जन्म: यजुर्वेदी ब्राह्माण १८४८.
कार्यकाळ: १८४८ - १९०१ .
गुरु: श्री आकलकोट स्वामी.
सन्यास: १२.३.१९०१ - सन्यासानंतर अद्वैतानंद.
समाधी: १९०१.
वाड्गमय: गुरुलीलामृत ग्रंथ
श्री वामनबुआ वामोरीकर य।ना स्वामींनी दिलेल्या चरण पादुका श्री वामनबुआ वामोरीकर य।ना स्वामींनी दिलेल्या चरण पादुका
हे यजुर्वेदी ब्राह्मण. शिक्षण वामोरी व धुळे येथे; अनेक सत्पुरुषांच्या सहवासात आले. परंतु नि:शंक समाधान पूर्ण दत्तावतारी अक्कलकोट स्वामी समर्थाच्या कृपाप्रसादाने झाले. स्वामी समर्थांनी पयोनदी संगमावर त्यांना ‘ब्रह्मनिष्ठ होशील बाळा | न भिणे कळि-काळा’ असा आशीर्वाद व मंत्रोपदेश देऊन त्यांचे जीवन कृतार्थ केले. (दि.१७-१२-१८६३) परिणामस्वरुपी ते ‘ब्रह्मनिष्ठ’ म्हणून शिष्यांस ज्ञात आहेत. दि.२७-४-१८७६ रोजी असाध्य रोगाने जर्जर झालेले वामनबुवा बडोदे येथील सुरसागरावर आत्महत्या करण्यासाठी गेले असता परमकृपाळू भक्तवत्सल श्रीस्वामी समर्थांनी तेथे प्रगट होऊन वामनबुवांना स्वहस्ते घरी आणून पोहोचविले. त्यावेळी त्यांच्या मातोश्री अहल्याबाई व बंधू वेणीमाधव ह्यांनाही श्रीस्वामी समर्थांच्या दर्शनाचा लाभ घडला आणि ते कृतार्थ झाले.
ब्रह्मचर्यपूर्ण जीवन, साधेपणा, सत्यप्रीती, नियमितपणा, स्वकार्य आणि श्रीस्वामी समर्थचरणी असीम श्रध्दा व प्रेमभाव हे त्यांचे व्यक्तिविशेष.
त्यांनी श्रीस्वामी समर्थांचे ओवीबद्ध चरित्र वर्णन करणारा पंचावन अध्यायांचा सुमारे दहा हजार ओव्यांचा ‘श्रीगुरुलीलामृत’ नावाचा अलौकिक ग्रंथ लिहिला आहे. ह्यात व्याकरण, न्याय, वेदांत, वैद्यक, ज्योतिष वगैरे शास्त्रांची सविस्तर चर्चा आहे, तसेच ‘प्रपंचात परमार्थ कसा साधता येईल’ याची शिकवण साध्या, सोप्या, शैलीदार भाषेत कर्तृत्वाहंकाररहित होऊन दिली आहे. या अलौकिक ग्रंथांच्या लेखनानंतर दि.२५-३-१९०१ रोजी संन्यास ग्रहण करुन ‘अद्वैतानंद’ नाम धरण करुन हे समाधिस्थ झाले. ह्यांची समाधी बडोदे येथे प्रतापनगर रोडवरील ॠणमुक्तेश्वर महादेवाच्या मागचे बाजूस असलेल्या इदगा मैदानाच्या उत्तरेस आहे. ब्रह्मनिष्ठ वामनबुवांना श्रीस्वामी समर्थानी स्वहस्ते दिलेल्या चरणपादुका, दत्तमूर्ती, महावस्त्र (छाटी), पंचायतन वगैरे श्रीदत्तमंदिर, स्वामी विवेकानंद मार्ग, बडोदे येथे आहेत.
श्री वामन बुआ वैद्य वामोरीकर आणी स्वामी समर्थ
एकदा मूळेकर (स्वामीचरित्रकार) आणि ब्रम्हनिष्ठ वामनबुवा वैद्य (गुरूलीलामृतकार) संप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. तेव्हा मुळेकरांनी तेथील पुजारी भोपे यांच्याकडे देवीच्या मुखातील तांबूल प्रसाद म्हणून मागितला. तेव्हा ते उपहासात्मक बोल बोलू लागले, "अक्कलकोटच्या स्वामी महाराजांची अवतारिक पूर्ण ब्रम्ह मूर्ती असेल तर तुम्हा जगदंबा मुखातील तांबूल प्रसाद देईल." हे ऐकताच वामनबुवांनी जगदंबेची शास्त्रोक्त प्रार्थना केली आणि एकाएकी आईसाहेबांच्या मुखातील विडा मूळेकरांच्या अंगावर पडला. दोघांनी तो प्रसाद प्रसन्नचित्ताने ग्रहण केला. परत काही दिवसांनी जेव्हा हे सर्व अक्कलकोटी आले तेव्हा स्वारी भक्तगणांसमवेत पेठेत विरूपाक्ष मोदी यांच्या घरात विराजमान झाली होती. उभयतांनी जेव्हा महाराजांचे दर्शन घेतले तेव्हा महाराज म्हणाले, "सप्तशृंगास जाऊन शंख केलात पण विडा आम्हांस द्यावा लागला. "
गुरुपरंपरा
स्वामी समर्थ
।
वामनराव वैद्य वामोरीकर
वामनराव वामोरीकर वैद्य व स्वामी उपदेश
वामनबुवा ब्रह्यचारी बडोदेकरांना लहानपणापासून दत्तप्रभूंच्या उपासनेचा नाद होता त्यामुळे कुणी साधू संन्यासी योगी ब्रह्यचारी वगैरे जो कोणी भेटेल त्याचे यथाशक्ति आदरतिथ्य करुन त्याज जवळ वेदांतापैकी काही भाषणे (चर्चा) करीत परंतु त्यांचे समाधान होईना एकदा असेच पुण्यात तुळशीबागेत नाना नातूंच्या माडीवर गोपाळराव दादा नातू व्यंकटेश तेलंग एक पुराणिक असे सर्व सत्पुरुषांच्या गोष्टी बोलत बसले होते इतक्यात एक तेजःपुंज ब्राह्मण तेथे येऊन म्हणाला सदगुरुवाचून व्यर्थ आहे त्यावर वामनबुवांनी त्यास विनंती केली की जो चित्ताची स्थिरता करील त्यास (आम्ही) सदगुरु दत्तात्रय मानू परंतु अद्याप असा कोणी भेटला नाही त्यावर तो ब्राह्मण म्हणाला अक्कलकोटास जा तुला श्री समर्थस्वामी गुरुदर्शन देतील तुझे समाधान होईल जा लवकर असे म्हणून तो ब्राह्यण कोठे गेला ते पाहत असता त्या कोणास तो दिसला नाही.
लिलेचा भावार्थ
वामनरावजी वैद्य तथा ब्रम्हनिष्ठ वामनबुवा वाम्बोरीकर बडोदेकर हे श्रीगुरुलीलामृत ग्रंथाचे कर्ते म्हणून सर्व परिचित आहेत पण ततपूर्वीच्या वामनबुवांच्या गुरुच्या शोधाची माहिती स्वामी समर्थ लीला अर्थ भागात आली आहे ते जाणते विद्वान पंडित होते त्यांना मराठी संस्कृत चांगले अवगत होते ते तेव्हाच्या इंग्रजी तिसरीपर्यंत शिकलेले होते त्यांना धर्म शास्त्र पुराणे यात चांगली गती होती त्यांना देवा धर्माची आवड होती त्यांना लहानपणापासून दत्त उपासनेचा नाद होता वेद उपनिषदे विविध शास्त्रांचा त्यांचा चांगला अभ्यास होता थोडक्यात म्हणजे ते त्या काळातील एक मान्यवर विद्वान पंडित होते त्यांना साधू संतांशी योगी ब्रह्यचारी आदि जे कोणी भेटत त्यांच्याशी धर्म पुराण गुरु आदिबाबत चर्चा करण्यात मोठा रस होता ते भेटणार्या विद्वानांशी चर्चा करीत परंतु त्यांच्या मनातील सदगुरु या संकल्पनेबाबतचे समाधान होत नसे म्हणून ते अस्वस्थ असमाधानी अशांत होते त्यांच्या डोक्यात नाना शंका कुशंकांचा गोंधळ गुंता होता त्यांना सदगुरु हवा होता पण तो भेटत नव्हता त्यांचा सदगुरुचा शोध जारी होता एकदा वामनबुवा त्यांच्या मित्राशी सत्पुरुषाच्या गोष्टी बोलत असताना एक तेजःपुंज ब्राह्मण येऊन म्हणाला सदगुरु कृपेवाचून सर्व व्यर्थ आहे त्यावर वामनबुवांनी त्या तेजःपुंज ब्राह्यणास विनंतीपूर्वक विचारले की जो चित्ताची स्थिरता करील त्यास (आम्ही) सदगुरु दत्तात्रय मानू परंतु अद्याप तर आम्हास असा कोणी भेटला नाही त्यावर तो ब्राह्मण म्हणाला तू अक्कलकोटास जा तुला श्रीसमर्थ स्वामी गुरुदर्शन देतील तुझे समाधान होईल जा लवकर असे सांगून तो ब्राह्मण दिसेनासा झाला वरील संवादावरुन अशांत अस्वस्थ अस्थिर असलेल्या वामनबुवास अक्कलकोटला जाण्याचा सुस्पष्ट आदेश दिला गेला वामनबुवांजवळ पुस्तकी पंडित्याची विद्वत्ता होती पण आत्मज्ञान नव्हते अनेकांशी चर्चा विचारविनिमय करुनही त्यांच्या शंका कुशंकांचे समाधान होत नव्हते सर्व शंका कुशंकांचे समाधान करणारा कोण याचा त्यांचा शोध अक्कलकोटास येऊन थांबला होता ब्रम्हनिष्ठ वामन रावजी वैद्यांसारख्या विद्वान पंडिताने चिकित्सक अभ्यासू ज्ञान योग्याला सुद्धा सर्व शंका समाधानावर एक मात्र उतारा अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे मिळाले तर आपण अजून कोणत्या अन्य सदगुरुचा शोध घेण्यात श्रम वेळ धन खर्ची घालावयाचे हा खरा प्रश्न आहे त्या सर्वांचेच उत्तर श्री स्वामी समर्थ उपासना !
खरे काय आहे ते पाहण्यासाठी वामनबुवा बडोदेकर अक्कलकोटास आले तेव्हा श्री स्वामी समर्थ हदरे या गावी होते दुसरे दिवशी रोगी व मिरगी या दोन गावांमधील पायो नदीत श्री स्वामी समर्थांनी बुवास दर्शन दिले आणि म्हणाले काय रे आमच्या ब्राह्यणाची थट्टा केलीस अशी खूण पटताच वामनबुवांनी स्नान वगैरे केले श्री स्वामी महाराजांचे पूजन करुन त्यांना प्रार्थना केली की महाराज मजला अनुग्रह द्यावा बुवांनी असे म्हणताच श्री स्वामी महाराजांनी त्याजकडे अवधूत गीता टाकून ते म्हणाले आमची नोकरी कर म्हणजे ब्रम्हनिष्ठ होशील आणि गाठोडे आम्हास दे. नंतर वामन बुवाने लंगोटी नेसून सर्व सामान श्री समर्थांपुढे ठेवले श्री स्वामी महाराजांनी ते परत दिले.
अर्थ, भावार्थ, मथितार्थ
अक्कलकोटला जाऊन खात्री करुन घ्यावी असेच वामनबुवासह त्यांच्या सर्व विद्वान मित्रांना वाटले, कारण त्या तेजःपुंज ब्राम्हणाने त्यांना स्पष्ट शब्दात सदगुरु कृपेवाचून त्यांच्या पांडित्यपूर्ण चर्चा चर्चांचा काथ्याकूट सर्व व्यर्थ आहे, ते सर्व काय समजायचे ते समजून चुकले. तो ब्राह्मण कुठे गेला हे शोधत असता तो त्यांना कोणासही दिसला नाही. श्री स्वामी समर्थांनीच (ब्राह्मण रुपात) त्या विद्वानांच्या कोंडाळ्यात येऊन सदगुरुबाबत मार्गदर्शन केले. इथेच त्यांना आश्चर्याचा धक्का त्यांनी दिला. दिव्यत्वाची प्रचिती त्यांना आली. आता श्री स्वामींना हात जोडण्यासाठी आणि दर्शनासाठी बुवा अक्कलकोटला निघाले. येथे घटना कशा घडत गेल्या त्या समजून घेतल्या पाहिजेत. विद्वान वामनबुवास कार्यप्रवण करण्यासाठी त्यांच्या चिकित्सक परंतु अस्थिर चित्ताला शांत करण्यासाठी श्री स्वामींनी ब्राह्मण वेषात येऊन अक्कलकोटला येण्याचे सूचित केले. अक्कलकोटला आल्यावर बुवा सारख्या विद्वानाला "काय रे आमच्या ब्राह्यणाची थट्टा केलीस" असे सांगून श्री स्वामींनी बुवास त्यांच्या सर्व व्यापकतेची खूण पटवून दिली. श्री स्वामींच्या या उदगाराने वामनबुवाच काय पण कुणीही आश्चर्यचकित होईल ! झाले ही तसेच. बुवा श्री स्वामींपुढे शरणागत झाले, दिपून गेले, की त्यांच्या सवयीनुसार त्यांना श्री स्वामींशी चर्चा करण्याची शंका कुशंका विचारण्याची आवश्यकताच वाटली नाही. हेच आपले सदगुरु या चरणांशिवाय अन्य दुसरे चरण नाही, अशी त्यांची मनोमन भावना झाली. त्यांचा अहंपणा विद्वथ्तेचा मी पणा सारे काही श्री स्वामींजवळ विरघळून गेले. श्री स्वामींची यथोचित पूजा करुन महाराज मजला अनुग्रह द्यावा म्हणून बुवांनी प्रार्थना केली. गुरुशरण अवस्थेत आलेल्या बुवाकडे श्री स्वामींनी अवधूत गीता टाकली, त्यांची नोकरी कर म्हणून बुवास सांगितले. वामनबुवा खरोखर भाग्यवानच ! कारण त्यांना साक्षात परमेश्वर सदगुरु श्री स्वामी समर्थ यांची चाकरी (नोकरी) करावयास सांगतात. कोणती नोकरी तुमच्या माझ्या कल्पनेपेक्षा वेगळी? ही नोकरी म्हणजे श्री स्वामींच्या व्यापक सर्वस्पर्शी कालतीत आचार विचार धर्माचा आणि तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याची चाकरी. वामनबुवांनी श्रीगुरुलीलामृतासारखी ५५ अध्यायी ९७५७ ओव्या ७२० पृष्ठांची अजरामर अशी श्रीगुरुलीलामृत नावाची पोथी लिहिली. या लोकप्रिय पोथीने वामनरावजी वैद्य हे ब्रम्हनिष्ठ झाले अजरामर बनले. बुवांचे गाठोडे श्री स्वामींनी घेतले याचा मथितार्थ, बुवांचे जे काय प्रारब्ध होते ते श्री स्वामींनी स्वतःकडे घेतले. बुवांचे ही चित्त आता शांत झाले होते. त्यांना हवा तसा सदगुरु भेटला होता. बुवा लंगोटी नेसले व श्री स्वामींकडे सामान सुपूर्त केले. श्री स्वामींनी ते बुवास परत दिले. वामनबुवा वैद्यांच्या स्थित्यंतरातून आपणा सर्वांसही काही बोध घेता येईल का? याचे आत्मचिंतन करावयास लावणारी ही लीला आहे.
ब्रह्मनिष्ठ वामनबुवा, महान स्वामीभक्त!
अक्कलकोटस्थ श्रीस्वामी समर्थांच्या चरित्ररूपाने ख्यातकीर्त असणाऱ्या ‘श्रीगुरुलीलामृत’ या अद्वितीय ग्रंथाचे लेखक, श्रीस्वामी समर्थांचे निस्सीम उपासक आणि शिष्य असणारे थोर सत्पुरुष म्हणजे श्री वामन रावजी वैद्य.
महाराष्ट्रातील नगर येथे राहणारे, ‘वैद्य’ आडनावाचे धारण्यगोत्रोत्पन्न यजुर्वेदी ब्राह्मण कुटुंब पिढीजात ‘वैद्यकी’ सांभाळीत होते. ‘वैद्यामृत’ हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिणारे मोरेश्वरराव, दुर्मिळ व नैसर्गिक औषधींच्या अध्ययनावर जहागिरी मिळविणारे नारायणराव, शिवशक्तीच्या रूपाने श्रीत्र्यंबकेश्वर-सप्तशृंग निवासिनीची कृपा प्राप्त करणारे ब्रह्मज्ञानी त्र्यंबकराव आणि विद्वान विठ्ठलराव अशा कर्तृत्ववान मंडळींमुळे ‘वैद्य’ कुटुंबाची प्रत्येक पिढी प्रतिष्ठा मिळवती झाल व विठ्ठलरावांचे पुत्र रावजी यांच्यामुळे अध्यात्माचा परीसस्पर्श लाभला.
प्रपंच आणि परमार्थ यांची यथायोग्य सांगड घालणारे रावजी, पत्नी अहिल्येसह तीर्थयात्रेच्या रूपाने सर्वत्र, सर्वदूर प्रवास करीत असत. एकदा ते सहकुटुंब द्वारकायात्रेस गेले असता त्यांना भुऱयाबुवा नामक सत्पुरुषास कुणा नृसिंहस्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घडून स्वात्मप्रतीती मिळाल्याचे समजल्याने तेही उत्सुकतेपोटी बुवांच्या दर्शनास गेले. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका अंध भक्तास नृसिंहस्वामींचे दर्शन घेण्याची विलक्षण तळमळ लागून राहिली, शिवाय रावजींनादेखील स्वामीदर्शनाची ओढ लागल्याने भुऱयाबुवांनी उभयतांस दर्शन देण्याची विनंती नृसिंहस्वामींकडे केली. श्रीनृसिंहस्वामी प्रकट झाले आणि त्यांनी अंध भक्त सूरदासास दृष्टी प्रदान करून त्यास संतोषविले. त्यानंतर श्रीनृसिंहस्वामींनी रावजी वैद्य यांना ‘यापूर्वी दोनदा भेट झाल्याची खूण’ सांगितली. त्या भेटींचे संदर्भ लक्षात येताच रावजींना स्वामींच्या असामान्यत्वाचा प्रत्यय आला आणि त्यांनी स्वामींसमोर साष्टांग दंडवत घालून अनन्यभावे प्रार्थनापूर्वक, आशीर्वादाची याचना केली. तेव्हा रावजींच्या मस्तकावर कृपावरदहस्त ठेवत स्वामी म्हणाले, “आपल्या वंशास सौख्य लाभेल. शिवशक्तीचा कृपाप्रसाद वृद्धिंगत होईल. आपणांस तीन पुत्र लाभतील. त्यातील तिसरा पुत्र आमच्या लीलाचमत्कारांचे वर्णन ग्रंथबद्ध करील.’’
हे श्रीनृसिंहस्वामी म्हणजेच अक्कलकोट क्षेत्री अवतरलेले श्रीस्वामी समर्थ तसेच त्यांच्या आशीर्वचनानुसार रावजी व अहिल्या यांच्या पोटी, वेणीमाधव आणि विश्वनाथ या दोन सुपुत्रांच्या पाठोपाठ बुधवार, दि. १६-८-१८४८ रोजी जन्मास आलेला तिसरा पुत्र म्हणजे ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य. ‘श्रीगुरुलीलामृत’ ग्रंथाद्वारे श्रीस्वामींच्या लीलाचमत्कारांचे वर्णन करणारा हा सत्पुरुष. या घटनेची ग्वाही पुढे तत्कालीन सिद्धसत्पुरुष श्रीमाणिकप्रभू यांनीदेखील दिली होती. एके समयी माणिकप्रभूंच्या दर्शनास विश्वनाथ रावजी वैद्य गेले असता प्रभूंनी तिथे उपस्थित असलेल्या श्रीस्वामींच्या चरणांवर विश्वनाथ यांस घालून, ‘‘तुमचा धाकटा बंधू वामन, या स्वामींचे गुणवर्णन करणारा ग्रंथ लिहून सत्पुरुषपदास पोहोचेल व ब्रह्मनिष्ठ होऊन गुरुमार्गाचे वैभव वाढवेल’’ असे भाकीत वर्तवले. माणिकप्रभूंचे आशीर्वचन घेऊन विश्वनाथ वामोरीस परतले आणि श्रीस्वामींनी दिलेली प्रसादमाला ‘बाल’वामन याच्या गळ्यात घालून, घडलेला प्रसंग मातापित्यांस सांगितला.
वामोरी येथे वास्तव्यास असलेल्या वामनबुवांनी मराठी ‘सहावी’पर्यंत शिकून तिथेच मदतनीस शिक्षकाची नोकरी केली. नित्यकर्मासोबतच वडीलबंधूंच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे वेदाध्ययन सुरू होते. सत्संगाची आवड असल्याने साधुसंत, साई, फकीर, यती, जंगम, संन्यासी, योगी, वेदांती, महंत या व अशा अनेकांशी वामनबुवांचा परिचय होत गेला. परंतु चित्तास स्थिरता नव्हती. पुढे वडील रावजी निवर्तल्यावर बुवांनी धुळ्यास कलेक्टर कचेरीत नोकरी केली आणि इंग्रजी ‘पाचवी’पर्यंतचा अभ्यास केला मात्र धुळे मुक्कामी प्रकृतीत बिघाड झाल्याने बुवा पुन्हा वामोरीस परतले. पुढे त्यांनी नगरच्या ‘वृत्तवैभव’ छापखान्यात लेखकाची नोकरी पत्करली. याचदरम्यान त्यांना अक्कलकोटच्या श्रीस्वामीमहाराजांविषयी समजले, पुढे नोकरीनिमित्त पुणे मुक्कामी असताना वामनबुवांना ‘‘तुला गुरू दत्तात्रेयस्वरूप स्वामी अक्कलकोटास दर्शन देतील’’ असा स्वप्नदृष्टांत घडला. बुवा लागलीच अक्कलकोटास रवाना झाले.
श्रीस्वामी समर्थांनी वामनबुवांस दत्तरूपाने दर्शन दिले आणि पयोनदीच्या तीरावर उपदेश करून, नामसाधना ध्यानादी विधीसह सांगून त्यांच्यावर ‘अवधूतगीता’ फेकली व म्हणाले, ‘‘आमची नोकरी कर, ब्रह्मनिष्ठ होशील.’’ वामनबुवांचा कायापालट झाला. पुढे श्रीस्वामींनी गाणगापुरास जाऊन ‘गुरुचरित्रा’चा सप्ताह करण्याचीही बुवांना आज्ञा केली. श्रीस्वामींच्या दीर्घ सहवासामुळे बुवांची चित्तवृत्ती स्थिर झाली, मनाची तळमळ निमाली, मात्र दुर्दैवाने पुढे त्यांच्या शारीरिक दुखण्याने उचल खाल्ली.
सन १८७६ पासून वामनबुवांची प्रकृती एकाएकी बिघडली. मूत्रकृच्छ, खोकला, आमांश, संधिवात, शरीरदाह, नेत्ररोग, मूळव्याध असे रोग उद्भवले. अनेक लौकिक उपाय, उपचार केले परंतु रोग शमेना. शारीरिक दुःख पराकोटीचे झाले. बडोदा मुक्कामी असलेले वामनबुवा बेचैन झाले. प्राणायाम करून जलसमाधी घेण्याचे ठरवून मध्यरात्री वामनबुवांनी निश्चयपूर्वक सुरसागर तलावात उडी टाकली. इतक्यात दयाघन अक्कलकोटस्थ श्रीस्वामी समर्थ तिथे प्रत्यक्ष प्रकट झाले आणि वामनबुवांचा हात धरून त्यांना वर काढले. अतिशय रागाने वामनबुवांच्या श्रीमुखात भडकावून श्रीस्वामी म्हणाले, “शहाण्या गाढवा! आयुष्य असून का मरतोस? देहप्रारब्ध कर्मक्षय होईपर्यंत तुझे प्रारब्ध तुला भोगलेच पाहिजे! सहज समाधी सोडून जलसमाधी कसली घेतोस? हेच काय ब्रह्मज्ञान कळले? दुःखाने का कुणी प्राणत्याग करते?’’ असे रागावून आणि तद्नंतर प्रेमाने समजावून त्यांना घरीदेखील पोहोचवले. श्रीस्वामी समर्थांचा हस्तस्पर्श होताच वामनबुवांचा आजार पुरता बरा झाला. वामनबुवा खडखडीत बरे झाले. पुढे वामनबुवांचा कायमस्वरूपी मुक्काम बडोदा येथे शंकरराव पट्टणकर यांच्या घरी झाला. येथील वास्तव्यामध्ये त्यांच्या हातून घडलेले अलौकिक कार्य म्हणजे श्रीस्वामी समर्थ संप्रदायासाठी प्रातःस्मरणीय असलेल्या ‘श्रीगुरुलीलामृत’ ग्रंथाची निर्मिती! ५५ अध्याय आणि ९७५७ ओव्यांमधून वामनबुवांनी श्रीस्वामींचे चरित्र लिहिले आणि श्रीस्वामींनी रावजीबुवा यांना दिलेली ग्वाही प्रत्यक्षात साकारली.
ग्रंथलेखनाच्या पूर्ततेनंतर मात्र वामनबुवांनी १७ मार्च १९०१ रोजी अकल्पितरीत्या संन्यास घेतला आणि अवघ्या आठवडाभरातच २५ मार्च रोजी ‘अद्वैतानंद’ हे नाव धारण केलेला हा निस्सीम स्वामीभक्त ‘समाधिस्थ’ झाला. ब्रह्मनिष्ठ वामनबुवांची समाधी बडोदा येथे असून त्यांच्या आठवणी अर्थात ‘श्रीगुरुलीलामृत’ ग्रंथाचे मूळ हस्तलिखित, श्रीस्वामी पादुका आणि वस्त्र आदी अमूल्य प्रासादिक वस्तू शंकरराव पट्टणकर यांच्या राहत्या घरी (श्रीदत्तमंदिर, गेंडीगेट, मांडवीनजीक, बडोदे) आजही जतन केलेल्या पाहावयास मिळतात.