मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय १०

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय १०

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

जन्मेजय ह्मणे हो वेदमूर्तीं ॥ माझिये पूर्वजांची ख्याती ॥ तुह्मी सांगीतली मजप्रती ॥ ते ऐकोनि चित्तीं संतोषलों ॥१॥

आतां पुढील वंशचरित्रें ॥ मज सांगा जी सविस्तरें ॥ कीं वर देवोनि ब्रह्महरिहरें ॥ रक्षिलें कुळ आमुचें ॥२॥

मुनि ह्मणे गा भूपती ॥ तुझिये पूर्वजांची अगाध कीर्ती ॥ ऐकतां विस्मय होय चित्तीं ॥ सकळांचिये ॥३॥

तरे तीं दंडायुधें छत्तिस ॥ विधीनें दीधलीं होतीं सोमास ॥ ह्मणोनि पराक्रम बहुवस ॥ वाढला तुमचें वंशाचा ॥४॥

असो नारदपुराणींच्या अनुमता ॥ नळराजा भद्री बैसतां ॥ प्रधानादिकां जाहला पुसता सैन्यवृत्तांत ॥५॥

कीं पूर्वीं सैन्य बहुत होतें ॥ ऐसें आयकिलें निरुतें ॥ तरी काय जाहलें तें मातें ॥ सांगिजे आतां जी ॥६॥

प्रधान ह्मणती ऐकें कुमरा ॥ सोमें जिंकिलें सकळ नॄपवरां ॥ ह्मणोनि सेवकपणें अवधारा ॥ ओळंगती ते ॥७॥

तो देवीं राहविला स्वर्गभुवनीं ॥ पुरूरवा नातु धाडिला मेदिनीं ॥ तेणें दीधली पाठवणी ॥ सकळरायां ॥८॥

ते कोणीच न येती साह्यसी ॥ ह्मणोनि दळ थोडें परियेसी ॥ ऐसें ऐकोनियां मानसीं ॥ आवेशला नळ ॥९॥

ह्मणे सोम आमुचा पूर्वज असोनी ॥ स्वर्गीं राहविला देवगणीं ॥ तरी जावोनि स्वर्गभुवनीं ॥ जिंकीन देवां ॥१०॥

इंद्रचंद्रादि सकळ लोक ॥ क्षणें जिंकीन कैलासादिक ॥ मजसीं समरंगणीं त्र्यंबक ॥ पुरों न शके ॥११॥

मग ह्मणे प्रधानादिकांसी ॥ तुह्मीं लाजविलें सोमवंशासी ॥ ह्मणोनि हाकारिलें रायांसी ॥ युद्धोत्साहें ॥१२॥

तंव सप्तद्दीपींचे भूपाळ ॥ असंख्यात मिळालें दळ ॥ निशाणें वाजिन्नलीं बहळ ॥ तये वेळीं ॥१३॥

देव भाविती खचला मेरु ॥ व्यग्र ब्रह्माविष्णु शंकरु ॥ मग इंद्रे पाठविला ब्रह्माकुमरु ॥ तो समाचारु आणावया ॥१४॥

नळ पातला नगराबाहेरी ॥ तंव नारद आला हस्तनापुरीं ॥ रायें पूजितां सोपचारीं ॥ विधिनंदन पुसतसे ॥१५॥

नळा त्वां दळभारा मेळविलें ॥ ह्मणोनि त्रैलोक्य गजबजिलें ॥ तरीं सांग पां वहिलें ॥ जाणें असे कोठवरी ॥१६॥

येरु ह्मणे ऐकें मुनी ॥ मज कैलास घेणें समरंगणीं ॥ जिंकोनियां शूळपाणी ॥ दावीण करणी सुरवरां ॥१७॥

नारद ह्मणे ऐकें नळा ॥ तूं न करीं शंभूचा चाळा ॥ तो आधार असे सकळा ॥ ब्रह्मांडासी ॥१८॥

नळ ह्मणे अतिविशेष ॥ मज अगत्य घेणें कैलास ॥ शिवें राहविलें स्वर्गास ॥ सोमासि ह्मणोनी ॥१९॥

मग नारद तेथुनि निघाला ॥ जावोनि शिवासि भेटला ॥ सकळ वृत्तांत सांगितला ॥ नळरायाचा ॥२०॥

तेणें खळबळ जाहला कैलासीं ॥ ह्मणती थोर उठली विवशी ॥ तंव रुद्र ह्मणे नारदासी ॥ वेगें विष्णुसी जाणवावें ॥२१॥

मग नारद वैकुंठीं गेला ॥ वृत्तांत विष्णूसि जाणविला ॥ येरू ह्मणे उपावो रचिला ॥ असे तयासी ॥२२॥

तूं जाई आपुले स्थानीं ॥ काहीं भय न धरावें मनीं ॥ तो भेटों येतसे आह्मां लागुनी ॥ सोमानिमित्त ॥२३॥

असो येरीकडे रायें नळें ॥ प्रधानवर्गांप्रति पुसिलें ॥ पूर्वीं किती दळ मेळविलें ॥ होतें सोमरायें ॥२४॥

तंव सेनापती जाहला बोलता ॥ पूर्वींहूनि चतुर्गुण आतां ॥ दळ मिळालें नृपनाथा ॥ आपणाजवळी ॥२५॥

राव संतोषला हरिखा ॥ वस्त्रालंकार ॥ दीघलें सकळिकां ॥ सन्मान करोनि सैनिकां ॥ केलें सिद्ध ॥२६॥

वाद्यघोष गर्जिन्नले ॥ दळ पश्चिमेसी चालिलें ॥ तंव जन्मेजयें प्रश्निलें ॥ कीं पश्चिम कळे कैशी ॥२७॥

वैशंपायन ह्मणे गा भूपती ॥ पश्चिम कोणीच नेणती ॥ परि त्यासी पाठ वेदश्रुती ॥ ह्मणोनि जाणे नळ तो ॥२८॥

पश्चिमपंथें मेरूसि जावें ॥ हें पुराणमात्रीं कथिलें भावें ॥ तें ऋषिवाक्य असे ठावें ॥ कृतयुगापासोनी ॥२९॥

ह्मणोनि पश्चिमपंथें चालिला ॥ ब्रह्मांडगोळ थरारिला ॥ गंधमादन पर्वत लागला ॥ तळों उतरला मेळिकार ॥३०॥

तेथें राजा नृसिंहदास ॥ जेणें रणीं जिंकिला सुरेश ॥ तेथ वेढा पडिला चौपास ॥ तें दूतीं नृसिंहा जाणविलें ॥३१॥

जीजी परदळ थोर आलें ॥ त्यांहीं गिरिवरा वेढिलें ॥ तंव येरें शुद्धीसि पाठविलें॥ भाट देखा ॥३२॥

ते जावोनि भेटले नळासी ॥ मुजरा करोनि रायासी ॥ वर्णिते जाहले उभयवंशासी ॥ तंव नळरायें विचारिलें ॥३३॥

ठाकूर कोठोनि आले ॥ तंव नागरीं ह्मणितलें ॥ कीं नृसिंहरायें पाठविलें ॥ शुद्धी तुमची घ्यावया ॥३४॥

नळ ह्मणे सिंहनाम ॥ तरी कां नये करूं संग्राम ॥ वृथावागवी तसे नाम ॥ तंव भाट कोपोनि बोलिले ॥३५॥

राया सांडी ब्रीदावळी ॥ नृसिंहा ऐसा नाहीं बळी । जेणें तोषविला चंद्रमौळी ॥ तपोबळें ॥३६॥

ऐकतां कोप आला नळा ॥ ह्मणे घरारे घरा तोंडाळा ॥ येरु येवोनि तये वेळां ॥ सांगती आपुले स्वामीसी ॥३७॥

ऐकतां जाहला सकोप ॥ वेमें उठिला नृसिंहभूप ॥ निशाणनादें सैन्याधिप ॥ चालिला समभारें ॥३८॥

त्या चातुरंमाचेनि भारें ॥ कंप सुटला वसुंधरे ॥ आणि सुटला वाद्यगजरें ॥ खळबळाट ॥३९॥

तंव वर्तला येक चमत्कार ॥ नघुक नामें नळकुमर ॥ तो पित्यासि झुंजला वीर ॥ समभारेंसीं ॥४०॥

जन्मेजय ह्मणे हो मुनी ॥ हें विपरीत ऐकिलें कानीं ॥ तरी सांगिजे विस्तारोनी ॥ मग मुनि ह्मणे ऐक ॥४१॥

नळ नगराहूनि निघतां ॥ गुर्विणी होती तयाची कांता ॥ ती पुत्र प्रसवली संकेता ॥ पूर्णदिवशीं ॥४२॥

अल्परायें उत्साहा केलें ॥ पुत्रा नघुक नाम ठेविलें ॥ दिवसे मासें वाढिन्नलें ॥ तें बाळक ॥४३॥

तो पांचा वरुषाचा जाहला ॥ आजानुबाहो बळें आथिला ॥ मग पितयाचा वृत्तात पुसिला ॥ तो सांगितला अल्परायें ॥४४॥

ह्मणे बा नळ तुझा पिता ॥ तेणें ऐकोनि पूर्वजांची कथा ॥ कीं स्वर्ग घेतला ते व्यवस्था ॥ मग निघाला सकोप ॥४५॥

ह्मणे पूर्वजीं स्वर्ग जिंकिला ॥ तरी मीं स्वर्गचि घेईन वहिला ॥ मग सप्तद्दीपींचा भूपाळमेळा ॥ घेवोनि गेला पश्चिमे ॥४६॥

तंव नघुक ह्मणे जी ताता ॥ मोही तेथें जाईन आतां ॥ आज्ञा दीजे सर्वथा ॥ तंव ह्मणे अल्यरावो ॥४७॥

तूं पांचावरूषांचेम लेंकरूं ॥ केविं बोलतोसि बीडवारु ॥ येरू ह्मणे मेळवोनि दळभारु ॥ जाईन मी ॥४८॥

रायें आज्ञा दिधली नघुका ॥ मग तो श्रूंगारला देखा ॥ करीं घेवोनि शरघनुषा ॥ चढला रथीं ॥४९॥

सैन्य मेळविलें अपरिमित ॥ तंव जन्मेजय प्रश्न करित ॥ कीं नळासवें गेले समस्त ॥ तरी येणें कैसें मिळविलें ॥५०॥

मग वैशंपायन बोले ॥ सप्तद्दीपपती नळें नेले ॥ परि येणें जे जे मेळविले ॥ त ऐकें आतं ॥५१॥

नघुकें हाकारिलें भाटांसी ॥ पाठविले देशोदेशीं ॥ बोलावोनि आणिलें रायांसी ॥ मेळिकारा ॥५२॥

ते जंबुद्दीपींचे राजे समग्र ॥ घेवोनि आले सैन्य भार ॥ त्यांची नांवें पृथकाकार ॥ ऐकें राया ॥५३॥

नागोरदेशींचा सुबाहो ॥ चौदालक्ष दळसमूहो ॥ गाजिनदेशींचा त्रिमलारावो ॥ लक्ष येक दळभारू ॥५४॥

परमहंस गांधरदेशींचा ॥ वीससहस्त्र भार तयाचा ॥ सुभटराव भोटदेशींचा ॥ आला सहस्त्रयेकेंसीं ॥५५॥

अवंतीचा अजमेरू ॥ त्याचा सोळासहस्त्र दळभारू ॥ कनोजीचा कनकसेनवीरू ॥ सतरासहस्त्रेंसीं पातला ॥५६॥

पिरुयवन मुद्रलदेशीचा ॥ चौसष्टसहस्त्र परिवार त्याचा ॥ आला कल्याण काश्मीरिंचा ॥ नवसहस्त्रेंसीं ॥५७॥

तपोधन तलेगेश्वरू ॥ तेतीससहस्त्र दळभारू ॥ कोकणदेशींच्या कल्परुद्रु ॥ दळ चौदालक्ष पैं ॥५८॥

गौडदेशींचा गंगाधर ॥ तीससहस्त्र परिवार ॥ खुरासनींचा पासापीर ॥ दळ सहस्त्र द्दादश ॥५९॥

जालंधरींचा जालंधर ॥ बाहात्तरसहस्त्र परिवार ॥ कालिंदीरींचा कालिंद्र ॥ आला चौदासहस्त्रेंसीं ॥६०॥

सिद्धरस सिंधुदेशींचा ॥ लक्ष्फ़ येक परिवार त्याचा ॥ रावणकुंभकर्ण लंकेचा ॥ आले अठराक्षोणींसीं ॥६१॥

तंव जन्मेजय संभ्रमें पुसे ॥ रावणकुंभकर्ण आले कैसे ॥ मग वैशंपायन सांगतसे ॥ परियेसीं भारता ॥६२॥

पूर्वीं सोमरायाचा पुरुषार्थ ॥ असे रावणादिकां विदित ॥ आणि दळभार अगणित ॥ ह्मणोनि लघुत्वें वोळगंती ॥६३॥

जन्मेजयें मागुतीं पुसिलें ॥ कीं लंकेचें वृत्त कैसें जाहलें ॥ मग वैशंपायन बोले ॥ ऐकें राया ॥६४॥

पूर्वीं गरूडा जन्म जाहलें ॥ तेणें सत्तावीसकुळें नाग भक्षिलें ॥ तें पूर्वस्तबकीं असे कथिलें ॥ गरुडाख्यान ॥६५॥

मग तो लंकेशिखरीं बैसला ॥ पादभारें त्रिकुट जाहला ॥ परि तो ओसचि होता राहिला ॥ बहुतकाळ ॥६६॥

तेथें राक्षसांचेनि भेणें ॥ नाहीं मनुष्यमात्रा जाणें ॥ तंव जन्मेजय पुनः ह्मणे ॥ कोठोनि येणें राक्षसां ॥६७॥

वैशंपायन ह्मणे परियेस ॥ क्रौचद्दीपीं होते राक्षस ॥ तयां प्रसन्न होवोनि महेश ॥ स्थान दीधलें लंकेचें ॥६८॥

रावणें स्वशिरें वाहोनी ॥ संतोषविला शूळपाणी ॥ चौदाही चौकड्या ह्मणोनी ॥ केलें राज्य लंकेचें ॥६९॥

ते रावण कुंभकर्ण बिभीषण ॥ आले राक्षस दळ घेवोन ॥ कायवाडदेशींचा नीलवर्ण ॥ आला तीससहस्त्रेंसीं ॥७०॥

चीनदेशींचा चतुरंग ॥ सवालक्ष सैन्ये अभंग ॥ महाचीनींचा मंडलिक चांग ॥ आल सवालक्षेंसीं ॥७१॥

बळभद्र भोटदेशींचा ॥ लक्ष येक परिवार त्याचा ॥ नीलकंठ कलिंगदेशींचा ॥ आला सवालक्षदळेंसी ॥७२॥

चांगदेवो वैराटींचा ॥ छत्तीससहस्त्र मेळा तयाचा ॥ मकरध्वज मुटकुणींचा ॥ बारासहस्त्रेसीं ॥७३॥

माळव देशींचा मळधर ॥ अठरालक्षसैन्यपरिवार ॥ सत्तरसहस्त्रेंसिं नागार्जुनवीर ॥ आला गुजराथींचा ॥७४॥

सोरटींचा सोमनाथ ॥ आला तीससहस्त्रासहित ॥ हर्षण नवसहस्त्रें सहित ॥ आला अहिरेशींचा ॥७५॥

स्त्रीदेशींची पिंगळावती ॥ अठरासहस्त्रीं मिरवती ॥ बर्बरदेशींचा बळवंत भूपती ॥ आला दशसहस्त्रेंसीं ॥७६॥

मारू राजा महाबाहो ॥ त्याचा येकलक्ष सैन्यवावो ॥ शंखवर्ण सिंहलरावो ॥ आला पांचलक्षेंसें ॥७७॥

विप्रती वसुपर्वतनायक ॥ आला नवसहस्त्रेंसीं अधिक ॥ एकचरणदेशींचा एकाक्ष ॥ आला तीससहस्त्रेंसीं ॥७८॥

उष्ट्रमुख महालिंगनाथ ॥ विसांसहस्त्रेसीं शोभत ॥ गदाधर अश्र्वमुखयुक्त ॥ बहात्तरसहस्रें ॥७९॥

कपिलाक्ष वानरदेशींचा ॥ नवसहस्र परिवार तयाचा ॥ सूकरमुखी खरमर्दनाचा ॥ भार सत्तरसहस्त्र ॥८०॥

हयमुख ते हरिहर ॥ एक्यायशींसहस्त्र दळभार ॥ येवोनि केला नमस्कार ॥ नघुकासि देखा ॥८१॥

ते नघुकें मानसन्मानें ॥ वस्त्रालंकारीं तांबुलदानें ॥ संतोषविले रायराणे ॥ देशोदेशीचे ॥८२॥

मग ते आरुढोनि रथीं ॥ त्वरें निघाले पश्चिमपंथीं ॥ निशाणें भेरीं गर्जती ॥ भारें क्षिती खालावली ॥८३॥

असो नघुक मार्गीं लागला ॥ तंव येरकिडे नवलाव जाहला ॥ नृसिंह दळभारें पातला ॥ तो देखिला नळरायें ॥८४॥

नळाचे वीर संसारले ॥ पाहिलें पायदळ ॥ उठावलें ॥ थोर घडधडाट प्रवर्तले ॥ बाण गोळे भिंडिमाळा ॥८५॥

नृसिंहाचें पायदळ ॥ घाई जाहलें बेंबिळ ॥ मग उठावले भूपाळ ॥ अश्वारुढ पैं ॥८६॥

ते नळाच्या असिवारीं ॥ खोंचिले राउत नानाशस्त्रीं ॥ तेवेळीं लोटले करी ॥ मदोन्मत्त ॥८७॥

कुंजरांवरीं कुंजर ॥ उठावले करीत मार ॥ तेथें धडमुंडांचे चूर ॥ होती शुंडादडें ॥८८॥

त्यांचें पाठीं रहंवर ॥ उठावले रथिये वीर ॥ तेव्हा बाणजाळीं अंबर ॥ दाटलें भूमिपरियंत ॥८९॥

चातुरंगा संग्राम जाहला ॥ तो हा संक्षेपें सांगीतला ॥ अशुद्धाचा पूर लोटला ॥ भू दाटली धडमुंडीं ॥९०॥

सातवरुषेवरी देखा ॥ युद्ध जाहलें उभयसैनिकां ॥ नळ राजा बैसला आइका ॥ वेढोनि पर्वतासी ॥९१॥

तंव दक्षिणदिशेकडोनि थोर ॥ येतां देखिला दळभार ॥ नळ धाविन्नला सपरिवार ॥ संचारले चातुरंग ॥९२॥

आणि उत्तरेकडोनि नृसिंहनाथ ॥ पातला हाकित पाचारित ॥ मध्यें नळ सैन्यासहित ॥ देवढे दोनी ॥९३॥

नळ मनीं करीं विचार ॥ हे नृसिंहाचेचि दोन्ही भार ॥ नघुक ह्मणे हें परदळ थोर ॥ ह्मणोनि मारा पेटले ॥९४॥

येरयेरांसी मिसळले ॥ घाई छिन्नभिन्न जाहले ॥ नळें दळ दोंठायीं केलें ॥ येकें साहिलें नृसिंहा ॥९५॥

क्रौंचद्दीपींचा दळाधिपती ॥ तेणे नृसिंह साहिला निर्घातीं ॥ आणि उठला नळभूपती ॥ दक्षिणदळावरी ॥९६॥

थोर जाहली केशधरणी ॥ अशुत्धें वोहळली मेदिनी । ते सांगता युद्धवाणी ॥ बोबडेल जिव्हा ॥९७॥

परि नळाचें दळ समग्र ॥ छन्नभिन्न जाहलें थोर ॥ तेव्हां घेवोनि धनुष्यशर ॥ विधिंता जाहला नळराया ॥९८॥

ऐसें देखोनियां नधुकें ॥ शर निवारिलें महातवकें ॥ सकळही तोडिली लक्षें ॥ नळपितयाचीं ॥९९॥

नळें कोपोनि संधान केलें ॥ मंत्रोनि अग्निशर सोडिले ॥ ते नघुकें निवारिले ॥ वरुणास्त्रें देखा ।१००॥

नळें मारुतास्त्र प्रेरिलें ॥ येरें पर्वतास्त्र मोकलिलें ॥ नळें तयाचे कुटके केले ॥ वज्रास्त्रेम पै ॥१॥

नघुकें इंद्रास्त्र सोडिलें ॥ तंव अनंतकोटी इंद्र जाहले ॥ ते सकळ वज्रा घेवोनि गेले ॥ गगनपोकळीं ॥२॥

ऐसे शस्त्रास्त्रीं झुजिन्नले ॥ मन नघुकें काय केलें ॥ गदेसि हाती वसविलें ॥ उतरला रथाखाली ॥३॥

धाविन्नला चरण चारी ॥ घाय दीधला मयुरांवरी ॥ नळपिता हाणिला निकरीं ॥ ह्रुदयीं देखा ॥४॥

मूर्छागत पाडिला नळ ॥ थोर जाहला हलकल्लोळ ॥ तंव रावणें वोलखिला भूपाळ ॥ मग नघुकासि बोलिला ॥५॥

अरे हा नळ तुझा पिता ॥ कैसा झुंजलासि नेणता ॥ आतां लोटांगण सर्वथा ॥ घालीं यासी ॥६॥

ऐसी ऐकोनियां बोली ॥ नघुक दुखावला तियेवेळीं ॥ मग लागला चरनकमळीं ॥ नळपितयाचे ॥७॥

नळरायासि ह्मणे रावण ॥ हा नघुक तुझा नंदन ॥ आगळा जाहला तुजहुन ॥ संसार धन्य दोघांचा ॥८॥

राया तूं सभाग्यनरु ॥ पोटीं जन्मला पुत्र झुंजारु ॥ आतां खेद नको करूं ॥ तंव नळे पुसिलें रावणा ॥९॥

हा कैसा जाहला सांग पां ॥ रावण ह्मणे राजटिळका ॥ गरोदर होती चकोरकमाळिकातूं निघालासि तैं ॥११०॥

तियेसि जाहला हा कुमर ॥ तुझा पुसिला समाचार ॥ येरीं सांगितला समग्र ॥ तवगमनाचा ॥११॥

तो हा दळ मेळवूनि आला ॥ परि तुजसवें येथें झुंजला ॥ ऐसा विचार ऐकिला ॥ मग संतोषला नळराव ॥१२॥

तो बत्तीसलक्षणी कुमर ॥ देखोनि आलिंगी नृपवर ॥ पुढें नृसिंहाचा समाचार ॥ आणिला मनीं ।१३॥

विडा मागोनि नळापाशी ॥ नघुक चढला स्वरथासी ॥ सारथी केलें रावणासी ॥ चालिला नृसिंहावरी ॥१४॥

रावणें रथ प्रेरिला ॥ दळभारेंसी उपमला ॥ गगनपंथें चालिला ॥ कैलासासी ॥१५॥

ह्मणे नृसिंह केतुलें बापुडें ॥ आधीं कैलास घेऊं निवाडें ॥ तें देखोनियां वेगाढें ॥ नारद गेला कैलासी ॥१६॥

शिवासि वृत्तांत सांगीतला ॥ कीं नळें गंधमादन वेढिला ॥ तयाचा पुत्र नघुक आल ॥ घ्यावया कैलास ॥१७॥

अजूनि काय गा निश्चित ॥ ऐकोनि गजबजिला उमाकांत ॥ मग नारदासि पुसत ॥ कैसा विचार करावा ॥१८॥

नारद ह्मणे परियेसी ॥ आपण जाऊं वैकुंठासी ॥ मग शीघ्र गेले विष्णुपाशीं ॥ शिवनारद ॥१९॥

शिवें स्तबिला अनंत ॥ सांगीतला सर्व वृत्तांत ॥ तंव ब्रह्मलोकीं ब्रह्मसुत ॥ गेला झडकरी ॥१२०॥

अवघा वृत्तांत श्रुत केला ॥ ऐकोनि विधी वैकुंठा आला ॥ शिवा केशवा भेटला ॥ मग स्तविला नारायण ॥२१॥

तैं ब्रह्माशंकर ह्मणती ॥ जयजयाजी लक्ष्मीपती ॥ तूं रक्षिता अवघड आकांती ॥ आह्मा समस्तां ॥२२॥

विष्णु ह्मणे ब्रह्मयाशिवा ॥ काय वृत्तात तो सांगावा ॥ येरीं श्रुत केला आघवा ॥ नळनघुकांचा ॥२३॥

ते ऐकोनि व्यवस्थाः अनंतें स्मारिलें वैनता ॥ तंव तो येवोनि शिघ्रता ॥ त्रिमूर्तीसीं वंदिलें ॥२४॥

विष्णु ह्मणे विनतात्मजा ॥ सोमवंशीचा नळराजा ॥ तेणें गंधमादन वेढिला वोजा ॥ घेवों पाहें कैलास ॥२५॥

त्या नळाचा नघुक कुमर ॥ अंतरिक्ष येतो सपरिवार ॥ तरी तो इलावृतखंडीं सत्वर ॥ पाडावा तुवा ॥२६॥

गरुड उडला झडकरी ॥ वेगें चालिला गगनांतरीं ॥ तंव नघुक सैन्यपरिवारीं ॥ देखिला येतां ॥२७॥

तेव्हां निजरूप प्रकाशिलें ॥ पक्ष अठ्ठेचाळीसगावें विस्तारले ॥ मग गरुडें झडपिलें ॥ ससैन्य नघुका ॥२८॥

एके करीं सैन्यपरिवार ॥ दुजे करीं नघुकवीर ॥ घेवोनि उडाल वेगवत्तर ॥ जात इलावृतखंडीं ॥२९॥

तंव नवलावो जाहला ॥ कुंभकर्ण हातौनि निसटला ॥ तो नृसिंहसैन्यावरी पडिला ॥ तेणें चुरला सैन्यभार ॥१३०॥

नृसिंह वांचला रथेसीं ॥ तो झूंजो चालिला आवेशी ॥ शेष राहिले सैन्येंसी ॥ नळावरी तेघवां ॥३१॥

थोर धडधडाट जाहला ॥ क्रौचद्दींपींचा दळवैया उडविला ॥ तंव कुंभकर्ण उठावला ॥ पाचारित मध्येंचीं ॥३२॥

नृसिंहदळभार मोडला ॥ तेव्हा दळवैयें ओळखिला ॥ ह्मणे रावण नघुक कोठें सांडिला ॥ कुंभकर्णा ॥३३॥

येर गरुडाचा वृत्तांत ॥ सांगितला असे समस्त ॥ मग दळवैया सहित ॥ भेटले नळासी ॥३४॥

नंतरें गरुडाची व्यवस्था ॥ सांगीतली नळनाथा ॥ ह्मणे नघुकादिकांस समस्तां ॥ उडविलें गरुडें ॥३५॥

ऐकोनि हाहाःकार जाहला ॥ नळें आकांत माडिला ॥ करूणारस मोकलिला ॥ महादुःखे विव्हळ ॥३६॥

मग समस्त राजे मिळाले ॥ त्यांहीं नळासि संबोखिलें ॥ ह्मणती होणार तें जाहलें ॥ त्वां मांडिलें कां रुदन ॥३७॥

नघुकें शंकर विरोधिला ॥ ह्मणोनि हा अनर्थ जाहला ॥ आतां पर्वत घेवोनि वहिला ॥ शुद्धी करुं नघुकाची ॥३८॥

तें ऐकोनियां नळें ॥ चातुरंग पालणविलें ॥ निशाणनादें गर्जिन्नलें ॥ भुमंडळ ॥३९॥

तेव्हां नृसिंहे काय केलें ॥ आपुलें दळ सन्नद्धविलें ॥ मग वाद्यघोषें चालिले ॥ संग्रामासी ॥१४०॥

तंव नळें तया वेळा ॥ भारू चौठायीं वाटिला ॥ आपण दक्षिणे राहिला ॥ स्वदळेसीं ॥४१॥

कुंभकर्ण राक्षसेंसीं ॥ झोंबिन्नला पश्चिमेसी ॥ मृगरावो उत्तरेसीं ॥ झोंबिन्नला दळभारें ॥४२॥

देववेसराचा नातु ॥ गेला पूर्वदिशे त्वरितु ॥ वेढोनि गंधमादन पर्वतु ॥ सर्वलागी मांडिली ॥४३॥

नृसिंहरावो चालिला ॥ तेणें नळ पाचारिला ॥ ह्मणे तुवां पर्वत वेढिला ॥ सातवरुषें ॥४४॥

नळराव ह्मणे आतां ॥ निर्वाण करणें सर्वथा ॥ गोत्रकुटुंबेसीं सर्वथा । बांधीन तुज ॥४५॥

नृसिंह ह्मणे न करीं बडिवार ॥ तुवां कोणता घेतला गिरिवर ॥ झुंजों आणिलें लेंकुर ॥ तया पक्षींद्र घेवोनि गेला ॥४६॥

निर्लज्जा अजोनि तरीं ॥ मुरडोनि जाई हस्तनापुरीं ॥ तंव नळ ह्मणे सांवरीं ॥ आपणेया नृसिंहा ॥४७॥

नळें सोडिले तीव्र शर ॥ त्याहीं खोंचले द्ळभार ॥ व्यापिलें भूमी आणि अंबर ॥ अंधकार प्रवर्तला ॥४८॥

मग नृसिंह तत्क्षणीं ॥ शरजाळ तोडिलें बाणीं ॥ तंव नळें घातलें अभिमंत्रोनी ॥ चामुंडास्त्र ॥४९॥

चामुंडा जाहल्या अनंतकोटी ॥ त्यांहीं सैन्य घातलें पोटीं ॥ मागुती रुद्रास्त्र नेहटीं ॥ प्रेरिलें नृसिंह ॥१५०॥

तेणें उडविलें चामुंडास्त्र ॥ तंव नळें सोडिलें विघ्नशर ॥ विघ्ने चालिलीं शतसहस्त्र ॥ शीघ्ररुद्रास्त्र भंगलें ॥५१॥

मागुती नृसिंहें काय केलें ॥ वैष्णवास्त्रा प्रेरिलें ॥ विष्णु कोटीवरी प्रकटले ॥ पळ सुटला विघ्नासी ॥५२॥

मग नळें पांच शर ॥ मंत्रोनियां प्रेरिले शीघ्र ॥ एक बाण असे सूर्यास्त्र ॥ मोहनास्त्र दूसरा ॥५३॥

इंद्रास्त्र तो तिसरा बाण ॥ ब्रह्मास्त्र जाणिजे चौथा मार्गण ॥ पांचवा तो त्रिनयन ॥ प्रकटले कोटीवंरी ॥५४॥

तंव नॄसिंहें कर जोडिले ॥ अर्कशंकरादिकां स्तविलें ॥ ह्मणे तुह्मांसि काजीं घातलें ॥ काय ह्मणवोनी ॥५५॥

देव नृसिंहसि ह्मणती ॥ आह्मां आकर्षिलें मंत्रशक्ती ॥ परि त्वां संग्राम बाणघातीं ॥ करितां आह्मी मावळूं ॥५६॥

मग नृसिंह प्रेरिलें शर ॥ तेणें देव लोपले शीघ्र ॥ इकडे नळ करी विचार ॥ भला मार वीराचा ॥५७॥

आश्चर्य समस्तां वर्तलें ॥ नृसिंहें सिंहनादा केलें ॥ ऐसें युद्ध थोर जाहलें ॥ शस्त्रास्त्रेंसी ॥५८॥

असो येरीकडे वेगीं ॥ वीरीं केली सर्वलागी ॥ तेथें कुंभकर्णादि अभंगीं ॥ घेतले शिखरा ॥५९॥

सिंहानादें अनंत भेरी ॥ राक्षसीं वाजविल्या शिकरीं ॥ तेणें खलबळ जाहली नगरीं ॥ कीं घेतला गिरी पारकीं ॥१६०॥

ऐकोनि नृसिंह गजबजिला ॥ मुखचंद्र संकोचला ॥ प्रधान ह्मणे घेतला ॥ पर्वत आपुला कुंभकर्णें ॥६१॥

तेव्हां ह्मणे नृसिंह रावो ॥ आतां पळाया नाहीं ठावो ॥ बाप माझे झुंज घ्याहो ॥ जीवें जावों गिरिसाठीं ॥६२॥

ऐसा करूनि विचार ॥ चातु रंगेंसीं उठिला वीर ॥ गदा घेवोनियां शीघ्र ॥ चराणाचाली चालिला ॥६३॥

तें नळवीरें देखोनी ॥ चालिला स्वरथ सांडोनी ॥ गदे गदेसीं झगटणी ॥ जाहला टणटणाट ॥६४॥

परि नळाच्या महावीरीं । चातुरंगा केली बोहरी ॥ तंव नृसिंहा मस्तकावरी ॥ हाणितलें नळें ॥६५॥

गिरगिरी येवोनि भूमीं पडिला ॥ नळें कवळोनियां धरिला ॥ मागुतेहातीं बांधिला ॥ मग आणिला स्वसैन्यीं ॥६६॥

आनंदें वाजलें निशाण ॥ नांदें गर्जिन्नलें गगन ॥ नगर लुटोनि मारिलें सैन्य ॥ कुंभकर्णें येरीकडे ॥६७॥

सकळ संपत्ती घेउनी ॥ प्रर्वत आपुला करोनिई ॥ नळाजवळी आला तत्क्षणीं ॥ कुंभकर्ण ॥६८॥

पूर्वोत्तरेचे दळभार ॥ येवोनि नळा करिती जोहर ॥ रायें सन्मानिले समग्र ॥ वस्त्रालंकार देवोनियां ॥६९॥

मग नळें काय केलें ॥ नृसिंहासी सोडविलें ॥ वस्त्रालंकारीं गौरविलें ॥ संबोखिलें नानापरी ॥१७०॥

तेथें सभा घनबटली ॥ नळाची कीर्ति विस्तारली ॥ परि लोक करिताती बोली ॥ कां पां नळ निश्चिंत ॥७१॥

नकरितां शुद्धी स्वपुत्राची ॥ हा कैसा जाईल स्वर्गासिची ॥ दुष्ट बुद्धी या रायाची ॥ नाहीं दुःख पुत्राचें ॥७२॥

येणें धरिला नूपनाथा ॥ त्याचा संदेह थोर वाटत ॥ काहीं उपाव ॥ उमाकांत ॥ कीं श्रीअनंत रचील ॥७३॥

ऐसें सभेसि बोलती ॥ तंव प्रधान बोले नळाप्रती ॥ तें पुढें ऐकावें श्रोतीं ॥ ह्मणे मधुकर कवी ॥७४॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ अष्टमस्तबक मनोहरू ॥ नळनृसिंहसंग्रामप्रकरू ॥ दशमोऽध्यायीं कथियेला ॥१७५॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP