श्रीगणेशाय नमः ॥
पाहोनि कृष्णावज्रधर ॥ कांपती पापनग समग्र ॥ कामक्रोधनमुचि वृत्र ॥ सर्वत्र दुःख पावती ॥१॥
कृष्णाकथामृत पान करोनी ॥ अतृप्त म्हणती सकळ मुनि ॥ तधी देवसेनाग्रणी ॥ ऐका आणीक म्हणतसे ॥२॥
कृष्णावेणीपासाव एक ॥ उत्पन्न जाहला भैरवनायक ॥ रूप जयाचे भयानक ॥ क्षेत्र तेथे जाहले ॥३॥
जया सिद्धिक्षेत्र नाव ॥ तयाचा अधिपती भैरव ॥ स्नान करिता तेथ मानव ॥ शुद्धभाव होतसे ॥४॥
क्षेत्राधिपाचे घेता दर्शन ॥ सर्व पाप होय निरसन ॥ अंतःकरण निर्वासन ॥ होत कृष्णाप्रसादे ॥५॥
प्रथम कृष्णेसी कमंडली ॥ नंतर ककुद्मती मिळाली ॥ जेथ होतसे पापहोळी ॥ अष्टोत्तरशत जपाने ॥६॥
पाषाणरूपी घोर राक्षस ॥ जेथे होता दुष्टमानस ॥ निजप्रवाहे तयाचा नाश ॥ करी कमंडलीसंगमी ॥७॥
विहगतीर्थ तेचि जाहले ॥ गरुडे तपा जेथ केले ॥ पूर्व जन्मा आठवी कोल्हे ॥ स्नाने कमंडलीसंगमी ॥८॥
ऐसी ऐकून कार्तिकोक्ति ॥ सर्व ऋषि प्रश्न करिती ॥ कवण कोल्हा पूर्वजाति ॥ स्मृति कैशी जाहली ॥९॥
तदा म्हणे कार्तिकेय ॥ जयंत नामे इंद्रतनय ॥ प्राशन करोनिया मद्य ॥ रंभेसि इच्छी भुलोनी ॥१०॥
ते देखोनिया ताते ॥ शाप दिधला जयंताते ॥ जंबूक होई रे दुर्मते ॥ मीनकेतनमदांधा ॥११॥
कृष्णादर्शन होता तुला ॥ स्मरशील तू पूर्व जातीला ॥ स्नान करिता या पदाला ॥ लाधशील निश्चये ॥१२॥
ऐसा उःशापिता सुत ॥ जंबूकदेह पावला त्वरित ॥ जेथ जाहला शापमुक्त ॥ जंबुकतीर्थ होय ते ॥१३॥
तेथेचि असे नागेश्वर ॥ वासुकि देवता निरंतर ॥ शुद्धचित्ता नेत्रगोचर ॥ सिद्धिकारक होतसे ॥१४॥
पुढे असे कुब्जेश्वर ॥ देवीसह पातकहर ॥ तेथोनि पौलस्त्येश्वर ॥ तीर्थ पौलस्त्य सत्य पै ॥१५॥
पौलस्त्यतीर्थी स्नान करिता ॥ पौलस्त्येशा भावे अर्चिता ॥ अखंड होय सौख्यभोक्ता ॥ शिवकृष्णाप्रसादे ॥१६॥
पुढे बाहुतीर्थ पावन ॥ जेथे करिता स्नानपान ॥ लाधे निश्चये कल्याणसदन ॥ स्कंद म्हणे ऋषींस ॥१७॥
बाहुतीर्थाची अगाध ख्याति ॥ सांगतो आता तुम्हांप्रति ॥ पूर्वी रावणासि दाशरथी ॥ मारोनि दुःखी जाहला ॥१८॥
पाचारोनि वसिष्ठासी ॥ म्हणे ब्रह्महत्या मसी ॥ घडली सांग उपायासी ॥ काय करू सद्गुरो ॥१९॥
पुलस्तिवंशी जन्म ज्याचे ॥ परी लोकांसि तो जाचे ॥ यास्तव मारिला राजयाचे ॥ कर्तव्य आमुचे मानुनी ॥२०॥
जाणून अथवा अज्ञानपणे ॥ केले कर्म ते अवश्य भोगणे ॥ भोगावाचून कर्म लोपणे ॥ कल्पांतीही असेना ॥२१॥
यास्तव करावी पापनिष्कृति ॥ न केलिया रौरवप्राप्ति ॥ ब्राह्मण वधिला हीच खंती ॥ चित्ती वसे माझिया ॥२२॥
अग्नि इंधने करी दहन ॥ सूर्यासि असती प्रखर किराण ॥ राजासि असे दंड साधन ॥ ब्राह्मण मनेचि जाळितो ॥२३॥
अग्नि जरी अत्यंत पेटला ॥ जाळी तरी तो काननाला ॥ ब्राह्मणकोपाग्नि समूळ कुला ॥ दहन करी निश्चये ॥२४॥
ब्रह्महत्यापासाव रक्षण ॥ आता करी पातलो शरण ॥ यापरी ऐकोनि रामवचन ॥ वसिष्ठ म्हणे तयासी ॥२५॥
रामचंद्रा दीनवत्सला ॥ देवाधिदेवा विप्रपाळा ॥ विपरीत नामे जयाचेनि वाला ॥ कोळी जाहला विमुक्त ॥२६॥
ब्रह्महत्या तया कैची ॥ परी लोकसंग्रहार्थाची ॥ चाड आहे तुला साची ॥ म्हणोनि चिंतले तुवा हे ॥२७॥
करावे धर्मसंस्थापन ॥ यास्तव केला देह धारण ॥ तरी करी वो तीर्थाटण ॥ पापक्षालन व्हावया ॥२८॥
प्रजापालन औरसापरी ॥ करावयास्तव झडकरी ॥ यावे तुवा रावणारि ॥ अयोध्यापुरीमाजि पै ॥२९॥
कृष्णातटी जावोनि तप ॥ करिता होसील दग्धपाप ॥ ऐसे ऐकोनि अयोध्याधिप ॥ पायी तैसाचि निघाला ॥३०॥
हनुमंत असे सह घेतला ॥ कृष्णातटी शीघ्र पातला ॥ तपश्चर्या करीत राहिला ॥ असता आश्चर्य वर्तले ॥३१॥
कृष्णेचिया घोर लहरी ॥ वाढू लागल्या समुद्रापरी ॥ पाहोनि कोपला ताटकारि ॥ मार्ग रोधिला म्हणोनी ॥३२॥
मारुती तदा पसरोनि बाहू ॥ अडविता तात्काळ कृष्णाप्रवाहू ॥ अगस्त्यापरी तुला पेऊ ॥ सांग पाहू म्हणतसे ॥३३॥
राममार्गासि ते वेळी ॥ सोडोनि कृष्ना दुभंग जाहली ॥ रामापासाव वर लाधली ॥ संतोषवोनी तयासी ॥३४॥
ऐसे बाहुतीर्थाभिधान ॥ निष्पाप होय केलिया स्नान ॥ हा अध्याय करिता पठण ॥ फल समान ऐकता ॥३५॥
पुढिले अध्यायी कथा मधुर ॥ सांगेल शिवाचा ज्येष्ठ कुमर ॥ वाल्मीकितीर्थ अति पवित्र ॥ अंतर शुद्ध होईल ॥३६॥
कृष्णकथा इक्षुदंड ॥ चाखोनी पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ विंशोऽध्याय हा वर्णिला ॥३७॥
इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये बाहुतीर्थवर्णनं नाम विंशोऽध्यायः ॥२०॥