मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ९

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ९

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

येता कृष्णाधाराधर ॥ नाचो लागले भक्तमयूर ॥ चित्तचातक होवोनि समोर ॥ फार टाहो फोडती ॥१॥

ऋषि म्हणती अहो स्कंद ॥ तपन झाला आनंदकंद ॥ ऐकोनि लागला हाचि छंद ॥ कृष्णामाहात्म्य ऐकावे ॥२॥

ऐशी ऐकोनिया वाणी ॥ स्कंद आणि कृष्णा ध्यानी ॥ म्हणे ऐका चित्त देवोनी ॥ कृष्णामहिमा अगाध ॥३॥

विष्णूतीर्थापासूनि दूर ॥ अग्नितीर्थ दंड सहस्त्र ॥ जे का भुक्तिमुक्तीचे घर ॥ कथा मनोहर येविषयी ॥४॥

मानसपुत्र चतुराननाचा ॥ ऋषीश्वर भृगु नावाचा ॥ दाता दयालु सदा वाचा ॥ नामी शिवाच्या रंगली ॥५॥

सत्यवादी शुचिष्मंत ॥ दयाशील ज्ञानवंत ॥ प्रिय अतीथ अभ्यागत ॥ शिवभक्त महायोगी ॥६॥

तयाची भार्या नामे दाता ॥ साध्वी सुशीला नित्य शांता ॥ प्रेमे सेवीतसे स्वकांता ॥ काय वृत्तांत जाहला ॥७॥

तो कोणेक दिवशी ऋषी ॥ आदित्य येता मध्यान्हीशी ॥ सूर्याराधना करावयासी ॥ गंगातीरासी पातला ॥८॥

इकडे शूलनामा असुर ॥ विक्राळ दाढा भयंकर ॥ मुनिपत्‍नीस सत्वर आला हरण करावया ॥९॥

देखोनि ऋषीचा आश्रम ॥ किंचित घेतसे विश्राम ॥ चुंबन करो पाहती द्रुम ॥ व्योम ऐसे वाटले ॥१०॥

ऐसे जे का पुण्यस्थल ॥ तेथे वृक्ष असती प्रफुल्ल ॥ नाना पुष्पांचे परिमल ॥ भ्रमर गुंजारव करिताती ॥११॥

जाई जुई चंपक मालती ॥ मोगरे नाना जाती फुलती ॥ पारिजात गुलाब सेवंत ॥ रंग असती भिन्न भिन्न ॥१२॥

दवणा पाच मरवा निर्मळ ॥ सुवास सुटतसे सोज्वळ ॥ ठायी ठायी सरोवरे विपुल ॥ माजी मराळ खेळती ॥१३॥

नाना जाती वृक्ष असती ॥ पक्वफलभारे नमती ॥ बकुल अम्र चिंचा किती ॥ कपित्थ असती बहुसाल ॥१४॥

केळी नारळी शिताफळे ॥ अत्यंत गोड रामफळे ॥ खिरण्या जांभळे रायावळे ॥ कोंब कोवळे वेळूंचे ॥१५॥

सुरु कृष्णागर मैलागर ॥ पनस दाळिंबे पेरू अपार ॥ खजूर पोफळी देवदार ॥ रुद्राक्ष सुंदर शोभती ॥१६॥

ऐसे नानाजाती वृक्ष असती ॥ पक्षी तयांवरी शब्द करिती ॥ शुक सारिका मंजुळ बोलती ॥ कोकिळा गाती सुस्वर ॥१७॥

ठायी ठायी मनोहर ॥ नाचती मयूरी मयूर ॥ गुंजारव करिती अति मधुर ॥ भ्रमर सुवासा देखोनी ॥१८॥

विप्र वेदघोष करिती ॥ स्वाहा वषट्‌कार बोलती ॥ तेथ जाहला असुरपति ॥ द्विजरूप तात्काळ ॥१९॥

आश्रमी जेव्हा तो शिरला ॥ मृग पक्षांनी आक्रोश केला ॥ आ करोनि म्हणे भृगुपत्‍नीला ॥ काम चेतला अंतरी ॥२०॥

ऐकोनि तयाच्या वचना ॥ बाहेर आली भृग्वंगना॥ देखोनिया तया ब्राह्मणा ॥ काय वचना बोलत ॥२१॥

अरे तू असशी कोठील कोण ॥ येथे यावया काय कारण ॥ परस्त्रीसी पाचारण ॥ काय कारण करतोसी ॥२२॥

ऐकोनि सतीचे उद्‌गार ॥ येरू म्हणे तुझा भ्रतार ॥ मीचि होतो म्हणूनि सत्वर ॥ बाहेर येई सुंदरी ॥२३॥

पूर्वी तुझे पित्याकडून ॥ झाले मजशी वाग्‍दान ॥ तरी तुज न्यावयालागून ॥ जाण येथे आलो गे ॥२४॥

पूर्वी केले जे भाषण ॥ त्याचेच बल अधिक जाण ॥ यासी असे गे शास्त्रप्रमाण ॥ विद्वज्जन बोलती ॥२५॥

ऐकोनि दुष्टाची ते वाणी ॥ भयाभीत झाली विप्रपत्‍नी ॥ मग आपल्या गृह्याग्निलागुनी ॥ शरण गेली तेधवा ॥२६॥

प्रदक्षिणा घालिता कुंडास ॥ कंप सुटला तदंगास ॥ येरु म्हणे गृह्यदेवतेस ॥ पूस आता झडकरी ॥२७॥

ऐकोनि ऐसे ती भामिनी ॥ विचारी पावका सांग झणी ॥ पुण्यपातका साक्षी होवोनी ॥ भूतांमाजी राहसी ॥२८॥

पावक म्हणे तुजलागून ॥ द्यावी राक्षसा ऐसे वचन ॥ असता भृगूसी अर्पण ॥ केले तुझिया पित्याने ॥२९॥

ऐकोनि अग्निची मात ॥ राक्षसे धरिला तिचा हात ॥ भृगूसी तो भीत भीत ॥ आश्रमापासाव निघाला ॥३०॥

गर्भिणी मुनीची भार्या ॥ विधात्या म्हणे अरे निर्दया ॥ काय केले हे अनार्या ॥ वाया गांजिशी का मज ॥३१॥

अहो सकल वनस्पती ॥ राक्षसे नेले मजप्रति ॥ ऐसे कथोनि माझा पति ॥ सावध करा तात्काळ ॥३२॥

अहो आश्रमदेवता ॥ राक्षसे नेली तुझी दांता ॥ ऐसे कथोनि माझिये कांता ॥ सावध करा तात्काळ ॥३३॥

अहो पुष्करणी सपद्मिनी ॥ राक्षसे नेली मज हिरोनी ॥ ऐसे कथोनी भृगुमुनि ॥ सावध करा तात्काळ ॥३४॥

स्फुंदस्फुंदोनि ते अंगना ॥ हाका मारी पक्षिगणा ॥ तुम्ही तरी माझिया रमणा ॥ सावध करा तात्काळ ॥३५॥

अरे गर्भस्थ माझिया बाळा ॥ काय करु मी हा कपाळा ॥ ऐसे ऐकता बाहेर आला ॥ हुंकार करोनी झडकरी ॥३६॥

पाहोनि तव बालतेज ॥ राक्षस झाला भस्म सहज ॥ कडिये घेवोनि तो निज ॥ बाळक आली घरासी ॥३७॥

इकडे तीर्थाहूनि ऋषी ॥ आश्रमी येता पाहे सुताशी ॥ सवेंचि कापोनि मानसी ॥ म्हणे पत्‍नीसी काय हे ॥३८॥

तुझा अपराधी असे कवण ॥ कैसे झाले हे गर्भपतन ॥ भस्म येथे काय कारण ॥ कथन करी मजलागी ॥३९॥

ऐकोनि ऋषीचे वचन ॥ झाले वृत्त करी कथन ॥ अग्निसी शापी ऋषि कोपून ॥ सर्वभक्ष्यी तू होसी ॥४०॥

ऐकोनि पत्‍निमुखीची वार्ता ॥ क्रोध नावरे ऋषीचे चित्ता ॥ म्हणे गृह्याग्नीने तत्त्वता ॥ साक्ष कैशी दीधली ॥४१॥

लोक म्हणती तुज पावक ॥ धर्मरहस्यामाजि मूर्ख ॥ आहेसी सकलाहितकारक ॥ आजि कळले पै माते ॥४२॥

ऐसे ऐकोनी शापवचन ॥ अग्नि झाला क्रोधायमान ॥ सर्वशक्ति संहारून ॥ लीन जाहला सागरी ॥४३॥

नष्ट झाला जठरानळ ॥ जिरेना एकही अन्नकवळ ॥ अंधकार जाहला सकळ ॥ पाकसिद्धी राहिली ॥४४॥

राहिले यजन माजन ॥ अतिथी जाती विन्मुख होवोन ॥ तदा इंद्रादि सुरगण ॥ शरण गेले विधीसी ॥४५॥

देवांसी विचारी धाता ॥ काय झालेसे तत्त्वता ॥ अग्निरहित सर्व जगता ॥ सांगती अमर नेमोनी ॥४६॥

स्वाहा स्वधा अग्निमागून ॥ जाते झाले विश्वांतून ॥ वषट्‌कारासहित यज्ञ ॥ लया गेले सर्वही ॥४७॥

मनुष्य गाई तुरग महिषी ॥ स्थावर जंगम सर्व विनाशी ॥ शरण आलो म्हणोनि तुजशी ॥ ऐकता विरिंची निघाला ॥४८॥

सवे घेवोनि देवगण ॥ ऋषि पितर आणि ब्राह्मण ॥ जलशायी जेथ हुताशन ॥ पातले तेथे समस्त ॥४९॥

ब्रह्मा आलासे पाहून ॥ प्रदीप्त झाला हुताशन ॥ म्हणे हे चतुरानन ॥ विनाकारण शाप हा ॥५०॥

काय केले मी भृगूस ॥ त्याने उच्चारिले शापास ॥ म्या न बोलावे की सत्यास ॥ कठीण प्रसंग सर्वथा ॥५१॥

प्रजापति बोले रे हुताशन ॥ कैसे वाचू तुजविण ॥ कैसे श्राद्ध सुधापान ॥ तुजवीण व्यर्थ सर्वथा ॥५२॥

तूचि यज्ञ स्वधा स्वाहा ॥ देवमुख तो मेषवाहा ॥ जिवंत करी ही सर्वसहा ॥ तुजवीण व्यर्थ सर्वथा ॥५३॥

तयावरी चतुरानन ॥ म्हणे कृष्णेसी करी गमन ॥ जे का साक्षात नारायण ॥ शापमोचन करील ॥५४॥

ब्रह्मयाचा निरोप घेऊन ॥ कृष्णादक्षिणतटी येऊन ॥ राहिला जेथे सिद्धेश्वरस्थान ॥ पावन करी पावका ॥५५॥

विष्णुतीर्थ मनोहर ॥ तेथोनि सहस्त्र धनुष्यांवर ॥ स्नान करिता अर्धवत्सर ॥ सिद्धि सप्तकर पावला ॥५६॥

झाला अग्नी शापमुक्त ॥ तेथे देता तीळ घृत ॥ सप्त कुळांचा उद्धार करीत ॥ नारद म्हणे ऋषींसी ॥५७॥

अमावास्या व्यतीपात ॥ येता जो सक्तुपिंड देत ॥ तयाचे तीन पुरुष मुक्त ॥ पितृलोक पावती ॥५८॥

सोमप्रदोष श्रवणेसी ॥ स्नान करोनि सिद्धेश्वरासी ॥ अवलोकिता अग्निलोकांसी ॥ जाईल ईशकृपेने ॥५९॥

रवि मकरेसि येता ॥ ब्राह्मणा तीळ तूप दान करिता ॥ आठ सहस्त्र गायत्री जपता ॥ चांद्रायणफळ मिळतसे ॥६०॥

सिद्धेश्वराच्या अग्रभागी ॥ स्नान करोनि द्विजालागी ॥ धेनु देता यज्ञभागी ॥ होय अग्निप्रसादे ॥६१॥

शुद्ध प्रतिपदा दिवशी ॥ अग्नितीर्थी ब्राह्मणाशी ॥ तंडूळ देता दरिद्र नाशी ॥ अग्नि भक्तजनाचे ॥६२॥

सह्यजेच्या दक्षिणतीरी ॥ अग्नितीर्थ सिद्धेश्वरी ॥ विप्रमुखी हवन करी ॥ तोचि वरी लक्ष्मीसी ॥६३॥

अग्नितीर्थ सिद्धेश्वर ॥ महिमा जयाचा ऐकता नर ॥ आयुष्यारोग्य सुख अपार ॥ भोगोनि जाय शिवलोका ॥६४॥

पुढिले अध्यायी तीर्थथोरी ॥ कथन करील तारकारी ॥ भक्तीने ऐकता मुरारि ॥ संकट वारी भक्तांचे ॥६५॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ तृप्ति पावला तेणे अखंड ॥ नवमोऽध्याय वर्णिला ॥६६॥

॥इति श्रीस्कंदपुराणे कृष्णामाहात्म्ये अग्नितीर्थवर्णनं नाम नवमोऽध्यायः ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP