मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय २२

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय २२

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

देखोनि कृष्णापंचानन ॥ दग्ध होय पापमदन ॥ परी जाहला ज्ञाननंदन ॥ तारक अज्ञान हराया ॥१॥

म्हणे ऋषींसी तारकारि ॥ आणिक आयका तीर्थे थोरी ॥ दुःखे होतील नष्ट सारी ॥ भक्तिपूर्वक सेवने ॥२॥

पूर्वी कथियेले वाल्मीकतीर्थ ॥ पंच धनु पुढे स्कंदतीर्थ ॥ तेथोनि दश धनु वामनतीर्थ ॥ ब्राह्मतीर्थ दश धनु ॥३॥

पापनाशनतीर्थ तेथोनी ॥ जेथे कृष्णा उत्तरवाहिनी ॥ सप्त जन्मींचे पाप झणी ॥ नुरे तत्तीर्थसेवने ॥४॥

पापनाशनतीर्थमहिमा ॥ काय वानू सकल तुम्हा ॥ पूर्वी देवर्षीसह ब्रह्मा ॥ पीडिला दैत्यवरांनी ॥५॥

क्षीराब्धिशायी नारायण ॥ तया जावोनि तदा शरण ॥ देवांसहित चतुरानन ॥ करी स्तवन पित्याचे ॥६॥

भक्तवत्सला मधुसूदना ॥ कैटभारी दुःखहरणा ॥ महिषासुराचे जाच नाना ॥ सोसवेना मुरारि ॥७॥

ऐसी ऐकोनि देवस्तुति ॥ म्हणे देवांसी लक्ष्मीपति ॥ तपश्चर्या करोनि अति ॥ महिष वराप्रती लाधला ॥८॥

स्त्रियेपासाव मृत्यु नेमिला ॥ तया म्हणोनि शरण देवीला ॥ जाता भवानी महिषवधाला ॥ करील निश्चये देव हो ॥९॥

नारायणाची मधुर वाणी ॥ ऐसी ऐकोनि देवांनी ॥ स्तविली भुवनेश्वरी भवानी ॥ दैत्यनाशिनी भक्तीने ॥१०॥

जय जय अंबिके सिद्धिप्रदे ॥ अभिष्टदायिनि मुक्तिप्रदे ॥ अभयप्रदे भक्तकामदे ॥ महानंदे भवानी ॥११॥

सर्वव्यापके विष्णुरूपिणी ॥ महाकालि दुःखहारिणी ॥ अज्ञानपटलध्वंसकारिणी ॥ देवि मृडाणी सर्वगे ॥१२॥

करोनि यापरी देवीस्तव ॥ नमिती ऋषींसहित देव ॥ देखोनि तयांचा शुद्ध भाव ॥ प्रगट सत्वर जाहली ॥१३॥

मारोनिया महिषासुरा ॥ म्हणे देवादि मुनीश्वरा ॥ काय इच्छा विदित करा ॥ वरद तुम्हांसी जाहले ॥१४॥

जगदंबिकेची यापरी उक्ति ॥ ऐकोनि ऋषी देव बोलती ॥ माते करावी येथ वस्ती ॥ कृष्णावेणीमांजि तू ॥१५॥

सदा असावे तुझे दर्शन ॥ हेचि मागणे आमुचे जाण ॥ पुरवी असेल दया पूर्ण ॥ तरी भक्तवत्सले ॥१६॥

देवी म्हणे तये वेळी ॥ वास करोनि कृष्णाजळी ॥ भक्तजनांची पुरवीन आळी ॥ नमनपूजनदर्शने ॥१७॥

तुम्ही माझे स्तोत्र केले ॥ श्रद्धापूर्वक ते ऐकिले ॥ तरी जे जे असेल चिंतिले ॥ ते ते सफळ होईल ॥१८॥

कृष्णास्नान करोनिया ॥ पठण करिता स्तोत्रासि या ॥ पुनश्चरणकामना जया ॥ सिद्धि तया होईल ॥१९॥

यापरी बोलोनि दैत्यनाशिनी ॥ खड्‌गखेटकधारिणी ॥ राहिली कृष्णातटी भवानी ॥ भक्तसंतोष कराया ॥२०॥

स्कंद म्हणे पापनाशिनी ॥ स्नान करोनि पूजा भवानी ॥ धूपदीपपुष्पचंदनी ॥ नैवेद्यवस्त्रतांबूले ॥२१॥

मंत्रपुष्पांजळीनंतर ॥ करा साष्टांग नमस्कार ॥ भावे पठण करा स्तोत्र ॥ तरा दुःखभवाब्धि ॥२२॥

पुढले अध्यायी कार्तिकेय ॥ सांगेल तीर्थ मार्कंडेय ॥ ऐकता कृष्णाकृपा होय ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥२३॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ द्वाविंशोऽध्याय हा ॥२४॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये पापनाशनतीर्थवर्णनं नाम द्वाविंशोऽध्यायः ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP