मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय २

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय २

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

श्रीकृष्णायै नमः ॥ कृष्णा भवभयमोचिनी ॥ कृष्णा कृष्णाघहारिणी ॥ कृष्णा कृष्णस्वरूपिणी ॥ कृष्णाबाई माउली ॥१॥

मागील अध्यायी कृष्णाजनन ॥ ऐकोनि ऋषी अस्वस्थमन ॥ बोलती हे ब्रह्मनंदन ॥ तृप्ति नोहे मानसी ॥२॥

कृष्णा कैशी या भूवरी ॥ तीर्थे आणिली नानापरी ॥ हेचि कथा सविस्तरी ॥ कोण कथी तुजवीण ॥३॥

परिसोनिया ऋषिवचन ॥ नारद बोले संतोषून ॥ तुमचे कृष्णेठायी मन ॥ सहज मुक्ती तेणेचि ॥४॥

कृष्णाकथेची अति प्रीती ॥ असता वारितसे मुक्ती ॥ मीही तुमचेचि संगती ॥ पावेन गती हो उत्तमा ॥५॥

मन करोनि सावधान ॥ कृष्णाकथा करा श्रवण ॥ कलीचे जो करी दहन ॥ महिमान ऐसे तियेचे ॥६॥

जेथे होतसे कथापठण ॥ तेथोनि पातके जाती पळोन ॥ सर्प गरुडासि देखोन ॥ पळती जेवि सर्वदा ॥७॥

विपत्तीतून सुटती समस्त ॥ द्रव्य होतए परिप्लुत ॥ शुभोदय तो देश होत ॥ ऐसा महिमा जियेचा ॥८॥

गूढ असे ही कथा अति ॥ स्कंदासि सांगे उमापती ॥ तेथेंचि सहज गोड मी ती ॥ श्रवण केली सादरे ॥९॥

तीच तुम्हांसि सांगतो कथा ॥ लक्ष्य लावा तुम्ही आता ॥ नास्तिकालाही सांगता ॥ फल काय तयासी ॥१०॥

सुज्ञ शैव की भागवत ॥ अथवा असती भक्तिवंत ॥ देता तयासी हे अमृत ॥ योग्य होय सर्वथा ॥११॥

अविद्येने झाकली कीर्ती ॥ अद्‍भुत ऐसेचि बोलती ॥ आत्मभूत भक्तांप्रती ॥ कथन आवडे विष्णूंचे ॥१२॥

नास्तिक अथवा जे दांभिक ॥ तार्किक अथवा विषयात्मक ॥ दिव्य कृष्णाकथानक ॥ अयोग्य तयांसी सर्वथा ॥१३॥

निमग्न असती भवसागरी ॥ संकटी शांति इच्छिती भारी ॥ मर्त्यास हे औषधापरी ॥ दिव्य कृष्णामहात्म्य ॥१४॥

सद्भक्तीने श्रवण करिती ॥ पापे तयांची दूर जाती ॥ अनात्मवाद बहु कांपती ॥ ठाव नाही म्हणोनि ॥१५॥

ऐसा दुर्बोध हा प्रभाव ॥ सांगेल जो का धरोनि भाव ॥ तोचि सुखाचा घेईल ठाव ॥ महिमा यापरी जाण पा ॥१६॥

कृष्णामहात्म्य जे जाणती ॥ दुःखे तयांची नष्ट होती ॥ जी का स्वप्नी असे भिती ॥ केवि ती होय जाग्रता ॥१७॥

कृष्णावेणास्मरणकृशानु ॥ पापवृक्ष करी दहनु ॥ ऋषींसि म्हणे ब्रह्मनंदनु ॥ ऐसे कृष्णामहात्म्य ॥१८॥

पूर्वी इंद्रादि सकळ देव ॥ हे चरित्र ऐकण्यास्तव ॥ गेले कैलासपर्वती शिव ॥ तेथे उमेसह बैसला ॥१९॥

सर्वालंकारभूषित ॥ सकल जगाचे जे दैवत ॥ जे का होते आसनस्थ ॥ नमन करिती तयासी ॥२०॥

जयजयाजी गंगाधरा ॥ कृपासागरा पार्वतीवरा ॥ नीलकंठा कर्पूरगौरा ॥ गजचर्मधरा महेशा ॥२१॥

पंचवदन त्रिशूलधर ॥ कांसे वेष्टिले व्याघ्रांबर ॥ शोभे ललाटी अर्ध चंद्र ॥ पिनाकपाणी दयाळा ॥२२॥

अंगी विराजे भस्मउटी ॥ देवाधिदेवा धूर्जटी ॥ रुंडमाळा घातली कंठी ॥ जटाजूटी नीर हे ॥२३॥

ऐसी करोनिया स्तुती ॥ पुढती साष्टांग नमन करिती ॥ बैसविले मग शिवानिकटी ॥ सर्वांप्रती कार्तिके ॥२४॥

केला पाहोनि तो गौरव ॥ संतुष्ट जाहले पार्वती शिव ॥ पाचारोनि स्कंदराव ॥ बैसविला निजांकी ॥२५॥

स्कंदे पाहोनि तातवदन ॥ वंदिले मातृपितृचरण ॥ कर जोडोनि नम्र वचन ॥ बोले स्तवोनि तयांसी ॥२६॥

म्हणे तुमचे भेटीची आस ॥ आहे आम्हांस सदा खास ॥ जरी निरंजनी तुझा वास ॥ तरी भक्तार्थ सगुण तू ॥२७॥

केले नृकपाल धारण ॥ भस्म सर्वांगी लेपन ॥ सदा स्मशानी राहणे करून ॥ भिक्षा मागणे नेहमी ॥२८॥

जो का भुजंगभूषण ॥ करी गजचर्म वेष्टन ॥ करिती जयाचे योगानुकरण ॥ सनकादिक मुनीही ॥२९॥

जया पाहिजे आत्मविज्ञान ॥ तेणे करावे हेचि ध्यान ॥ म्हणोनिया हे सदाचरण ॥ वागविलेसे मज गमे ॥३०॥

तरी प्रसन्न होवोनि देवा ॥ सुखवी सकल मनोभावा ॥ तूचि साक्षी सर्व जीवा ॥ सदाशिवा महेशा ॥३१॥

ऐसे ऐकोनि स्कंदवचन ॥ संतोष पावले अमरगण ॥ भक्तिपूर्वक करोनि स्तवन ॥ करिती नमन आदरे ॥३२॥

म्हणे कार्तिक सनकादिकाला ॥ श्रवणी सादर देवमेळा ॥ झाला देखोनि मी पित्याला ॥ प्रश्न केला एक हो ॥३३॥

देवाधिदेवा इंदुशेखरा ॥ श्रीशंकरा कर्पूरगौरा ॥ कृपासागरा पंचवक्त्रा ॥ परिसा माझी विनंती ॥३४॥

पूर्वी समस्त ऋषी मिळोन ॥ करिती अगस्तीस जो प्रश्न ॥ की श्रीकृष्णाचरित्रकथन ॥ पुण्यपावन करी हो ॥३५॥

तोचि देवा तुजलागोनि ॥ प्रश्न करितो कर जोडोनि ॥ कृष्णाकथामृत माझिये कानी ॥ घाली दीनदयाळा ॥३६॥

हेचि तुझे मुख श्रवण ॥ करावे इच्छिती सर्व जन ॥ मीही होईन पंक्तिपावन ॥ शरणवत्सला महेशा ॥३७॥

ऐसे ऐकोनि ऋषि सकळी ॥ हर्षे पिटती गजरटाळी ॥ म्हणती धन्य चंद्रमौळी ॥ रत्‍न ऐसे प्रसवला ॥३८॥

ब्रह्मचारी जो निश्चित ॥ परोपकारी प्रतापवंत ॥ होती जयाचे दर्शने मुक्त ॥ प्राणी तो हा कार्तिक ॥३९॥

ऐसे परिसोनि मुनिवचन ॥ संतुष्ट झाला उमारमण ॥ प्रेमे स्कंदासि पोटी धरून ॥ म्हणे परिस बाळका ॥४०॥

जिचे चरित्र आपुले कानी ॥ पडावे ही इच्छा मनी ॥ धरिली तुवा ती मजपासूनि ॥ झाली उत्पन्न जाणिजे ॥४१॥

विष्णूने ही निर्माण केली ॥ तरी हरिहर एक बोली ॥ जैसा कापूर परिमळी ॥ भेद नसेचि सर्वथा ॥४२॥

कल्पारंभी कृष्णावेणी ॥ उत्पन्न झाली सर्व भुवनी ॥ हेतु असे पापशमनी ॥ हेचि जाण सर्वथा ॥४३॥

पातकांचे करी कर्षण ॥ म्हणोनि कृष्णा नामाभिधान ॥ गाती हरुषे भक्त जन ॥ पुण्यपावन नाम हे ॥४४॥

महानदी ही सुविख्यात ॥ इचे महात्म्य अति अद्‍भुत ॥ स्नाने दर्शने जीव मुक्त ॥ होती नरकस्थ जीवहि ॥४५॥

कृष्णावेणाकथामृत ॥ पढता निर्मळ होय चित्त ॥ श्रवणे कृतात भयाभीत ॥ होय निश्चये मुनीहो ॥४६॥

पुढिले अध्यायी कथा सुरस ॥ येईल कृष्णा भूतळास ॥ नारद म्हणे मुनिवरास ॥ परिसा चित्त देवोनि ॥४७॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ द्वितीयोऽध्याय गोड हा ॥४८॥

॥इति श्रीस्कंदपुराणे रेवाखंडस्थ कृष्णामाहात्म्ये महात्म्यकथाप्रश्नोनाम द्वितीयोऽध्यायः ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP