मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय ३२

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय ३२

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

जन्मेजयो मुनीसि विनवी ॥ स्वामी अग्रकथा सांगावी ॥ कैसी हरिली सुभद्रादेवी ॥ पंदुनंदनें ॥१॥

मग ह्नणे मुनीश्वर ॥ कीं सुभद्राहरणप्रकारु ॥ पंचमस्तबकीं समग्र ॥ कथिला असे ॥२॥

परि ग्रंथसंबंधा निमित्तें ॥ सांगतों संकलितमतें ॥ नानाग्रंथकथायुक्तें ॥ मतांतरभेदें ॥३॥

असो कापडियाचेनि वेषें ॥ पार्थ शंखोद्धारीं बैसलासे ॥ तें जाणोनियां परेशें ॥ बिजें केलें त्याजवळी ॥४॥

परस्परें भेटी जाहली ॥ पार्थे चरणकमळें वंदिलीं ॥ मग सन्मनोनि वनमाळीं ॥ स्वमंदिरीं आणिला ॥५॥

तेथें करोनि येकांत ॥ पार्थासि ह्नणे श्रीअनंत ॥ कीं अनर्थ केलासे अत्यंत ॥ संकर्षणें ॥६॥

म्यां सुभद्रा दीधली तूतें ॥ तें अमान्य करोनि निरुते ॥ संकर्षणें दुर्योधनातें ॥ दीधली पैं ॥७॥

तरी देखतां समस्तयादवां ॥ सुभद्रादेवी हरावी तुवां ॥ मोहनी घालोनियां सर्वा ॥ जिंकावें समरी ॥८॥

गोवर्धनीं इंद्रपूजेसी ॥ जाणें होईल समस्तांसी ॥ मी रथ देईन तुह्मासी ॥ राहोनि मागें ॥९॥

सुभद्रा तुज दाखवीन ॥ दोघांचें मानवीन मन ॥ पार्थ ह्नणे आज्ञा प्रमाण ॥ वर्तणें मज ॥१०॥

मग यतिभोजना करोनि आयती ॥ सुभद्रे बोलावोनि श्रीपती ॥ ह्नणे पार्थे वाहूनि नेतां रथीं ॥ तुवां जावें उगलेंची ॥११॥

वरिले पंक्तीं बैसला भोजनीं ॥ तो बरवा पाहें न्याहाळोनी ॥ तें सुभद्रेनें आणितां मनीं ॥ मग पंक्तीं मांडिल्या ॥१२॥

पांतिकर सन्मानिले ॥ अनुक्रमें बैसविले ॥ अर्जुनयतीसि बैसविलें ॥ पहिले पंक्ती ॥१३॥

आनंदें आरोगणा करिती ॥ कृष्णअंतुरिया पाहती ॥ सुभद्रा न्याहाळी अतिप्रीतीं ॥ हर्ष चित्तीं उचंबळे ॥१४॥

पार्थेही सुभद्रा देखिली ॥ दोघांची येकदृष्टी जाहली ॥ मदनभूली पडिन्नली ॥ जाकळिलीं विंरहज्वरें ॥१५॥

असो आरोगणा सारोन ॥ शंखोद्धारा गेला अर्जुन ॥ अवस्थाभूत जाहला मदन ॥ उभयवर्गी ॥१६॥

मग उदेलिया दिनमणी ॥ सकळसामुग्री घेवोनी ॥ यादव चालिले गोवर्धनीं ॥ इंद्रपूजेसी ॥१७॥

बलभद्र कृष्णाजवळी आला ॥ ह्नणे इंद्रपूजेसि चालें वहिला ॥ कृष्ण ह्नणे तिये वेळां ॥ तुह्मीं जावें सकुटुंब ॥१८॥

कांहीं कार्य असें तें सारोनी ॥ मी शीघ्र येतों मागोनी ॥ येरु निघाला घेवोनी ॥ सकळ अंतःपुरें ॥१९॥

पायद अश्व गज रथ ॥ यादव नरनारी समस्त ॥ वाद्यगजरें सैन्य जात ॥ हलकल्लोळें ॥२०॥

पार्थ आला कृष्णाजवळी ॥ रथ सांजोनि देत वनमाळी ॥ येरु चालिल तिये वेळीं ॥ दृष्टीं सुवोनि यादवां ॥२१॥

तये अंतःपुरांमाझारी ॥ सुभद्रा सुखासनाभीतरीं ॥ गुढारोनियां नानाकुसरी ॥ असे जात ॥२२॥

सुभद्रा बाहेर काढोनि वदन ॥ जेव्हां करी अवलोकन ॥ तेव्हां रथ वेगें लोटोन ॥ पातला पार्थ ॥२३॥

तेणें सुभद्रा वाहूनि रथीं ॥ वारु हाकिले शीघ्रगती ॥ तंव हाहाःकार जाहला अती ॥ यादवांमाजी ॥२४॥

सुभद्रा हरिली रे हरिली ॥ यादवसेना संसारली ॥ पैल सुभद्रा ह्नणती नेली ॥ सन्यासियें ॥२५॥

तंव अतिरथी महारथी ॥ चातुरंग सेनापती ॥ वोडवती शीघ्रगती ॥ धनुर्धर अर्जुन ॥२६॥

ह्नणती अरे अरे कापाडिया ॥ तुवां संन्यास निंदिला वायां ॥ अभिलाषिसी परस्त्रिया ॥ कैसा आपणा रक्षिसी ॥२७॥

तेव्हां रथ मुरडोनि पार्थ ॥ यादवांसी काय बोलत ॥ वायां न करा रे पुरुषार्थ ॥ येक अनंतचि बळियाढा ॥२८॥

तयावांचोनि सर्व तुह्मी ॥ मशकवत जाणतों आह्मीं ॥ ऐसी ऐकोनि शब्दोमीं ॥ उठावले यादव ॥२९॥

शस्त्रअस्त्रें असंख्यातें ॥ वीर वर्षले निर्घातें ॥ तेव्हां न दिसे अर्जुन तेथें ॥ जाहला हाहाःकार ॥३०॥

परि अर्जुनें तत्क्षणीं ॥ शस्त्रास्त्रें तोडिलीं बाणीं ॥ मग घातली मोहिनी ॥ यादव पाडिले निद्रिस्थ ॥३१॥

अश्व गज रथ पायद ॥ महावीर सकळ योध ॥ उलडले नानाविध ॥ धरणियेवरी ॥३२॥

देखतां गाहिंवरली सुभद्रा ॥ ह्नने उणें आलें यादववीरां ॥ पाडिलें मुख्य बळिभद्रा ॥ मज पापिणीनिमित्तें ॥३३॥

आतां करावा देहपात ॥ ऐसें ऐकोनि ह्नणे पार्थ ॥ कीं हा मोहनीचा प्रवर्त ॥ नकरीं चिंत्ता कामिनी ॥३४॥

मी आतांचि उठवितों यांसी ॥ परि हे फिरोनि झुंजती मजसी ॥ आपण जावों मग हषीकेशी ॥ उठवील यांतें ॥३५॥

यावरी सुभद्रा देवी विनवी ॥ कीं मज प्रचिती दाखवावी ॥ ह्नणोनि सारथियातेंचि उठवी ॥ धनुर्धर तो ॥३६॥

ऐसा चमत्कार देखोनी ॥ सुभद्रा आनंदली मनीं ॥ तेव्हां पार्थ बोलिल वचनीं ॥ त्या सारथ्यासी ॥३७॥

अरे भ्रम फेडिला अवघ्यांच ॥ मी अर्जुन पुत्र पंडूचा ॥ ऐसें ह्नणोनि इंद्रप्रस्थाचा ॥ धरिला मार्ग ॥३८॥

मागुती येवोनि गोविंद ॥ थोर देखतसे विनोद ॥ मग मोहनी काढोनि परमानंद ॥ करी सावध सकळांसी ॥३९॥

यादव ह्नणती श्रीकृष्णासी ॥ संन्यासियें हरिलें सुभद्रेसी ॥ तूं कोठें गेलहोतासी ॥ आह्मां हे गती केली तेणें ॥४०॥

तंव सारथी ह्नणे तयां ॥ तो सन्यासिवेषें धनंजया ॥ बळदेव ह्नणे कोपोनियां ॥ हें कापट्य कृष्णाचें ॥४१॥

कौशाल्य करोनि खादला मान ॥ कन्या नेवविली रथ देऊन ॥ तंव बोलिला जगज्जीवन ॥ हा बोल आह्मां कासया ॥४२॥

तुह्मां समस्तां असतां येथें ॥ कन्य हरोनि नेली पार्थे ॥ जरी मी असतों तरी निरुतें ॥ मजलागींही जिंकिता ॥४३॥

बळभद्र ह्नने उगाचि जाई ॥ सुभद्रेसी घेवोनि येई ॥ कृष्ण ह्नणे तो माझा काई ॥ देईल ऐसें न वाटे ॥४४॥

म्यांचि तयासि होती दीधली ॥ तुह्मीं दुर्योधनासि देवों केली ॥ पार्थे तीर्थयात्रा मांडिली ॥ येणें निमित्तें ॥४५॥

थोर प्रयासही करोनी ॥ कन्य तेणें नेली हिरोनी ॥ आणि तुह्मांतें जिंकिलें रणीं ॥ तो कां मज मानील ॥४६॥

तेणेंसि करील पुरुषार्थ ॥ ऐसा नाहीं त्रिभुवनांत ॥ झणी बोलावोनि कौरवनाथ ॥ जावें दळभारें तयांवरी ॥४७॥

ऐसा विचार करोनी ॥ मग गोवर्धनासि जावोनी ॥ इंद्रपूजा सांग सारोनी ॥ आले द्वारकेसी ॥४८॥

यावरी अक्रूर पाठविला ॥ तो हस्तनापुरासि गेला ॥ अवघा वृत्तांत सांगीतला ॥ दुर्योधनासी ॥४९॥

ह्नणे सकळसैन्या सरिसें ॥ तुह्मां बळभद्रें बोलाविलेंसे ॥ आपण आणाया विशेषें ॥ जावों सुभद्रेसी ॥५०॥

मग भीष्मद्रोणधृतराष्ट्र ॥ यांसी पुसतसे गांधार ॥ कीं ऐसियासी विचार ॥ करणें काय सांगा पां ॥५१॥

ऐसें ऐकोनि धृतराष्ट्र ह्नणे ॥ तुह्मी सर्वथानव जाणें ॥ हें अवघेंही कृष्णाचें करणें ॥ नकळे कवणा ॥५२॥

जेणें बाळपणापासोनी ॥ असंख्य अरी मारिले रणीं ॥ संकर्षण सहस्त्रफणी ॥ जो सकळसृष्टीआधार ॥५३॥

तया देखतां सुभद्रेतें ॥ हरुनियां नेलें पार्थे ॥ तो काय आतां तुह्मांतें ॥ जिंकिलाजाय ॥५४॥

तुह्मी काय त्यापरीस बळी ॥ तीं बाहुलीं खेळवी वनमाळी ॥ अक्रुरा ह्नणती ते वेळीं ॥ सुभद्रा द्यावी पार्थासीच ॥५५॥

मग अक्रूर जावोनि द्वारकेसी ॥ वृत्तांत सांगे कृष्णबळभद्रासी ॥ तेव्हां बोलिला हषीकेशी ॥ यादवांप्रती ॥५६॥

कीं अभिमान सांडिला कौरवीं ॥ तरी कैसी व्यवस्था करावी ॥ तेव्हां ह्नणितलें यादवीं ॥ द्यावी कुमरी पार्थासीच ॥५७॥

श्रीकृष्ण ह्नणे उग्रसेना ॥ हें आणावें बळदेवमना ॥ येरु ह्नणे अगा कृष्णा ॥ काहीं पुसणें न लागे ॥५८॥

जेणें हरोनि नेली सायासीं ॥ तो तरी नेदी कीं आपणासी ॥ तरी आतां देवोनि पार्थासी ॥ करावें शोभन ॥५९॥

ऐसेंचि बळभद्रा ह्नणितलें ॥ तेंव्हा संकर्षण बोलिले ॥ जें गा होणार तें जाहलें ॥ आतां भलें तेंचि करा ॥६०॥

मग अक्रुरा वाहूनि समस्तीं ॥ तो पाठविला इंद्रप्रस्थीं ॥ कीं सांगावें धर्माप्रती ॥ सुभद्रा पार्था दीधली ॥६१॥

तरी समारंभें येणें ॥ लग्न बरव्यापरी करणें ॥ ऐसेंचि शिकविलें श्रीकृष्णें ॥ अक्रूरासी ॥६२॥

मग अक्रूर बैसोनि रथीं ॥ शीघ्र गेला इंद्रप्रस्थी ॥ सकळही सांगीतली स्थिती ॥ पांडवांलागीं ॥६३॥

तंव कुंतिभोजादि द्रुपदेंसीं ॥ घेवोनियां सकुटूंब सैन्येंसीं ॥ धर्म आला द्वारकेसी ॥ महोत्साहें ॥६४॥

मग नानावाद्यगजरीं ॥ सोहळा केला दिवस चारी ॥ पार्थसुभद्रा सुंदरी ॥ अनुपम्य वधुवरें ॥६५॥

नानापरींचीं आंदणें ॥ दीधलीं वस्त्रालंकारभूषणें ॥ वर्‍हाडी पूजिले श्रीकृष्णें ॥ मानसन्मानें परियेसा ॥६६॥

तो समारंभ वर्णिता ॥ राया विस्तार होईल ग्रंथा ॥ मग बोळविलें इंद्रप्रस्था ॥ वधुवरेंसीं ॥६७॥

यावरी मणिपूरींची व्यवस्था ॥ पार्थे सांगीतली समस्तां ॥ तंव श्रीकृष्ण जाहला बोलता ॥ आणीं आतां चित्रांगीं ॥ ॥६८॥

आज्ञा मागोनि पांडवांसी ॥ कृष्ण गेले द्वारकेसी ॥ पार्थ निघाला मणिपूरासी ॥ भद्रसेनासी भेटला ॥ ॥६९॥

मग चित्रांगीं उलूपियेसी ॥ पार्थे आलिंगिलें प्रेमेंसी ॥ आणि विनविलें भद्रसेनासी ॥ कीं पाठविजे कामिनी ॥७०॥

येरु ह्नणे धनुर्धरा ॥ कन्या होतील गरोदरा ॥ मग पाठवीन अवधारा ॥ तुह्मांसवें ॥७१॥

तो बोल पार्थे मानिला ॥ तेथें षण्मासवरी राहिला ॥ तंव चित्रांगीसी संभवला ॥ गर्भ देखा ॥७२॥

तेव्हां पार्थ ह्नणे रायासी ॥ आतां आज्ञा द्यावी आह्मांसी ॥ स्त्रियांसह बंधुवर्गासी ॥ जावों भेटावया ॥७३॥

रावो विनवी पार्थासी ॥ कीं पुत्र नाहीं आमुचे वंशीं ॥ तरी चित्रांगीचिय कुमरासी ॥ देईन राज्य ॥७४॥

ह्नणोनि चित्रांगी राहविजे ॥ पुत्र होईल मग नेइजे ॥ तें मानोनि पंडुआत्मजें ॥ ह्नणितलें रायासी ॥७५॥

जो पुत्र होईल तो घेइजे राया ॥ बभ्रुवाहन नाम ठेविजे तया ॥ मग देयीं पाठवोनियां ॥ चित्रांगी उलुपीसी ॥७६॥

ऐसें बोलोनि निघाला ॥ पार्थ इंद्रप्रस्थीं पातला ॥ समस्तांलागीं भेटला ॥ सांगीतला वृत्तांत ॥७७॥

द्रौपदीसी नियमितपणें ॥ पांचांजणांहीं भोगणें ॥ आणि सुभद्रेसि अर्जुनें ॥ रमणें निरंतर ॥७८॥

असो सुभद्रा हरलियावरी ॥ कितीयेका कालांतरीं ॥ इंद्रप्रस्थीं आला श्रीहरी ॥ धर्मालागीं भेटावया ॥७९॥

अर्जुनाचिये प्रेमस्थितीं ॥ तेथें राहिला श्रीपती ॥ तैं कृष्णें पर्णिली युवती ॥ कालिंदी ते ॥८०॥

वनीं खेळतां कृष्णपार्था ॥ तंव अग्नी आला अवचिता ॥ विप्ररुपें भेटोनि अवस्था ॥ सांगीतली अजीर्णाची ॥८१॥

मग त्याचे भोजननिमित्तें ॥ खांडववन जाळिलें कृष्णपार्थे ॥ तैं मयसभा करुनि दैत्यें ॥ दीधली अर्जुनासी ॥८२॥

ते चतुर्थस्तबकीं समग्रता ॥ सांगीतली असे कथा ॥ पुनर्गत सांगतां ग्रंथा ॥ होईल विस्तार ॥८३॥

यानंतरें धर्मादिकांसी ॥ सांगता जाहला हषीकेशी ॥ कीं स्त्रिया मेळवा आपणासी ॥ टाळावया अपावो ॥८४॥

राया कंदर्पाचेनि भरें ॥ पुरुष वर्ते अनाचारें ॥ तें चुकवावया चतुरें ॥ कराव्या दोनी कांता ॥८५॥

आतां ऐकें युधिष्ठिरा ॥ जेवीं अर्जुना चित्रांगी उलूपी सुभद्रा ॥ तेवीं तुह्मीं कराव्या दारा ॥ एकएकीं पृथकत्वें ॥८६॥

तें मानवोनि पंडुनंदना ॥ मग पृथकपणें केल्या अंगना ॥ ते पुत्रांसह असे वर्णना ॥ पंचमस्तबकीं ॥८७॥

असो मग कृष्णें पांडवांसी ॥ ह्नणितलें जातों द्वारकेसी ॥ येरी पूजिलें श्रीकृष्णासी ॥ षोडशोपचारें ॥८८॥

देवो ह्नणे धर्मराया ॥ न विश्वासें कौरवां या ॥ ते प्रवर्ततील अपाया ॥ निश्वयें जाण ॥८९॥

तरी य धौम्यासि पुसोनी ॥ राजनीती मनीं आणोनी ॥ तुह्मीं वर्तावें माझेनी ॥ निरंतर आधारें ॥९०॥

तंव कर जोडोनि पंडुनंदनीं ॥ प्रेमें स्तविल चक्रपाणी ॥ जीजी तुजवांचोनि निर्वाणी ॥ नाही रक्षिता आह्मांते ॥९१॥

जयजयाजी कैवल्यपती ॥ तूंचि भक्तां परमगती ॥ देवा नेणिजे तुझी व्यक्ती ॥ सृष्टिमाजी ॥९२॥

तुवां लीलेनें मनुष्यवेष ॥ धरिला दुष्टांचा कराया नाश ॥ धर्म प्रतिपाळणा विशेष ॥ जीवोद्धरणार्थी ॥९३॥

इतुक्यांत सुभद्रा येवोनि जवळी ॥ ह्नणे अवधारीं वनमाळी ॥ मूळ धाडोनि सहस्त्रमौळी ॥ नेइजे मज द्वारके ॥९४॥

तें श्रीकृष्णा मानवलें ॥ तंव कुंतीयें विनविलें ॥ कीं त्वां निरंतर सांभाळिलें ॥ पाहिजे सेवकासी ॥९५॥

येरु ह्नणे वो कुंतिये ॥ मी सदैव तुह्मांजवळी आहें ॥ मनीं न धरावें हो माये ॥ आन काहीं ॥९६॥

ऐशा बोलोनि नानायुक्ती ॥ परस्परें आलिंगिती ॥ मग निघाला श्रीपती ॥ द्वारकेसी ॥९७॥

अभिमन्यूची सर्व स्थिती ॥ देवें कथिली पांडवांप्रती ॥ तो आनंद त्रिजगतीं ॥ न समाये देखा ॥९८॥

यावरी द्वारके श्रीपती ॥ जावोनि भेटला यादवांप्रती ॥ ह्नणे जावोनि इंद्रप्रस्थीं ॥ आणावें सुभद्रेसी ॥९९॥

मग बळदेवो निघाला ॥ येवोनि पांडवां भेटला ॥ सुभद्रेसी घेवोनि गेला ॥ मूळ करोनी ॥१००॥

नंतरें कितीयेका दिवशीं ॥ पार्थ आला द्वारकेसी ॥ भेटला समस्त यादवांसी ॥ कृष्णादिकां ॥१॥

तो सुभद्रे अभिमन्यासी ॥ घेवोनि गेला स्वनगरासी ॥ ऐसा आनंद सकळांसी ॥ वर्तला तेव्हां ॥२॥

आतां इतुकियाचि अवसरीं ॥ भद्रसेन सपरिवारीं ॥ येवोनि भेटला प्रेमभरीं ॥ पांडवांसी ॥३॥

मूळ करोनि चित्रांगीउलुपीये ॥ मणिपूरीं नेल्या रायें ॥ त्या बभ्रुवाहनासि उत्साहें ॥ भेटल्या जाणा ॥४॥

असो पांडव इंद्रप्रस्थीं ॥ राज्य करिती थोर ख्याती ॥ पार्थे सुभद्रा आणिली मागुती ॥ पुत्रासहित ॥५॥

सोयरीक दुणावली ॥ यादवपांडवां प्रीती वाढली ॥ कृष्णें नानासंकटीं पाळिलीं ॥ पांडवें देखा ॥६॥

तंव मध्येंचि पडिली विवशी ॥ वैर पांडवां श्रीकृष्णासी ॥ वाटिन्नलें तें परियेसीं ॥ भारता गा ॥७॥

पुढें डंगवीपर्वकथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ तें ऐकावें संतश्रोतां ॥ ह्नणे मधुकरकवी ॥८॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ सुभद्राहरणप्रकारु ॥ द्वात्रिंशोऽध्यायीं कथियेला ॥१०९॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP