प. प. कृष्णानंद सरस्वती
दत्त संप्रदायातील सत्पुरूष
प. प. कृष्णानंद सरस्वती (काशीकर स्वामी)
जन्म: ज्ञात नाही.
आई/वडिल: ज्ञात नाही
गुरु: नारायण स्वामी.
नाव: संन्यासा नंतर नाव कृष्णानंद सरस्वती.
समाधी: फाल्गुन वद्य ७ शनिवार१७४९.
विशेष: 'अज्ञान तिमिर दीपक' वेदान्त ग्रंथ.
आदर्श गुरू सेवक म्हणून प्रसिद्ध असलेल्या संदीपक, अरुण उपमन्यु इ. आदर्श शिष्यांच्या यादीमध्ये कृष्णानंदांचे नाव आवर्जून घालण्याएवढी प्रखर गुरूनिष्ठा त्यांच्या ठायी जन्मजात होती. म्हणून नरसोबावाडीतील तपोनिधिच्या मालिकेत त्यांचे नाव आदर्श गुरू सेवक म्हणून आदराने घेतले जाते.
गुरु हेच अंतिम सत्य आहे. ह्या तत्त्वाचा अंगिकार करून काया, वाचा, मनाने अष्टौप्रहर गुरुंची सेवा करणारे हे स्वामी गुरुस्वरूप झाले. त्यांच्या कृतार्थ जीवनाचा महत्त्वाचा कालावधी श्रीक्षेत्री वाडीतच झाल्याने त्यांचे वाडीवर निस्सीम प्रेम होते. गुरुकृपेने महापुरुषांच्या सत्संगाने अनेक यात्रा सविधान पायी केल्या. नारायण स्वामींच्या कृपेने कडकडीत वैराग्य निर्माण करून ते ज्ञानाधिकारी बनले. ब्रह्मचर्यातूनच त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला. त्यांची धर्मनिष्ठा, शास्त्रनिष्ठा, गुरुनिष्ठा ह्या निष्ठात्रयीला प्रसन्न होऊन आपल्या आनंद साम्राज्यांवर विराजमान करून नारायणस्वामींनी गुरूसेवा हे साधन सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवून दिले. त्यांच्यासारखी गुरुसेवा करण्यास कोणीही समर्थ नव्हते. दत्तसंप्रदायामध्ये ‘गुरुसेवेस’ अनन्यसाधारण महत्त्व आहे. संन्यासधर्माचे पालन करुन गुरुपूजा, गुरुस्तुती, गुरुस्मरण करुनच गुरुरूप बनले.
प.प.कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराजांची समाधी नारायण स्वामींचे समाधीला लागुनच आहे. ब्रम्हचर्यापासूनच संन्यास दीक्षा आणि गुरूंच्या सानिध्यात राहून श्रीदत्त व गुरुसेवा केली गुरु शिष्य संवादात्मक ग्रंथ लिहून सामान्य लोकांना तत्वबोध व्हावा या उद्देशाने त्यांनी ‘अज्ञान तिमिर दीपक’ नावाचा वेदान्त रहस्य प्रतिपादक ग्रंथ संस्कृतमध्ये लिहून त्यात वेदांत रहस्याची उकल केली आहे. ईश्वर प्राप्तीचा मार्ग शुद्ध व सुबोध करून सांगितला आहे.
असे अखंड सेवा करणारे श्री कृष्णानंद स्वामी गुरुकृपेने याचि देही यांची डोळा मुक्तिचा सोहळा पाहून शके १७४९ फाल्गून व ॥७ शनिवारी प्रात:काली गुरुचरणी लीन झाले. कृष्णानंद सरस्वती परंपरागत ५५० वर्षे दत्तगुरुची अखंड सेवा करणाऱ्या पूजक मंडळींच्यासाठी प्रेरणाकेंद्र आहेत. त्यांनी केलेल्या आदर्श गुरुसेवेसारखी सेवा सर्व दत्तभक्तांकडून त्यांनी करून घ्यावी हेच त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना !
नारायण स्वामींचे एकनिष्ठ शिष्य म्हणून व गुरु शिष्यांच्या उत्कट प्रेमाचे प्रतीक म्हणून नारायण स्वामींच्या मंदिराच्या डाव्या बाजूला श्री कृष्णानंद स्वामींच्या सुंदर पादुका स्थापन करण्यात आल्या. स्वामींचे पूजक मंडळींवर अत्यंत प्रेम होते. आजही मनोहर पादुकांचे त्रिकाळ अर्चन केले जाते.
N/A
References : N/A
Last Updated : June 18, 2024
TOP