मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ३५

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ३५

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.

 


श्रीगणेशाय नमः ॥

पाखंड हिरण्याक्ष मस्त ॥ होवोनि नेता श्रुतिभू समस्त ॥ कृष्णावराहे तया नष्ट ॥ करोनि आणिली पुनरपि ॥१॥

म्हणोनि कृष्णा यज्ञमूर्ती ॥ नमितांची होवोनि पुढे स्फूर्ती ॥ स्कंद म्हणतसे मुनीप्रती ॥ आणीक तीर्थसि ऐकिजे ॥२॥

घेवोनी याज्ञवल्क्यास ॥ यात्रा करित करित व्यास ॥ वीरभद्र क्षेत्र नाम जयास ॥ तयासचि पातला ॥३॥

कृष्णोदकी स्नान आणी ॥ तर्पण पितरांसि उभयतांनी ॥ करोनि तेथे मग तेथुनी ॥ दुसरे दिनी निघाले ॥४॥

कृष्णातीरासि याज्ञवल्क्य ॥ देखोनि करी बहु विस्मय ॥ म्हणे व्यासासि हे काय ॥ अति रमणीय दिसतसे ॥५॥

तीर्थवृंदे जयाभोवती ॥ गोपुरे गगनालागि चुंबिती ॥ जया सर्वही देव सेविती ॥ ते हे लिंग दिसतसे ॥६॥

जया देखता देह पाहे ॥ माझा रोमांकित होताहे ॥ सखोल भूमीमाजि ते हे ॥ लिंग मला गा दिसतसे ॥७॥

परिसोनि यापरी म्हणे व्यास ॥ तुला सांगतो बा कथेस ॥ भक्तिपूर्वक ऐकता ईश ॥ पापविनाश होतसे ॥८॥

पूर्वकल्पी कृष्णातीरी ॥ दक्षप्रजेशा कैटभारी ॥ यज्ञ कराया आज्ञा करी ॥ म्हणोनि करी दक्ष तो ॥९॥

जेथे ब्रह्मादि सुर भूसुर ॥ येती वाचोनि एक ईश्वर ॥ जैसे वर्‍हाडी पातले समग्र ॥ परी वरावीण व्यर्थचि ॥१०॥

ऐसा शिवरहित यज्ञ पाहुनी ॥ कोपोनि बोले नारदमुनी ॥ अरे दक्षा रुद्रावाचुनी ॥ सांग नोहे यज्ञ हा ॥११॥

दक्ष ऐकोनि ते भाषण ॥ नेदीच किंचित्‍ तिकडे मन ॥ देखोनि यापरी ब्रह्मनंदन ॥ कैलाससदना जातसे ॥१२॥

तेथे सतीसह शंकरांसी ॥ देखोनि कथी दक्षयज्ञासी ॥ ऐकोनि सती म्हणे पतीसी ॥ मज आज्ञेसी द्याल का ॥१३॥

तदा अकस्मात्‍ नारदमुनी ॥ खिन्न जाहला असे पाहुनी ॥ देवोनि आसन तया भवानी ॥ म्हणे फिरोनि सांग पा ॥१४॥

नारद म्हणे गे सती परिस ॥ तुझा पिता हा महा क्रतूस ॥ करितो परी तो तुझे पतीस ॥ निमंत्रणासही करीना ॥१५॥

नारदाची यापरी बोली ॥ ऐकोनि सती शिवा बोलली ॥ आपण जरी का आज्ञा दिली ॥ यज्ञासि जाईन ॥१६॥

शत्रु मित्र उदासीन ॥ सरिसेचि मानिती जे सज्जन ॥ तया कैचा मानापमान ॥ उत्सवादि पहाया ॥१७॥

नसे सन्मान माहेरी ॥ तरी जावे पितृघरी ॥ ऐसा स्वभाव निर्धारी ॥ असे स्त्रियांचा मुनी हो ॥१८॥

यापरी केली बहु प्रार्थना ॥ परी न शिव तियेसि आज्ञा ॥ तरी नमोनि पतिचरणा ॥ सदनासि गेली पितयाचे ॥१९॥

तदा नंदीस म्हणे शंकर ॥ जावोनि सतीचे रक्षण कर ॥ ऐसे ऐकता सपरिवार ॥ गेला सतीसह सवेंचि ॥२०॥

जावोनि यापरी कृष्णातटी ॥ प्रवेश करितांचि यज्ञवाटी ॥ जननीची चढे भृकुटी ॥ अठी कपाळा घातल्या ॥२१॥

भगिनी मावशी पितृभगिनी ॥ पाहोनि पाहीना तिला कोणी ॥ निंदा पतीची पितृवदनी ॥ देखोनि सती कोपली ॥२२॥

शिवनिंदकापासाव जाहला ॥ देह अपवित्र हा आपुला ॥ म्हणोनि तयाचा होम केला ॥ योगाग्निमाजी सतीने ॥२३॥

नारदमुखे हे धूर्जटी ॥ ऐकोनि निजजटा आपटी ॥ हा हा म्हणोनि होती दाटी ॥ सकल गणांची तेधवा ॥२४॥

अकस्मात जाहला वीरभद्र ॥ उभा ठाके जोडोनि कर ॥ म्हणे तयासि तदा रुद्र ॥ दक्षासि मार झडकरी ॥२५॥

ऐसी ऐकता रुद्रवाणी ॥ सवेचि निघाला तो तेथुनी ॥ कृष्णातटी यज्ञसदनी ॥ येवोनि यज्ञ ध्वंसिला ॥२६॥

खड्‌गे उडवोनि दक्षमस्तक ॥ रगडोनि टाकिले तात्काळिक ॥ देखोनि ब्रह्मादि देव सकळिक ॥ गेले कैलासपर्वती ॥२७॥

तेथे पाहोनि पंचवदना ॥ स्तविती घालोनि लोटांगणा ॥ वेदवेद्या पतितपावना ॥ करुणाघना महेशा ॥२८॥

जे का अनीश्वर यज्ञ करिती ॥ फळे तयांची ते पावती ॥ तू अलिप्त सर्वा भूती ॥ कर्मसाक्षी अकर्ता ॥२९॥

ऐसे नेणोनि हा दक्ष ॥ नाश पावला आम्हासमक्ष ॥ आता करोनि कृपाकटाक्ष ॥ करी जिवंत याजला ॥३०॥

परिसोनि यापरी देवस्तुती ॥ प्रसन्न जाहला ब्रह्मादिपती ॥ म्हणे हासोनि देवांप्रती ॥ अशक्य मागीतले हे ॥३१॥

परी आणोनि बस्तमुख ॥ लाविता होईल तुम्हा हरिख ॥ ऐसे ऐकताचि ब्रह्मादिक ॥ तैसेचि करिती मुनी हो ॥३२॥

सुधादृष्टीने शिव देखता ॥ येवोनि दक्षासि चेतनता ॥ उठोनि जोडी दोन हस्ता ॥ वीरभद्रासि दीन तो ॥३३॥

म्हणे देवेश भक्तवत्सला ॥ त्र्यंबका हे त्रैलोक्यपाळा ॥ नीलकंठा काळकाळा ॥ वीरभद्रा त्राहि भो ॥३४॥

शांतिचित्तैकवंद्यपादा ॥ महारुद्रा भक्तकामदा ॥ पुरे सोसवेना ही आपदा ॥ वीरभद्रा त्राहि भो ॥३५॥

सकळ देवांसि आणिले यज्ञा ॥ पूजिले परी शंकराविना ॥ म्हणोनि पावलो यातना नाना ॥ वीरभद्रा त्राहि भो ॥३६॥

तूचि यज्ञ यज्ञकर्ता ॥ तूचि यज्ञांग यज्ञभोक्ता ॥ तूचि आमुची मातापिता ॥ वीरभद्रा त्राहि भो ॥३७॥

दक्षे यापरी स्तोत्र केले ॥ ऐकोनि वीरभद्र डोले ॥ म्हणे देईन तुज इच्छिले ॥ दक्षप्रजापते बा ॥३८॥

सदाशिवाचे चरणारविंदी ॥ भक्ति असो दे कदा न निंदी ॥ शंभुभक्तांसि सदा वंदी ॥ करी अंगीकार हा ॥३९॥

जे का केले तुवा स्तोत्र ॥ पढती तया जे निरंतर ॥ तया तोषोनि उमावर ॥ पूर्ण मनोरथ करील ॥४०॥

दक्ष ऐकोनि यापरि ॥ बरे बोलोनि नमन करी ॥ सदाशिवाचे राहिला द्वारी ॥ तारकारी म्हणतसे ॥४१॥

पुढे वीरभद्रेश्वर ॥ प्रगत होवोनि देईल वर ॥ सांगेल पराशरकुमार ॥ याज्ञवल्क्य ऋषीसी ॥४२॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ पंचत्रिंशोऽध्याय हा ॥४३॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये दक्षचरितवर्णनं नाम पंचत्रिंशोऽध्यायः ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP