श्रीगणेशाय नमः ॥
श्रीकृष्णावेण्यै नमः ॥ ॐ नमोजी गजानना ॥ आदिपुरुषा गौरिनंदना ॥ पूर्ण करिसी भक्तकामना ॥ म्हणोनि आलो शरण मी ॥१॥
तू बुद्धिदाता मंगलमूर्ती ॥ सत्वर पुरविसी भक्तजनार्ती ॥ अभिलाष धरोनि हाचि चित्ती ॥ अनन्यगती पातलो ॥२॥
आता नमू वाग्विलासिनी ॥ आदिशक्ति ब्रह्मनंदिनी ॥ जिव्हाग्री नित्य बैसोनी ॥ ग्रंथ वदवी मन्मुखे ॥३॥
तू सकलगुणनिधान ॥ मी तो असे बुद्धिहीन ॥ म्हणोनि मागतो वरप्रदान ॥ चरणी नमोनि जननीये ॥४॥
आता नमू श्रीसद्गुरूमूर्ती ॥ ध्यान करू अहर्निशी ॥ दासवांछा पुरविण्यासी ॥ गुरुराया समर्थ तू ॥५॥
ऐसे ऐकोनि सदगुरुमूर्ती ॥ पातले तेथे त्वरित गती ॥ प्रसन्न होवोनि शिष्याप्रती ॥ बोलती का वो चिंतिले ॥६॥
तदा वंदोनि सद्गुरुचरण ॥ म्हणालो मी बुद्धिहीन ॥ नसे विद्याही मजलागुन ॥ कैचे काव्यज्ञान मग ॥७॥
ऐसा असोनि पशुसमान ॥ करावे कृष्णाचरितवर्णन ॥ म्हणोनि हे श्रीगुरुचरण ॥ चिंतिले निजमानसी ॥८॥
आयुष्याचा नसे भरवसा ॥ गळी यमाचा पडेल फांसा ॥ चित्ती परि ही असे आशा ॥ काय करू गुरुवरा ॥९॥
उदारबुद्धी श्रीगुरुनाथ ॥ म्हणती सकल मनोरथ ॥ होतील शुद्ध करोनि चित्त ॥ कृष्णास्मरण करी बा ॥१०॥
ऐसो ऐकोनि गुरुवचन ॥ कृष्णेचे मग करी ध्यान ॥ आणि म्हणे हे चरित्रकथन ॥ तुझे करवी मन्मुखे ॥११॥
ऐसे करोनि कृष्णास्तवन ॥ वंदिले मातापितृचरण ॥ विनवोनिया मग संतसज्जन ॥ श्रोतृजन निमंत्रिले ॥१२॥
म्हणे आता सावधान ॥ तुम्ही होवोनि मजकडून ॥ कृष्णाकथा सुधापान ॥ करवा सज्जन संत हो ॥१३॥
कृष्णा वेणी ककुद्मती ॥ स्वर्गी सदा त्या वास करिती ॥ तेथोनि आल्या भूतळापती ॥ जगदुद्धार कराया ॥१४॥
त्या पातल्या कवणे रिती ॥ स्कंदपुराणी कैलासपती ॥ ते आदरे स्कंदाप्रती ॥ सांगे ऋषींसि नारद ॥१५॥
असे भाषा ही संस्कृतु ॥ अर्थ जाणती विद्यावंतु ॥ भोळे आबालवृद्ध भक्तु ॥ ज्ञान तयाला कैचेनी ॥१६॥
ऐसे देखोनि कृष्णाबाई ॥ ठाव देता माझे ह्रदयी ॥ स्फुरण जाहलेंचि लवलाई ॥ ग्रंथ प्राकृत वदाया ॥१७॥
श्रोती व्हावे सावधान ॥ कृष्णाचरित्रसुधापान ॥ करिता दुःखनिदर्शन ॥ कल्पांतीही घडेना ॥१८॥
दोषांचे जे माहेरघर ॥ तो हा कलि निरंतर ॥ स्वधर्म सांडोनि दुराचार ॥ राहताति लोक पै ॥१९॥
संगे तयाचे भयभीत ॥ जाहलो आम्ही जाण निश्चित ॥ आता स्वामी कृपावंत ॥ सांगा उपाव झडकरी ॥२०॥
बोल ऋषींचे करोनि श्रवण ॥ हासोनि बोले ब्रह्मनंदन ॥ महापथासी पंडुनंदन ॥ गेले कली हा जाणोनि ॥२१॥
येथेचि राहता धीर होऊन ॥ करिता येतसे जे साधन ॥ ते न घडेचि पावता मरण ॥ ऐसे वाटे मजप्रती ॥२२॥
म्हणोनि जे का नर ज्ञानी ॥ धरू नये हे भय तयांनी ॥ कलियुग हे मोक्षदानी ॥ वैकुंठभुवनी नेतसे ॥२३॥
अदृश्य कलियुगी देव म्हणती ॥ भेटे ज्ञानियासि सत्वरगती ॥ अज्ञानियांसि स्वये श्रीपती ॥ सांगे उपाव तरावया ॥२४॥
स्कंदपुराणी जया कथेस ॥ बोलिला श्रीवेदोव्यास ॥ तीच सांगतो आता तुम्हांस ॥ प्राक्रुत भाषेकरोनी ॥२५॥
कल्पारंभी नारायण ॥ ब्रह्मयासी करी कथन ॥ तुवा साद्यंत सृष्टिरचन ॥ ममाज्ञेने करावे ॥२६॥
ऐकोनि विधि वंदोनि चरण ॥ बोले दोन्ही हस्त जोडून ॥ आज्ञेप्रमाणे सृष्टिरचन ॥ करीन युगपरत्वे ॥२७॥
परि प्रलयवधि ही स्थिती ॥ कैशी चालेल माझिये हाती ॥ ऐकोनि म्हणे कृपामूर्ती ॥ तुवांचि केले पाहिजे ॥२८॥
तुजवाचोनि चतुरानना ॥ कोणासि करिता नये रचना ॥ तरी पर्वत तीर्थ आणि वना ॥ यथापूर्व रचावे ॥२९॥
मी आपुले तनूपासून ॥ करीन कृष्णेसि उत्पन्न ॥ करावया जगदुद्धारण ॥ परम पवित्र भूमंडळी ॥३०॥
तीच सर्व तीर्थमाता ॥ ऐसे वदे तै जगत्पिता ॥ निष्पाप करोनिया जगता ॥ सायुज्यताही देईल ॥३१॥
संगे कलीचे जो का मळ ॥ दर्शने तो भस्म सकळ ॥ कृष्णासान्निध्याचे फळ ॥ तेही अगम्य जाणिजे ॥३२॥
तत्तीरी करितील जे वास ॥ ते पावन अन्य जीवांस ॥ करितील ऐसे जगन्निवास ॥ ब्रह्मयासी बोलिला ॥३३॥
मग कृष्णेसि ह्या जगती ॥ स्वये उत्पन्न करी श्रीपती ॥ इतर ब्रह्मयाचेचि हाती ॥ तीर्थे निर्माण करवी पै ॥३४॥
ऐसी सकळ तीर्थे करून ॥ बोलता झाला रमारमण ॥ जे का करितील भक्ति पूर्ण ॥ दोष न वसे तयांसी ॥३५॥
मंत्रौषधींचा असे ज्ञानी ॥ काय करी तया अग्नि ॥ कलिनिर्मित पातकांनी ॥ भक्तांसि व्हावे काय हो ॥३६॥
म्हणोनि करिता तीर्थसेवन ॥ तैसेचि जाण हरिस्मरण ॥ येणे कलियुग कृतासमान ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥३७॥
हे कथानक करोनि श्रवण ॥ संतोष पावले ऋषिजन ॥ वदती नारदा पुण्यवान ॥ म्हणोनि उद्धरी जडांसि ॥३८॥
ऐसी कृष्णा पुण्यपावन ॥ केली विष्णूने निर्माण ॥ तिचे कथासुधापान ॥ करवी दीनदयाळा ॥३९॥
ऐसे परिसोनि नारदऋषी ॥ म्हणे विधीने ह्रषीकेशी ॥ स्तवोनि पुसता तो तयासी ॥ सांगे तेचि सांगतो ॥४०॥
ऐकोनि ब्रह्मयाची स्तुती ॥ सांगतसे मग दानवारि ती ॥ चुकवावया संसारभीती ॥ कृष्णेसि निर्मितसे ही ॥४१॥
त्या कृष्णेचे भयेकरून ॥ निःशंक न करी कली वर्तन ॥ वायु स्पर्शोनि कृष्णाजीवन ॥ करी उद्धार जडाचा ॥४२॥
स्नान पान स्तव नमन ॥ तैसेचि अंतरी तिचे स्मरण ॥ तेणे निष्पाप नर होऊन ॥ दिव्य गती मेळवी ॥४३॥
योगाभ्यासादि साधने ॥ कथिली आहेत शास्त्राने ॥ दुष्कर आहेत कलियुगाने ॥ म्हणोनि कृष्णा निर्मिली ॥४४॥
जो ऐसी करील भक्ति ॥ तैसी तयाला मिळेल मुक्ति ॥ मिथ्या मानू नका उक्ति ॥ समस्त तुम्ही ऋषी हो ॥४५॥
जे तज्जलाचे करितील पान ॥ तद्रूप जातील ते होऊन ॥ भवभयनाशक मिळे ज्ञान ॥ मिथ्या नोहे कदापि ॥४६॥
तुझे कार्य व्हावे अविघ्न ॥ म्हणोनिया निजमूर्तिपासून ॥ केली जे मूर्ति उत्पन्न ॥ अति लावण्य गोजिरी ॥४७॥
तिचे मुखप्रभेकरून ॥ दिशा दिसती शोभायमान ॥ त्यांचे मलिनत्व जाऊन ॥ तेजःपुंज मिरविती ॥४८॥
चतुर्भुज मेघकांती ॥ शंखचक्राब्जगदा हस्ती ॥ झळके पीतांबर कटी ॥ गळा वैजयंती शोभत ॥४९॥
उरी श्रीवत्सलांछन ॥ नाही दिधले कन्या म्हणून ॥ हे न द्यावे तिजलागून ॥ म्हणोनि न दे तियेसी ॥५०॥
ऐसी उत्पन्न करोनी मूर्ती ॥ म्हणे विधीला लक्ष्मीपती ॥ इतर तीर्थे भूमीवरुती ॥ इचे संगती असू दे ॥५१॥
श्रीहरीचे ऐकोनि वचन ॥ संतोष पावला कमलासन ॥ मग सृष्टीची रचना करून ॥ तीर्थे निर्माण पै करी ॥५२॥
विष्णु रुपिणी कृष्णाबाई ॥ सकळ जगाची तीच आई ॥ सत्यापासोनि इया ठायी ॥ आली पावन कराया ॥५३॥
म्हणे नारद ऋषींप्रती ॥ ऐसी असे हो कृष्णोत्पत्ती ॥ पुढिले अध्यायी सेनापति ॥ प्रश्न करील शिवासी ॥५४॥
कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोना पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ प्रथमोऽध्याय गोड हा ॥५५॥
॥इति श्रीस्कंदपुराणे रेवाखंडस्थ कृष्णामाहात्म्ये कृष्णोत्पत्तिवर्णनं नाम प्रथमोऽध्यायः ॥