श्रीगणेशाय नमः ॥
कृष्णारामचंद्र समीप येता ॥ भक्तभरता लक्ष्मीपिता ॥ उचंबळोनी सन्मुख जाता ॥ हर्ष चित्ती न समाये ॥१॥
आता श्रोते सावधान ॥ रामतीर्थाचे महिमान ॥ जे का भैरवतीर्थापासून ॥ पंचवीस धनु ऐका ते ॥२॥
अयोध्याधिपति दशरथ ॥ रामनामे तयाचा सुत ॥ जो का साक्षात् रमाकांत ॥ रावणांतक अवतरे ॥३॥
एक बाण एक वचन ॥ एक पत्नी प्रजापालन ॥ करिता औरस पुत्रासमान ॥ आश्चर्य एक जाहले ॥४॥
साकेतवासी एक ब्राह्मण ॥ जयशर्मा जया अभिधान ॥ तयाचा असे एक नंदन ॥ पंचहायन वयाचा ॥५॥
होता तयाचे मौजीबंधन ॥ ब्रह्मचारी पावला तात्काळ मरण ॥ मातापिता करिती रुदन ॥ मूर्च्छायमान होऊनी ॥६॥
प्रेत घेऊनि शोक करित ॥ येऊनि राजद्वारी टाकित ॥ म्हणे अरे सीताकांत ॥ थोर आकांत करीतचि ॥७॥
अरे पापिष्ठा राघवा ॥ बाळ नेला रे हा दैवा ॥ देतो तुझिये द्वारी जीवा ॥ दुजी हत्या घे माथा ॥८॥
प्रजेसि आले अकाली मरण ॥ यासि असे राजा कारण ॥ बाळ माझा राजीव नयन ॥ तुझे पायी ठेविला ॥९॥
मस्तक आपटीतसे धरणी ॥ पाहोनिया राजमणी ॥ तया आश्वासन देऊनी ॥ शोधाकारणे निघाला ॥१०॥
वनी उपवनी गिरिकंदरी ॥ शोधित जाय सप्तशिखरी ॥ तो एक धूम्रपान करी ॥ शूद्र ऐसा देखिला ॥११॥
चकित होऊनिया राम ॥ म्हणे अधर्माचे हेचि वर्म ॥ शूद्रे आचरिला विप्रधर्म ॥ स्वधर्म सोडिला पापिष्ठे ॥१२॥
ऐसा विचार करोनी ॥ शूद्रतापस मारोनी ॥ रामराजा निघे तेथुनी ॥ निजसदनी यावया ॥१३॥
घरी येऊनी जव पाहत ॥ ब्राह्मण ससुत आनंदित ॥ म्हणे जाहला बाळ जिवंत ॥ सुखी नांद राजया ॥१४॥
घेऊनिया आपुला बाळ ॥ विप्र गेला पाहोनि नवल ॥ साशंक होवोनि राम केवल ॥ वसिष्ठासी पुसतसे ॥१५॥
अधर्माचा नाश केला ॥ तापसवध परि घडला ॥ वसिष्ठ म्हणती पुण्यजला ॥ कृष्णा सेवी आदरे ॥१६॥
ऐसी ऐकोनि गुरुवाणी ॥ कृष्णेसि आला कोदंडपाणि ॥ धनुष्कोटिने कुंडे खणी ॥ पांच स्नान करावया ॥१७॥
तेच झाले रामतीर्थ ॥ ब्रह्मसत्र असे जेथ ॥ स्नान करोनी राम तेथ ॥ लक्ष गोदान देतसे ॥१८॥
मुक्त जाहला अयोध्यानाथ ॥ रामेशलिंग स्थापित तेथ ॥ नारद ऋषींस सांगत ॥ पुण्य अमित रामतीर्थी ॥१९॥
कार्तिकपौर्णिमाकृतिकेसी ॥ स्नान करिता रामतीर्थासी ॥ द्वादशाब्दव्रतफलासी ॥ पावे रामेशकृपेने ॥२०॥
भक्तिपूर्वक श्राद्ध करिता ॥ सप्त कुलांचा उद्धार तत्त्वता ॥ हा अध्याय श्रवण करिता ॥ मुक्तता होय तात्काळ ॥२१॥
पुढले अध्यायी भीमकुंड ॥ महिमा सांगेल स्कंद प्रचंड ॥ सोडोनिया वाद वितंड ॥ ब्रह्मांडनायक वश करा ॥२२॥
कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ तृप्ति पावाल तेणे अखंड ॥ एकादशोऽध्याय वर्णिला ॥२३॥
इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये रामतीर्थवर्णनं नाम एकादशोऽध्यायः ॥