मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय १९

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १९

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

कृष्णा महिषासुरमर्दिनी ॥ कृष्णा शुंभनिशूंभनाशिनी ॥ चरणारविंद्रभ्रमरजननी ॥ मकरंदनीर सेविता ॥१॥

आता करोनि शुद्ध ह्रदय ॥ ऐका कथा अत्यंत रम्य ॥ चंद्रचूडाचा ज्येष्ठ तनय ॥ म्हणे श्रोतयांलागी पै ॥२॥

मध्य देशी एक ब्राह्मण ॥ असे वेदांगवेदनिपुण ॥ अतिथिप्रिय संपत्तिमान ॥ नंदन बहूत जयासी ॥३॥

ऐकोनि तयाची उदार कीर्ति ॥ इंद्र आला आश्रमाप्रती ॥ स्वये धरोनि पक्षिमूर्ति ॥ आतिथ्ययाचना कराया ॥४॥

नरमांस मज पाहिजे ॥ ऐसे म्हणितले तया बिडौजे ॥ ऐकोनि पाचारिले द्विजे ॥ निजात्मजांसि सन्निध ॥५॥

म्हणे पुत्र हो अहा अतिथी ॥ आला आपुले गृहाप्रती ॥ नरमांस द्यावे यासि निगुती ॥ मुक्तिसाधन असे हे ॥६॥

ऐसे ऐकून तातवचन ॥ म्हणती तयाचे सर्व नंदन ॥ दुरून आला असे दमून ॥ माध्याह्नकाळी जो ॥७॥

वैश्वदेवांती तोचि अतिथी ॥ ऐसे बोलती श्रुतिस्मृती ॥ पुसू नये गोत्र जाती ॥ गृहस्थाश्रम धर्म हा ॥८॥

याचि कारणे तुवा आपुले ॥ मांस द्यावे हेचि भले ॥ विपरीत यापरी बोलता मुले ॥ चित्त क्षोभले पित्याचे ॥९॥

खिन्न होवोनिया म्हणे ॥ व्यर्थ तुमचे होय जिणे ॥ आज्ञा पित्याची उल्लंघणे ॥ लाजिरवाणे साच हे ॥१०॥

तुम्ही केले कर्म दुष्ट ॥ होईल तेणे ज्ञान नष्ट ॥ ऐकोनि ऐसा शाप अनिष्ट ॥ साष्टांग नमिती सर्वही ॥११॥

म्हणती अगा तातराया ॥ शरण आलो तुझिये पाया ॥ अज्ञानसागर तराया ॥ सांग उपाय झडकरी ॥१२॥

प्रथम दुःख हे दरिद्रता ॥ दुसरी असे अज्ञानता ॥ दारिद्र्य तेथे निरभिमानता ॥ परी मूढता दुर्गम ॥१३॥

अज्ञानपणे नीच योनी ॥ पावोनि दुःखी सदा प्राणी ॥ म्हणोनि दावी मोक्षतरणी ॥ अज्ञानजीवनी बुडालो ॥१४॥

ऐसे ऐकोनि दीन वचन ॥ पुत्रांसि म्हणे तो ब्राह्मण ॥ ब्रह्माविष्णुशिवदर्शन ॥ होता ज्ञान होईल ॥१५॥

पुत्र म्हणती वैकुंठलोकी ॥ विष्णु कैलासी पिनाकी ॥ ब्रह्मा वसे सत्यलोकी ॥ एकत्र भूवरी दुर्लभ ॥१६॥

यापरी होता शंका तयांसी ॥ दया उपजली तातमानसी ॥ म्हणे कृष्णा हे ह्रषीकेशी ॥ वेणा शिवरूप भूवरी ॥१७॥

ब्रह्मा ककुद्‌मती पवित्र ॥ असे जेथ ते कर्‍हाडक्षेत्र ॥ जावोनि तिथे बिल्वपत्र ॥ संगमेशा वहावे ॥१८॥

कृष्णावेणीची संगती ॥ जेथ करी ककुद्‌मती ॥ स्नान करिता तेथ मुक्ती ॥ पावाल तीर्थप्रसादे ॥१९॥

यापरी पित्याची सुधावाणी ॥ ऐकुन गेले संगमस्थानी ॥ स्नान करोनि दुर्गाभवानी ॥ देखिली निष्ठापूर्वक ॥२०॥

संगमेशा अत्यादरे ॥ पूजिले पुष्पबिल्वपत्रे ॥ स्तुति केली बहुत प्रकारे ॥ कोयनाकृष्णावेणींची ॥२१॥

तव निघाले दिव्य तेज ॥ जलापासाव ते द्विज ॥ देखोनि म्हणती धन्य आज ॥ जन्म सफळ जाहले ॥२२॥

सवेंचि जाऊनी पित्यापाशी ॥ सांगती सकळ वृत्त त्यासी ॥ ऐकून बोले पिता सुतांसी ॥ ब्रह्म सत्य होय ते ॥२३॥

जो का विषयकर्दमी बुडे ॥ तयाचे दृष्टीस जे न पडे ॥ भक्तमानसी जे सापडे ॥ तेचि देखिले पुत्र हो ॥२४॥

धन्य धन्य तुम्ही धन्य ॥ आजि फळले सकळ पुण्य ॥ ज्ञानहीनांसि जे अगम्य ॥ तेचि देखिले पुत्र हो ॥२५॥

ऐसा ककुद्‌मतीसंगम ॥ श्रवण करिता पुण्य परम ॥ पूर्ण होती सकळ काम ॥ जे का असती मानसी ॥२६॥

पुढिले अध्यायी शंभुबाळ ॥ कथा सांगेल बहु मंजुळ ॥ बाहुतीर्थ अति निर्मळ ॥ श्रवणी आळस नसावा ॥२७॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ एकोनविंशोऽध्याय हा ॥२८॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये कर्‍हाडक्षेत्रसंगमवर्णनं नाम एकोनविंशोऽध्यायः ॥ १९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP