मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ४४

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ४४

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

कृष्णा कंसारिदायिनी ॥ कृष्णा संसारहारिणी ॥ कृष्णा हंसानंदकारिणी ॥ भजा कृष्णेसि भजा हो ॥१॥

स्कंदासि म्हणती मुनी सकळ ॥ पूर्वाध्यायी ऐकिले नवल ॥ आला घरासि वैकुंठपाळ ॥ यती अतिथिस्वरूपे ॥२॥

निदैवियाने चिंतामणी ॥ येता हातासि दगड म्हणोनि ॥ फेकिजे तैसा उभयतांनी ॥ धिकारिला यती तो ॥३॥

पुढे तया दंपतीसी ॥ गती जाहली सांग कैसी ॥ वाणी मुनीची ऐकोनि ऐसी ॥ शिखीवाहन म्हणतसे ॥४॥

अहो मनुष्यजन्म दुर्लभ ॥ विप्रजन्म तो अतिदुर्लभ ॥ श्रीमंतपण ते अत्यंत दुर्लभ प्रारब्धयोगेचि घडे हे ॥५॥

सकल विद्यांमाजि निपुण ॥ असोनि यतीसी धिक्कारून ॥ मुका जाहला तो ब्राह्मण ॥ विष्णुशर्मा नामक ॥६॥

जाया तयाची होय आंधळी ॥ दोघे यापरी दुःखी जाहली ॥ कालांतरी मग मरोनि गेली ॥ दादला बाईल उभयता ॥७॥

पुढे कर्नाटकीप्रांती ॥ जन्म पावले ते दंपती ॥ अंजनानगरी वास करिती ॥ दुःखी संततीहीन हो ॥८॥

दुर्बळ लक्ष्मीहीन होउनी ॥ गेले उभयता तदा वनी ॥ तेथे पाहोनि बहुत मुनी ॥ नमन साष्टांग घातले ॥९॥

म्हणती जोडोनिया हात ॥ तुम्ही आमुचे मायातात ॥ पूर्वजन्मीचे पापवृत्त ॥ करा विदित मुनी हो ॥१०॥

ऐसे ऐकोनि उभयवचन ॥ बोलती मुनी ज्ञाननयन ॥ लोभ दुःखासि कारण ॥ लोभासि कारण द्रव्य हे ॥११॥

द्रव्यलोभे हेलना करी ॥ संतांची तो जन्मांतरी ॥ मूर्ख होय तयापरी ॥ कठोरवैखरी मुका तो ॥१२॥

हरण करी जो पुस्तक ॥ यतिद्रोही गुरुनिंदक ॥ जन्मांतरी तो मूढमूढक ॥ होय कार्तिक म्हणतसे ॥१३॥

पूर्वजन्मी तुवा यतिचा ॥ द्रोह केला म्हणोनि वाचा ॥ नाही तुलाही बायकोचा ॥ जाय डोळा कृपणत्वे ॥१४॥

जेथे होय पुराणश्रवण ॥ तीर्थ द्विजदेवसदन ॥ तेथ करिता दीपदान ॥ ज्ञानवंत होत पै ॥१५॥

स्वच्छ जयाच्या दृष्टी असती ॥ तोचि लाधे पुत्रसंतती ॥ अन्यथा फलप्राप्ती ॥ उलत होतसे ब्राह्मणा ॥१६॥

वित्तलोमे तुझे स्त्रीने ॥ लाविले यतीस धिःकाराने ॥ अंध झाली याच योगाने आणीक कथितो ऐक बा ॥१७॥

देवालय मठस्थान ॥ पुराणश्रवणाचे ठिकाण ॥ सिद्धमहापथस्थान ॥ दीप हरिला येथुनी ॥१८॥

म्हणोनि ही तुझी बाईल ॥ आंधळी जाहली कर्मबल ॥ आता प्रायश्चित्त केवळ ॥ घेवोनि निर्मळ होय गा ॥१९॥

प्रायश्चित्त धनाविणे ॥ कैसे घ्यावे दरिद्रियाने ॥ म्हणशील यापरी तरी जाणे ॥ तीर्थयात्रेसि भक्तीने ॥२०॥

तीर्थे भूमीवरी अनेक ॥ प्रयागतीर्थ मुक्तिदायक ॥ काशीमाजी तीर्थ एक ॥ पांचनद नामक पै ॥२१॥

गंगा गोदावरी कृष्णा ॥ उच्चार करिता चुके यातना ॥ तीरी होम जप स्नाना ॥ करिता संसार नुरेची ॥२२॥

स्नान सितासितामाजी ॥ करिता पातके असती जी जी ॥ ती ती होवोनि नष्ट राज्यी ॥ अमरावती होईल ॥२३॥

सितासितेचिया तीरी ॥ मरण येतांचि मुक्तिनवरी ॥ माळ घाली गळाभीतरी ॥ तारकारी म्हणतसे ॥२४॥

सिंहराशीस येता गुरू ॥ गोदावरीस नमस्कारू ॥ करोनि करिता स्नान नरू ॥ भवसागर तरेल ॥२५॥

कृष्णासुकीर्ति काय वानू ॥ जेथ कुंठित सहस्त्रवदनू ॥ नाम जियेचे पतितपावनू ॥ म्हणोनि वानू किंचित ॥२६॥

ऊर्ध्वरेतस योगयुक्त ॥ मुनी जे का तयांप्रत ॥ होय तेंचि स्थान प्राप्त ॥ कृष्णातटी वासका जे ॥२७॥

कन्यागती कृष्णातीरी ॥ राहता एक संवत्सरी ॥ नष्ट होती पातके सारी ॥ संसारवारी चुकतसे ॥२८॥

परि प्रतिग्रह कदा न घेणे ॥ प्रारब्धलाभे तुष्ट असणे ॥ क्रोधमत्सरा सोडोनि देणे ॥ भजणे कृष्णेसि अंतरी ॥२९॥

आचरिसी यापरी जरी ॥ तरीच इच्छा होय पुरी ॥ भार्येसहीत कृष्णातीरी ॥ जावोनि करी वास गा ॥३०॥

ऐसे मुनीचे ऐकोनि वचन ॥ काय करील तो ब्राह्मण ॥ सांगेल शिवाचा प्रिय नंदन ॥ मुनिजनांसी पुढे तो ॥३१॥

कृष्णकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ चवेचाळिसावा अध्याय हा ॥३२॥

इति स्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये चतुश्चत्वारिंशोऽध्यायः ॥४४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP