मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ५९

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ५९

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

करिता कृष्णेसि नमस्कार ॥ पापे धावती दूर दूर ॥ ब्रह्मा विष्णू महेश्वर ॥ तुष्ट सर्वदा तयासी ॥१॥

कैलासपर्वती शंकरात्मज ॥ सांगे मुनीला क्षेत्र सहज व जया देखता अहो घटज ॥ आनंदसागरी बुडाला ॥२॥

असाध्य जी का अमराप्रती ॥ ती ही विंध्यगिरी विनंती ॥ करावी परी दुःख अती ॥ काशीवियोगज होतसे ॥३॥

तेही न व्हावे आपणासी ॥ म्हणोनिया तो अगस्ती ऋषी ॥ अनेक हिंडोनि तीर्थांसी ॥ सुखासि कोठे न लाधे ॥४॥

शेवटी येवोनि श्रीगिरीला ॥ दैवे पाहतांचि श्रृंगाला ॥ तैसेचि पाताळगंगाजला ॥ आनंदला अगस्ती ॥५॥

जो का गिरिवरी मल्लिकार्जुन ॥ करी तयाला साष्टांग नमन ॥ करिता जोडोनि अंजली स्तवन ॥ मदनांतक म्हणतसे ॥६॥

इल्वलवातापि दानवा ॥ ठार मारोनिया तुवा ॥ प्राशिला समुद्र कुंभसंभवा ॥ विंध्य नमविला श्रीगुरो ॥७॥

परोपकारार्थ जया जगणे ॥ धन्य तयाचे सफळ जिणे ॥ येरा जगणे आणि मरणे ॥ सरिसेंचि जाणे मी तरी ॥८॥

सदा करणे परोपकार ॥ हाचि जयाचा सुनिर्धार ॥ तीर्थे सर्वही निरंतर ॥ राहत याजवळि हे ॥९॥

जो परोपकारी सदा ॥ तया न बाधे कदा आपदा ॥ श्री तयाचे सेविते पदा ॥ जैसी दामोदराचे ॥१०॥

जैसा पातलासि तू येथे ॥ तैसेचि आणिसी कार्तिकाते ॥ तरी मोठेच पुण्य तूते ॥ घडेल इष्ट संगमे ॥११॥

ऐसी शिवाची ती सुधोक्ती ॥ ऐकोनि चालिला मुनी अगस्ती ॥ स्कंदा पहावे ऐसे चित्ती ॥ धरोनि कृष्णातटाने ॥१२॥

तीर्थातीर्थासि मुनिवर ॥ सभार्य करीत नमस्कार ॥ कनका दर्गेसि पाहता कर ॥ जोडोनि नमन करीतसे ॥१३॥

लोपामुद्रेसि म्हणे प्रिये ॥ कनका दुर्गेसि पहा चल ये ॥ दर्शन जियेचे घेतांचि होये ॥ अखंड सौभाग्यवती स्त्री ॥१४॥

त्रिभुवनाला जो अजिंक ॥ तो हा हिरण्यकशिपू एक ॥ नरहरीने मारोनि देख ॥ प्रल्हाद तोक रक्षिला ॥१५॥

तदा तापला नरहरी ॥ देखोनि श्रीही होय घाबरी ॥ शांत केला स्तवोनि परी ॥ प्रल्हादाने तेधवा ॥१६॥

आणि जोडोनि अंजुळी ॥ उभा राहिला श्रीहरीजवळी ॥ बोले नरहरी तये वेळी ॥ प्रल्हादासि प्रीतीने ॥१७॥

श्रांत जाहले वैशाखमासी ॥ म्हणोनि पन्हे दे पिआवयासी ॥ वत्सा तेणे मम मानसी ॥ समाधान होइल ॥१८॥

ऐसे परिसतांचि प्रल्हाद ॥ गुळ चिंचा मिरी स्वाद ॥ पन्हे ते करोनि सुखद ॥ देवासि अर्पी भक्तीने ॥१९॥

मग नरहरी सहस्त्र घटा ॥ तोषोनि पीतसे घटघटा ॥ तदा प्रल्हाद उच्छिष्टा ॥ याची हस्तासि जोडुनी ॥२०॥

देवाधिदेवा तुझा प्रसाद ॥ घेई आम्हांसि आनंद ॥ बरे बोलोनि भक्तवरद ॥ अर्धे प्राशन करीतसे ॥२१॥

अवशिष्ट देतसे निजसेवका ॥ पाहोनिया ते लक्ष्मी कनका ॥ तोषोनिया भक्तपाळिका ॥ कनकवृष्टिला करीतसे ॥२२॥

सवेचि कृष्णा भक्तवत्सला ॥ नरहरीसी पहावयाला ॥ फोडोनि गेली पर्वताला ॥ म्हणे पत्‍निला अगस्ती ॥२३॥

कनकामाता एक बाजूसी ॥ पिता नरहरी दुजे बाजूसी ॥ मध्ये कृष्णा विराजे कशी ॥ कन्या क्रीडा करीतसे ॥२४॥

तदा हासोनि सकळदेव ॥ नरहरीचा करिती स्तव ॥ नष्ट केला दैत्यगर्व ॥ नमो नमो नरहरे ॥५॥

वित्तमत्तघ्न देवेशा ॥ रमावरा हे वरप्रदेशा ॥ त्रैलोक्यनायका अकिंचनेशा ॥ नमो नमो नरहरे ॥२६॥

स्तवोनि यापरी नरहरीला ॥ पूजोनि देती पन्हे पियाला ॥ कोणी सहस्त्र शत घटाला ॥ लक्ष कोणी कोटिही ॥२७॥

ऐसी तयांची पाहोनि भक्ती ॥ अर्धे पीतसे लक्ष्मीपती ॥ मग देवही साष्टांग नमती ॥ करोनि गेले निजपदा ॥२८॥

ऐसे पतीचे ऐकोनि वचन ॥ पतिव्रता श्रीहरि पूजन ॥ करी पतीसह भावेकरून ॥ ब्रह्मनंदन म्हणतसे ॥२९॥

मग पहाया स्वामि कार्त्तिक ॥ जाय अगस्ति सपत्‍निक ॥ तैसिच कृष्णा देशा अनेक ॥ पवित्र करीतची चालिली ॥३०॥

स्वजले आपुले तरंगिणी ॥ सकल कलिमल विनाशिनी ॥ ज्ञानहीनासि मुक्तिदायिनी ॥ पतीस चालली पहाया ॥३१॥

अनंत तीर्थ जियेमाजी ॥ आहेत सागरापर्यंत जी जी ॥ तारकतीर्थ तयामाजी ॥ योजनांतर जयासी ॥३२॥

याज्ञवल्क्यादि मुनी तेथ ॥ जावोनि पाहती वृक्ष अश्वत्थ ॥ होते जयावरी राक्षस श्रेष्ठ ॥ अति भयानक मुनी हो ॥३३॥

दर्शन ऋषींचे होतांचि मुक्त ॥ होवोनि जाहले शरणागत ॥ आणि सांगती स्ववृत्तांत ॥ वृक्षापासाव उतरूनी ॥३४॥

आम्ही ब्राह्मणपुत्र सकळ ॥ रूपविद्यामदे व्याकुळ ॥ पाहोनि हासलो कृश दुर्बळ ॥ वामदेवासि एकदा ॥३५॥

ऐसा अनादर जरी केला ॥ तरी तो मुनी उगा बसला ॥ दोष आमुचा आम्हा फळला ॥ राक्षसजन्मास पावलो ॥३६॥

अश्वत्थ हा पुण्य पावन ॥ याचेनि संगे तुमचे दर्शन ॥ आता आमुचे पापमोचन ॥ झाले निश्चये जाणिजे ॥३७॥

ऐशी तयांची दीनवाणी ॥ ऐकोनि उपजली दया मनी ॥ आणि कृष्णोदके मुनी ॥ सिंचन करिते जाहले ॥३८॥

स्पर्श होता कृष्नोदकाचा ॥ देह जाहला दिव्य तयांचा ॥ भाव अंतरी धरोनि साचा ॥ नमन करिती मुनीसी ॥३९॥

मग मुनींच्या वंदोनि चरणा ॥ करिती कृष्णेचिया स्नाना ॥ तेथेचि राहोनि तीर्थाभिधाना ॥ करिती तारक असे हो ॥४०॥

पुढे असे तीर्थऋषी ॥ याज्ञवल्क्यादि जेथ ऋषी ॥ स्नान करिती ते तुम्हांसी ॥ ब्रह्मपद निवेदिले ॥४१॥

पुढे सागरसंगममहिमा ॥ श्रवण करिता भक्तिने रमा ॥ कृपा करील मोक्षधामा ॥ पावाल ठेवा निश्चय ॥४२॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ एकुणसाठावा अध्याय हा ॥४३॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये तारकतीर्थवर्णनं नाम एकोनषष्टितमोऽध्यायः ॥५९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP