श्रीगणेशाय नमः ॥
घूकपापी शीघ्र लपती ॥ भक्तकुक्कुट आराव करिताती ॥ उदयासि कृष्णा पद्मिनीपती ॥ येता जागृती सकळिका ॥१॥
ऋषी म्हणती अहो स्कंदा ॥ अंबाह्रदयानंदकंदा ॥ कृष्णाकथामृत पाजोनि छंदा ॥ पुरवी आमुचे आणखी ॥२॥
नसे जया जनन मरण ॥ होता साक्षाद्भगवान कृष्ण ॥ मनुष्यदेहा अवलंबून ॥ कर्मे प्राकृतसा करी ॥३॥
निरापराधी जांबवंत ॥ तयासवे हा युद्ध करीत ॥ पीडा देतसे तया बहुत ॥ मणी मिळावा म्हणोनी ॥४॥
जांबवंते सिंहापासून ॥ मणी नेला तया मारून ॥ सिंहे प्रसेनापासाव रत्न ॥ वनी वधून घेतले ॥५॥
दिले प्रसेना सत्राजिताने ॥ कृष्ण घेईल या भीतीने ॥ असो वृथा पीडिले कृष्णे ॥ जांबवंता किमर्थ ॥६॥
वृथा द्रोह जांबवंताचा ॥ करिता झाला पति रुक्मिणीचा ॥ संदेह फेडी हा आमचा ॥ कृपा करोनि लवकरी ॥७॥
ऐकोनि यापरी स्वामी कार्तिक ॥ म्हणे ऋषी हो परिसा कौतुक ॥ श्रवण करिता नुरे पातक ॥ कृष्णकथा पवित्र ॥८॥
जो का निरंजन अज सत्य हरी ॥ पाप कैचे तया शरीरी ॥ परि मानवेषधारी ॥ लोकोपकारी होतसे ॥९॥
आळ आला आपणावरी ॥ तो घालवावया हरी ॥ जांबवंतासि पीडा करी ॥ परि अंतरी सखेद ॥१०॥
वृथा द्रोह केला मी या ॥ प्रायश्चित्त काय करू या ॥ ऐसे चिंतोनि विप्रवर्या ॥ म्हणे उपाया वदा हो ॥११॥
तव बोलती विप्र सकळ ॥ नामे जयाचे अजामीळ ॥ मुक्त जाहला तया मळ कैचा सांग दयाळा ॥१२॥
कृष्ण कृष्ण उच्चार करिता ॥ पापे धावती दहा वाटा ॥ परिसोनि यापरी रुक्मिणीभर्ता ॥ म्हणे विप्रांसि पुनरपि ॥१३॥
तुम्ही बोलिला तेहि खरे ॥ परी श्रेष्ठ मार्गानुसारे ॥ इतर वर्तती म्हणोनि थोरे ॥ सदाचारेचि रहावे ॥१४॥
प्रारब्धबळे श्रेष्ठ तेही ॥ दुराचरण करिताता काही ॥ परी उपदेश ते कदाही ॥ नाही वाईट करीत हो ॥१५॥
म्हणोनि सांगा तीर्थ एक ॥ जे का सकल पापदाहक ॥ ऐसी ऐकून मधुर भाक ॥ म्हणती मुनि तयासी ॥१६॥
या भुवरी अनेक तीर्थे ॥ जी का देती भुक्तिमुक्तीते ॥ क्षेत्रे तयापरी सांगतो तूते ॥ एकाग्रचित्ते ऐक बा ॥१७॥
मथुरा द्वारका कांची माया ॥ काशी आवंती नैमिषायोध्या ॥ सेतुबंध त्रिविध गया ॥ प्रभास महेंद्रपर्वत ॥१८॥
श्रीरंगतीर्थ कुरुक्षेत्र ॥ गंगासागर संगम पवित्र ॥ पुष्कर आणि हरिक्षेत्र ॥ ऐक चक्रधर मुरारे ॥१९॥
गंगा गोदावरी यमुना ॥ शरयू सरस्वती कृष्णा ॥ गोमती तीर्थे यापरी नाना ॥ मना वाटेल तेथ जा ॥२०॥
ऐसे ऐकोनि रमाकांत ॥ म्हणे कृष्णेमाजि तीर्थ ॥ पापनाशननाम विदित ॥ पतितपावन मुनी हो ॥२१॥
भार्गवतीर्थापासाव दोन ॥ बाण अंतर तेथ गमन ॥ करितो तुमची आज्ञा प्रमाण ॥ विप्रदैवत मी असे ॥२२॥
अन्यतीर्थ वर्षशते ॥ वास करिता जे पुण्य ते ॥ कृष्णातटी राहता मिळते ॥ त्रिरात्रेचि निश्चयेसी ॥२३॥
सकल तीर्थात मुकुटमणी ॥ उत्तर वाहिनी कृष्णावेणी ॥ धनदायिनी त्रितापहरिणी ॥ भक्तजननी मुनी हो ॥२४॥
गंगेत तीर्थे आहेत नाना ॥ परी उत्तरवाहिनी कुष्णा ॥ श्रेष्ठ सर्वात जिचे स्नाना ॥ करिता पुण्या मिति नसे ॥२५॥
करिता कृष्णातटी दान ॥ वाजपेय पुण्य सान ॥ उत्तरवाहिनी कृष्णासेवन ॥ पद निर्वाण देतसे ॥२६॥
ऐसी ऐकोनि केशवोक्ति ॥ म्हणती आम्ही येऊ संगती ॥ महिना पंधरा दिवस तीर्थी ॥ वसती करू इच्छितो ॥२७॥
ऐसे ऐकोनि यदुकुलरवी ॥ दुंदुभिनादे प्रसिद्ध करवी ॥ विप्र सोयरे मुले आघवी ॥ बांधव बरोबर घेतले ॥२८॥
जेथे उत्तरवाहिनी कृष्णा ॥ तेथे येऊनि तो कान्हा ॥ मुरली वाजवी मधुर नाना ॥ स्वरविभूषित तेधवा ॥२९॥
ते ऐकून ब्रह्मादि देव ॥ आले जेथे वासुदेव ॥ नमन करोनि बोलती सर्व ॥ धन्य सरिद्वरा ही ॥३०॥
सकळ जनाचे पापशमन ॥ व्हावया तुवा निर्माण ॥ केली आपुल्या अंशापासून ॥ कृष्णा कृष्णरूपिणी ॥३१॥
तदा ब्रह्मादि सुरवरा ॥ कृष्ण म्हणे स्नान करा ॥ स्वये करोनि दश सहस्त्रा ॥ गाई विप्रांसि देतसे ॥३२॥
विप्र भोजन सप्त दिन ॥ करी देवाधिदेव कृष्ण ॥ तदा होवोनि कृष्णा प्रसन्न ॥ देत दर्शन सकलिका ॥३३॥
कृष्णावेणीची देखोनि मूर्ती ॥ सदेव विप्र लक्षुमीपति ॥ नमूनि बोले अतिप्रीती ॥ हे पापघ्नि कामदे ॥३४॥
पतितपावने परायणे ॥ पाप गेले तुझे सेवने ॥ अन्यथा न होय सफळ जिणे ॥ कृष्णे दर्शने तुझिया ॥३५॥
ऐसी ऐकोनि कृष्णवाणी ॥ बोले तदा कृष्णावेणी ॥ संसार सागरापासाव प्राणी ॥ उद्धराया कृत्य हे ॥३६॥
नाम जयाचे अनंत पापा ॥ नष्ट करी सहज बापा ॥ दंश करील म्हणोनि सापा ॥ भ्यावे गरुडे काय हो ॥३७॥
केली जयाने मुक्त गणिका ॥ तया कैची पापशंका ॥ परी लोकशिक्षार्थ देखा ॥ करणे सकळ घडे हो ॥३८॥
आता सभुदेववास ॥ येथे करावा जगन्निवास ॥ पुरवी माझि येवढी आस ॥ दयासागरा श्रीपते ॥३९॥
तुझेनि नामे तीर्थ हे हो ॥ प्रसिद्ध जेथे स्नानेचि देहो ॥ शुद्ध होवोनि स्मरणही हो ॥ तुझे मोक्षदायक ॥४०॥
द्यावा दुर्लभ हा वर ॥ ऐसे ऐकोनि रमावर ॥ तथास्तु म्हणोनि सहमुनिवर ॥ तीर्थरूपी राहिला ॥४१॥
ऐसे आख्यान हे रम्य ॥ ऐकता मनोरथ पूर्ण होय ॥ जया अंतरी भक्तिमाय ॥ उणे तया काय हो ॥४२॥
असो पुढे ऋषिवरांते ॥ आदित्यादि महातीर्थे ॥ कथन करील अहो श्रोते ॥ भूतेश्वरतनय तो ॥४३॥
कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ पन्नासावा अध्याय हा ॥४४॥
इति स्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये पंचाशत्तमोऽध्यायः ॥५०॥