मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ५२

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ५२

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

तटी जियेच्या योगिमंडळ ॥ बैसोनि आपुले ह्रदयकमळ ॥ वाहे जियेला ती कृपाळ ॥ कृष्णा विमल मज करो ॥१॥

गिरीजात्मक म्हणे ऋषींसी ॥ पूर्वाध्यायी शंखतीर्थासी ॥ येवोनि करिती स्नान तापसी ॥ याज्ञवल्क्यादि सकळ ते ॥२॥

पुढे जाहली काय कथा ॥ तेची ऐका तुम्ही आता ॥ याज्ञवल्क्यादि मग पुढे जाता ॥ नैध्रुवाश्रम लागला ॥३॥

जेथे युधिष्ठिरमत्तहस्ती ॥ येवोनि आश्रम भग्न करिती ॥ सवेंचि ते मग मरण पावती ॥ नैध्रुवकोपे मुनी हो ॥४॥

तये वेळी धर्मराज ॥ धरी मुनींचे चरणांबुज ॥ म्हणे कृपाघन तुम्ही सहज ॥ करा वर्षाव मजवरी ॥५॥

तदा नरहरीभक्त नैध्रुव ॥ कृष्णानुचर हा धर्मराव ॥ आहे म्हणोनि येता कणव ॥ बोले वचन नृपासी ॥६॥

आजपासोनि जरी हस्ती ॥ येतील माझे आश्रमाप्रती ॥ तरी मरतील शीघ्र निश्चित्ती ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥७॥

ऐसे बोलोनि कमंडलू ॥ घेवोनि प्रोक्षिले दंती जळू ॥ तदा जिवंत तात्काळू ॥ होता नवल वाटले ॥८॥

यापरी देखोनि नैध्रुवाश्रम ॥ पुढे चालिले मुनिसत्तम ॥ आले त्रयोदश पवित्र परम ॥ तीर्थे जेथ तेथ हो ॥९॥

पहिले जाणिजे ब्रह्मतीर्थ ॥ याज्ञवल्क्यादि मुनि जेथ ॥ ब्रह्मयज्ञे ब्रह्मासि प्राप्त ॥ झाले स्कन्द म्हणतसे ॥१०॥

तेथोनि एकचि बाणावर ॥ पितृतीर्थ असे थोर ॥ तिळोदके जेथ पितर ॥ तृप्त होती तर्पिता ॥११॥

पुढे श्रीतीर्थ परम पावन ॥ बाणपंचक जया प्रमाण ॥ पति मिळावा नारायण ॥ म्हणोनि जेथे तपे श्री ॥१२॥

गौरितीर्थ असे चवथे ॥ आपणा वरावे कैलासनाथे ॥ म्हणोनि गौरी तपोनि जेथे ॥ तुष्ट शिवाते करीतसे ॥१३॥

स्नान करिता गौरितीर्थी ॥ मिळे स्त्रियेसी सौभाग्य संतती ॥ इंद्रतीर्थ असे पुढती ॥ स्नाने ऐश्वर्यदायक ॥१४॥

गौतमाचा होतांचि शाप ॥ उद्विग्न जाहला अमराधिप ॥ मुक्त म्हणावे म्हणोनि अमुप ॥ तीर्थे हिंडला राजा तो ॥१५॥

अखेर येता संगमस्थानी ॥ मुक्तपाप देवाग्रणी ॥ होवोनि गेला मग जेथुनी ॥ अमरावतीलागि ते ॥१६॥

इंद्रतीर्थापासोनि जवळ ॥ विष्णुतीर्थ अति निर्मळ ॥ जेथे करी तप वैकुंठपाळ ॥ देवा अमृत मिळाया ॥१७॥

विष्णुतीर्थी विष्णुदर्शन ॥ व्हावे म्हणोनि तपा गहन ॥ करिते झाले गंधर्वजन ॥ प्रसन्न कृष्ना होय ते ॥१८॥

वर देवोनि मनोरथ ॥ करी कृष्णा पूर्ण जेथ ॥ होय विद्यालाभ तेथ ॥ स्नान करिता नरासी ॥१९॥

पुढे उर्वशीतीर्थ रम्य ॥ स्नाने जेथिंचे बहुत पुण्य ॥ जेथे कृष्णा प्रसन्न होय ॥ उर्वशीला तत्तपे ॥२०॥

काय इच्छा असे तुजला ॥ ऐसे विचारी उर्वशीला ॥ येरी म्हणे धाडिले मला ॥ बलारातिने येथ हो ॥२१॥

विश्वामित्रासि भुलवावे ॥ स्वर्गासि नंतर तुवा यावे ॥ कथिले यापरी मला देवे ॥ शक्ति यास्तव देई भो ॥२२॥

उर्वशीची ही प्रार्थना ॥ ऐकोनि बोले बरे कृष्णा ॥ सवेंचि जाहली गुप्त जाणा ॥ करुणारसवाहिनी ॥२३॥

कृष्णेचिया प्रसादे ती ॥ जावोनि विश्वामित्राप्रती ॥ श्वान करोनि अमरावती ॥ लागि घेवोनि जातसे ॥२४॥

असो उर्वशीतीर्थाहून ॥ पुढे पन्नास शर प्रमाण ॥ सूर्यतीर्थ परम पावन ॥ ऐका कथानक तयाचे ॥२५॥

कृष्णातटी एक भूसुर ॥ राहोनि करी तप दुर्धर ॥ मनी आणोनि दिवाकर ॥ शतवत्सर बैसला ॥२६॥

तदा कृष्णा होवोनि तुष्ट ॥ म्हणे माग बा तुझे इष्ट ॥ ऐसे ऐकोनि द्विजश्रेष्ठ ॥ बोले स्पष्ट तियेसी ॥२७॥

माझे आश्रमी जगन्माते ॥ येवोनि स्नान करिती जे ते ॥ निष्पाप होवोनि तुझे पदाते ॥ जावोत देई हे मज ॥२८॥

ऐसे ऐकोन ती कृष्णा ॥ तथास्तु म्हणे तया ब्राह्मणा ॥ सवेंचि पावे अंतर्धाना ॥ जाणा सूर्यतीर्थ हे ॥२९॥

पुढे तीर्थ सप्तसागर ॥ ऐका तयाची कथा रुचिर ॥ शालग्रामी सुयशवर ॥ सुमति नामे नृप असे ॥३०॥

तो एकदा कृष्णातटी ॥ गेला सहज दैवदृष्टी ॥ तव अकस्मात होतसे भेटी ॥ याज्ञवल्क्यादि मुनींची ॥३१॥

मग तयांना नमस्कार ॥ करोनि म्हणे तो वसुधावर ॥ धन्य माझे कुल थोर ॥ चरण आपुले देखिले ॥३२॥

आजपर्यंत मी ही क्षिती ॥ पाळिली जशी दंडनीती ॥ आता कैशी परत्र गती ॥ मज होईल मुनी हो ॥३३॥

ऐसे विचारिता क्षणी ॥ सांगती तयाते सकळ मुनी ॥ येथे यथाविधि मख करोनी ॥ कृष्णार्पण करी हो ॥३४॥

बरे बोलोनि तो नृपाळ ॥ संभार जमवी तात्काल सकळ ॥ यज्ञ कृष्णार्पण केवळ ॥ करी दीक्षा घेऊनी ॥३५॥

यज्ञांती याज्ञवल्क्यादिक ॥ तपोबळे सप्तसागरोदक ॥ आणोनि करिती मंत्राभिषेक ॥ दीक्षितासी मुनी हो ॥३६॥

होता यापरी स्नान अवभृथ ॥ राजा जाहला स्वतःकृतार्थ ॥ सप्तसागरतीर्थ तेथ ॥ शोभे यज्ञभूमीने ॥३७॥

येथेचि कलियुगी जन्मेजय ॥ करील सर्पसत्र निर्भय ॥ स्नाने जेथिचे फिरोनि सदय ॥ होईल तो गा निश्चये ॥३८॥

येथोनि एक कोसावर ॥ विभूतितीर्थ उग्र दूर ॥ तेथे तपे एक द्विजवर ॥ तटी कृष्णानदीचे ॥३९॥

तव अकस्मात भयानक ॥ राक्षस धावला त्यावरी एक ॥ देखता भीतीने विप्रे उदक ॥ मृत्तिकेसह फेकिले ॥४०॥

होता कृष्णोदकस्पर्श ॥ भस्म जाहला तो राक्षस ॥ पावोनि दिव्य देह सुरस ॥ द्विजास करी नमन तो ॥४१॥

उभा ठाकला जोडोनि कर ॥ म्हणे तुम्ही कृपासागर ॥ केला आजि ममोद्धार ॥ नीच योनीपासुनी ॥४२॥

बोलोनि यापरी दिव्य पुरुष ॥ गेला विमानी स्वर्गलोकास ॥ स्कंद सांगे ऋषिजनांस ॥ तेच विभूतितीर्थ हो ॥४३॥

पश्चिमेसी तीस हजार ॥ धनु असे हो जया अंतर ॥ तेचि गोपाद तीर्थ सुंदर ॥ बहु गोपाद सुचिन्हे ॥४४॥

धर्मपालक श्रीधूर्जटी ॥ लिंगरूपी गोपाद शेवटी ॥ प्रगट जाहला कृष्णातटी ॥ गोपादेश्वर म्हणोनी ॥४५॥

गोपादेश्वरा कामधेनू ॥ पूजा करोनि करी नमनू ॥ ऐश्वर्य आपुले तीर्थार्पणू ॥ करोनि वराला देतसे ॥४६॥

स्नान करोनि गोपादतीर्थी ॥ देखे डोळा गोपादपती ॥ उपवास करिता तीन राती ॥ गोवधमुक्ती होतसे ॥४७॥

यज्ञार्थ दूध दही साय ॥ देवोनि वाढवी आपणा गाय ॥ सदा वंदा तिचे पाय ॥ माय आपुली म्हणोनी ॥४८॥

ताडण करिती जे गाईसी ॥ रोधिती देती केल्श इसी ॥ ते गोतीर्थसेवनासी ॥ करिता होती मुक्त पै ॥४९॥

गोपादतीर्थी करोनि स्नान ॥ एक मास शिवार्चन ॥ करोनि पितरा तिलतर्प्ण ॥ गोलोक मिळतसे ॥५०॥

तयांचे जे मनोरथ ॥ ते पुरवीन मी येथ ॥ ऐसे बोलोनि स्वर्गाप्रत ॥ गेली कामदुघा ती ॥५१॥

पर्वकाळी सकळ गाई ॥ स्वर्गाहून या ठायी ॥ येती म्हणोनि करा घाई ॥ स्नान पूजन जपासी ॥५२॥

मंत्रम्‍ ॥ नमो गोभ्यः श्रीपतिभ्यः सौरभेयीभ्यः एव च ॥ नमो ब्रह्मसुताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नमः ॥५३॥

ऐसा म्हणोनिया मंत्र ॥ जप करिता होय पवित्र ॥ स्कंद म्हणतसे आता विचित्र ॥ चरित्र सांगेन मी पुढे ॥५४॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ बावन्नावा अध्याय हा ॥५५॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये गोष्पदतीर्थवर्णनं नाम द्विपंचाशत्तमोऽध्यायः ॥५२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP