मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय २४

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय २४

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

हिरण्यकश्यपादि नास्तिक जन ॥ तयांचेचि करावे विदारण ॥ म्हणोनि सह्यस्तंभ भेदून ॥ कृष्णानृसिंह निघाला ॥१॥

मयूरवाहन म्हणे ऋषींसी ॥ अवधान द्यावे आता कथेसी ॥ पूर्वी सांगितले तुम्हांसि ॥ तीर्थ मार्कंडेय जे ॥२॥

योगीतीर्थ तयापुढे ॥ जेथे होय ज्ञान रोकडे ॥ म्हणोनि योगीजना आवडे ॥ सिद्धि जोडेल साधका ॥३॥

श्रीतीर्थ असे तेथून ॥ जयाचे करिता दर्शन स्नान ॥ षण्मासमात्रे होय साधन ॥ महिमान ऐसे तयाचे ॥४॥

तयापासाव गोतीर्थ ॥ पुढे असे शंभुतीर्थ ॥ तेथोनि पुढे पितृतीर्थ ॥ प्रमाण तीस धनुष्ये ॥५॥

शुक्लतीर्थ अति साजिरे ॥ डोळा देखताचि पाप नुरे ॥ राक्षस जयाचे स्पर्शमात्रे ॥ मुक्तकलेवर जाहला ॥६॥

तो राक्षस कवण होता ॥ हेचि सांगतो तुम्हा आता ॥ सुवृत्त नामे भूमिभर्ता ॥ होता परम धार्मिक ॥७॥

तया राजयाजवळ एक ॥ असे विप्र अति सुरेख ॥ वेदशास्त्रे जया ठाऊक ॥ होती सकळ ऋषी हो ॥८॥

परि तयालागी गर्व ॥ असे जाणतो मीचि सर्व ॥ विप्रा जिंकिता जया पर्व ॥ काळ वाटे सदाचि ॥९॥

ऐसे वर्तता एक दिनी ॥ यज्ञार्थ धनाशा धरोनी ॥ येता उत्तंक महामुनि ॥ नृपे देखोनि पूजिला ॥१०॥

म्हणे जाहलो धन्यजन्म ॥ तीर्थ माझे जाहले सद्म ॥ आपुले देखोनि पादपद्म ॥ कृतार्थ जाहलो आजि मी ॥११॥

अभागियाचे घरी गंगा ॥ काय कारण आली सांगा ॥ तव उतंक बोले भंगा ॥ करोनि बोले तो द्विज ॥१२॥

काय केले तुवा पठण ॥ कैचे असे तुज ज्ञान ॥ ऐसे वचन साभिमान ॥ ऐकोनि तपोधन कोपला ॥१३॥

हांसोनि म्हणे अरे मूर्खा ॥ गर्व जाहला तुला बाका ॥ तुवा जिंकिले द्विजा अनेका ॥ राजाश्रये सर्वदा ॥१४॥

आता जिंकू मज पाहसी ॥ आपणासि तव सर्वज्ञ म्हणसी ॥ तरी राक्षस होवोनि राहसी ॥ निर्मनुष्य वनांत ॥१५॥

ऐसा उत्तंक शाप देता ॥ जाय तयाची शीघ्र अहंता ॥ शरण येवोनि म्हणे तत्वता ॥ कृपा करी मजवरी ॥१६॥

अज्ञानमदे मूढ जाहलो ॥ म्हणोनि अबद्ध बोलिलो ॥ मुक्त करी गा मज दयालो ॥ राक्षसयोनीपासुनी ॥१७॥

यापरी बोलता आपणासी ॥ देखे तव राक्षसासी ॥ तये वेळी उत्तंक मुनीसी ॥ आली मानसी कणाव ॥१८॥

कृष्णावेणीसि तदा जाउनी ॥ स्नान करी उत्तंकमुनी ॥ अंजुळी भरोनि घेतले पाणी ॥ राक्षसावरी शिंपडावया ॥१९॥

राक्षसाचे येवोनि जवळी ॥ उत्तंक फेकिती अंजुळी ॥ स्पर्श होतांचि ते काळी ॥ दिव्य देह पावला ॥२०॥

राक्षसदेहापासाव मुक्त ॥ विप्र होवोनि आनंदित ॥ उत्तंकरचणी जव लागत ॥ तव विमान पातले ॥२१॥

देह जयाचा शुक्ल असे ॥ द्विजश्रेष्ठ तो विमानी बसे ॥ जावोनि स्वर्गी अमरसे ॥ भोगी सुख अखंड ॥२२॥

उत्तंकही तोषोनिया ॥ म्हणे द्विजाची शुक्ल काया ॥ जाहली म्हणोनि या ठाया ॥ शुक्लतीर्थ नाम हे ॥२३॥

स्नान करोनि शुक्लतीर्थी ॥ शुक्लेश्वराते पूजिती ॥ संसारसागरा तेचि तरती ॥ कृष्णाभक्तीतरीने ॥२४॥

शुक्लतीर्थापासाव दुजे ॥ अमरतीर्थ अति विराजे ॥ जयाचे दर्शने होइजे ॥ कीर्ति गाजे त्रिभुवनी ॥२५॥

पूर्वी दानवी पराभव ॥ आपुला केला पाहोनि देव ॥ गेले बहुत तीर्थासि सर्व ॥ परी चैन पडेना ॥२६॥

जंबुद्वीपी कृष्णावेणी ॥ तेथे अखेर सकळ येउनी ॥ राहिले कृष्णास्नानपानी ॥ तत्पर एकाग्रमतीने ॥२७॥

वेदज्ञ मुनीकरवी स्थापिती ॥ अमरेश नामे पशुपती ॥ जयाचे दर्शने कामना पुरती ॥ इच्छित भक्तजनांच्या ॥२८॥

अमरेश्वराचे पश्चिमेसी ॥ अमरतीर्थी प्रतिदिवशी ॥ स्नान करोनि अमरेश्वरासी ॥ अमर पूजिती भक्तीने ॥२९॥

करिता यापरी एक हायन ॥ विजय पावले अमरगण ॥ फिरोनि लाधले निजस्थान ॥ अमरतीर्थप्रसादे ॥३०॥

ऐसी अमरतीर्थप्रसिद्धि ॥ तुम्हा वर्णिली यथाबुद्धि ॥ पुढिले अध्यायी सर्व शुद्धी ॥ कारक ऐका तीर्थ ते ॥३१॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ चतुर्विशोऽध्याय हा ॥३२॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये अमरतीर्थवर्णनं नाम चतुर्विंशोऽध्यायः ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP