श्रीगणेशाय नमः ॥
करिता कृष्णाग्निसेवन ॥ शीततमभयवारण ॥ होते म्हणोनि तया शरण ॥ अनन्य भावे रिघावे ॥१॥
पूर्वाध्यायी अमृत मधुर ॥ वचन मुनीचे ऐकोनि द्विजवर ॥ आता विचारी जोडोनि कर ॥ तया ऋषिवरासी ॥२॥
महाबळापासाव उगम ॥ होवोनि जाहला अब्धिसंगम ॥ जिचा तियेमाजि परम ॥ उत्तम तीर्थ कवण हो ॥३॥
कृष्णेत तीर्थे अनेक असती ॥ कोटि तयांमाजि माझी गती ॥ सांगा मुनिवर्य मजप्रती ॥ कृपा चित्ती ठेवुनी ॥४॥
ऐसी ऐकोनि विप्रवाणी ॥ तया बोलती सकळ मुनी ॥ पंचबाणप्रमाण तेथुनी ॥ तीर्थ ज्वालानृसिंह ॥५॥
देख जावोनि ती कृष्णा ॥ ऐसे ऐकिता वंदोनि चरणा ॥ आज्ञा मुनीची धरोनि प्रमाणा ॥ तात्काळ गेला सभार्य ॥६॥
आश्रम करोनि कृष्णातटी ॥ अंध मुके ते दंपती ॥ कन्येसि असता बृहस्पती ॥ करिती उग्र तपाते ॥७॥
उभयतांनी निजशरीर ॥ ममता सोडोनि निरंतर ॥ अर्पिले प्रेमपुरःसर ॥ तीर्थदेवासि मुनी हो ॥८॥
त्रिकाळ करिती सदा स्नान ॥ कृष्णावेणीचे अंतरी ध्यान ॥ भक्तिपूर्वक निरशन ॥ करिती हायन द्वादश ॥९॥
येता फिरोनि कन्येसि गुरू ॥ होय गोचर दयासागरू ॥ विप्रपत्नीसी नेत्र चारु ॥ वाचा विप्रासि देतसे ॥१०॥
स्वप्नी देखोनि उभयतांही ॥ म्हणती नृहरे त्राहि त्राहि ॥ तुजवाचोनि आह्मा नाही ॥ त्राता दीनदयाळा ॥११॥
तदा नरहरी ब्राह्मणासी ॥ म्हणे राजा सूर्यवंशी ॥ भीमनामा तयापाशी ॥ जावे तुवा ममाज्ञे ॥१२॥
आणि म्हणावे की तुवा ॥ बापा करावी एक सेवा ॥ जलापासाव नरहरी देवा ॥ आणी सिद्धभूमीसी ॥१३॥
ऐसे देखोनिया स्वप्न ॥ जागाचि जाहला तो ब्राह्मण ॥ म्हणे भार्येसि तोषून ॥ धन्य धन्य आजि मी ॥१४॥
अहो प्रिये मी नरहरी ॥ स्वप्नी देखिला रजनीभीतरी ॥ दिधली तयाने मज वैखरी ॥ मूकत्व हरिले कृपेने ॥१५॥
अहो केवळ भक्तप्रिय ॥ देवाधिदेव जगद्वंद्य ॥ मूढ अभक्ता जो अगम्य ॥ दुःखरूप सदाची ॥१६॥
अहो सदय ते मुनिवर गुरू ॥ तयाचे कृपे हा लक्ष्मीवरू ॥ देखिला म्हणोनि मी लेकरू ॥ मातापितरू होतसे ॥१७॥
बोलोनि यापरी ते दंपती ॥ राजयाकडे गमन करिती ॥ स्वप्नी आली जी प्रचीती ॥ ती नृपाप्रती कथियली ॥१८॥
ऐकोनि राजा उभयतांसी ॥ नमन करोनि आसनासी ॥ देवोनि करी पूजनासी ॥ वस्त्रभूषणसुगंधे ॥१९॥
येवोनिया हर्षभरते ॥ म्हणे धन्य धन्य जन्म ते ॥ जेणे तपे नरहरीते ॥ केले नयनगोचर ॥२०॥
धन्य विप्र हा विप्रपत्नी ॥ धन्य शुभाचार धरणी ॥ जेथे कृष्णाघहारिणी ॥ भक्तजननी वसतसे ॥२१॥
अहो भूदेव काय मना ॥ ते कथन करा या दासजना ॥ ऐसी ऐकोनिया प्रार्थना ॥ द्विज म्हणाला नृपासी ॥२२॥
मंत्रज्ञ विप्राचिये हाती ॥ उदकापासाव नरहरीमूर्ती ॥ काढोनि ठेवी सिद्धस्थानि ती ॥ यवत्क्षितीचंद्रतारका ॥२३॥
जरी मानिसी हे असत्य ॥ तरी होशील भस्म सत्य ॥ ऐसे ऐकोनि विप्रवाक्य ॥ जाय कृष्णातटी तो ॥२४॥
संगे घेवोनि ब्राह्मणोत्तम ॥ येवोनि तेथे सामात्य भीम ॥ जेथे ज्वाळा भव्य परम ॥ उदकापासाव उसळती ॥२५॥
तेथे तृणाच्या राशी आणून ॥ डोहामाजि देत फेकून ॥ सहसा महामूर्ति घेऊन ॥ आला बाहेर झडकरी ॥२६॥
शंख तूर्य मृदंगादी ॥ वाद्ये वाजविती मधुरनादी ॥ ऋग्युजुःसामवेदी ॥ स्तविती विप्र तेधवा ॥२७॥
कृष्णातटी स्थापोनि मूर्ती ॥ ज्वालानृसिंह नाम देती ॥ पूजन भक्तीने सकल करिती ॥ प्रेमे बोलती जय हरे ॥२८॥
करोनि उत्सव सर्व यापरी ॥ गेले आपापले घरी ॥ सभार्य विप्र तो वास करी ॥ तेथेंचि नरहरी भक्तीने ॥२९॥
सदा सेवोनि नरहरीसी ॥ दोघे पावले सायुज्यपदासी ॥ ऐसे नृसिंहचरित्रासी मी तुम्हांसि कथियेले ॥३०॥
भक्तिपूर्वक यासि ऐकता ॥ किंवा भक्तीने कथन करिता ॥ होय मनोरथ पूर्ण तत्त्वता ॥ सायुज्यताही मिळतसे ॥३१॥
म्हणे शिवाचा ज्येष्ठ पुत्र ॥ पुढे कथानक परम पवित्र ॥ लाधाल ऐकता इह परत्र ॥ सुख सर्वत्र मुनी हो ॥३२॥
कृष्णकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ पंचेचाळिसावा अध्याय हा ॥३३॥
इति स्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये नृसिंहमाहात्म्यवर्णनं नाम पंचचत्वारिंशोऽध्यायः ॥४५॥