्रतानुष्ठान सद्भावीं ॥ गांधारियें आचरिलें ॥२७॥

तंव जन्मेजय प्रश्न करी ॥ कीं पूजिला मृन्मयकरी ॥ तरी साक्षात हत्ती काय घरीं ॥ नव्हता तियेचे ॥२८॥

वैशंपायन ह्नणे गा भूपती ॥ हे धर्मशास्त्रींची उपपत्ती ॥ कीं मृत्तिकेचा करोनि हस्ती ॥ शेवटीं जळीं निक्षेपावा ॥२९॥

तेणें इंद्राचा ऐराव्रत ॥ स्वर्गलोकीं होय प्राप्त ॥ आतां असो हा वृत्तांत ॥ ऋषिवाक्य करणीय ॥३०॥

असो सोळाविये दिवशीं गांधारी ॥ स्त्रान सारोनि पूजा करी ॥ आरुढोनियां हस्तीवरी ॥ वाणें नगरीं देतसे ॥३१॥

कोटिसंख्या मिळाले ब्राह्मण ॥ वानिताती भाटजन ॥ वाद्यगजर होत गहन ॥ वेदोच्चार मंगलगीतें ॥३२॥

चाकें जोडोनि हस्तीप्रती ॥ कौरव चवरें ढाळिती ॥ वाणें देवोनि द्विजांप्रती ॥ दानें उचित्तीं दीधलीं ॥३३॥

घरोघरीं सुवासिनीसी ॥ वाणें देतसे उल्हासीं ॥ तृप्त केलें याचकांसी ॥ तये वेळीं ॥३४॥

पुढें नृत्य करिती पात्रें ॥ गायक करिती गायन सुस्वरें ॥ असो ऐशा संभ्रमें थोरें ॥ कुंतिमंदिरीं पावली ॥३५॥

वाण देवोनि कुंतियेसी ॥ गांधारी गेली भागीरथीसी ॥ जळीं निक्षेपूनि हत्तीसी ॥ विसर्जिलें व्रत ॥३६॥

मग बैसोनि सुखासनीं ॥ उत्साहें आली निजसदनीं ॥ इकडे चिंताग्रस्त जाली मनीं ॥ कुंतमादेवी ॥३७॥

ह्नणे धन्य जन्म इयेचा ॥ वोवसा केला सत्कीर्तीचा ॥ मनोरथ न पुरेचि आमुचा ॥ धिक जियाळें संसारीं ॥३८॥

ऐसी कुंती हीनपणें ॥ बैसली चिंताग्रस्तमनें ॥ तंव तिये संधी भीमसेनें ॥ येवोनि पुसिलें मातेसी ॥३९॥

ह्नणे माते कां कोमाइलीसी ॥ तें सांगावें मजपाशीं ॥ येरीनें श्रुत केलें भीमासी ॥ गांधारीचें आचरण ॥४०॥

तुह्मी आणाल पांच गोळे ॥ तेणें न होती श्रवण डोळे ॥ तरी मनोरथ विलया गेले ॥ नव्हे वोवसा माझेनी ॥४१॥

मग भीमें मातेसि संबोखोनी ॥ येके स्थळीं खणिली मेदिनी ॥ तो येकचि पेड करोनी ॥ द्वारीं आणोनि टाकिला ॥४२॥

तंव चौघे येवोनि सहोदर ॥ देखती माता चिंतातुर ॥ धर्म पुसे विनीतकंधर ॥ कोमाइलीस कां जननीये ॥४३॥

येरीनें गांधारीचा वृत्तांत ॥ धर्मादिकांसि केला श्रुत ॥ ह्नणे सिद्धी न जाय मनोरथ ॥ तंव पार्थ बोलिला ॥४४॥

ह्नणे तया व्रताचां फळश्रुती ॥ माते सांगावी मजप्रती ॥ तंव कुंती ह्नणे ऐरावती ॥ अन्य जन्मीं पाविजे ॥४५॥

तो इंद्राचा कुंजर जाण ॥ न पाविजे या वोवशाविण ॥ मग मातेसि ह्नणे अर्जुन ॥ कोणें अन्यजन्म देखिला ॥४६॥

जें देइंजे तेंचि घेइंजे ॥ तरी माती पुजतां तेचि लाहिजे ॥ आतां या व्रताचा भ्रम सांडिजे ॥ आणि ऐकें ममोक्ता ॥४७॥

वोवसा करणें साचार ॥ परि प्रत्यक्ष इंद्राचा कुंजर ॥ येथ आणीन हा निर्धार ॥ न करीं चिंता जननीये ॥४८॥

येरी ह्नणे बा अर्जुना ॥ तरी त्रिभुवनीं मीचि धन्या ॥ तंव पार्थ लागोनि मातृचरणा ॥ धनुष्यबाणां घेतलें ॥४९॥

देवेंद्रासि पत्रिका लिहिली ॥ ते ऐका दों चौं बोलीं ॥ जे इंद्रालागीं पाठविली ॥ तृतीयपार्थे ॥५०॥

श्रीसकलतीर्थस्वरुपसौजन्य ॥ परोपकारसिद्धमूर्ति राजमान्य ॥ राजश्री सुरपती धन्यधन्य ॥ परिपूर्ण सकळार्थी ॥५१॥

कर जोडोनि पार्थ विनवी ॥ तुह्मीं आपुली खुण जाणावी ॥ जें मागेन तें सद्भावीं ॥ देइंजे बाळकासी ॥५२॥

तरी आमुची माता कुंती ॥ जे पंडुरायाची ज्येष्ठ युवती ॥ अखंड वास हस्तनावती ॥ वोवसा चित्तीं तियें धरिला ॥५३॥

तरी गणगंधर्व अप्सरांसहित ॥ मृत्युलोकीं ऐरावत ॥ आपण धाडिजे निभ्रात ॥ श्रृंगारोनी ॥५४॥

पूजा करोनि तृतीयप्रहरीं ॥ सवेंचि पाठवीन अमरपुरीं ॥ विनंती न बैसे जरी जिव्हारीं ॥ तरी निशाण अवधारिजे ॥५५॥

पहिलेनें सौम्य उपचारें ॥ कार्य करावें नीतिचतुरें ॥ नातरी शेवटीं बलात्कारें ॥ होईल तैसें करावें ॥५६॥

हेयबुद्धि न धरावी मनीं ॥ करीन कार्य समरंगणीं ॥ स्वल्पामाजी सारवजनीं ॥ असे बहुत ॥५७॥

पित्या पुत्राचा संबंध वोजे ॥ ह्नणोनि करुणा वाक्यें मागिजे ॥ नेदाल तरी घेइजे ॥ बलात्कारें ॥५८॥

ऐसी लेहोनि पत्रिका ॥ पार्थे बाणीं बांधिली देखा ॥ मग आकर्ण वोढोनि धनुषा ॥ शर स्वर्गी पाठविला ॥५९॥

इंद्र बैसला सभेभीतरीं ॥ परिवार वोळंगती कुसरीं ॥ तंव रुणझुणाट श्रोत्रीं ॥ ऐकिला सर्वी सायकांचा ॥६०॥

मध्यस्तंभीं आदळला बाण ॥ अवघे उठले चाकाटोन ॥ येक उठले गजबजोन ॥ काय जाहलें ह्नणोनी ॥६१॥

बाण खडतर असे आला ॥ तो परिवारें देखिला ॥ मग कष्टें ओढोनि आणिला ॥ इंद्राजवळी ॥६२॥

तंव तयाचे पिसार्‍यापाशीं ॥ देखिलें येके पत्रिकेसीं ॥ मग ते काढोनि सभेसी ॥ बृहस्पती वाचीतसे ॥६३॥

तो ऐकोनि पत्रवृत्तांत ॥ कोपें खवळला अमरनाथ ॥ ह्नणे केवढा जाहला पार्थ ॥ केविं ऐरावंत पाठविणे ॥६४॥

बृहस्पती ह्नणे सुरनाथा ॥ तूं कोप न करीं गा वृथा ॥ विचार करोनियां सर्वथा ॥ पाहें आपुल्या ठायीं ॥६५॥

अर्जुन नीतिमंत कुलीन ॥ ह्नणोनि स्तंभीं आदळला बाण ॥ जरी अवचितां घेता प्राण ॥ तरी कैंसें वर्ततें ॥६६॥

आतां उगेंचि पाठवावा ॥ अन्यथा भ्रम सांडावा ॥ हाचि उपकार मानावा ॥ वांचलेति जीवीं ॥६७॥

आजि त्रैलोक्या माझारी ॥ अर्जुना सम नाहीं क्षेत्री ॥ यास्तव हस्ती पाठविणें निर्धारी ॥ परी येक असे विचार ॥६८॥

तरी पडिताळा पाठवा तयासी ॥ कीं आह्मीं धाडितों ऐरावतीसी ॥ परि मार्ग करोनियां आकाशीं ॥ नेइजे तुह्मीं ॥६९॥

येथें त्याचें समर्थपण ॥ सहजचि होईल विद्यमान ॥ हें ऐकोनि गुरुवचन ॥ संतोषले समस्त ॥७०॥

मग इंद्रें लिहिला पडिताळा ॥ कीं ऐरावती आह्मीं दीधला ॥ परि तुह्मीं नेइंजे वहिला ॥ मार्ग आकाशीं करोनी ॥७१॥

मग ते बाणाग्रीं बांधोनि पत्रिका ॥ इंद्रें धाडिली मृत्युलोका ॥ पार्थ उभा असे तेथें सायका ॥ जाहलें पतन ॥७२॥

अर्जुनें पत्रिका वंदिली ॥ व्यवस्था मनीं आणिली ॥ मग हांसोनि आज्ञा घेतली ॥ युधिष्ठिराची ॥७३॥

ऐरावत उतराया मेदिनीं ॥ आह्मी सोपान करितों मार्गणीं ॥ ऐसी मागुती पत्रिका लिहूनी ॥ धाडिली पार्थे इंद्राकडे ॥७४॥

तो बाण इंद्रसभेंत पडिला ॥ सकळ वृत्तांत कळों आला ॥ मग ऐरावती श्रृंगारिला ॥ सन्नद्ध केला परिवार ॥७५॥

गणगंधर्व अष्टनायका ॥ श्रृंगारिल्या तत्क्षणीं देखा ॥ आतां चित्त देवोनि ऐका ॥ मूर्त्ति ऐरावतीची ॥७६॥

रुंद असे अर्ध योजन ॥ तीसयोजनें उंच जाण ॥ लांब शतपाडें परिमाण ॥ पर्वत जैसा ॥७७॥

तयाचीं वदनें येकशत ॥ मुखाप्रती आठआठ दंत ॥ दंतीं सरोवरें समस्त ॥ उदकपूर्ण ॥७८॥

तयांमाजी कमळें अपारें ॥ शतपत्रें सहस्त्रपत्रें ॥ तेथ अप्सरादि कलापात्रें ॥ करिती नृत्य ॥७९॥

मधुकर रुंजी घालिती ॥ आमोदसुगंध स्वीकारिती ॥ ऐसा इंद्राचा ऐरावती ॥ सिंधुजात गजेंद्र ॥८०॥

यापरि गणगंधर्वासहित ॥ इंद्रें पाठविला ऐरावत ॥ तंव पार्थे बांधिला शरीं सेत ॥ पायरिया अनुक्रमें ॥८१॥

ते अभंग विद्या पार्थाची ॥ सघनदाटी मार्गणांची ॥ विस्तारणा शरस्तोमाची ॥ असंख्यात परियेसा ॥८२॥

निशाणनादें वाद्यगजरीं ॥ अवघे उतरले धरणीवरी ॥ तो विस्मयो वर्तला नगरीं ॥ नरनारी राजयां ॥८३॥

भीष्मद्रोणादि संतोषले ॥ सामर्थ्य पार्थाचें वानिते जाहले ॥ ह्नणती विद्येचें रुप केलें ॥ पूर्वी होती बंदिखानीं ॥८४॥

ओंवाळीती अर्जुनासी ॥ ह्नणती धन्य हा सोमवंशीं ॥ तो महोत्साह गा कवणासी ॥ वर्णवेल जन्मेजया ॥८५॥

लगबगां विप्र आचार्य गेले ॥ त्यांहीं कुंतिये सांगितलें ॥ ह्नणती विधान करीं वहिलें ॥ बैसोनि ऐरावतीवरी ॥८६॥

मग सकळ विधान उपचार ॥ कुंतीये केले अपार ॥ वाणें दानें देवोनि द्विजवर ॥ केले सुखी सर्वही ॥८७॥

दुर्योधनाहूनि चौगुण ॥ युधिष्ठिरें वेंचिलें धन ॥ वस्त्रालंकार रत्न कण ॥ दीधलीं दानें कोटिवरी ॥ ॥८८॥

मग भीम आणि कुंती ॥ बैसविलीं ऐरावतीवरती ॥ वाद्यें लागली नेणों किती ॥ वेद पढती ब्राह्मण ॥८९॥

कलापात्रें नृत्य करिती ॥ नारद तुंबर गंधर्व गाती ॥ सुरकरी साधनें दाविती ॥ प्रकार नाना ॥९०॥

ऐशीं संभ्रमाच्या गजरीं ॥ वाणें देतसे घरोघरीं ॥ मग पातली मंदिरीं ॥ गांधारियेचे ॥९१॥

तयेसि वाण देवोनि प्रीतीं ॥ स्वगृहीं सुखें आली कुंती ॥ आनंद न माय त्रिजगतीं ॥ पावली ऐरावती प्रत्यक्ष ॥९२॥

मनीं खंती करी गांधारी ॥ कीं धन्य कुंती हे संसारीं ॥ धिक् जियाळें लोकाचारीं ॥ माझें निर्देवेचें ॥९३॥

माझे पुत्र येकशत ॥ जैसे सूकरी प्रसवे बहुत ॥ कीं सिंहिणीचा येक सुत ॥ करी घात कुंजरांचा ॥९४॥

तैसे कुंतीचे पांचजण ॥ सरी न पवे त्यांची त्रिभुवन ॥ मग हावोनि दीनवदन ॥ करी रुदन गांधारी ॥९५॥

ह्नणोनि निवांतचि राहिली ॥ इकडे कुंती स्वगृहीं आली ॥ नानोपचारें पूजा केली ॥ ऐरावतीची ॥९६।

तो जिये वाटां उतरला ॥ तियेचि वाटां पाठविला ॥ अमरावतीतें पावला ॥ गंधर्वादिकेंसी ॥९७॥

देव आनंदें सुरदुंदुभी ॥ वाजविते जाहले नभीं ॥ पुष्पवृष्टी करी लोभी ॥ सुरेश्वर ॥ ॥९८॥

असो हा सुखसोहळा पूर्ण ॥ जाहलें ऐरावतीआख्यान ॥ पुढील कथा ऐका गहन ॥ ह्नणे मधुकरकवी ॥ ॥९९॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबकमनोहरु ॥ ऐरावतीआख्यानप्रकारु ॥ एकविंशाध्यायीं कथियेला ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP