मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ३८

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ३८

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

स्मरता कृष्णागरुडरूपा ॥ भय उपजले पाखंडसर्पा ॥ दया उपजोनि गरुडाधिपा ॥ सवेंचि समीप नेतसे ॥१॥

मुनिवराला शिवसुत म्हणे ॥ आता कथेसी चित्त देणे ॥ वर दिधला नरहरीने ॥ पुत्र होईन म्हणोनी ॥२॥

पुढे कैसा बाळ जाहला ॥ पराशराचा सांग मजला ॥ व्यासासि ऐसा प्रश्न केला ॥ याज्ञवल्क्य ऋषीने ॥३॥

तदा साक्षात विष्णुमूर्ती ॥ सांगे आपुली मायोत्पत्ती ॥ जी ऐकता सुखप्राप्ती ॥ केवळ भक्तीने होतसे ॥४॥

आश्रमापासाव पराशर ॥ सपत्‍नीक गेला कृष्णेवर ॥ स्नान करावे हाचि निर्धार ॥ करोनि मानसी सत्य पै ॥५॥

जी का साक्षात विष्णुरूपिणी ॥ स्नान तियेचे करोनि मुनी ॥ तटी कृष्णाजिनी बैसोनि ॥ करी आन्हिक विधीने ॥६॥

जाया तयाची सत्यवती ॥ कृष्णेत गेली स्नानाप्रती ॥ पाहे तेथ ती मत्स्यदंपती ॥ पिल्लासहित खेळता ॥७॥

मत्स्यमत्स्यिणी एकमेक॥ होती रममाण ते कौतुक ॥ पाहोनि सत्यवती देख ॥ उभी नावेक राहिली ॥८॥

मनी खोचला कामबाण ॥ म्हणे धन्य हे मत्स्यजनन ॥ सवेंचि आली मग तेथुन ॥ नजीक प्राणप्रियाचे ॥९॥

उशीर इतुका का लागला ॥ ऐसे विचारी मुनी तियेला ॥ तव आंगासि कंप सुटला ॥ लागलाचि तियेचे ॥१०॥

तदा पराशर ज्ञानदृष्टी ॥ पाहोनि बोले तियेप्रती ॥ मत्स्यापासाव दुरुत्पत्ती ॥ तुझी होईल निश्चये ॥११॥

तिला यापरी शाप देता ॥ अनुताप होवोनि तिचे चित्ता ॥ करी तत्काळ साष्टांग पाता ॥ प्राणनाथासि आपुले ॥१२॥

म्हणे अहो महाराज ॥ ओढाळ मन हे आहे सहज ॥ परि नसेचि विचार मज ॥ आज तत्फळ मिळाले ॥१३॥

आता करा हो क्षमा स्वामी ॥ कवणासि विनवू तुम्हावीण मी ॥ बोलोनि ऐसे पाय नमी ॥ ती भामिनी पतीचे ॥१४॥

होवोनि पराशर तदा सदय ॥ म्हणे जे मी बोलिलो काय ॥ ते जरी कदा मिथ्या न होय ॥ परी उःशाप ऐक गे ॥१५॥

जरी जाहला मत्स्यगर्भ ॥ तरी मनुष्य देह दुर्लभ ॥ पावोनि लाधसी अतिदुर्लभ ॥ हरी अर्भक मद्भार्ये ॥१६॥

ऐसे कांतेसि बहु मंजुळ ॥ जेथे पराशर बोलिला बोल ॥ तेथेंचि जाहले तीर्थ मंजुळ ॥ मंजुलेश्वर सन्निध ॥१७॥

मंजुळतीर्थी स्नान दान ॥ करिता मंजुळेश्वरपूजन ॥ सकळ अमंगल होता निरसन ॥ सदा कल्याण वसतसे ॥१८॥

म्हणे मुनीला स्वामी कार्तिक ॥ पुढे कथानक पापहारक ॥ सांगेल योगेश उत्तंक ॥ याज्ञवल्क्य ऋषीसी ॥१९॥

कृष्णकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ अडतिसावा अध्याय हा ॥२०॥

इति स्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये मंजुलतीर्थवर्णनं नाम अष्टत्रिंशोऽध्यायः ॥॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP