मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ३१

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ३१

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

हराया बली भक्ताभिमान ॥ कृष्णाचि धरी रुप वामन ॥ मनचि होता कृष्णार्पण ॥ द्वारपाळपण मेळवी ॥१॥

आता श्रोते सावधान ॥ ऐकता होईल समाधान ॥ पूर्वी श्रीरामलिंगाभिधान ॥ स्थान जागृत वर्णिले ॥२॥

याज्ञवल्क्यासि म्हणे व्यास ॥ अमर करिती जेथ वास ॥ जे का करी पापनाश ॥ स्नान करितांचि भक्तीने ॥३॥

कृष्णावेणीमाजि ते हे ॥ विख्यात रुद्रतीर्थ आहे ॥ तैसेचि सर्वेशलिंग पाहे ॥ नोहे उपमा जयासी ॥४॥

रुद्रपादयुत रुद्रेश्वर ॥ जेवि अवयवांमाजि शिर ॥ सकल लिंगात तेवि थोर ॥ महिमा जयाचा ॥५॥

ब्राह्मणकुळी जन्म पावला ॥ स्नान करोनि रुद्रेश डोळा ॥ देखिला जरी तरिच लाधला ॥ मोक्ष कुळासहित तो ॥६॥

धातूमाजी कनक थोर ॥ केले तयाचे अलंकार ॥ तयामाजि हो जेवि सूत्र ॥ मंगल पवित्र कनकची ॥७॥

तेवी सकल नदीमाजी ॥ श्रेष्ठ कृष्णा तियेमाजी ॥ तीर्थे असती पवित्र जी जी ॥ तया रुद्रतीर्थ हे ॥८॥

पुढे देकोनि अग्निकुंड ॥ देतांचि अग्निपदी पिंड ॥ लाधे मुक्तीचे सुख अखंड ॥ कुळे एकवीस सहित तो ॥९॥

नंतर विष्णूचे पदी जावे ॥ पिंड देइजे भक्तिभावे ॥ निजपितरांसि उद्धरावे ॥ दुर्गतीपासाव सुपुत्रे ॥१०॥

विष्णुपदाचे दक्षिणेसी ॥ रामतीर्थ अहो ऋषी ॥ ऐका तयाचे चरित्रासी ॥ सुत शिवाचा म्हणतसे ॥११॥

भार्गवराम एकवीस ॥ वेळा नक्षत्र मेदिनीस ॥ करोनि रुधिरे पितृगणांस ॥ तर्पि सकोप होऊनि ॥१२॥

कोप होताचि तो शांत ॥ म्हणे भार्गव रमाकांत ॥ केले जयाचे नष्ट कांत ॥ आकांत करितील स्त्रिया त्या ॥१३॥

आता पाप हे कुठे फेडू ॥ कवण गुरूला कसे धुंडू ॥ ऐसा पश्चात्तापचेंडू ॥ लागे आदळू तन्मनी ॥१४॥

ऐसा भार्गव फिरत फिरत ॥ आला कृष्णातटी त्वरित ॥ तव देखिले मुनी वरिष्ठ ॥ जमदग्नीचे सुताने ॥१५॥

पाय धरोनि म्हणे तया ॥ घडली मला क्षत्रहत्या ॥ आता स्वामी सांगा उपाया ॥ मुक्त व्हावयाकारणे ॥१६॥

तदा ते मुनी काय बोलत ॥ तू तरी आहेस अच्युत ॥ परी घेवोनि देह वरिष्ठ ॥ केलेसि निंदित कर्म हे ॥१७॥

म्हणोनि याचि विप्रदेहे ॥ करणे निष्कृती तुवा ठीक हे ॥ आमुचे वचनी विश्वास आहे ॥ तरी सांगतो भार्गवा ॥१८॥

कारण पितरांसि मुक्ति व्हावया ॥ कृष्णातटी ती रामगया ॥ तारक पद बोलती जया ॥ रामलिंगापुढे ते ॥१९॥

जया जाहला संसारशोक ॥ तया नरा जे शांतिकारक ॥ येवोनि जेथे तीर्थे अनेक ॥ वास करिती सदाही ॥२०॥

सीताहातींचा वाळुपिंड ॥ मिळताचि हर्षला जो उदंड ॥ जेथे पावला पद अखंड ॥ ब्रह्मांडनायक पिता तो ॥२१॥

तारकेशा दुजे नाम ॥ रामलिंग श्रेष्ठ परम ॥ असे जेथे तेचि धाम ॥ पंचकोश परिमिता ॥२२॥

जावोनि तेथे गा भार्गवा ॥ यात्रा करावी भक्तिने तुवा ॥ फोडोनि पातकगिरि आघवा ॥ पितरांसि द्यावा मोक्ष तो ॥२३॥

यापरी ऐकोनि मुनिवचन ॥ रामतयाही सह घेऊन ॥ तेथे जावोनि यात्राविधान ॥ करिता मनोरथ लाधला ॥२४॥

व्यास म्हणे गा याज्ञवल्क्या ॥ ऐसे क्षेत्र हे रामगया ॥ येथे न येता जन्म वाया ॥ यातना तया न सोडी ॥२५॥

अंतरिक्षी गृही स्मशानी ॥ मरता कोठेही तो प्राणी ॥ मुक्ति लाधेचि या ठिकाणी ॥ पिंड देता सुपुत्रे ॥२६॥

ऐसे बोलोनि ते उभयता ॥ यात्रा करोनि शीघ्र तत्वता ॥ मानिते जाहले सार्थकता ॥ जन्म येता नराचे ॥२७॥

मुदगल तीर्थासि पुढे गेले ॥ जेथे मुदगले यज्ञ केले ॥ भस्मभूषित तीर्थ जाहले ॥ मुदगलेश्वर तेथ हो ॥२८॥

रामगयातीर्थ मुदगल ॥ अंतर सहा धनु केवळ ॥ तेथे करोनि स्नान निर्मळ ॥ मुदगलेश्वर पूजिला ॥२९॥

पुढे जाता एक संगम ॥ देखोनि पुसता प्रश्न उत्तम ॥ सांगेल त्याची कथा निगम ॥ मूर्तिमंत्र व्यास तो ॥३०॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ एकत्रिंशोऽध्याय हा ॥३१॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये रामगयामुदगलतीर्थवर्णनं नाम एकत्रिंशोऽध्यायः ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP